भेटा इंजिनिअरिंग सोडून फॅशन डिझायनिंग करणार्‍या तरुणाला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2019 07:10 AM2019-12-05T07:10:00+5:302019-12-05T07:10:02+5:30

कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला; पण मन लागेना, मग ते सोडून आवडीच्या विषयाकडे वळालो. बीएससी केलं फॅशन डिझायनिंग घेऊन आणि आता स्वत:ची अकॅडमी उघडली आहे.

Meet Young boy Who leave engineering to become Fashion Designer. | भेटा इंजिनिअरिंग सोडून फॅशन डिझायनिंग करणार्‍या तरुणाला !

भेटा इंजिनिअरिंग सोडून फॅशन डिझायनिंग करणार्‍या तरुणाला !

Next
ठळक मुद्देशिक्षण सुरू असतानाच मनाशी ठरवलं की नोकरी न करता व्यवसाय करायचा.

 - गिरीश  कुलकर्णी

नुकतीच तिशी गाठलीय. कोळपेवाडीच्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात बारावी झाल्यानंतर घरच्यांच्या आग्रहाखातर मी पुण्यात कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. मनाविरुद्ध झालेल्या अ‍ॅडमिशनमुळे अभ्यासात लक्ष लागेना. रडतखडत जेमतेम वर्ष कसंतरी काढलं अन् सरळ घरचा रस्ता धरला तो परत न जाण्यासाठी.
       इंजिनिअरिंग सोडून गावी माहेगावला परत आलो; पण त्यानंतर सर्वाचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. भरमसाठ फी वाया घालवलीस,  तू काहीच करू शकत नाहीस, तुझ्याकडून काहीही होणार नाही, ही भावना प्रत्यक्ष- अप्रत्यक्षरीत्या कुणी ना कुणी व्यक्त करायचंच.  
आता पुढं काय करायचं, याचा विचार डोक्यात सुरू होताच. त्यात मला मात्र लहानपनापासूनच विविध रंगांचे व डिझाइन्सचे आकर्षक कपडे घालण्याची आवड होती. मग आपोआपच माझी पावलं फॅशन डिझायनिंगकडे वळाली. मुळात कलेची आवड  असल्याने मी तीन वर्षाचा बी.एस.सी. इन फॅशन डिझाइन हा अभ्यासक्रम डिस्टिंगशनमध्ये पूर्ण केला. शिक्षण सुरू असतानाच मनाशी ठरवलं की नोकरी न करता व्यवसाय करायचा. मात्र नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारं भांडवल आणायचं कुठून, हा प्रश्न होताच.  
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर व्हॅन हुसेन या आंतरराष्ट्रीय कपडय़ांच्या कंपनीमध्ये मी काहीकाळ फॅशन कन्सल्टंट म्हणून  नोकरी केली. त्यानंतर फॅशन डिझाइन इन्स्टिटय़ूटमध्ये     व्यवस्थापक म्हणून काम केलं; पण आपलं काहीतरी सुरू करावं असं मनात सारखं होतच. व्यवसायामध्ये यश संपादन करायचं असेल तर नेहमी स्वतर्‍ला सिद्ध करावं लागतं ही खूणगाठ मनाशी बांधली. त्याचंच फलित म्हणून कॉलेजमध्ये ओळख झालेल्या शिक्षिका नेहा हुरकट यांच्या सहकार्यातून पुण्यामध्ये दहा बाय दहाच्या भाडय़ाच्या राहत्या खोलीमध्ये  केवळ एकाच विद्यार्थिनीच्या हजेरीवर वस्र डिझायनिंग  इन्स्टिटय़ूटची मुहूर्तमेढ रोवली. 
सुरुवात तर केली, आता प्रतीक्षा होती विद्याथ्र्याच्या अ‍ॅडमीशनची. जाहिरात करण्यासाठी मोठा खर्च परवडणारा नसल्यानं माहिती पत्रकं छापून ती घरोघरी पोहोचविण्याचं काम सुरू केलं. सुरुवातीचे काही महिने अडचणीत गेल्यानंतर प्रतिसाद मिळू लागला. मेहनत घेण्याची तयारी, प्रमाणिकपणा व जिद्द या त्रिसूत्रीवर संस्थेची प्रगतीकडे वाटचाल सुरू झाली. विद्यार्थीसंख्या वाढल्यानं ही जागा कमी पडू लागली. मग नवीन जागेचा शोध सुरू झाला. निगडी प्राधिकरणमधील 1300 चौरस फुटाची जागा भाडेतत्त्वावर घेण्याचं निश्चित केलं. या जागेचं भाडं, डिपॉझीट व अंतर्गत सजावटीचा खर्च मोठा असल्याने मेव्हणे मोहितराव यांनी दीड लाख रुपयांचं भांडवल उपलब्ध करून दिले. या जागेत स्टिचिंग, ड्राफ्टिंग, बूटीक मॅनेजमेंट, फॅशन स्टुडीओ आदी स्वतंत्र दालनं तयार करण्यात आली. संस्थेच्या जाहिरातीसाठी सोशल मीडिया व वेब  साइटचा मोठा फायदा झाला. फॅशन डिझायनर नेहा हुरकट यांच्या सहकार्यातून संस्थेनं पुण्यासारख्या शहरात वेगळी ओळख निर्माण केली.
        गेल्या तीन वर्षापासून गोवा येथे आयोजित करण्यात येणार्‍या आंतरराष्ट्रीय फॅशन शोमध्ये आमचे विद्यार्थी आता सहभाग घेतात.
सध्या लग्न, साखरपुडा, वाढदिवस यासारख्या कौटुंबिक कार्यक्रमांबरोबरच प्री-मॅरेज शूट, प्री-मॅटर्निटी शूट करण्यात येत असतं. या कार्यक्रमांसाठी पहिली आवश्यकता भासते ती फॅशन डिझायनर्सची. त्यामुळे फॅशनच्या झगमगत्या क्षेत्राला  अजूनही लखलखते दिवस येणार आहेत.
     
  (शब्दांकन  - गिरीश जोशी)

Web Title: Meet Young boy Who leave engineering to become Fashion Designer.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.