BHNS चा दादामाणूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 03:50 PM2018-06-15T15:50:09+5:302018-06-15T15:50:09+5:30

दहावी-बारावीत त्याला अगदीच जेमतेम मार्क होते; पण आज तो वन्यजीव संशोधन क्षेत्रात मोठी भरीव कामगिरी करतो आहे. हे कसं साधलं?

Meet BHNS Varadgiri to know more about loving nature | BHNS चा दादामाणूस

BHNS चा दादामाणूस

googlenewsNext

-ओंकार करंबेळकर

उच्चशिक्षण, संशोधन, तज्ज्ञ असे शब्द ऐकले की हे सगळं कोण्या दुसर्‍या लोकांसाठी आहे, आपण अगदी साधे आहोत, आम्हाला कसं बरं एखाद्या विषयात संशोधन करायला मिळणार असं वाटतं. पण परीक्षेत मिळालेले मार्क्‍स, तुमची आर्थिक पार्श्वभूमी  यांचा तुमच्या भविष्यातील यशाचा काहीही संबंध नसतो, केवळ योग्य दिशेनं केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांच्या जोरावर आपण यशस्वी होऊ शकतो याचं उत्तम उदाहरण वन्यजीव संशोधन क्षेत्र.  आणि ते कसं याची कहाणी वरददादा सांगतात. हा  आपला दादाच आहे. होय दादाच. वन्यजीव आणि पर्यावरण या क्षेत्रांतील संशोधनामध्ये वरद गिरी यांचं नाव आदरानं घेतलं जातं. त्यामुळे केवळ वयामुळे नाही तर त्याच्या कामामुळेही तो एकदम दादामाणूस झाला आहे. या क्षेत्रात आज नव्यानं येणार्‍या मुला-मुलींसाठी मार्गदर्शन करणारा आणि संशोधनाच्या कामातून स्वतर्‍चा वेगळा ठसा निर्माण करणार्‍या माणसाची गोष्ट एकदम भन्नाट आहे.
    बेळगाव जिल्ह्यातल्या अंकली नावाच्या गावापासून त्याचा सगळा प्रवास सुरू झाला. अगदी साध्या घरातल्या वरदचं शिक्षण अंकली, कर्‍हाड, कोल्हापूर अशा विविध ठिकाणी झालं. शिवाजी विद्यापीठामध्ये प्राणिशास्रमध्ये  मध्ये एम.एस्सी. करेर्पयत त्याचं काय करिअर करायचं हे ठरलं नव्हतं. पण सुदैवानं त्याला हेमंत धमके, सचिन माळी आणि अनिल शिंगारे यांच्यासारखे प्राणिशास्रवर मनापासून प्रेम करणारे मित्र मिळाले. ते त्याचे मित्र मार्गदर्शक असे सगळेच काही होते. प्राणिशा हे विद्यापीठातील वर्गाबरोबर बाहेरही शिकायचं शास्त्र आहे हे या सगळ्या मुलांना मनापासून पटलेलं होतं. त्यामुळे विद्यापीठासह आजूबाजूच्या प्रदेशातील झाडांचं, प्राण्याचं निरीक्षण करण्याची सवय या सर्वाना लागली. मित्रांबरोबरच प्रत्येक निर्णयाच्या वेळेस मार्गदर्शन करायला, मदतीसाठी त्याला सत्यजित माने हे मार्गदर्शक भेटले. या सर्वाच्याबरोबर बिनभिंतीच्या शाळेत गेल्यावर वरदला आपण यामध्येच पुढचं करिअर करू शकतो हे लक्षात आलं. पक्षीनिरीक्षण आणि फुलपाखरांच्या अभ्यासापासून सुरू झालेली त्याची आवड एम.एस्सीनंतर सापांच्या अभ्यासार्पयत सुरू झाली. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस)मध्ये काम सुरू केल्यानंतर त्यानं साप आणि सरपटणार्‍या प्राण्यांचा अभ्यास सुरू केला. बीएनएचएसमध्ये विविध प्रजातींची झालेली ओळख, ग्रंथालयात झालेले वाचन, विविध क्षेत्रांतील लोकांच्या झालेल्या भेटी यामुळे सरपटणार्‍या प्राण्यांच्या जगातील भरपूर माहिती त्याला मिळाली. बीएनएचएसमध्ये अशोक कॅप्टन यांनी त्याला टॅक्सोनॉमी कशी करायची शिकवली. विठोबा हेगडे यांनी बेडूक कसे पकडायचे आणि ओळखायचे हे शिकवलं तर समीर किहिमकर यांनी पाली, सरडे कसे ओळखायचे हे शिकवलं. असं त्याचं हळूहळू शिक्षण होत गेलं. वरद स्वतर्‍ला आजही विद्यार्थीच म्हणवतो. आजही त्याची कोणतीही माहिती आपल्यापेक्षा लहान-मोठय़ा कोणत्याही वयाच्या व्यक्तीकडून शिकण्याची त्याची तयारी असते आणि तो तसे शिकतोही. हे सगळं शिक्षण, संशोधन सुरू असताना त्याच्यामागे त्याचे आई-वडील ठाम उभे होते. वरद म्हणतो, माझे आई-बाबा एकदम साधे होते, त्यांना मी नक्की काय संशोधन करतो याची कल्पनाही नसावी. पण वेळोवेळी त्यांनी मी अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नये याची जाणीव करून द्यायचे, परिस्थिती नसतानाही आर्थिक मदत करायचे. वर्तमानपत्रात, मासिकांमध्ये लेख, मुलाखती, फोटो प्रसिद्ध झाल्यावर आपला मुलगा काहीतरी चांगलं करत आहे हे त्यांना समजलं. पण आज जे संशोधन करता आलं, अभ्यास करता आला, आदर मिळतो तो केवळ त्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच.  वरदनं काम सुरू केलं तेव्हा त्याला वाटायचं आपण एखाद्या तरी प्रजातीच्या शोधामध्ये योगदान दिलं पाहिजे. पण आज वरदनं 40 प्रजातींच्या शोधांमध्ये सहभाग घेतला आहे, अनेक नव्या संशोधकांना मदत करून त्यांना या जगताची ओळख करून दिली आहे. त्याचे नाव 3 प्रजातींना देण्यात आलं आहे. 

डेंड्रेलाफिस गिरी, सनेनास्पीस गिरी, सीटरेडाक्टीलस वरदगिरी अशा या तीन सरपटणार्‍या प्राण्यांच्या जाती आहेत. वरद म्हणतो, मला दहावीत 48 टक्के गुण मिळाले होते, बारावीत 53 टक्के गुण मिळाले होते, शिक्षणाच्या प्रत्येक प्रवेशाच्या वेळेस माझा नंबर अगदी शेवटचा किंवा शेवटच्या मुलांमध्ये असायचा. आपण आयुष्यात काहीतरी मोठं करू शकू, असं तेव्हा स्वप्नातही वाटलेलं नव्हतं. पण शिक्षकांच्या आणि या क्षेत्रातल्या मित्रांचं अगदी आधीपासून मार्गदर्शन मिळाल्यामुळे हे साध्य झालं. भारत हा जैवविविधतेने संपन्न असा देश आहे. त्यामुळे येथे संशोधनासाठी भरपूर वाव आहे, या क्षेत्रात तरुण मुलं मोठय़ा संख्येने येतही आहेत. 
नव्यानं या क्षेत्रात येणार्‍या मुलांना वरद सांगतो, वन्यजीव संशोधन क्षेत्रामध्ये सर्व काही संगणकाच्या क्लीकवर होत नाही. तुम्हाला घराबाहेर पडून संशोधन करावं लागेल, मेहनत करावी लागेल. इथे मेहनतीला पर्याय नाही. योग्य वेळ आणि कष्ट केल्याशिवाय कोणत्याही निष्कर्षार्पयत पोहचता येत नाही. तुम्ही चांगल्या प्रकारे काम करत असाल मात्र तुमच्याकडे चिकाटी नसेल किंवा तुम्ही फारच अधीर असाल तर या क्षेत्रामध्ये फार काळ राहाता येत नाही. वैयक्तिक गौरवासाठी तुम्हाला या क्षेत्रात यायचे असेल तर तुम्ही परत विचार करायला हवा. सोशल मीडियावर एखाददोन प्रजाती ओळखता येणं म्हणजे तुम्ही या क्षेत्रातले तज्ज्ञ होणं नाही. सगळ्यांनी कामासाठी योग्य वेळ देणं, संशोधन करणं सध्या उपलब्ध असलेल्या ज्ञानात भर घालणं हा एकमेव योग्य मार्ग आहे असं तो स्पष्टपणे सांगतो. 

onkark2@gmail.com 

Web Title: Meet BHNS Varadgiri to know more about loving nature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.