भेटा बंडखोर आफ्रिकन गायिका मकेबाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 07:00 AM2019-10-24T07:00:00+5:302019-10-24T07:00:02+5:30

जवाँ है चॉँद तारे जवाँ है हे गाणं तुम्ही ऐकलं असेल, त्याची चाल ज्या आफ्रिकन गाण्यावरून उचलली आहे, ते गाणं गाणारी बंडखोर गायिका म्हणजे मकेबा. कला आणि सामाजिक बंड याची ती एक नवीन ओळख आहे.

 Meet the rebellious African singer makeba | भेटा बंडखोर आफ्रिकन गायिका मकेबाला

भेटा बंडखोर आफ्रिकन गायिका मकेबाला

Next
ठळक मुद्देतिनं तयार केलेली स्वतर्‍ची स्टाइल त्या देशातील शालेय मुलींमध्ये कमालीची लोकप्रिय ठरली

-शिल्पा दातार-जोशी

Girls are the future mothers of our society, and it is important that we focus on their well-being
अतिशय सुंदर तरल आवाजातलं ताल आणि लयबद्ध ‘नाकुपेंडा मालायका’ हे स्वाहिली भाषेतलं जुनं गाणं कानावर पडलं आणि कुठंतरी बॉलिवूडशी संबंधित गाणं ऐकल्याचा भास झाला. लक्षात आलं, जवाँ है चॉँद तारे जवाँ है या गाण्यासाठी ‘नाकुपेंडा मलायका’ची चाल जशीच्या तशी उचलली आहे. भारतीय गाणी आणि जुनं आफ्रिकन संगीत यांच्यात साम्य सापडतं ते असं! जाझचा बाज, संगीतात जुन्या आफ्रिकी लोकगीतांची धाटणी आणि मृदु आवाज असलेली ग्रॅमी अवॉर्डसह जागतिक पातळीवर वेगळी ओळख मिळालेली ही पहिली आफ्रिकन महिला गायिका, संगीतकार, गीतकार अभिनेत्नी, संयुक्त राष्ट्रसंघाची सदिच्छादूत आणि नागरी हक्क चळवळीतील सामाजिक कार्यकर्ती म्हणून झेंझिल मिरियम मकेबा प्रसिद्ध आहे. तिनं आफ्रिकी संगीताला पाश्चात्त्य देशांत लोकप्रिय केलं. पाश्चात्त्य श्रोता, प्रेक्षक मिळवला. द. आफ्रिकेतील वर्णभेदाविरोधात आवाज उठवणारी तिची कितीतरी गाणी प्रसिद्ध आहेत. तिला ‘मामा आफ्रिका’ या नावानेही ओळखलं जातं.
मकेबा ही दक्षिण आफ्रिकेतील प्रसिद्ध गायिका, गीतकार, अफ्रोपॉप, जॅझ, वर्ल्ड म्युझिकसारख्या संगीत संस्थांशी जोडलेली होती. तिनं वर्णभेदाच्या विरोधात दक्षिण आफ्रिकेतील गोर्‍या बहुसंख्य लोकांविरुद्ध बंड पुकारलं. 
जोहान्सबर्गमधील स्वाझी व झोसा जमातीतील दांपत्याच्या पोटी तिचा जन्म झाला. तिची आई  स्तिना स्वाझी जमातीतील होती. ती सांगोमा म्हणजेच पारंपरिक उपचार करणारी होती. ती उदरनिर्वाहासाठी घरकामगाराचं काम करायची. तिचे वडील कॅसवेल मबेका शिक्षक होते. मिरियमच्या जन्माच्या वेळी तिच्या आईची परिस्थिती इतकी कठीण होती की दोघीही बाळंतपणानंतर वाचतील का, ही शंका होती. दोघीही सुखरूप राहिल्याने तिच्या आजीने तिचं नाव झेंझिल असं ठेवलं. मबेका केवळ 18 दिवसांचीच असताना तिच्या आईला घरगुती मद्याची विक्र ी केल्याच्या आरोपावरून तुरुंगवास पत्करावा लागला. सुटकेसाठी आवश्यक असणारी रक्कम मकेबा कुटुंबाकडे नसल्यामुळे बाळ झेंझिलला सहा महिन्यांचा काळ आईबरोबर तुरुंगात घालवावा लागला. लहानपणी ती प्रिटोरियामधील चर्चमध्ये प्रार्थना म्हणत असे तेव्हाच तिच्यातील गायनकलेची चुणूक दिसली. मकेबाचं प्रोटेस्टंट पंथात धर्मातर झाल्यानंतर ती चर्चमध्ये इंग्रजी, झोसा, झुलू आणि सोथो भाषांमध्ये रीतसर प्रार्थनेचे सूर आळवू लागली. ती इंग्रजी भाषा बोलायला शिकण्याआधीच त्या भाषेतून गाऊ लागली. मकेबा लहान असताना तिचं कुटुंब ट्रान्सवालला स्थायिक झालं. ती सहा वर्षाची झाल्यावर वडिलांचं छत्न हरवलं, त्यानंतर इतक्या लहान वयात ती उदरनिर्वाहासाठी एका कुटुंबात आया म्हणून काम करू लागली. कारण तिची आई जोहान्सबर्गमधील एका गोर्‍या कुटुंबात काम करायला गेल्यामुळे मकेबा आणि तिच्या पाच भावंडांची जबाबदारी तिच्यावर पडली. प्रिटोरियामध्ये आपल्या आजी आणि चुलत भावंडांबरोबर ही सगळी भावंडं राहू लागली. तिला संगीत आणि वाद्यांचा वारसा तिच्या कुटुंबातूनच मिळाला होता. तिची आईही अनेकविध पारंपरिक वाद्यं वाजवत असे. तिच्या भावानं डय़ूक एलिंग्टन व इला फित्झगेराल्ड यांच्या काही कॅसेट्स आणल्या आणि मकेबाला गाणी म्हणायला प्रोत्साहन दिलं. तिचे वडीलही उत्तम पियानो वाजवत असत. नंतर घराण्याची ही पारंपरिक वाद्यांची आवडच मकेबाचं करिअर झाली. 
वयाच्या सतराव्या वर्षी जेम्स कुबेशी पहिलं लग्न झाल्यावर मकेबाने एका मुलाला जन्म दिला. तिच्या नवर्‍याने तिचा आतोनत छळ केला. दोन वर्षानंतर हे लग्न संपुष्टात आलं. त्यानंतर तिला स्तनाचा कर्करोग झाल्याचं निदान झालं. सुमारे दहा वर्षानी ती या जिवावरच्या दुखण्यातून पूर्ण बरी झाली.
त्यानंतर तिनं व्यावसायिकरीत्या गाणं म्हणायला सुरु वात केली. वयाच्या एकविसाव्या वर्षी ती मॅनहॅटन ब्रदर्सच्या जाझ ग्रुपमध्ये सामील झाली. त्यावेळी मॅनहॅटन ब्रदर्सतर्फे प्रसिद्ध आफ्रिकी व अमेरिकन गाण्यांचं सादरीकरण होत असे. त्यात पुरु षांची मक्तेदारी इतकी होती की त्या वाद्यवृंद व गायकांच्या ताफ्यात मकेबा ही एकटीच गायिका होती. या ग्रुपमध्ये असतानाच तिचं पहिलं गाणं खूप लोकप्रिय झालं. मॅनहॅटन ब्रदर्सनंतर 1956 मध्ये ती स्कायलार्क्‍स या महिलांच्या ग्रुपबरोबर काम करू लागली. मॅनहॅटन ब्रदर्सबरोबर कार्यक्र म करत असताना ती नेल्सन मंडेला यांना भेटली. त्यावेळी मंडेला यांनी ‘ही मुलगी भविष्यात काहीतरी चांगलं करणार’ हे भाकीत वर्तवलं होतं, ते कालांतराने खरं झालं. मकेबाने वर्णभेदाविरोधात आवाज उठवला. ‘यू टेल सच लव्हली लाइज?’ या सुरेल भावपूर्ण गीताने अनेक रेकॉर्ड मोडले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या बिलबोर्ड टॉप 100 मध्ये स्थान मिळवणारी ही पहिली दक्षिण आफ्रिकी रेकॉर्ड. 
  ती न्यू यॉर्क शहरात गेल्यावर तिला अल्पावधीत प्रसिद्धी मिळाली. तिथंच 1960 साली तिचा सोलो अल्बम प्रसिद्ध झाला. त्याच वर्षी तिनं तिच्या आईच्या दफनविधीसाठी दक्षिण आफ्रिकेत परतण्याचा निर्णय घेतला; पण द. आफ्रिकेच्या सरकारनं तिला प्रवेश नाकारला. तिचा व्हिसा रद्द झाला. दरम्यानच्या काळात हत्याकांडात तिच्या कुटुंबातील दोन सदस्य मारले गेले. 
पुढे दक्षिण आफ्रिका सरकारच्या वर्णभेदी धोरणांबद्दल तिनं जोरदार आवाज उठवला.  दरम्यानच्या काळात तिची दोन आत्मचरित्नही प्रसिद्ध झाली. अमेरिकेत किंवा आफ्रिकेत स्टेजवर सादरीकरण करताना ती मेकअप करत नसे आणि आपले कुरळे केस सरळ करण्याच्या भानगडीतही पडत नसे. ती आफ्रिकी दागिने घालणं जास्त पसंत करत असे. तिनं तयार केलेली स्वतर्‍ची स्टाइल त्या देशातील शालेय मुलींमध्ये कमालीची लोकप्रिय ठरली. नऊ पासपोर्ट्स आणि दहा देशांचं नागरिकत्व असलेली ती पहिली गायिका असेल. 
एका संगीतात झोकून दिलेल्या कलाकाराचा मृत्यू स्टेजवर येणं हे एखाद्या कलाकाराचं त्याच्या कलेशी एकरूपतेचंच लक्षण! इटलीमध्ये सादरीकरणाच्या वेळी ती स्टेजवर हृदयविकाराच्या झटक्याने कोसळली आणि गेली.

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)

 

Web Title:  Meet the rebellious African singer makeba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.