थेट आसाममध्ये जाऊन मानसोपचार करणार्‍या तरुण डॉक्टरची गोष्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 04:10 PM2019-10-10T16:10:22+5:302019-10-10T16:10:58+5:30

मुंबईतला मनोविकारतज्ज्ञ तरुण डॉक्टर, तो ठरवतो मानसिक उपचारांची गरज दुर्गम भागात, खेडय़ापाडय़ातही आहे, आपण तिथं जायला हवं. आणि म्हणून तो सरळ आसाम गाठतो.

Meet a young psychiatrist who works in rural Assam! | थेट आसाममध्ये जाऊन मानसोपचार करणार्‍या तरुण डॉक्टरची गोष्ट!

थेट आसाममध्ये जाऊन मानसोपचार करणार्‍या तरुण डॉक्टरची गोष्ट!

Next
ठळक मुद्देमी ठरवलं की आपण फक्त सायकॅट्रिस्ट व्हायचं नाही तर कम्युनिट सायकॅट्रिस्ट व्हायचं.

डॉ. नीलेश मोहिते

एमबीबीएसच्या तिसर्‍या वर्षार्पयत माझं आयुष्य सुखा सुखी चाललं होतं. मध्यमवर्गीय कुटुंबात, मुंबईत मी वाढलो. वडील बँकेत अधिकारी, तर आई गृहिणी. मुंबईतल्या ख्यातनाम टीएनएमसी आणि नायर हॉस्पिटलमध्ये मी शिकलो. आमच्या पीएसएम फिल्ड व्हिजिट सुरू झाल्या आणि आम्हाला झोपडपट्टी, दुर्गम गावं, रेड लाइट एरिया, अनाथआश्रम, अंध आणि अपंगांसाठीच्या संस्था आणि तुरुंग असं अनेक ठिकाणी नेण्यात आलं. हा अनुभवच माझ्यासाठी नवा आणि डोळे उघडणारा होता. निराशही झालो ते सारं पाहून.  त्याकाळात मला वाटू लागलं की, मी किती नशिबवान आहे. मला कुठलं व्यंग नाही, कुठलीही सामाजिक-राजकीय कारणं माझ्या जगण्यावर परिणाम करत नाहीत, माझं कुटुंब आहे, माझ्या शिक्षणासाठी, भविष्यासाठी त्यांनी उत्तम तरतूद केली आहे. या भावनेनं बरं वाटलं तसं जबाबदारीची जाणीवही करून दिली. त्यानंतर मी आणि माझ्या मित्रांनी काही लहानमोठे सामाजिक उपक्रम सुरू केले.
त्याचकाळात मी डॉ. अभय बंग यांनी सुरू केलेल्या निर्माण उपक्रमातही सहभागी झालो.  निर्माणच्या प्रशिक्षणात सार्वजनिक आरोग्यासंदर्भात अनेक गोष्टी शिकता आल्या. त्यातून प्रश्न सोडवण्याचा दृष्टिकोन विकसित झाला. त्याचवेळी आमच्यापैकी अनेकांनी एक समस्या, प्रश्न निवडून त्यावर काम करायचं ठरवलं. मी विषय निवडला, मेण्टल हेल्थ अ‍ॅण्ड अ‍ॅडिक्शन्स. मानसिक आरोग्य आणि व्यसनं.  2011ची ही गोष्ट. पुढची प्रवेश परीक्षा तयारी किंवा प्रॅक्टिस असं काही ना करता मी काही काळ प्रत्यक्ष काम करून पाहिलं. विविध आरोग्य प्रकल्पांना भेटी दिल्या, सामाजिक कारणांचा आरोग्यावर होणारा परिणाम अभ्यासला. त्यावेळी सामाजिक घटक आणि त्यांचा मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम यांचा जवळचा संबंध माझ्या लक्षात आला. त्याचवेळी मी ठरवलं की आपण फक्त सायकॅट्रिस्ट व्हायचं नाही तर कम्युनिट सायकॅट्रिस्ट व्हायचं. मात्र तसं काम करायचं तर मला दुर्गम भागात जाणं भाग होतं, मुंबईत काम करणं हा काही पर्यायच नव्हता. सायकॅट्रीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनही करायचं होतं, आणि कामही. त्याच शोधात 2013 साली मी आसाममधल्या तेजपूरला गेलो. एलजीबी तेजपूरला भेट दिली. पाहताक्षणी मला आसाम आणि तेजपूर आवडलं.
मग मी घरी परत आलो, प्रवेश परीक्षेचा जीवतोड अभ्यास केला. उत्तीर्ण झालो आणि पुढच्यावर्षी एलजीबी आसाम तेजपूरला दाखल झालो. तिथल्या सायकॅट्री विभागाच्या प्रमुख डॉ. अपराजीताना भेटलो आणि आपण फक्त पीजी नाही तर कम्युनिटी वर्कही करणार असल्याचं त्यांना सांगितलं. तिथं सुरुवातीचे काही दिवस अवघड गेले मात्र दुसर्‍यावर्षी मी बंगलोरला निम्हांसा गेलो आणि तिथं काम करण्याचा माझा आत्मविश्वास बळावला.
माझं शिक्षण संपल्यावर माझ्याकडे दोन संस्थांच्या ऑफर होत्या. एक म्हणजे द अ‍ॅण्ट आणि दुसरी परिवर्तन. परिवर्तन ही संस्था तर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी सुरू केली. तिचं काम आसाममध्ये चालतं, सध्या डॉ. हमीद दाभोलकर ते काम पाहतात. मी दोन्ही संस्थात काम सुरू  केलं, अ‍ॅण्टमध्ये 20 दिवस आणि 10 दिवस परिवर्तन संस्थेचं काम.
माझा ड्रिम जॉबच मला मिळाला होता. मी गावखेडय़ात, लोकांच्या सोबत राहिलो. मानसिक आरोग्याच्या समस्या, लोकांना औषधोपचार न मिळणं किंवा तिथंवर न पोहचता येणं हे सारं जवळून पाहता आलं.  साधी औषधं घेतली तर बरे होतील अशा शेकडो रुग्णांना मी भेटलो. मात्र आजाराविषयी गैरसमज, अंधश्रद्धा, जागृती नसणं, गरिबी, आणि सुविधा नसणं यामुळे हे मानसिक आजार अधिक बळावतात आणि गुंतागुंतीचे होतात असं लक्षात आलं.
या भागात गावखेडय़ात जाऊन काम करणारा मी एकटाच सायकॅट्रिस्ट असल्याचं लक्षात आलं. अनेक लोकांनी तर मानसरोग तज्ज्ञ पहिल्यांदाच तिथं पाहिला होता.  गेली अडीच वर्षे मी आता इथं काम करतो आहे, आसाम आणि अरुणाचल प्रदेशातल्या 15 जिल्ह्यांत काम सुरू आहे. प्रवास करतो आहे. अनेक तरुण मुलांना प्रशिक्षणही देतो आहे. त्यांच्या मदतीनं अनेकांना जगण्याची उमेद देण्याचा प्रय} करतो आहे.
काम आता कुठं सुरू झालं आहे, आता आसाम हे माझं घरच झालं आहे. हा प्रवास अधिक समाधानाचा असेल आणि लोकांना शक्य ती मदत करता येऊ शकेल, अशी आशा मलाही आहेच..


(डॉ. नीलेश आसाममध्ये कार्यरत मनोविकार तज्ज्ञ आहेत.)
 

Web Title: Meet a young psychiatrist who works in rural Assam!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.