जुन्या केसांना नवं ‘फायर कटिंगचं ’वळण लावणार्‍या कोल्हापूरच्या पीकेला भेटा! तो का म्हणतोय, अपना टाइम आयेगा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 02:48 PM2019-02-28T14:48:22+5:302019-02-28T14:50:29+5:30

आमच्याकडे परंपरागत नाभिकांचा व्यवसाय! मी मनाशी ठरवलं होतं, वाट्टेल ते करीन; पण या धंद्यात जाणार नाही! -पण परिस्थितीच अशी आली, की इलाजच नव्हता दुसरा ! मग लढायचं ठरवलं आणि टाकलं स्वतर्‍चं सलून.

Meet PK a young boy form Kolhapur, shares his passion about styling & breaks the social norms. | जुन्या केसांना नवं ‘फायर कटिंगचं ’वळण लावणार्‍या कोल्हापूरच्या पीकेला भेटा! तो का म्हणतोय, अपना टाइम आयेगा!

जुन्या केसांना नवं ‘फायर कटिंगचं ’वळण लावणार्‍या कोल्हापूरच्या पीकेला भेटा! तो का म्हणतोय, अपना टाइम आयेगा!

Next
ठळक मुद्दे‘काम मागणारे हात’ आता ‘काम निर्माण करणारे’ आणि ‘काम देणारेही’ होऊ लागले आहेत.

प्रथमेश काशीद ऊर्फ पीके

कॉलेज लाईफ मनमुराद जगत होतो. कलाक्षेत्रामध्ये अधिक रस होता. यूथ फेस्टिव्हल, नाटक यामध्ये काम करायचो. त्याच बरोबर स्पर्धा परीक्षांचाही अभ्यास चालू होता..
मात्र वडिलांचं हृदयविकाराच्या झटक्यानं अचानकच निधन झालं. पायाखालची जमीनच सरकली. वडील गेल्यावर पहिले बारा दिवस प्रत्येक पाहुणा म्हणत होता, काय लागलं तर सांग; पण तेराव्या दिवशी मी या दुनियेत एकटाच होतो. दुनियादारीची जाण नसलेला. आता काय करायचं कळत नव्हतं. घरची जबाबदारी तर पेलायचीच होती. त्यावेळी माझं वय होतं 20 वर्षे. घरी आई आणि नववीत शिकणारी बहीण. आम्ही नाभिक समाजाचे; पण तो पारंपरिक व्यवसाय वडिलांना येत नव्हता त्यामुळे माझाही त्या कामाशी इतका परिचय नव्हता. ते काही फार बरं काम नाही असं मला वाटायचं. थोडी नफरतच होती मनात. लहानपणी कुणी म्हणायचं की, शेवटी कात्री आणि कंगवा हातात घेशील. तर रागाने मी म्हणायचो, मुळीच नाही! मी शिकणार! वाट्टेल ते करीन; पण हा धंदा करणार नाही.
पण सगळंच बदललं. मीपण विचार केला आता गरज पैसे मिळवण्याची आहे, तर आपण हा पारंपरिक व्यवसाय करायला काय हरकत आहे?
काम शिकण्यासाठी एका सलूनमध्ये गेलो. पण तिथला माहोल बघून मला एक क्षणपण थांबावंसं वाटलं नाही. मात्र त्यावेळी कोल्हापूरमध्ये सगळीकडे जावेद हबीब नावाचा बोलबाला होता. कोण हा माणूस म्हणून जरा चौकशी केली तर मी आवाक झालो. त्याच्याबरोबर मी इतर स्टायलिस्टची माहिती नेटवर वाचत गेलो झपाटल्यासारखा! मग विचार केला हे सगळे एवढे उच्चशिक्षित, तरीपण हे काम करतात; पण मी कोण नाकारणारा?
हबीब सलूनला भेट दिली. तिथला सेटअप मला आवडला. मी ती अकॅडमी जॉइन केली. तिथे लेडिज हेअरकट शिकलो. पण नातेवाईक हा बायकांचे केस कापतो म्हणून जरा विचित्र नजरेनं माझ्याकडे बघायचे. वाटायचं आपण चुकीचं तर काही करत नाही ना? 
- म्हणून मी परत जेण्ट्स सलूनमध्ये जायला लागलो तिथे दाढी-कटिंगचा सराव केला. मला गुरुपण चांगले लाभले. त्यांनीच मला सांगितलं तू आमच्या पेक्षा वेगळा आहेस. आम्हाला जमलं नाही, ते तू सहज करशील. जरा धीर आला..
एका सुट्टीच्या दिवशी घरी बसलो होतो. अचानक जीवनात टर्निग पॉइण्ट आला. मला आमचे नातेवाईक म्हणाले मेकअप करणार का? मी म्हटलं ते काय असतं?.. ते म्हणाले चल दाखवतो. 
- अशा रीतीने अचानक चंदेरी दुनियेत माझा प्रवेश झाला. तिथे मेकअप काय असतो समजलं. मेकअप करणं शिकत असताना माझ्यातला कलाकार घडत होता.
आणि एक दिवस मोठा ब्रेक मिळाला. सहाय्यक मेकअपमनचं काम मिळालं. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेसाठी काम करण्याची संधी मिळाली. हार्दिक जोशी (राणा दा) आणि धनश्रीदी यांनी मला खूप सांभाळून घेतलं. हार्दिक दादाने मला सांगितलं तू इतके चांगले केस कापतोस तर स्वतर्‍चं सलून का टाकत नाहीस? मेकअप + हेअर कटिंगपण करता येईल, कधी रिकामा नाही राहणार तू!
- तेवढय़ा हिमतीवर मी विचारांनं स्वतर्‍चं सलून काढायचं ठरवलं. कोल्हापुरात शालिनी पॅलेससमोर गाळा घेतला. आई आणि मित्रांच्या साह्यानं भांडवल उभं केलं. 
दुकान चालू केलं- 
सलून चालू तर केलं. पण त्यात इथं कुणाला रस नव्हता. मी वस्तरा वापरत नव्हतो. इथं लोकांना वस्तरा लावल्याशिवाय कटिंग केल्यासारखं वाटत नव्हतं. आणि सलूनमध्ये स्रिया येणं तर अशक्यच. एका तरुण मुलाकडून/पुरुषाकडून केस कसे कापायचे? - हाच पहिला प्रश्न. 
- म्हणून मी दाढी वाढवली. खूप प्रयत्न केले. अपॉइण्टमेण्ट घ्यायचो मगच कटिंग करायचो, हा प्रकार कोल्हापुरातल्या या भागात नवीन होता. कारण आजर्पयत सलूनमध्ये गेल्यावर थोडावेळ बसून नंबर लागतो अशी मानसिकता होती. पण माझ्या इथं ना गर्दी, ना काही. त्यामुळे मी असा नवशिका दिसायचो. सलून रिकामं दिसायचं. याला काय येत की नाही, असे प्रश्न अनेकांना पडत होते. ते तसं मला विचारतही.
पण मी ठरवलं होतं आज ना उद्या माझी कामाची पद्धत नक्की यशस्वी होईल. मात्र एक दिवस खूपच रडलो, कारण दुकानाचं भाडंपण जास्त होतं. तेही देता येण्याएवढी कमाई होत नव्हती. काय करणार? घरी काय सांगायचं हा प्रश्न होता, पैशाचं सोंग आणता येत नव्हतं. 
एवढय़ा प्रयत्नाने टाकलेल्या सलूनमध्ये लोक फिरकत नव्हते.
शेवटी ठरवलं. आणखी सहा महिने करून पाहू. मात्र आता लोकांना आपल्या कामाची माहिती देऊ. 
. मग मी काय आणि का करतोय हे सलूनमध्ये लिहून ठेवू लागलो. हळूहळू लोकांना ते कळलं. ते वाचून अनेकजण येऊ लागले. मी मेकअप करतो, चेहरा बघून त्याला अनुरूप हेअरकटपण करतो अशी नोटीसही लावली सलूनमध्ये. करून बघा असं आवाहन केलं.
हळूहळू लोकांना माझी सलग तीन कटिंगमध्ये लूक सेट करायची कन्सेप्ट समजली. मग हळूहळू लोकच माझी जाहिरात करू लागले. 
हल्लीच मी कोल्हापूरमध्ये फायर कटिंगची कन्सेप्ट आणली. मी एका महिन्यातच 230 फायर कटिंग केले. मग लक्षात आलं आपल्या भोवतालची माणसं साधी सरळ आहेत. त्यांना जोर्पयत तुम्ही काही विश्वासात घेऊन सांगत, दाखवत नाही तोर्पयत ती स्वीकारत नाहीत. मात्र एकदा स्वीकारलं की स्वीकारलं.
बर्‍याच गोष्टी बदलायला वेळ लागला. पण मी त्या बदलल्या. उच्चभ्रू लोकांमध्ये जी सलून कन्सेप्ट होती ती सामान्यांसाठी प्रत्यक्षात उतरवताना मला संघर्ष करावा लागला. 
- एवढं शिकून शेवटी कात्री- कंगवा हातात घेतला याचा आता मला आनंद आहे. जो व्यवसाय माझ्या रक्तात होता, जी कला माझ्या हातात होती त्यावरच्या निष्ठेनं मी तो करतोय. आता या व्यवसायात काही राहिलं नाही असं म्हणणार्‍यांना मी काही सांगत नाही. वयाच्या पंचविशीत आहे, मी काय सांगणार? 
पण एक नक्की!
- आता मी फक्त केस कापत नाही तर जुनाट विचारांची बंधनं ही कापतो..

...........

आज मी यशस्वी 
व्यवसाय करतोय कारण.

1)वेळेचं महत्त्व जाणतो. अपॉइण्टमेण्ट देतो. काम वेळेत पूर्ण करतो. ग्राहकालाही त्याला मिळणार्‍या वेळेचं महत्त्व कळतं.
2) एका कटिंगमध्ये केसांना लूक येत नाही, हे पटवण्यात यशस्वी झालो. 
3) शांत आणि निवांत वातावरणात काम करतो. गर्दी ही कन्सेप्ट पुसून काढली. आता सलून म्हणजे निवांतपणा हे समीकरण रुजू झालं आहे. 
4) स्रियांप्रमाणे पुरु षांनीही सौंदर्याकडे लक्ष द्यावं हे मी पटवून देऊ शकलो. मुलगे फक्त लग्नात फेशिअल करतात, ही कन्सेप्ट पुसून टाकली. 
5) केस धुऊन कटिंग करणं, त्याचं महत्त्व समजावलं. या गोष्टी होत नव्हत्या असं नाही; पण मी ज्या वर्गाचा विचार करत होतो तिथं हे सगळं नवीन होतं.

***
सरकारी नोकरी ?- नाही!
प्रायव्हेट जॉब? - नाही
परदेशी जाण्याचा चान्स? - नाही!
हाताला काम? - नाही!
जिंदगीला काही अर्थ?- नाही!
- हा असा नन्नाचा पाढा म्हणत
रडत न बसता
स्वतर्‍ची वाट शोधत 
तुम्ही स्वतर्‍च हिमतीने निघाला आहात?

- तर 
ऑक्सिजनची टीम 
तुम्हाला शोधतेय!
हे वाचा!!!

***

पीकेची कहाणी वाचलीत?
आयडियाची डोकेबाज कल्पना लढवून, हातात काहीच नसताना या तरुणांनं जिद्दीनं आपल्याला हवे ते प्रयोग केले, आणि त्यातून आपल्यासाठी नव्या व्यवसायाच्या वाटा शोधल्या, निर्माण केल्या. स्वतर्‍च्या हातांना तर काम मिळवलंच.
- एका बाजूला देशातल्या वाढत्या बेरोजगारीच्या बातम्या एक भयावह चित्र दाखवत आहेत, आणि दुसरीकडे देशाच्या कानाकोपर्‍यात ‘काम मागणारे हात’ आता ‘काम निर्माण करणारे’ आणि ‘काम देणारेही’ होऊ लागले आहेत.
- आपल्या आसपास चाललेल्या अशाच प्रयत्नांचा शोध घ्यावा असं टीम ऑक्सिजनने ठरवलं आहे.
- त्यासाठीच हे निवेदन !

तुम्ही करता आहात असं काही? 
 कुणीतरी आपल्याला काम देईल याची वाट न बघता तुम्ही स्वतर्‍च तुमच्यासाठीचा रस्ता शोधायला घेतला आहे का?
- प्रयत्न छोटा असेल, अगर मोठा !
म्हणजे तुम्ही हेलिकॉप्टर बनवण्याच्या विचाराने झपाटलेले असाल किंवा गावात चहा-पोह्यांची एखादी टपरी टाकून स्वतर्‍च्या स्वतंत्र व्यवसायाची सुरुवात केलेली असेल !
किंवा अगदी गावाकडच्या जमिनीच्या छोटय़ा तुकडय़ावर तुम्ही रुजवलं असेल तुमचं असं खास वेगळं स्वप्न !
- म्हणजे तुम्ही उद्योजक असा, शेतकरी असा, चहा-पोहेवाले असा की थेट जगाच्या बाजारपेठेला भिडण्याची स्वप्नं पाहणारे स्टार्टअपवाले !
- तुमचं काम काय आहे हे महत्त्वाचं नाही, महत्त्वाची आहे ती त्यामागची तुमची कल्पना आणि जिद्द !
ते काम किती छोटं, किती मोठं हा प्रश्न नाही, तसंच तुम्ही जे काही करायला घेतलंय ते यशस्वी झालंय की अपयशी ठरलंय हाही मुद्दा नाही.
त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे त्यातला संघर्ष, त्या संघर्षाच्या मुळाशी असलेली बेधडक आणि बेमिसाल कल्पना. कष्ट, जिद्द आणि धडपड. नवं काही घडवण्याचा अपार जोश.
तुमच्या अशा कल्पक संघर्षाची कहाणी तुम्ही ‘ऑक्सिजन’शी शेअर करावी, असा आमचा आग्रह आहे.
ही अशी धडपड करणारे तुम्ही स्वतर्‍ असाल किंवा तुमचा कुणी मित्र-मैत्रीणही असेल !
- तुम्ही लिहा ही कहाणी आणि पाठवा आमच्याकडे ! 
कळू देत सार्‍या महाराष्ट्राला तुमच्या कल्पनेची भरारी आणि दिसू देत जिद्दीचा जलवा.

काय आणि कसं लिहाल?

1. तुम्हाला या उद्योग-व्यवसायाची कल्पना कशी सुचली? काम कसं सुरू केलं? त्यातली आव्हानं काय होती? यश आलं की अपयश?
2. भांडवल कसं उभं केलं? मदत कुठून मिळाली? यशाचं सूत्र सापडलं तर ते काय होतं? अपयश आलं तर त्यानं काय शिकवलं?
3. आपल्या कामाकडे तुम्ही कसं पाहता? 
4. भविष्यात त्या कामाला काय स्कोप आहे असं वाटतं? हे काम वाढवण्याच्या कोणत्या योजना आहेत?
5. वय वर्षे 16 ते 35 या वयोटातील तरुण/तरुणीच (फक्त) या सदरासाठी अनुभव पाठवू शकतात.
6. आपली पत्रं/ई-मेल वाचून आमची टीम आपल्याशी अधिक माहितीसाठी संपर्क करेल.

कसं पाठवायचं?
1. पत्ता-नेहमीचाच. पान 4 वर तळाशी.
2. लिहून पाठवणार असाल, तर पाकिटावर -अपना टाइम आएगा असा उल्लेख जरूर करा.
3. ई-मेल करताना सब्जेक्ट लाइनमध्ये अपना टाइम आएगा असा उल्लेख जरूर करा. आणि इथे ई-मेल पाठवा र्‍
oxygen@lokmat.com
4. संगणकावर लिहून ई-मेल करताना मजकूर शक्यतो युनिकोड फॉण्टमध्ये किंवा पीडीएफ फाइलच्या स्वरूपात असावा.
5. सोबत तुमचा फोटो, संपर्काचा क्रमांक न विसरता पाठवा.

आम्ही वाट पाहू !
- टीम ऑक्सिजन

Web Title: Meet PK a young boy form Kolhapur, shares his passion about styling & breaks the social norms.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.