फुटाणे विकून मेडिकलपर्यंत धडक मारणाऱ्या रामप्रसादला भेटा..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 07:55 AM2020-11-26T07:55:15+5:302020-11-26T08:00:11+5:30
आजही किनवट गावात कुणाला उपचारांची गरज असली तर ५ तासांचा प्रवास करून नांदेड गाठल्याशिवाय पर्याय नाही. गावात ज्या वैद्यकीय सुविधा आहेत, त्या अगदीच प्राथमिक स्वरूपाच्या आहेत. त्या गावातला रामप्रसाद आता डॉक्टर होणार आहे.
- ऋचिका सुदामे पालोदकर
किनवट गावातला आठवडी बाजार भरला की, चौथी-पाचवीत शिकणारा सडपातळसा एक पोरगा धावतपळत यायचा आणि वडिलांच्या शेजारी बसून फुटाणे विकू लागायचा. फुटाणे विकूनच कुटुंबाचा चरितार्थ चालायचा. आपला पोरगा मोठा झाला की लहान-मोठं काहीतरी काम करील आणि पोट भरून सुखात राहील, असं त्याच्या मायबापाला वाटायचं. मात्र फुटाणे ज्या कागदात बांधतात त्या पुडीच्या कागदावरील अक्षरं, रेषा आणि आकडे या मुलाशी दोस्ती करू लागले. त्याला हाका मारू लागले. त्यांचा असा लळा लागला की हा फुटाण्याच्या पुड्या बांधून विकणाऱ्या मुलाने थेट पुण्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयापर्यंत धडक मारली. त्याची ही गोष्ट तुम्ही कदाचित सोशल मीडियात वाचलीही असेल.
पण ‘ऑक्सिजन’ने ठरवलं की, जरा त्याला निवांत भेटू. समजून घेऊ त्याच्या जिद्दीचं सीक्रेट.
तो किनवटचा. किनवट गाव नांदेडपासून १५० किमी अंतरावर आहे. रामप्रसाद जुनगरे. फकीरराव आणि सूर्यकांता जुनगरे यांचा हा मुलगा. त्याला एक लहान भाऊ आणि दोन मोठ्या बहिणी. वडिलांचा फुटाणे विकण्याचा व्यवसाय. घरची परिस्थिती अगदीच बेताची. पुस्तकाला पैसे असले तर वहीला नाही आणि वही मिळाली तर पेन नाही, अशी काहीशी अवस्था. मात्र शिक्षणाची गोडी लागलेल्या मुलाची शाळा मायबापानं सोडवली नाही. त्यानंही कष्टानं अभ्यास केला आणि नुकत्याच झालेल्या नीट परीक्षेत ७२० पैकी ६२५ गुण मिळवून डॉक्टर होण्याच्या दिशेनं आपलं पहिलं दमदार पाऊल टाकलं.
हे कसं जमलं? रामप्रसादला विचारलं. तो सांगतो, ‘परिस्थिती बदलायची म्हणून अभ्यास करायचा असं काय बी माझ्या डोक्यात नव्हतं. मला फक्त अभ्यास करावा वाटायचा. खूप खूप अभ्यास करावा वाटायचा, म्हणून मी अभ्यास केला. परीक्षेत चांगल्या मार्कानं पास झालो. बस्स एवढंच.’ असं रामप्रसाद अगदी सहज सांगतो.
मुळात हुशार मुलगा. दहावीपर्यंत किनवटच्या शाळेत शिकला. वर्गात पहिल्या पाचमध्ये तर तो हमखास असायचाच. इयत्ता सहावी-सातवीपर्यंत रामप्रसाद वडिलांना फुटाणे विकण्यास मदत करायचा. आपलं पोरगं हुशार आहे हे समजून घरातल्यांनी नंतर त्याला कामाला लावलं नाही. अभ्यास करू दिला. त्यामुळे नंतर नंतर अगदी कधीतरीच आणि तेही रविवारी सुटीच्या दिवशीच रामप्रसाद वडिलांसोबत फुटाण्याच्या गाडीवर दिसायचा.
दहावीत बोर्डाच्या परीक्षेत त्यानं ९४ टक्के गुण मिळविले. दरम्यान, त्याच्या दोन्ही बहिणींची लग्न झाली. दहावीची परीक्षा झाल्यावर तो पुण्यात त्याच्या ताईकडे राहायला गेला. त्याचे मार्क पाहून ताई आणि भावजींनी त्याला शिक्षणासाठी पु्ण्याला येण्याचा सल्ला दिला. त्यानेही तो सल्ला ऐकला आणि पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजला अकरावीला प्रवेश घेतला.
सामान्यपणे किनवटचा पोरगा अकरावीला एकतर नांदेडला जातो किंवा मग मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादला येतो; पण वेगळी वाट निवडत पुण्याला गेलेला रामप्रसाद पु्ण्याची ‘हाय-फाय लाइफ’ पाहून थबकून गेला. भाषा, आर्थिक स्तर, सामाजिक परिस्थिती या सर्वच बाबतीत तफावत असल्यानं त्याला जुळवून घ्यायला थोडे जड गेले; पण आपण भले आणि आपला अभ्यास भला, अशी रामप्रसादची विचारधारा असल्याने त्याने अभ्यासात मन रमवून घेतले.
सुरुवातीला आपण या स्पर्धेत कसे काय टिकाव धरू, असा प्रश्न त्याच्या मनात डोकावत होता. डॉक्टर व्हायचं तर मनात होतं; पण महागड्या कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घ्यायला, त्याच्याकडे पैसेही नव्हते. पण अशातच होस्टेलमध्ये राहाणाऱ्या एका मित्राकडून लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट या एनजीओची माहिती मिळाली. नीटला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या गरीब घरच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी ही संस्था आहे. या संस्थेत दाखल झाल्यावर मात्र रामप्रसादला नवाच हुरूप आला आणि अभ्यासाची दिशा स्पष्ट झाली. या संस्थेत डॉ. अतुल ढाकणे, डॉ. किरण तोगे, डॉ. तेजस अहिरे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. तो सांगतो, त्यांच्यामुळेच माझं स्वप्न पूर्ण होण्यास मदत झाली.
आजही किनवट गावात कुणाला उपचारांची गरज असली तर ५ तासांचा प्रवास करून नांदेड गाठल्याशिवाय पर्याय नाही. गावात ज्या वैद्यकीय सुविधा आहेत, त्या अगदीच प्राथमिक स्वरूपाच्या आहेत. त्या गावातला रामप्रसाद आता डॉक्टर होणार आहे. तो सांगतो, मेडिकलला प्रवेश मिळाला आता पुढचा आनंद माझ्या गावातल्या लोकांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आहे.
( ऋचिका लोकमतच्या मराठवाडा आवृत्तीत वार्ताहर आहे.)
ruchikapalodkar@gmail.com