भेटा छत्तीसगडमध्ये काम करणारा नाशिकचा तरुण, जेव्हा विकासाची व्याख्या शोधतो!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 06:22 PM2020-02-27T18:22:10+5:302020-02-27T18:22:59+5:30
नाशिकचा उच्चशिक्षित तरुण इंजिनिअर. शाश्वत विकासाची वाट शोधत थेट छत्तीसगड-दंतेवाडय़ात जातो आणि त्यातून सुरू होतो एक प्रवास शिकण्या-शिकवण्यासह नव्या जगण्याचाही!
- शिल्पा दातार-जोशी
नाशिकमधल्या कार्यक्र मात तो उत्साहानं बोलत असतो. अनुभव सांगत असतो. शाश्वत विकास म्हणजे काय ही संकल्पना उलगडत असतो.
अचानक लक्षात येतं, तो बोलतो आहे ते वेगळं आहे, त्याच्या शाश्वत विकासाच्या संकल्पनेच्या आपणही प्रेमात पडू लागलो आहे. पण असं आकर्षण वाटणं, प्रेमात पडणं वेगळं आणि त्यासाठी झोकून देणं, घरदार, संपन्नता सोडून मनासारखं काम करण्यासाठी निघून जाणं सोपं थोडंच असणार?
मात्र ते त्यानं केलं. आकाश बडवे त्याचं नाव. उच्चशिक्षित. इंजिनिअर. शहरी नोकरीच्या चकरात न अडकता त्यानं छत्तीसगडमध्ये काम करायचं ठरवलं. छत्तीसगडचा आदिवासीबहुल भाग- दंतेवाडा. हे नाव आपण नक्षलवादी हल्ला यासंदर्भात ऐकलं-वाचलेलं असतं. त्यापलीकडे फारसं माहिती नसतं, आपल्या देशाच्या त्या भागाविषयी. आकाशने मात्र तिथं जाऊन काम सुरू केलं आणि जैविक शेतीच्या माध्यमातून हजारो आदिवासींचं अभावाचं आयुष्य बदलायचा प्रय} करणं तरी सुरू केलं.
त्याला विचारलं की, एकदम नाशिक सोडून दंतेवाडा, का?
तर तो एका वाक्यात सांगतो, ‘जिथं माझी जास्त गरज होती तिथं मी गेलो.!’
नाशिकमध्ये शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर त्यानं राजस्थानमधील प्रसिद्ध बिट्स पिलानी विद्यापीठात अभियांत्रिकीची पदवी घेतली. उच्चशिक्षणाचा वापर केवळ स्वतर्साठी करायचा नसतो, समाजालाही त्याचा उपयोग व्हायला हवा, अशी शिकवण त्याला आजोबा स्वातंत्र्यसैनिक भाऊ नावरेकर व सामाजिक कार्यकर्ते असलेले मामा श्रीकांत नावरेकर यांच्याकडून नकळत मिळत होतीच. त्यांच्या शाश्वत विकासाच्या संकल्पनेवर त्याचा विश्वास होताच. म्हणूनच प्रशिक्षणादरम्यान त्याला गावांमध्ये काम करायला आवडलं. झारखंड, गुजरात व इतरत्र आदिवासी समुदाय पाहिल्यानंतर त्याला जाणवलं, की संसाधनं भरपूर असूनही आदिवासी समुदाय त्याचा चांगल्या पद्धतीनं वापर करत नाही कारण निसर्ग व्यवस्थापनाबाबत त्यांच्याकडे वेगळी प्रगल्भता आहे. तो म्हणतो, ‘या समाजाला आपल्याकडं जे वेगळं आहे त्याची जपणूक करायला आवडतं.’
अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान ग्रामीण विकास फेलोशिपसाठी त्याने अर्ज केला. या शिष्यवृत्तीअंतर्गत नक्षलग्रस्त जिल्ह्यांतील जिल्हाधिकार्यांना विकासकामात मदत करण्यासाठी काही तरु णांची निवड झाली. सुमारे आठ हजार जणांमधून निवडलेल्या 225 विद्याथ्र्यामध्ये आकाशचा समावेश होता. 2012 साली त्यानं छत्तीसगडमध्ये काम करण्याचा निर्णय झाला.
छत्तीसगडमध्ये गेल्यावरचा अनुभव तो सांगतो, ‘तिथले जिल्हाधिकारी देवसेनापती हे प्रोत्साहन देणारे होते. माझं शिक्षण कृषी या विषयात झालं नव्हतं. पण आदिवासींबरोबर काम करता करता पारंपरिक शेतीची माहिती मिळाली. कृषितज्ज्ञ व्यक्ती भेटल्या. जैविक शेतीविषयक प्रशिक्षण देणार्या लोकांना आम्ही बोलवायचो. त्यातून मीही शिकत गेलो. एकीकडे गोंड आदिवासींच्या आर्थिक विकासाची बाजू वाईट होती. तिथं साक्षरता कमी होती. गोंडी व हलबी या आदिवासी भाषा बोलल्या जात. गोंडी भाषा समजणं फारच अवघड असल्यानं कधी अडचण यायची. एकीकडं निसर्गसंपन्नता व दुसरीकडं गरिबी, यात सुवर्णमध्य साधायचा होता.’
पण मग तो सुवर्णमध्य कसा साधला?
तर त्यांवर आकाश सांगतो, ‘‘शेतीमध्ये रसायनांचा वापर करायचा नाही, तसंच शेतीसाठी बाजारातून महाग विकत घेण्यापेक्षा नैसर्गिक संसाधनांवर आधारित शेती करून पैसा वाचवायचा. या संकल्पनेला अॅग्रो इकॉलॉजी हा नवा शब्द रूढ झालाय. जमीन व आजूबाजूचं वातावरण यात जेवढी विविधता असेल तेवढी शेती उत्पन्न देते. हे माहीत झालं होतं; पण कामं पुढं नेणं आव्हान होतं. नक्षलग्रस्त भाग असल्यानं सुशिक्षित माणसं इथं येत नव्हती. त्यांना असुरक्षित वाटत होतं. माझ्या मनात भीती नव्हती, घरच्यांच्या मनात होती. त्यांचं मन तयार करण्यासाठी खूप चर्चा कराव्या लागल्या. दुर्गम भाग, आरोग्य, शिक्षण यांसारख्या सुविधांचा अभाव, तिथून बाहेर पडणं अवघड या बाबींमुळे पुरेसं मनुष्यबळ अजूनही नाहीये.’’
आकाश सध्या दंतेवाडय़ाच्या 120 गावांमध्ये काम करत असताना शेती व वनोत्पादनावर भर देतो आहे. दंतेवाडय़ामधील आदिवासी अजूनही रेशनचं धान्य घेत होते. तिथं तीन पातळ्यांवर अन्नस्वयंपूर्णता वाढण्याकडे लक्ष दिलं. एक म्हणजे, प्रत्येक घर अन्नाच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालं पाहिजे. दुसरं, घराबाहेरील समाजही कुपोषित नको. आणि आर्थिक स्वयंपूर्णता. हे काम करण्यासाठी बेस पक्का हवा. बाह्य कॉस्मेटॉलॉजीपेक्षा शाश्वत विकासावर भर दिल्यास आदिवासीही आपली परंपरा व आधुनिकतेची सांगड घालत उत्तम बाजारपेठ मिळवू शकतात. अंगणवाडीचा पोषक आहार, जलसंधारणावर काम करता करता त्याला जैविक शेतीचं महत्त्वही कळत होतं. जिल्हाधिकारी देवसेनापती यांनी त्याला त्याबाबतीत स्वातंत्र्य दिलं. साडेतीन वर्षे काम केल्यानंतर पारंपरिक शेतीची संकल्पना प्रत्यक्षात उतरली; पण त्या शेतमालासाठी बाजारपेठ कुठं होती? तेव्हा तो सांगतो, शहरातली पारंपरिक व सेंद्रिय शेतमालाची मागणी वाढत असताना तिथर्पयत दंतेवाडय़ाहून शेतमाल कसा पाठवता येईल, हा विचार सोशल मीडियार्पयत येऊन पोहोचला.
आदिवासींचा सण असलेल्या भूमगादी या संकल्पनेचा मार्केटिंगसाठी वापर करायचा ठरला. संक्र ांतीच्या आसपास पिकं निघतात. देवाचं नाव, पूजा केली जाते. प्रत्येक घरातून थोडं धान्य आणून एकत्र केलं जातं. या संकल्पनेला धरून भूमगादी ही शेतकरी उत्पादक कंपनी त्यानं तयार केली. आजघडीला यात 2700 शेतकरी शेअर होल्डर आहेत.
दंतेवाडय़ातील आदिवासी लोक गरजेपुरताच तांदूळ पिकवित. काही जाती तर नामशेष होण्याच्या मार्गावर होत्या. आदिवासींना पारंपरिक वाणांची लागवडीस प्रोत्साहन दिलं. शेतीची उत्पादकता वाढली. आदिवासींच्या तांदूळ, डाळी, मूग, नाचणी आदी धान्यासाठी ‘आदिम’ नावाचा ब्रॅण्ड तयार केला. विविध महोत्सवांच्या माध्यमातून या धान्याचे आरोग्यदायी गुणधर्म, त्यातील पोषणमूल्यं याचं महत्त्व पटवून दिलं जातं. यातून शेतकर्यांचं उत्पन्न तर वाढलंच, नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या सुमारे दीडशे ते दोनशे सुवासिक तांदळाच्या जातींचे पुनरु ज्जीवन झालं. त्यासाठी त्यानं सोशल मीडियाच्या माध्यमाचा सकारात्मक वापर केला. बाजारभावासाठी ऑनलाइन ट्रेड पेज सतत पाहिलं जातं. आदिम अंतर्गत भारतभरातील 40शहरांत पंचवीस ते तीस प्रकारची उत्पादनं जातात.
शाश्वत विकासाची ही वाट शाश्वत समाधानाच्याही वाटेवर घेऊन जाते तर, असं आकाशला भेटून नक्की वाटतं.
(शिल्पा मुक्त पत्रकार आहे.)