कैसाय बंटाईत? -भेटा धारावीतल्या जिगरबाज तारुण्याला!

By meghana.dhoke | Published: October 17, 2019 07:30 AM2019-10-17T07:30:00+5:302019-10-17T11:31:30+5:30

धारावीतल्या कामराज हायस्कूल आणि माटुंगा लेबर कॅम्पच्या अड्डय़ांवर बसून ‘लोकमत दीपोत्सव’ने शोधून आणली आहे एक ‘तरुण’ कहाणी! ..त्याबद्दल!!

meet dharavi rappers & hip hoppers, a new generation from Dharavi | कैसाय बंटाईत? -भेटा धारावीतल्या जिगरबाज तारुण्याला!

कैसाय बंटाईत? -भेटा धारावीतल्या जिगरबाज तारुण्याला!

Next
ठळक मुद्देही पोरं धारावीत राहातात, धारावी हे त्यांचं घर आहे. ती सांगतात, ‘आय एक्झिस्ट’! मी आहे. मी असणार आहे.

-मेघना ढोके

गल्ली बॉय तुम्ही पाहिला असेल. नसेलही.
पण या दोस्तांना भेटा.
ही पोरं म्हणजे गल्ली बॉयमधला मुराद नाहीत.
असतील त्याच्याच वयाचे किंवा काहीसे लहानही. विशीतले जेमतेम. मुरादइतकं इन्स्टण्ट यशही त्यांच्या वाटय़ाला येत नाही, आणि आपण मुरादसारखं झटकेपट पॉप्युलर व्हावं असंही काही त्यांच्या मनात नाही.
मुळात त्यांची कुणाशी स्पर्धा नाही, ना त्यांना कुणाच्या पुढे जायचंय, ना त्यांना काही सिद्ध करायचं आहे.
त्यांना फक्त सांगायचं आहे, ठणकावून. 
‘आय एक्झिस्ट’! मी आहे. मी असणार आहे.
तुम्ही असाल किंवा नसाल, मोठे असाल किंवा श्रीमंत असाल, मध्यमवर्गीय असाल नाही तर सोफिस्टिकेटेड असाल, स्कायस्क्रॅपर्समध्ये राहत असाल, सबर्बमध्ये राहत असाल नाहीतर सोबोमध्ये. तुम्ही कुणीही असाल, आम्ही तुम्हाला मोजतच नाही जा.
आणि तुम्ही आम्हाला मोजावं, आम्हाला काही भलं म्हणावं, दया दाखवावी किंवा सहानुभूती दाखवावी किंवा आमचं काही भलं करावं अशी अपेक्षाही नाही आमची!
तुम्ही तुमच्या जगात सुखात राहा, नाहीतर खड्डय़ात जा. वी डोण्ट केअर!
व्हाय?
बिकॉज वी आर लाइक धीस.
आम्ही असेच आहोत आणि असेच राहणार आहोत.
- कोण ही मुलं? कुठं राहतात? अशी उद्धट का बोलतात?
- तर ती उद्धट नाहीत, स्पष्ट बोलतात. बेदरकार नाहीत, ते बेधडक आहेत. जोशात आहेत, बेहोशीत नाहीत!
ते राहतात धारावीत.
धारावी म्हटलं की काय येतं डोळ्यासमोर? आशिया खंडातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी. सर्वत्र दरुगधी. घाण. गल्लीबोळ. कलकलाट. आणि स्लमडॉग मिलेनिअरसह तमाम हिंदी सिनेमात पाहिलेलं वस्तीचं रूप.
हे सारंच डोळ्यासमोर येतं कारण धारावी म्हणजे हेच सगळं असं माध्यमांनी आजवर ठसवलं आहे!
पण हे म्हणजे धारावी नाही!!
मग धारावी काय आहे?
तर धारावी हे या तरुण मुलांचं घर आहे आणि आपण इथं राहतो याचा अभिमानच आहे, असं ते आता सार्‍या जगाला ठणकावून सांगत आहेत.
त्यांच्या मनात अंगार, शब्दात आग आहे आणि अंगात लय आहे..
ते आहेत रॅपर्स. हिपहॉपर्स.
आणि त्यांचा पत्ता आहे, मुंबई 17.
धारावीतल्या 70 फूट रोडवर कामराज हायस्कूलसमोर जाऊन उभं राहिलं किंवा माटुंगा लेबर कॅम्पमध्ये लावलेल्या ‘आय लव्ह धारावी’ या मोठय़ा बोर्डसमोर बैठकच मारली तर.
- तर कदाचित भेटतात ही मुलं!
पण त्यांना भेटणं सोपं नाही, कारण ते फार बिझी असतात. आपापल्या फोनमध्ये नजर घालून आणि कानात हेडफोन किंवा इअरफोनच्या वायरी घालून जगभरातलं रॅप ऐकत असतात. आपल्याच तंद्रीत असतात. एकेका शब्दाचा, एकेका बीटचा तासन्तास खल करतात.
कुणी भेटलंच ओळखीचं तर आवाज देतात, ‘कैसाय बंटाईत? क्या सीन है?’
त्यावर पलीकडचाही. ‘क्या मापूस’ म्हणून नमस्कार घालतो आणि जो तो आपापल्या कामाला लागतो.
बंटाईत, मापूस ही खास धारावीतली भाषा, या शब्दांचा अर्थ होतो दोस्त!
आणि हे दोस्त आता हिपहॉपचा हात धरून आपल्या जगण्याला शब्द देत आहेत. त्यांच्यात रॅपर्स आहेत, हिपहॉपर्स आहेत, बी-बॉयर्स आहेत आणि बीट बॉक्सर्सही आहेत.
जगभरात हिपहॉपच्या जगात काय चाललंय याची त्यांना खडान्खडा माहिती आहे. ते बोलतात उत्तम इंग्रजी, मराठी, हिंदी, कानडी, तमीळ, तेलुगू आणि यासगळ्याची मिळून अशी बनलेली त्यांची अशी खास धारावीची भाषा.
त्यांच्या या खास घडवलेल्या भाषेला मीडियावाले धारावी स्लँग म्हणतात हे या पोरांच्या डोक्यात जातं. 
ते म्हणतात तुमची ती भाषा आणि आमची ती स्लॅँग असं नाही चालणार. आम्ही येतो का तुमची भाषा सुधरवायला मग तुम्ही कोण आमच्या भाषेला आणि जगण्याला नावं ठेवणारे.?
या तरुण रॅपर्ससह धारावीतल्या तारुण्यानंही आता आपण झोपडपट्टीत राहतो याचा खल मनात बाळगणं सोडून दिलं आहे!
त्यांच्या आईवडिलांच्या पिढीत आपण गरीब, दुसर्‍यांच्या घरी राबणारे असं बिच्चारेपण होतं, या तरुण मुलांनी मात्र ठणकावून सांगायला सुरुवात केली आहे की, मुंबई चालते ती आमच्या कष्टांच्या जोरावर, आम्ही मेहनतीचं खातो, सव्र्हिस देतो, तुम्ही आम्हाला पैसे मोजता तर काही उपकार नाही करत, आम्ही नसलो तर हा मुंबईचा डोलारा डळमळेल!
ते राहतात एकदम फॅशनेबल, रंगवलेले केस, टॅटू, कमावलेली शरीरं, गॉगल्स आणि तोंडात मसालेदार तडकामारू भाषा.
आता त्याच भाषेत ते रॅप लिहू लागलेत.
आपली सुख-दुर्‍ख रॅपच्या भाषेत मांडत जगभरातल्या वंचित आणि कष्टकरी वेदनांशी स्वतर्‍ला जोडून घेत खर्‍या अर्थानं ग्लोबल होत आहेत.
रॅप ही त्यांची पॅशन आहेच, हिपहॉप श्वास आहे आणि त्याबळावर एक नवं जग त्यांना उभं करायचं आहे, जे त्यांना माणूस म्हणून स्वीकारेल. त्यांच्या जगण्याचा सन्मान करेल!
आणि तो सन्मान नवीन जग त्यांना देणार नसेल तर नव्या जगाचा भाग होण्याचीही त्यांची इच्छा नाही.
ते म्हणतात, हम अपनेमेंही एक दुनिया है!!
त्या त्यांच्या दुनियेच्या पोटात शिरून, त्यांच्याशी गप्पा मारून, त्यांच्या रॅपच्या तालाशी ताल मिळवून बरेच दिवस कामराज हायस्कूल आणि माटुंगा लेबर कॅम्पच्या अड्डय़ांवर बसून एक खास कहाणी ‘लोकमत दीपोत्सव’ने शोधून आणली आहे र्‍
मुंबई 17
या पत्त्यावर जा आणि अनुभवा तरुण धारावी रॅपर्सचं भन्नाट, रसरशीत आणि जहाल जिवंत जगणं!
  ‘दीपोत्सव’ या ‘लोकमत’च्या दिवाळी अंकात!


( लेखिका लोकमत वृत्तसमूहात मुख्य उपसंपादक आहेत.)
meghana.dhoke@lokmat.com

***************

अंकाविषयी अधिक माहिती 
deepotsav.lokmat.com


अंक कसा आणि कुठे मिळेल?
1. ऑनलाइन खरेदी र्‍ deepotsav.lokmat.com
2. व्हॉट्सअ‍ॅप मेसेज पाठवून प्रत मिळवा र्‍ 955-255-0080
3. ई-मेल र्‍ sales.deepotsav@lokmat.com
4. स्थानिक वृत्तपत्र विक्रेत्याकडे मागणी नोंदवा

Web Title: meet dharavi rappers & hip hoppers, a new generation from Dharavi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.