एक साधा डिप्लोमा होल्डर भारतातला आघाडीचा रोबोटमेकर कसा बनला?- त्याची कहाणी!
By Meghana.dhoke | Published: March 14, 2019 08:00 AM2019-03-14T08:00:00+5:302019-03-14T13:44:42+5:30
भारतातले आघाडीचे रोबोटमेकर जयक्रिश्नन टी सांगत आहेत रोबोटच्या दुनियेतला बदलता थरार.
जयक्रिश्नन टी
रोबोट, रोबोटिक्स हे काय असतं हेच मला माहिती नव्हतं. मुळात मी असं काहीतरी काम करतोय ज्याला रोबोटिक्स म्हणतात हेही मला माहिती नव्हतं. मी जे काम करायचो ते मुख्यतर् मेकॅनिकल होतं, मशिन्स आवडायचे आणि त्यावर वेगवेगळे प्रयोग करत त्या मशिन्सवर कण्ट्रोल कसा मिळवता येईल एवढाच विचार माझ्या मनात होता. त्याला थोडीबहुत इलेक्ट्रॉनिक्सची जोड देत मी माझे प्रयोग करत होतो.
मी फार जुना काळ सांगतोय. (म्हणजे आजच्या तरुण मुलामुलींसाठी तर फारच जुना !) 1992-93च्या आसपासचे हे दिवस. त्याकाळी रोबोटिक्स असा शब्दच आपल्या आसपास नव्हता. भारतात तर काहीच घडत नव्हतं, विदेशांत असेलही मात्र फार प्राथमिक अवस्थेत होतं. आणि जगही तेव्हा आजच्या इतकं ‘कनेक्टेड’ नव्हतं. कुठं काय चाललंय हे काही बसल्याजागी चटकन कळत नसे. कॅसेट रेकॉर्डर आणि व्हीसीआरचा तो काळ. त्यामुळे आपण काही मेकॅनिकल जॉब्ज करतोय आणि ते करताना मशिन्स आपण म्हणू तसे वागू शकतात असं काहीसं माझ्या डोक्यात धूसर होतं. धूसर असण्याचंच ते वय होतं कारण मी साधं डिप्लोमा इंजिनिअरिंग करत होतो. ते झालं मग जॉब मिळाला बंगळुरूला. तिकडे गेलो. जाताना माझ्या खांद्यावर माझी सगळी प्रयोगशाळाच होती. म्हणजे मी जे काही प्रयोग करत असे त्याचं सारं साहित्य घेऊनच मी फिरायचो. वेळ मिळाला की माझे प्रयोग करत बसायचो. जॉब लागला, सगळं सुरू होतं. दोन-तीन वर्षे नोकरी केली.
आणि 1996 साली मी कोचीला परत आलो.
मला कळत नव्हतं मी डिप्लोमा इंजिनिअर आहे की टेक्निशियन? मी नक्की कोण आहे. माझंच मला कळत नव्हतं. मग मी ठरवलं की, पुढचं काहीतरी शिकायचं. बीटेक करायचं ठरवलं. प्रवेश परीक्षा दिली आणि 1998 साली मी बी.टेकला अॅडमिशन घेतली. तोर्पयत मी एक उपकरण तयार केलं होतं, त्याला माझा पहिला रोबोट म्हणता येईल. एक असं उपकरण जे ऐकण्याची क्षमता, शरीरातल्या संवेदना मोजायचं. पण त्यात रोबोटिक काही नव्हतं सगळं मेकॅनिकल होतं आणि थोडंबहुत इलेक्ट्रॉनिक. बी.टेक करायला गेलो आणि मला पहिल्यांदा इंटरनेट वापरता आलं. तेव्हा मला कळलं की रोबोटिक्सनावाची एक स्वतंत्र शाखा असते आणि यंत्रमानवाला माणसासारखं काम करायला लावता यावं म्हणून जगभर प्रयोग सुरू आहेत.
माझेही प्रयोग सुरू होतेच. 1998च्या सुमारास मी एक रोबोट बनवला, चालता-फिरता, भिंतींवर चढणारा. वॉकिंग/क्लायबिंग रोबोट मी बनवला. हा रोबोट खिडक्यांच्या काचा स्वच्छ करायचा, त्यासाठी भिंतीवर चढायचा. त्याकाळी काही आपल्याकडे आता दिसतात तशा मोठय़ा ग्लास पॅनलच्या इमारती नव्हत्या. मात्र घराच्या काचा पुसायला यंत्राची मदत व्हावी या साध्या विचारातून हा रोबोट तयार झाला. त्यातही 85 टक्के मेकॅनिकल आणि 15 टक्के जेमतेम सॉफ्टवेअर होतं. काचा पुसायला रोबोट हे ऐकूनच लोक तेव्हा हसले होते, आता तसं काम ही काळाची गरज आहे.
तोवर 2000 साल उजाडलं. मी बी.टेक झालो. एका कंपनीत जॉब करत होतो. तिथंही रोबोटिक्सनव्हतं. मायक्रोप्रोसेसिंगवर काम करायचो. चार वर्षे मी ते काम केलं. मात्र ते काम करतानाही माझ्या डोक्यात रोबोट होताच. मी सतत इंटरनेटवर सर्च करायचो की कुठं रोबोटिक्स मधला काही जॉब आहे का, आपल्याला संधी मिळेल का, इमेलवर माझं काम आणि रिझ्यूम पाठवत रहायचो. मात्र तशी काही संधी मिळत नव्हती. तरीही माझा शोध सुरूच होता.
एका मल्टिनॅशनल कंपनीची संधी चालून आली. अमेरिकन कंपनी. मला ते सेल्सचा जॉब देत होते. अमेरिकन सरकार त्याकाळी अमेरिकेतल्या लघुउद्योगांना पाठबळ देत होतं. त्यातून त्या झालेले रोबोटिक कण्ट्रोल असलेले प्रॉडक्ट त्यांना भारतात विकायचे, लोकप्रिय करायचे होते. त्यामुळे त्यांचं रोबोटिक काम तिकडेच होणार होतं इकडे फक्त मार्केटिंगचं काम होतं.
मला ऑफर आली तशी पहिली प्रतिक्रिया म्हणून सरळ त्यांना ‘नाही’ म्हणालो. मला रोबोट बनवायचे आहेत आणि हे मार्केटिंग कर म्हणतात हे मला फारसं आवडलं नाही. पण मग नंतर शांतपणे विचार केल्यावर वाटलं मार्केटिंग तर मार्केटिंग पण काम तर रोबोटिक्सशी संबंधित आहे. निदान कळेल तरी की मार्केटमध्ये नवीन काय आहे, हे लोक रोबोटवर नवीन काम काय करत आहेत, काय नवीन येतंय? 2004 - 2005 र्पयत आपल्याकडे आयआयटीतही रोबोटिक्स ही वेगळी अभ्यास शाखा आहे, त्यात स्पेशलायझेशन करायला हवं असं काही नव्हतंच. को-रोबोटिक्स होतं. स्वतंत्र काही काम होत नव्हतंच फारसं. त्यामुळे कुठंच रोबोटिक्सची संधी दिसत नसताना निदान रोबोटिक प्रॉडक्टच्या मार्केटिंगचं काम तर मिळालं, ते करू असं म्हणत मी या कामाकडे संधी म्हणून पाहिलं.
ती संधी आहे हे मला दिसलं आणि ते मी स्वीकारलं हा मला वाटतं माझ्यासाठी महत्त्वाचा निर्णय होता. अर्थात तेव्हाही त्यांची नोकरीची ऑफर स्वीकारताना मी त्यांना एक प्रपोजल दिलं. त्यांना सांगितलं मी तुमचं मार्केटिंग करतो; पण मला टेक्निकल काम करायचीही तुम्ही परवानगी द्या, त्यासाठी सपोर्ट करा. तर ते म्हणाले, तू आमच्या प्रॉडक्टपैकी काही निवड, ते विक आणि त्यातून जे काही पैसे येतील ते तुझ्या रिसर्चसाठी वापर आमचं काहीही म्हणणं नाही. माझ्यासाठी ही एक मोठी संधी होती कारण त्या अमेरिकन कंपनीला आपली उत्पादनं फक्त भारतात उतरवून लोकप्रिय करायची होती, त्यांना तेव्हा त्यातून फार आर्थिक नफा नाही झाला तरी चालणार होता. तो पैसा ते मला द्यायला तयार होते.
पण इकडे माझे मित्र, बॅचमेटही आता माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या प्रोजेक्टमध्ये पैसा ओतायला तयार नव्हते. तुझ्या काहीतरी फॅन्सी आयडिया असतात तू सगळं बुडवतोस असं त्यांचं मत होतं. पण एक ‘फ्रेण्ड’ मात्र तयार झाली, तिनं माझ्याशी पार्टनरशिप करायची तयारी दाखवली. ( आता तीच माझी बायको आहे !) तिनं माझ्यावर विश्वास ठेवला आणि आमचं काम सुरू केलं. एक वर्षभर रिसर्च करून काम केलं; पण जो रोबोट बनवला तो काही फार खास नव्हता. त्या कंपनीलाही आवडला नाही, मग त्यात सुधारणा होण्यासाठी त्यांनी मला सॉफ्टवेअर ट्रेनिंग दिलं. उत्तम ट्रेनिंग मिळालं. आणि त्यानंतर मी एक ‘ह्युमनाइड आर्म’ म्हणजे माणसाचा हात असतो तसा एक रोबोट तयार केला. तो रोबोट पूर्णतर् माणसाच्या हातासारखं काम करायचा. तो अमेरिकन कंपनीला आवडला, त्याचं रितसर उत्पादन सुरू झालं. आणि अमेरिकन सैन्यासाठी आम्ही तो आर्म बनवणं सुरू केलं. साधारण 300 युनिट आम्ही विकले. त्यादरम्यानच जागतिक मंदी आली अमेरिकन कंपनी म्हणाली की तुझं उत्पादन तू कर, आम्ही तुला सॉफ्टवेअर देतो. त्यासाठी आम्ही मग सॉफ्टवेअर टीम बनवली, त्यांचं ट्रेनिंग केलं. आणि युद्धात काम करू शकतील, असे वेगAा रोबोटिक बनवले. अर्थात ते प्रोजेक्ट त्या कंपनीचेच होते, आम्ही सब कॉण्ट्रॅक्टवरच काम करत होतो.
2010 नंतर मात्र मी त्या कंपनीपासून वेगळा होत आमचं स्वतंत्र काम, स्वतंत्र कंपनी म्हणून सुरू केलं. 2011/12च्या आसपास आम्ही स्पेनसाठीही डिफेन्स रोबोट बनवले. तोवर आमचं सगळं काम डिफेन्स रोबोटिक्सचंच सुरू होतं. मात्र रोबोटिक्सच्या जगात बदल होत आहे हे मला माझे त्या जगातले कॉण्टॅक्ट, माहिती यावरून लक्षात यायला लागलं होतं.
माझ्या लक्षात आलं, वर्ल्ड इज हेडिंग टू सव्र्हिस रोबोटिक्स. मग मी ठरवलं आपण सव्र्हिस रोबोट बनवायचे. म्हणजे असे रोबोट जे सेवा क्षेत्रात काम करू शकतील.
मग आम्ही पहिली रोबोट बनवली. तिचं नाव ‘इसरा!’ ती कुक आणि वेटरचं काम करायची. ती ऑम्लेट बनवू शकायची, सव्र्ह करायची. मात्र तिचा लूक फार चांगला नव्हता. मग आम्ही ती डिसमेण्टल करून तिचे बाकीचे सारे पार्ट विकले. तोवर हे लक्षात आलं होतं की आता ‘हॉस्पिटॅलिटी’ क्षेत्रात रोबोट येतील. मात्र ते देखणे हवेत, माणसांसारखे दिसायला हवेत.
2017 साली आम्ही एचडीएफसी बॅँकेच्या मुंबईतील कमला मिल ब्रॅँचसाठी एक रोबोट बनवला. कस्टमर सव्र्हिससाठी त्यांनी तो रोबोट वापरला. त्याचं नाव त्यांनी इरा असं ठेवलं. बॅँकेत रोबोट वापरायचा हा पहिलाच प्रयोग.
त्यानंतर आम्हाला केरळ पोलिसांनी विचारलं की आमची सगळी प्रशासकीय कामं करेल असा रोबोट तुम्ही बनवून द्याल का, आम्ही तयार होतो. तसा पोलीस ड्रिव्हन रोबोट आम्ही बनवला. आता तो रोबोट केरळ पोलिसांच्या सेवेत आहे, त्यांनी त्याला सब इन्सपेक्टरची रॅँक दिली आहे. आता सेवा क्षेतातल्या अनेक रोबोट्सवर आमचं काम सुरू आहे. सर्जिकल रोबोटिक्समध्येही आम्ही काम करतो आहोत. जे काही ऑपरेशन्सही करू शकतील, त्यासाठी मदत करतील.
माझं मात्र स्वप आणि इच्छा आहे की आता हेल्थकेअर क्षेत्रातले रोबोट बनवायचे. आपल्याकडे आजारी, वृद्ध माणसांची काळजी घेण्यासाठीच्या समस्या वाढत आहेत. त्यामुळे लोकांना परवडतील, अगदी माणसांसारखे दिसतील असे रोबोट बनवण्याची आता आम्ही तयारी करतोय. जे आजारी माणसांची काळजी घेतील, त्यांचे मूड आणि भावनिक चढउतार समजून त्यांना गाणी ऐकवतील, गप्पा मारतील, त्यांना व्हिडीओ दाखवतील, औषधं देतील, त्यांच्या तब्येतीचं रेकॉर्ड ठेवतील, त्यांचा अभ्यासही करतील, त्यांच्यासाठी हेल्पिंग हॅण्ड ठरतील. त्यांचे केअरटेकर बनतील.
हे सारं काही फार अवघड नाही. अशक्य तर नाहीच नाही. रोबोटिक्सचं जग आता विस्तारत आहे. सेवाक्षेत्रात रोबोट मोठय़ा प्रमाणात येऊ घातले आहेत. रोबोटवर काम करायच्या तंत्रावर पक्का हात आणि माणसांशी/निसर्गाशी कनेक्ट या दोन गोष्टी जमल्या तर रोबोटिक्सचं हे जग अनेक शक्यतांना जन्माला घालणार आहे.
रोबोटिक्समध्ये काम करणार्या तरुण विद्यार्थ्यांना काय सांगाल?
* तुम्ही कोणत्याही प्रकारचं इंजिनिअरिंग केलेलं असेल, इंजिनिअरिंगसह तुमचा कॉमन सेन्स आधी वापरा. लॉजिक आधी वापरा. लॉजिक वापरणं हे साधारण फार सामान्य किंवा जुनाट वाटतं; पण रोबोटिक्सच्या जगात लॉजिक फस्ट हे विसरू नका.
* लॉजिक वापरलं तर तुम्हाला अवतीभोवतीच्या गरजा आणि त्याच्यावरची सोल्युशन्स चटकन सापडतील.
* आता आपण काहीही ‘इन्व्हेन्शन’ करत नाही, म्हणजे शोध लावत नाही. देअर इज नो इन्व्हेन्शन ओन्ली डिस्कव्हरी. आपण फक्त सोल्यूशन शोधून काढतो. त्यामुळे हा बेसिक फरक लक्षात ठेवून आपल्या कामाकडे पहायला हवं.
* ते करायचं तर तुमची निरीक्षण शक्ती दांडगी हवी.
* म्हणजे आता रोबोटिकसाठी एक सूत्र तयार झालं- थिअरी + निरीक्षण + लॉजिक.
* मी सगळं काम करत करत शिकलो, त्यामुळे करून पाहून शिका हे सूत्र मला फार महत्त्वाचं वाटतं, जे शिकलात ते स्वतर्त जिरवायला, मुरवायला शिका. त्यातून नवीन काही घडेल.
*निसर्गाकडे पहा, निसर्गाइतकं गुंतागुंतीचं तरीही सरळसाधं काही नाही, त्यात तुम्हाला अनेक उत्तरं सापडतील. त्यासाठी डोकं जरा मोकळं ठेवा.
* फिजिक्स, मॅथ्स आणि तुमची अभ्यासशाखा यांचा अभ्यास दांडगाच हवा, एकदम मांड ठोका त्या विषयांवर. निरीक्षण + थिअरी + लॉजिक आणि प्रयोगशीलता यातून तुम्हाला तुमची उत्तरं सापडतील. वर्क ऑन इट !
* सोल्युशन्स आर एव्हरीवेअर हे सूत्र कायम लक्षात ठेवा.
***
थिरुवनंतपुरमच्या
पोलीस हेडक्वॉर्टरमध्ये गेलात,
तर हीच तुम्हाला हॅलो म्हणेल..
केरळची रोबोकॉप
केरळला थिरुवनंतपुरमच्या पोलीस हेडक्वॉर्टर्समध्ये तुम्ही गेलात तर तिथं एक रोबोकॉप तुमच्या स्वागताला हजर असेल आणि तुम्ही काहीही न सांगताच तुमची बर्यापैकी माहिती तिच्याकडे जमा झालेली असेल. केरळ पोलिसांनी या रोबोकॉपला पोलीस सबइन्स्पेक्टरचा दर्जा दिला आहे आणि ती आता पोलीस सेवेत दाखलही झाली आहे.
जयक्रिश्नन टी यांच्या कंपनीने हा रोबोकॉप बनवला आहे. ते सांगतात, पोलिसांची किचकट प्रशासकीय कामं तिनं करावी अशी केरळ पोलिसांची अपेक्षा होती. पोलीस मुख्यालयात आता ही रोबोकॉप ते कामं उत्तम करेल.
ती काय काय काम करणार आहे?
1. पोलीस मुख्यालयात येईल त्या प्रत्येकाला कोण कुठं बसतं, तुमचं काम कुणाकडे, तिथं कसं जायचं याची माहिती देईल.
2. ती माहिती देतानाच तुमचं आयडी कार्ड मागेल, ते तपासेल, तिच्याकडे असलेल्या स्कॅनरने स्कॅन करेल, तुमची सगळी माहिती घेईल, फोटो काढून घेईल, तक्रार नोंदवून घेईल. तुमच्या माहितीत काही घोळ आढळल्यात तुमचा फोटो काढून फेस डिटेक्टरने तुमची अधिक माहिती तत्काळ मिळवेल, ती त्याला जोडेल.
* तिला आवश्यक वाटलं तर तत्काल वरिष्ठांना व्हिडीओ कॉल करेल.
* तिच्याकडे आयईडी डिटेक्टर आणि मेटल डिटेक्टरही आहेत, ती सगळ्या गोष्टींचं प्रॉपर स्क्रिनिंग करेल.
* दरम्यान कुणी सिनिअर जात असेल तर त्याचा चेहरा ओळखून एक कडकडीत सॅल्यूटही करेल.
* एकदा रजिस्टर केलेले चेहरे ती कधीच विसरत नाही, त्यामुळे आलेल्या माणसांची फाईल नंबर, त्यांची वेळ, त्यांना हवी ती सगळी माहिती ती चटकन काम काढून देईल.
* सगळी बेसिक माहिती, त्यातली आकडेवारी, तपशील, तारखा आणि कामाचं स्वरूप तिच्याकडे कायम अपडेट मिळेल.
(संस्थापक सीईओ, असिमोव्ह रोबोटिक्स, कोचीन)
(मुलाखत आणि शब्दांकन - मेघना ढोके)