मेमरी ओव्हरलो़ड!!
By admin | Published: October 13, 2016 08:43 PM2016-10-13T20:43:33+5:302016-10-14T12:56:52+5:30
ध ड ध ड.. ध ड ध ड.. हृदयाच्या ठोक्यांचा आवाज आपला आपल्यालाच येत असतो.. दुपारचे बारा वाजलेले. संपूर्ण रस्त्यावर चिडीचूप शांतता.
- समीर मराठे
रस्त्यावर, दुकानांवर कुठे कुठे मोठमोठ्या अक्षरांत लिहिलेलं.. वी वॉँट फ्रीडम, इंडियन डॉग्ज गो बॅक.. कर्फ्यू आणि बंदच्या भयाण शांततेचे घण अक्षरश: डोक्यात वाजत होते.. या स्मशानशांततेनं डोकं दुखायला लागलं होतं.. काश्मिरातील सर्वात संवेदनशील अशा अनंतनाग जिल्ह्यात आडवाटेनं किती किलोमीटर आम्ही आत आलो असू, आत्ता आठवतसुद्धा नाही. पण सगळीकडे गच्च शांतता. आमचे डोळे तेवढे भिरभिरते.
कुठून एखादा दगड येईल आणि आपल्या गाडीचा, आपला वेध घेईल याची काहीच शाश्वती नाही. थोडं पुढे गेल्यावर लांबूनच एका झाडाखाली थोडी हालचाल दिसली. बारा-चौदा वर्षांचा एक लहान मुलगा. आमची गाडी येताना पाहून झपकन खाली पडलेली एक वीट त्यानं उचलली आणि झाडामागे लपला.. आम्ही जागच्या जागी ब्रेक दाबला. खाली उतरलो. हे होतं चौरट गाव. थोड्याच वेळात कुठून तरी एक जण आला, मग दुसरा, मग तिसरा... पाचच मिनिटांत बाया, माणसं, मुलं.. चार-पाचशे जणांनी आम्हाला घेरलं. त्यांनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली.. कौन हो, कहॉँसे हो? क्यूॅँ आये हो?.. आम्ही त्यांना सांगितलं.. पत्रकार आहोत.. खोऱ्यातली परिस्थिती बघायला, काश्मिरी जनतेला नेमकं काय हवंय हे जाणून घ्यायला आलोय.. त्या लोकांनी सांगितलं,
‘आमच्या गावात लष्कराच्या गोळीबारात तीन जण मेले. पेलेट गनच्या गोळीबारात कित्येकांचे डोळे गेले, अनेक जण जखमी झाले.. आत्ता या क्षणापर्यंत एकही पत्रकार इथे फिरकला नाही. तुम क्यूॅँ आये हो?.. काही कळायच्या आत घोषणाबाजी सुरू झाली.. शेकडो लोकांचा हा मॉब आता पेटून उठलेला. हिंसक होऊ पाहत असलेला.. तेवढ्यात सायरनचा आवाज आला. सगळीकडे पळापळ. वाट फुटेल तिकडे सारे जण पळायला लागले. आर्मीची गाडी आली होती.. आम्हाला काही कळेना. पळावं तर कुठे? लपावं तर कुठे?.. मी आणि माझा एक सहकारी बायकांच्या मागोमाग एका घरात घुसायचा प्रयत्न करतो. फोटोग्राफर बोळीत पळतो, तर आमच्या ड्रायव्हरला काहीच न कळल्यानं आपल्याच गाडीच्या मागे तो लपतो..
पळणाऱ्या लोकांनी काही सेकंदात आपापल्या हातात दगड घेतले होते. त्यांनी आर्मीच्या गाडीवर दगडफेक सुरू केली.. धाड धाड.. आर्मीची गाडी पुढे गेली.. तरीही दगडफेक सुरूच होती.. जमावातल्याच काही काश्मिरी लोकांनी मग आम्हाला बाहेर काढलं.. कसंबसं रस्त्याला लावलं. ही माणसं जर नसती तर आम्ही जिवंतपणी तिथून बाहेर पडलो नसतो हे मात्र खरं. काश्मिरात असे जिवावरचे प्रसंग आणखीही काही वेळा आले, पण निभावलं सारं काही... धगधगत्या, पेटलेल्या काश्मीर खोऱ्यातला हा एक थरारक अनुभव... असे किती अनुभव वाट्याला आले आमच्या, त्याची गणती नाही. आज आठवलं तरी डोकं भिरभिरतं आणि वाटतं, कसे वाचलो आपण!! - त्या आठवणीने पोटात पडणारा खड्डा आणि सतत नजरेसमोर तरळणारे, डोळे गेलेल्या काश्मिरी तरुणांचे ते चेहरे : एनएच 44 ने मला दिलेली ही भेट!..
दोन-चार अंडरवेअर्स, कितीही कळकट्ट झाल्या तरीही रोज घालता येऊ शकणाऱ्या दोन जीन्स, तसलेच मळखाऊ तीन-चार टी शर्ट्स.. गरजेपुरते कपडे बॅगेत कोंबायचे, बॅग खांद्यावर लटकवायची, हायवेवर जाऊन उभं राहायचं.. ट्रक, टेम्पो किंवा बसला हात द्यायचा, गाडीत चढायचं, वाटेल तिथे उतरायचं, तिथल्या लोकांमध्ये मिसळायचं, जिथे जे मिळेल ते खायचं, पुन्हा रस्त्यावर यायचं, दिसेल त्या गाडीला हात द्यायचां.. - भारत असाच; जसा आहे तसा, जसा दिसतोय तसा पाहायचा असं माझ्या डोक्यात होतं. अजूनही आहे. मी हट्ट धरला होता माझ्या संपादकांकडे, की मला असं जाऊ द्या!! पण हा वेडेपणा परवडणारा नव्हता. रिस्क होती. डेडलाइन गळ्याशी आलेली असताना कोण मला एकट्याला सोडेल? दोन दिवसभराच्या अखंड चर्चा कम ‘भांडाभांडीनंतर’ ठरलं.. आॅफिसच्याच गाडीनं जायचं.. दोन गट करायचे. प्रत्येक गटात दोन संपादकीय सहकारी, एक फोटोग्राफर आणि (एकच कॉमन) ड्रायव्हर.. दोन दिवसांनी ‘झिरो माइल्स’पासून निघायचं..
- अशा प्रवासाला निघताना जर्नालिस्ट लोक अभ्यास करतात. माणसं शोधतात. अपॉइंटमेंट ठरवतात. राहण्या-जेवण्याची तजवीज करतात. - हे काहीच न करता फक्त गूगलकृपेने मिळालेले नकाशे पोतडीत भरून आम्ही निघालो. खरी मज्जा तीच तर होती. खरंतर होतं आॅफिसचं काम, पण रोडट्रिपचा थरार आमचा आमचा खासगी असणार होता! - परत आलो, तेव्हा मी पूर्वीचा उरलो नाही; एवढं सांगतो. किती माणसं आली माझ्याबरोबर!.. सारं आयुष्य हायवेवर आणि ट्रकवरच गेलेला, आता मी मरणारही हायवेवरच, असं छातीठोक सांगणारा, नरसिंहपूरजवळ भेटलेला ट्रक ड्रायव्हर दशरथसिंग..
घरच्यांनी सवर्णांच्या घराजवळ जमीन घेतली या ‘अपराधा’पोटी मार खाल्लेला, धुळीत मिळवलेला; पण ज्यांनी मारलं त्यांच्या विरोधातली लढाई हिमतीने लढायला उभा राहिलेला बुंदेलखंडातला सुन्नू... आपल्या कामाची मजुरी मागितली म्हणून नागडं करून विजेचा शॉक दिलेलं झाशीतलं जोडपं... दिल्लीच्या कॅनॉट प्लेस या अत्यंत हायफाय चकाचक आणि अतिश्रीमंत परिसरातले कफल्लक भिकारी... लव्हमॅरेज केलं म्हणून घरच्यांनी हाकलून दिलेला, दिल्लीत घर आणि स्वत:च्याच बॅँक अकाउंटमध्ये तब्बल २२ लाख रुपये असूनही भिकेला लागलेला, वडिलांनी ‘वेडा’ ठरवलेला, नोकरीसाठी दरदर भटकणारा, उत्तर प्रदेशात मुख्यमंत्रिपदाचा दावा करणाऱ्या मंत्र्याचा मुलगा..‘झाडू लेके सुपर पॉवर कैसे बनेगा मेरा इंडिया?’, असं विचारणारे मॅगसेसे पुरस्कारप्राप्त बिझवादा विल्सन...
स्वप्नांना पंख लावून पार आॅलिम्पिकमध्ये, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांत खेळणाऱ्या हरयाणातल्या शाहाबाद या लहानशा खेडेवजा शहरातल्या शेकडो मुली.. चरस, गांजा पिऊन नशेत तर्रऽ असणारे मथुरेतले बारा-चौदा वर्षांचे ‘पंडे’.. आणि चंबळच्या घाटीत भेटलेला ‘दस्यूसम्राट’ डाकू मलखान सिंग!!! डोक्यातली मेमरी फुल्ल आहे. डाउनलोड होता होत नाही असा ‘डाटा’. सांगणार तरी किती आणि लिहिणार तरी काय काय? - आता मला नवी हार्ड डिस्क आणावी लागणार बहुतेक. कारण, मी आधी हट्ट धरला होता, तो मी पूर्ण करीनच कधीतरी. ट्रकला हात दाखवून पुढचा प्रवास करीन. या रोडट्रिपमध्ये भेटलेला भन्नाट भारत आता मानगुटीवर बसला आहे. तो मला गप्प बसू देणार नाही.
(लेखक लोकमत वृत्तसमूहात उपवृत्तसंपादक आहेत.)
sameer.marathe@lokmat.com