मेन्स डे- काय खासियत आहे या दिवसाची?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 07:58 AM2020-11-19T07:58:29+5:302020-11-19T08:00:20+5:30
आज आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, काय त्याची खासियत?
- अनन्या भारद्वाज
१९ नोव्हेंबर. हा दिवस जगभर म्हणजे किमान ८० देशांत आंतरराष्ट्रीय पुरुष दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाला अन्य दिवसांसारखं ग्लॅमर नसलं, त्याची काहीशी टरही उडवली जाते की जगभरात सगळ्या दिवसांवर जर पुरुषांचंच राज्य असतं, तर त्यांच्या नक्की कोणत्या न्याय-हक्कांसाठी हा दिवस साजरा केला जातो?- मात्र या वादाच्या पलीकडे जाऊन पुरुषांसाठी न्याय-हक्क, भेदभाव, शोषण, दमन आणि हिंसा या साऱ्याच्या विरोधात जनजागृती व्हावी, जगण्याच्या विविध क्षेत्रांत पुरुषांनी दिलेल्या योगदानाची नोंद म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
यंदा या दिवसाची थिम आहे, ‘बेटर हेल्थ फॉर मेन ॲण्ड बॉइज’. अर्थात पुरुष आणि तरुणांच्या आरोग्याची काळजी आणि जनजागृती हे सूत्र घेऊन यंदा हा दिन साजरा केला जाणार आहे. या आंतरराष्ट्रीय दिवसाला युनेस्कोची मान्यता असल्याने अमेरिका, इंग्लंड, भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका खंड, युरोपातले काही देश असं मिळून ८० देशांत तो अधिकृतपणे साजरा करावा, शासनस्तरावर त्याची नोंद घेतली जावी अशी अपेक्षा आहे.
हा दिवस सुरू कधी झाला?
१. ७ फेब्रुवारी १९९२ रोजी थॉमस ऑस्टर यांनी पुढाकार घेत हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा व्हावा अशी मागणी केली होती. तसे प्रयत्नही केले, मात्र त्याला पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही.
२. पुढे १९९९ मध्ये डॉ. जेरोम तिलकसिंग यांनी कॅरेबिअन बेटांवर हा दिवस साजरा करण्यास प्रारंभ केला. त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळावी म्हणून प्रयत्न केले. कॅरेबिअन बेटांवर त्यांना उत्तम प्रतिसाद लाभला आणि पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावरही मान्यता मिळाली.
३. २००० च्या दशकात जागतिकीकरणानं वेग घेतल्यावर बाजारपेठेनंही हा दिवस उत्तम मार्केटिंग संधी म्हणून वापरला.
४. आता तर ऑनलाइन शॉपिंगच्या काळात नव्या मार्केटिंग योजना या मेन्स डे निमित्तानं राबवल्या जात आहेत.
( अनन्या मुक्त पत्रकार आहे.)