त्यानं रोझ क्विन होणं रुईया कॉलेजचा कट्टा स्वीकारतो तेव्हा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 04:20 PM2018-10-04T16:20:06+5:302018-10-04T16:20:53+5:30

अजय. पण एका टप्प्यावर वाटलं, आपण ‘तो’ नाही. मग तिथून अंजली होण्याचा प्रवास सुरू झाला आणि रुईया महाविद्यालयातील रोझ क्वीन किताब जिंकत तिनं एक नवीन पाऊल टाकलं

meet Ruia college new rose queen | त्यानं रोझ क्विन होणं रुईया कॉलेजचा कट्टा स्वीकारतो तेव्हा.

त्यानं रोझ क्विन होणं रुईया कॉलेजचा कट्टा स्वीकारतो तेव्हा.

Next
ठळक मुद्देनव्या अस्तित्वाच्या शोधात रोजचा दिवस हे आजही नवीन आव्हान असतं. पण मग मीही त्याच जिद्दीने प्रत्येक सूर्योदयासोबत रोजचं आव्हान झेलायचं ठरवलं.

-  अंजली सिरोया
शब्दांकन : स्नेहा मोरे

वय वर्ष 21, नवी ओळख - अंजली सिरोया, आयुष्याच्या सगळ्यात चॅलेंजिंग टप्प्यावर मला ‘मी’ वेगळे असल्याचं जाणवलं. माझं बाहेरचं अस्तित्व आणि आतली ‘मी’ वेगळी असल्याची जाणीव मनात वादळ निर्माण करणारी असते, हे खरंच त्या दिवशी कळलं. पण जे ती भावना नेमकी या क्षणाला शब्दांत व्यक्तही करू शकत नाही. डोळ्यांत हसू आणि रडू एकाच वेळी दाटलं होतं, कुणाला सांगावं की नाही? सगळं लपवून ठेवावं? संपवावं? अशा असंख्य निरुत्तर प्रश्नांच्या लाटा मनात आदळत होत्या. या सगळ्या प्रश्नांना कुठे वाट करून द्यायची याचा शोध सुरू होता. 
घरच्यांचा हट्ट होता, इंजिनिअरिंग करावं म्हणून अ‍ॅडमिशन घेतली खरं; पण मनाविरुद्ध, आवडीविरुद्ध काहीच जमतं नव्हतं. त्यावेळी अखेर आईला सांगितलं की, इंजिनिअरिंग जमत नाहीय, त्याची आवड नव्हतीच कधी. मग अखेर आई-बाबांनी आवडत्या शाखेचं शिक्षण घेण्याची परवानगी दिली. आणि मग आयुष्यातला टर्निग पॉइंट म्हणावा असा प्रवास खर्‍या अर्थाने सुरू झाला, असं म्हणत मी सुस्कारा सोडला खरा आणि बीएमएमसाठी रुईया कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन घेतलं, यावेळी आयुष्यात आणखी एक मोठं आव्हान वाट पाहत आहे, याची पुसटशी कल्पना नव्हती. पण मग बारावीनंतर माझा माझ्याशी झगडा सुरू झाला.
माझ्या आत लपलेल्या वेगळ्या अस्तित्वाची मला कल्पना नव्हती. पण हळूहळू मोठं होत असताना जाणीव होऊ लागली. तोर्पयत आयुष्याच्या सगळ्यात संवेदनशील टप्प्यावर मी होते, 18व्या वर्षी बारावीत असताना माझं मनातलं अस्तित्व आणि बाहेरची ‘मी’ वेगळी असल्याचं जाणवलं. या सगळ्याविषयी कधी घरच्यांसमोर बसून बोलायची हिंमत झाली नाही. तो विचार मनाला हादरवणारा होता; पण आतल्या आवाजाला वाट करून द्यायचीय असं सतत वाटायचं. बर्‍याचदा वयाच्या या टप्प्यात आपल्या घरच्यांपेक्षा आपल्याला मित्र-मैत्रिणी जवळचे वाटतात. माझ्या बाबतीतही हेच झालं, माझी जवळची मैत्रीण असलेल्या पूजा हिला सांगितलं होतं. काही क्षणांसाठी बिथरलेल्या तिने हसतं हसतं माझं नवं अस्तित्व स्वीकारलं. आणि या प्रवासात आजही खंबीरपणे ती सोबत आहे.
नव्या अस्तित्वाच्या शोधात रोजचा दिवस हे आजही नवीन आव्हान असतं. पण मग मीही त्याच जिद्दीने प्रत्येक सूर्योदयासोबत रोजचं आव्हान झेलायचं ठरवलं, माझ्यातला बदल हळूहळू सगळ्यांच्या नजरेत दिसू लागला. पण घरच्यांचा नजरांना उत्तर देण्यासाठी मी बांधिल होते, एका अनपेक्षित क्षणी घरी माझ्या अस्तित्वाचा उलगडा झाला आणि माझ्या मनात घोंगावणार्‍या रोजच्या वादळाची जणू त्सुनामीत परिणिती झाली.  मी वेगळा पोशाख करून घरातून निघणं, मेकअप करणं हे घरच्यांना रुचत नव्हतं. त्या कठीण प्रसंगात वेळोवेळी आईचा आणि मोठय़ा भावाचा मार खाल्ला. त्यांना माझ्या असित्वाविषयी आणि ट्रान्सजेंडर समुदायाविषयी काहीच माहीत नव्हतं. त्यामुळे त्यांना राग येणं, तो अनावर होणं आणि ते कृतीत उतरणं हे रोजचंच सुरू होतं. बर्‍याचदा माझा रागही अनावर व्हायचा, त्यात मग आईला कधी कधी मीही खूप बोलायचे. पण तो सगळा माझ्याशी मी केलेला संघर्ष आहे, असं म्हणून पुन्हा त्याच जोमाने डोळ्यातलं पाणी पुसून उभं रहायचं ठरवलं.
अनेक प्रसंग आले, ज्या वेळेस असं वाटायचं संघर्ष संपत नाहीय, उत्तरं सापडत नाहीय. ती प्रत्येक रात्रंदिवस माझा माझ्याशीच झगडा सुरू असायचा. ज्यावेळी मी स्वतर्‍ला बदलणं सुरू केलं, त्यावेळी आपसूकच घरातून बंधन आली. चेंबूरसारख्या परिसरात राहणार्‍या मला घरच्यांनी बजावलं, घरातून निघताना मेकअप करायचा नाही. परिसरातून बाहेर गेलीस की तुझ्या मनासारखं हवं ते कर. त्याप्रमाणे, मग मी घरातूनच ‘अजय’ म्हणून बाहेर पडायचे आणि मग कुठल्यातरी मित्र-मैत्रिणीच्या घरी जाऊन ‘तिच्या’ अस्तित्वानिशी समाजात वावरायचे.
संघर्षाच्या वावटळात अखेर तो दिवस आलाच, ज्या दिवशी मी घरं सोडायचं ठरवलं. मे महिन्यात आई-बाबा, मोठा भाऊ या सगळ्यांशीच भांडून घरचा उंबरठा ओलांडला. आणि मग एका मित्राकडे जायचं ठरवलं, सायंकाळनंतर बॅग भरून निघाले. घरी कुणालाच कल्पना नव्हती की मी कुठेय? सारेच चिंतित होते, पण मी मात्र जबाबदारीनीशी माझ्या चुलत भाऊ भूपेंद्रला मित्राकडे सुखरूप असल्याचं सांगितलं होतं. पण ती रात्रं आणि दुसर्‍या दिवशीची सकाळ घरांतून सतत फोन येत होते, मी ठरवलं होतं, घराच्या भावनिक चौकटीत अडकले तर स्वतर्‍च्या अस्तित्वासोबत उभं राहणं कठीण होईल. याच विचाराने ओलांडला होता तो उंबरठा.
पण मग भावाचा फोन आला, एकदा आईशी बोलून घे. तिला सांग ठीक आहेस वगैरे. त्यावेळी आईच्या आवाजातला कंप आणि धाप टाकत घेत असलेल्या श्वासाने मी स्तब्ध झाले. आपल्यामुळे आईच्या स्वास्थ्यावर परिणाम होऊ नये, या भीतीने अखेर पुन्हा घर गाठलं. त्या दिवशी घरी गेल्यानंतर आई, बाबा, मोठा भाऊ आणि मी एकत्र बसलो. माझ्या नव्या अस्तित्वाविषयी नवे निर्णय घेण्याबद्दल चर्चा होणार होती, आणि ती तशी झालीही. बंधनं असतीलच पण स्वतर्‍च्या पायावर उभं राहिस्तोवर तसचं जगावं लागेल या उक्तीवर घरच्यांनी स्वीकारलं. मात्र आजही काही लोक येऊन माझ्याबद्दल वाईट बोलतात, प्रश्नांचा भडीमार करतात अशी आईची कायम तक्रार असते.
रुईया कॉलेजमधल्या ‘रोझ क्वीन’च्या किताबानंतर मात्र आयुष्य बदललंय. या स्पर्धेत भाग घेत असताना आयोजकांच्या परवानगीपासून सगळंच करावं लागलं. त्यावेळी माझे निवडक फ्रेण्ड्स सोडून इतरांसाठीही माझं या स्पर्धेतलं वावरणं हा वेगळा अनुभव होता. पण मी ठरवलं होतं, स्वतर्‍ला सिद्ध करायची ही संधी दवडायची नाही. घरी कुणकुण लागली होती की, कॉलेजमधल्या कार्यक्रमात भाग घेतलाय; पण मी नेमकं काय करत होते, याची त्यांना कल्पना नव्हती. ‘रोझ क्वीन’ जिंकल्यानंतरही घरच्यांचा दृष्टिकोन बदललेला नाही, याउलट काही माध्यमांत छापून आलेले फोटो पाहून आई-वडिलांनी मला जाब विचारला. त्या त्या वेळी त्यांना मी समजावून सांगितलंही, की मी मेहनत करून ते स्थान मिळवलंय.
आता कॉलेजमध्ये फिरताना मला पूर्वीपेक्षा अधिक मोकळ वाटतं. शिवाय, माझ्या समुदायातही माझ्या या अचिव्हमेंटबद्दल कळल्याने तिथे पाठ थोपटली गेली.  या सगळ्या प्रवासात स्वप्निल हासुद्धा आणखी एक सोबती. त्याचा प्रवासही माझ्याच सारखा. माझ्याच इतका चढ-उताराचा. त्यामुळे आम्ही सोबतच आमच्या जाणिवांना टप्प्याटप्याने ओळखत आहोत, आणि एक्सप्लोर करत आहोत. आता संपूर्ण आयुष्य मला नव्या अस्तित्वासोबतच जगायचंय.

**

‘त्या’ निर्णयाला उशीरच झाला
सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आमच्या समुदायासाठी दिशादर्शक आहे, हे खरंय. मात्र सल ही आहे की, हा निर्णय येण्यासाठी फार काळ जावा लागला. या निर्णयानंतर समाजाची मानसिकता बदलण्यासाठी काळ लोटावा लागेल, हे तितकं सोपंही नाही. आजही समाजात माझ्यासारख्या नव्या अस्तित्वाशी झगडा करणारी अनेक मुलं-मुली आहेत. पण गरज आहे ती त्यांना समजून घेण्याची, त्याचं ऐकून घेण्याची. कारण या संघर्षाची सुरुवात आपल्या घराच्या उंबरठय़ापासून होते आणि मग ती निरंतर सुरू असते.. समाजाची विचारसरणी हळुहळू का होईना बदलेल हा सकारात्मक विश्वास घेऊन पुढे पाऊल टाकायचं  आहे.

Web Title: meet Ruia college new rose queen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.