भेटा 26 वर्षाच्या ख्यातनाम चित्रकाराला, जो सध्या गोव्यातल्या भिंती रंगवतोय...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 08:00 AM2019-11-21T08:00:00+5:302019-11-21T08:00:04+5:30
ख्यातनाम चित्रकार एफ. एन. सूझा यांच्या भन्नाट नातवाबरोबर, सोलोमनबरोबर गोव्याच्या साळगावात फिरताना..
रमेश घाडी
जेरूसलेम. तेथील महान येशुदा मार्केट संध्याकाळी बंद झाल्यावर पुन्हा त्या रस्त्यावर हळूहळू गर्दी जमू लागते, ही गर्दी विंडो शॉपर्सची नसून चित्रकलाप्रेमींची असते.
या रस्त्यावरील सगळ्या दुकानांच्या शटर्सवर एका अवालिया स्ट्रीट चित्रकाराने एक दोन नव्हे तर तब्बल दोनशे तीस स्प्रे पेंटिंग्ज काढलेली आहेत.
दर संध्याकाळी इथे दुनियाभरातील पर्यटक तसेच स्थानिक, स्प्रे पेंटिंग्ज आवडणार्या चित्रप्रेमींचा गोतावळा जमतो.
ही चित्र काढणारा अवालिया चित्रकार आहे सव्वीस वर्षाचा सोलोमन सूझा.
लंडनमध्ये जन्मलेला हा सोलोमन, म्हणजे महान जगप्रसिद्ध भारतीय चित्र कार फ्रान्सिस न्यूटन सूझा यांचा नातू. म्युरल, ग्राफिटी, स्प्रे पेंटिंग चित्नकार सोलोमन सूझालाही आपण चित्रकार फ्रान्सिस न्यूटन सूझांचा नातू आहोत याचा फारच अभिमान आहे.
1924 साली जगप्रसिद्ध चित्रकार फ्रान्सिस न्यूटन डिसौजा यांचा जन्म गोव्यातल्या सोनारभाट साळगाव येथे झाला. फ्रान्सिस न्यूटन सूझा, ज्यांना गोव्यातलं चित्रकारी जगत यफ यन म्हणून ओळखतं, यांचे वडील ते लहान असतानाच वारले. टेलरिंगचं काम करणारी त्यांची आई त्यांना घेऊन मुंबईला गेली. मुंबईत यफ यनचं शिक्षण सेंट झेव्हियर स्कूलात झालं. शाळेत टॉयलेटच्या भिंतींवर ग्राफिटी, न्यूड चित्र काढताना पकडलेल्या यफ यनला शाळेतून काढून टाकण्यात आलं. दुसर्यानं वाकडं काढलेलं चित्र मी नीट काढत होतो, असा यफ यनचा दावा होता, पण त्याचं म्हणणं कोणीच ऐकलं नाही.
त्यांनी मुंबईच्या जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये आपलं चित्रकलेचं शिक्षण घेतलं.
स्वातंत्र्यानंतरच्या कालावधीत ज्या भारतीय चित्नकारांनी जागतिकमान्यता मिळवली त्यात यफ यन अग्रेसर होते. ते प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुप ऑफ बॉम्बेचे संस्थापक सदस्य होते. 1949 साली ते लंडनला गेले. 1967 साली त्यांनी आपलं बस्तान न्यू यॉर्कला हलवलं. आपल्या हयातीत जरी त्यांच्या चित्रनी फारसा पैसा कमावला नसला तरी त्यांच्या मरणोत्तर चित्रची लोकप्रियता फारच वाढली. त्यांच्या काही चित्नांनी तर सगळे जागतिक रेकॉर्ड्स मोडून टाकले. जगातल्या सगळ्या नावाजलेल्या म्युझियम आर्ट गॅलरीत आता त्यांच्या चित्रचा समावेश आहे.
यफ यनची मुलगी केरन सूझा कोहन; ती स्वतर् एक प्रसिद्ध पेंटर आहे, हा तरुण चित्रकार सोलोमन तिचाच मुलगा आहे. सव्वीस वर्षाच्या सोलोमनला त्याच्या आई व आजोबाकडून चित्रकलेचा वारसा मिळालाय.
‘माझा जन्मच आर्ट स्टुडिओत झाला, बालपण आईची अन् आजोबाची चित्र पाहण्यात गेलं, मी चित्नकार व्हायचं कधी ठरवलं ते पण आठवत नाही!’ असं तो हसून सांगतो.
आजोबाप्रमाणे त्यालाही अकराव्या वर्षी भिंतींवर काढलेल्या ग्राफिटीमुळे शाळेतून काढून टाकण्यात आलं. दुसर्या दिवशी त्या अकरा वर्षाच्या बंडखोरानं स्प्रे पेंट घेऊन शाळेची पूर्ण भिंतच रंगवून टाकली. गवयाचं पोरदेखील सुरात रडतं असं म्हणतात, सोलोमोनचं पण तसंच झालं. त्याचं ते स्प्रे पेंटचं रंगकाम पुष्कळ लोकांना आवडलं. आणि मग त्यानं पाठी वळून बघितलं नाही. भिंती, शटर्स. तो रंगवतच गेला.
कुठल्याही प्रकारचं चित्नकलेचं प्रशिक्षण न घेतलेला सोलोमन हा सेल्फ टॉट आर्टिस्ट आहे. स्वयंप्रशिक्षितच.
पंधराव्या वर्षीच त्याच्या ग्राफिटी, म्युरल्सवर, स्प्रे पेंटिंग्जवर चर्चा व्हायला लागली.
सतराव्या वर्षी सोलोमन इंग्लंड सोडून इस्नयलमध्ये स्थायिक झाला. त्याचा महाने यहुदा प्रोजेक्ट फारच प्रसिद्ध झाला. महाने यहुदाच्या पारंपरिक बाजाराच्या दुकानांच्या शटर्सवर त्याने योसी बनाई, रोसेन बार्र, डेव्हिड बेन गिरियन, अलबर्ट आईनस्टाईन, महात्मा गांधी अशी ऐतिहासिक प्रभूतींची, लेखक, विचारवंतांच्या 230 स्प्रे पेंटिंग्जनी पुर्या मोहोल्ल्याची आर्ट गॅलरी करून टाकली.
सोलोमनची आई आपल्या जीवनात एकदाच त्यांच्या वडिलांच्या गावी साळगावी येऊन गेली होती. सोलोमनला मात्र ती गोव्याच्या, साळगावच्या एक्सायटिंग ट्रिपबद्दल बालवयात खूप वेळा सांगायची. त्याला पुष्कळदा वाटायचं एकदातरी आमच्या पूर्वजांच्या भूमीला भेट द्यावी. ज्या सुंदर भूमीने त्याच्या जगप्रसिद्ध चित्नकार आजोबाला कलेची देणगी दिली ती भूमी पहावी. तिथल्या जनजीवनाविषयी त्याच्या मनात नेहमीच जिज्ञासा असायची.
***
विवेक मिनेझिस. एक लेखक, पत्रकार , सेरेंडीपिटी आर्ट फेस्टिव्हलचा क्युरेटर साळगावचाच; पण बर्याच वर्षापासून इंग्लंडमध्ये स्थायिक झालेला. त्याच्या नजरेला एक पेंटिंग पडलं. आपल्या गावावर आत्यंतिक प्रेम असलेला हा इसम चक्रावून गेला. ते पेंटिंग होतं साळगाव चर्चच्या परिसराचं. अन् पेंटर होता जगप्रसिद्ध मोर्डनिस्ट पेंटर फ्रान्सिस न्यूटन सूझा. साळगावचा पुत्र .
विवेक मिनेझिससाठी तो एक अत्यानंदाचा क्षण होता.
दीड-दोन महिन्यांनंतर त्याच्या कानावर सोलोमनचीपण कीर्ती पडली. त्या दोघांची ओळख झाली. विवेक मिनेझिसने जेव्हा जेरूझलेमातील महाने यहुदाची सोलोमनची स्प्रे पेंटिंग्ज पाहिली तेव्हा तर तो पार वेडावून गेला. त्याला सोलोमनने आपल्या पूर्वजांच्या गावी, गोव्यात असं काहीतरी करावं असं वाटू लागलं. विवेकने सोलोमनला भारतात सेरेंडीपिटी फेस्टिव्हलला येण्याचं आमंत्नण दिलं. सोलोमनलाही वाटलं आपल्या आजोबाच्या जन्मगावाला भेट देण्याचं आपलं फार फार वर्षापूर्वीचं स्वप्न पूर्ण होणार!
साळगावातपण बातमी पसरली. त्यांच्या आवडत्या सेलेब्रिटी चित्रकाराचा नातू तोही चित्नकारच आपल्या आजोबाच्या गावी येणार म्हणून गावची मंडळी सुखावून गेली.
परवाच्या दिवशी हेता पंडिताच्या घराच्या भिंतीवर गावातल्या सगळ्यांच्या आवडीच्या साक्रुलाचे स्प्रे पेंटिंग करून सोलोमनने आपल्या मोहिमेची सुरुवात केली.
त्यानंतर त्यानं साळगावच्या 90 वर्षाच्या सालिगाव इन्स्टिटय़ूट भिंतीवर अँथनी डिमेलो जे बिसीसीआयचे संयुक्त संस्थापक तसेच नामवंत लेखक होते त्यांचं स्प्रे पेंटिंग काढलं.
सोलोमनचा हसतमुख चेहरा, साधेपणाने सगळ्यांशी मिसळून वागण्याचा स्वभाव, त्यामुळं त्यानं सगळ्या साळगाववासीयांना जिंकून घेतलंय.
तो पेंटिंग करताना बोलतो, काही प्रश्नांची उत्तरे देत राहतो. कोणी प्रेमाने आणून दिलेलं सॉफ्ट ड्रिंकपण पिऊन टाकतो. जुनी स्कूटर घेऊन गावातील गुरांना, भटक्या कुत्र्यांना कट मारत बिनधास्त फिरतो. कोणी जेवणाचं आमंत्नण दिल्यास आपुलकीने जातो.
‘आय अॅम प्युअर व्हेजिटेरियन’-असं न संकोचता सांगतो.
तुझ्या आजोबाची काहीतरी आठवण सांग ना.?
-असं मी काल त्याला सहज म्हटलं.
तर तो सांगतो, ‘मी चार वर्षाचा होतो. ग्रँण्डपाने आम्हाला एका चांगल्या रेस्तरांत जेवायला नेलं, त्यांच्याबरोबर काही चित्नकार मित्नपण होते. त्यांना खेकडे आवडायचे, त्यांनी एक खेकडय़ाची मोठी नांगी माझ्या प्लेटमध्ये टाकली. माझ्याने प्रयत्न करून ती खेकडय़ाची नांगी कशीच फुटेना. मी भोकाड पसरलं. सगळेजण हसायला लागले. आजोबांनी मला उचलून आपल्या मांडीवर घेतला, माझ्या कपाळाचा मुका घेतला व आपल्या हातांनी ती खेकडय़ाची नांगी मला भरवली. आय स्टील रिमेंबर दॅट इंडियन ग्रॅण्डफादरली टच.
-माझ्या स्टाइलवर माझ्या आजोबांचा आणि आईचा प्रभाव आहे.!
-तो शांतपणे सांगत असतो.
म्हणतो, गोव्याबद्दल, माझ्या आजोबाच्या गावाबद्दल जी माझी अपेक्षा होती त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने हा प्रदेश चांगला आहे. इथला निसर्ग आणि माणसे दोन्ही सुंदर आहेत!
त्याच्या शब्दांतील प्रामाणिकपणा त्याच्या निष्पाप नजरेतून जाणवतो.
आपल्या दीड महिन्याच्या वास्तव्यात तीस तरी स्प्रे पेंटिंग्ज करण्याचा त्याचा मानस आहे. कन्टेम्पररी आणि इतिहासातील माणसं असे दोन्ही विषय तो हाताळणार आहे.
सोलोमन साळगावनंतर पणजीत व इतर अनेक गावांतही चित्रं काढणार आहे.
सेरेंडीपिटी फेस्टिव्हल ऑफ गोवा या उपक्र मामुळे साळगावकरांना आपल्या जगप्रसिद्ध लाडक्या यफ यन सूझाच्या नातवाचं तोंड बघायला मिळालं. सोलोमनचं आपल्या आजोबाच्या गावाला भेट देऊन गावाच्या नाक्यावर त्याचं स्प्रे पेंटिंग पोट्रेट करण्याचं कितीतरी वर्षाच स्वप्न साकार झालं.
ते स्वप्न घेऊनच हा चित्नकार अवलिया अल्युमिनिअमची शिडी, हातात रंगाचा स्प्रे कँन घेऊन पेंटिंग्ज करतो. त्याची तर्हाच वेगळी आहे. तोंडावर खेळकर भाव, हातात कॅनमध्येच थांबून रेघोटय़ा.दोन-अडीच तासात पेंटिंग पूर्ण.
आता उद्या कोणाची भिंत? कोणाचं पेंटिंग? .. असं आमच्या गावातील साधी माणसं विचारीत राहतात.
सोलोमन हसत उत्तर देत राहतो. चित्र काढत असतो.