कायद्यावर बोट ठेवणारा पर्यावरणाचा वकील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 03:58 PM2018-07-12T15:58:25+5:302018-07-12T16:00:43+5:30

पर्यावरणासाठी नुसता कळवळा असून उपयोग नाही. त्यासाठी नियम माहिती हवेत, कायद्यानं भांडता यायला हवं. तेच करणारा एक दोस्त.

meet a environmental lawyer | कायद्यावर बोट ठेवणारा पर्यावरणाचा वकील

कायद्यावर बोट ठेवणारा पर्यावरणाचा वकील

Next

- ओंकार करंबेळकर
    

आपल्या आजूबाजूला होणारं प्रदूषण, आपल्याला जाणवतंही. ध्वनिप्रदूषण किंवा एखाद्या नदीमध्ये सोडल्या जाणार्‍या दूषित पाण्याबद्दल न्यायालयात खटला चालू असल्याचंही वाचतो. कधीकधी न्यायालयानं प्रदूषण करणार्‍या व्यक्तींना, उद्योगांना दंड ठोठावल्याचं आपण वाचतो. पर्यावरणाच्या र्‍हासावर आणि बदलांवर समाजातील काही सजग लोकांचे आणि पर्यावरणप्रिय वकिलांचे घारीसारखे लक्ष असते. या लोकांच्या धडपडीमुळेच न्यायालयार्पयत ही प्रकरणे जातात, दोषींना शिक्षाही होत असते.
    पुण्याच्या हर्षद गरूडचं कामही काहीसं अशाच स्वरूपाचं आहे. निसर्ग, झाडं, फुलपाखरं यांची ओळख त्याला अगदी लहानपणापासूनच होती. थोडं मोठं झाल्यावर सेव्ह टायगर मोहिमेची आणि आपल्या देशात झालेल्या वाघांच्या दयनीय स्थितीची माहिती समजली. आपल्या देशात वाघ अत्यंत धोक्यात आहेत हे त्याच्यासाठी एकदम अस्वस्थ करणारं होतं. वाघांबरोबर पर्यायानं इतर प्राणीही तितक्याच संकटात असल्याचंही त्याला पुस्तकांमधून, टीव्हीवरच्या कार्यक्रमांतून समजू लागलं. त्यामुळे प्राणी, पक्षी, फूलपाखरू यांच्यामधील त्याची रुची अधिकच वाढली. 
पुढे कायद्याचं शिक्षण घ्यायला सुरुवात केल्यानंतर पर्यावरण कायदे या विषयात काम करणार्‍या लोकांची संख्या कमी असल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यानं वकील झाल्यानंतर पर्यावरणाचे विषय हाताळायचे असं ठरवून टाकलं. कायद्याचं शिक्षण घेतानाच त्यानं भारतात गाजलेल्या महत्त्वाच्या पर्यावरण प्रकरणांचा अभ्यास सुरू केला, त्यातील विविध मुद्दय़ांबद्दलच्या शंकांचं निरसन करून वाचन सुरू ठेवलं. 


    वकील झाल्यानंतर त्याला पहिलाच खटला दोन हत्तींसाठी लढायला मिळाला. हा खटला चालविण्यासाठी कोणीच नसल्यामुळे 2008 साली त्यासंदर्भातील सर्व काम थंडावलं होतं. त्यामुळे तो पुन्हा गतिमान करण्यासाठी प्रयत्न करायचं हर्षदनं ठरवलं. प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांच्याबरोबर सुरुवातीचा काळ हा खटला चालवल्यानंतर त्याची सगळी जबाबदारी हर्षदने घेतली. या दोन हत्तींचा वापर भीक मागण्यासाठी केला जात होता. या हत्तींमधील एक हत्ती कजर्तजवळील एका स्टुडिओमध्ये बेकायदेशीररीत्या चित्रीकरणासाठी वापरला जात असल्याचंही समजलं. दोन्ही हत्तींची तब्येत अत्यंत खालावली होती. त्यात एका हत्तीचा मृत्यू झाला. दुसर्‍या हत्तीचा जीव वाचवण्यात मात्र हर्षद आणि इतर सहकार्‍यांना यश आलं. या जिवंत राहिलेल्या हत्तीला मथुरेच्या वाइल्ड लाइफ रेस्क्यू सेंटरमध्ये पाठवण्यात आलं. 
हर्षद म्हणतो, या खटल्यानं पर्यावरणीय खटल्यांचा चांगला अनुभव मिळाला, हुरूपही वाढला. कायदेशीर प्रयत्नांमुळे पर्यावरणाला मदत होऊ शकते ही कल्पना सुखावणारी होती.
 या दोन हत्तींप्रमाणे सोलापूरमध्ये नान्नज येथे माळढोक आणि इतर प्राण्यांना  एका फटाक्याच्या कारखान्यामुळे धोका निर्माण झाला होता. या खटल्यात राष्ट्रीय हरित लवादाने हा कारखाना बंद करण्याचे आदेश दिले. अशा अनेक खटल्यांमध्ये काम करण्याची संधी हर्षदला मिळाली.
    पर्यावरणाच्या संदर्भातील खटल्यांच्या बाबतीत, यामुळे विकासकामांना खीळ बसते असा आरोप केला जातो. हर्षद म्हणतो, भारतासारख्या विकसनशील देशांसाठी विकास नक्कीच गरजेचा आहे. मात्र त्यासाठी पर्यावरण आणि परिसंस्थेचा नाश करण्याची गरज नाही. मेट्रो ट्रेन, मोनोरेल सारखे प्रकल्प वृक्षतोड किंवा इतर प्रदूषणांच्या मार्गानी पर्यावरणाचं नुकसान करत असतील तर  थोडा विचार करण्याची गरज आहे. पर्यावरणाला पूरक अशी नीती ठरवून हे प्रकल्प तडीस नेले पाहिजेत. पर्यावरण साक्षरता शालेय शिक्षणातूनच आल्यास या प्रदूषणाला कमी करता येईल. कायद्याचा वापर करून आपण निसर्ग वाचवू शकतो, नियमावर बोट ठेवणं उत्तम. 

Web Title: meet a environmental lawyer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.