message T- जे खुल्लमखुल्ला बोलता येत नाही, ते जगजाहीर सांगण्याचा बेधडक मार्ग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 03:36 PM2019-08-22T15:36:42+5:302019-08-22T15:37:17+5:30
म्हटलं तर फॅशन, म्हटलं तर स्टेटमेण्ट, तरुण भावनांना वाट करुन देण्याची एक हक्काची जागा.
- निकिता बॅनर्जी
सहा वर्षाच्या एका मुलाचा एक फोटो अलीकडेच सोशल मीडियात बराच गाजला. चर्चा होती, त्याच्या टी शर्टची. त्याच्या टी शर्टवरच्या मेसेजची खरं तर. त्या मुलाचा फोटो इतका व्हायरल झाला की, जगभर फिरला आणि त्यानिमित्तानं चर्चाही झाली ती भलत्याच विषयाची.
जॉर्जियातली ही गोष्ट. निक्की राजन नावाच्या बाई विविध शर्ट तयार करतात. त्यांच्या सहा वर्षाच्या मुलाच्या शाळेचा पहिला दिवस होता. शाळेत जाताना शर्टवर काय चित्र काढू, किंवा काय छापू असं त्यांनी विचारलं तर तो सहज म्हणाला, त्यावर लिहून दे, ‘आय विल बी यूअर फ्रेण्ड!’ तसा शर्ट घालून तो शाळेत गेला तर मुलंच नाही तर पालक-शिक्षकही चकीत झाले.
अनेकांनी त्या विधानाचा अर्थ शाळेत मुलांना होणार्या त्रासाविषयी, बुलिंगविषयी लावला. शाळेत मुलं मैत्री करायला येतात, हे त्या छोटय़ानं अगदी समर्पकपणे सांगितलेलं दिसतं.
जगभर त्याच्या फोटोची आणि विधानाची चर्चा झाली.
अर्थात टी-शर्टवरच्या मेसेजची अशी चर्चा होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. मेसेज टीजचा इतिहास पाहिला तर साधारण 1960 सालापासून विविध मेसेज टी शर्टवर झळकलेले दिसतात. अगदी अलीकडच्या काळातही इमिग्रेशन अर्थात स्थलांतरितांच्या समस्या आणि वेदनांना वाचा फोडणारे अनेक संदेश तरुण मुलामुलींनी मोहीम म्हणून अंगाखांद्यावर मिरवले. जगभर स्थलांतरितांचे प्रश्न, स्थानिकांना असलेल्या अडचणी, त्यांचे प्रश्न, परस्परांचं नातं यासंदर्भात विधानं करणारे शर्टही बरेच गाजले.
त्याआधी 1970च्या दशकात ब्लॅक पॉवर अर्थात कृष्णवर्णीयांच्या लढय़ाचे संदेशही बराच काळ टी-शर्टवर तरुण मुलामुलींनी वापरले. व्यवस्थेतली असमानता, अन्याय, भेदभाव याविषयी या शर्टनी काही न बोलताही वाचा फोडली. जगजाहीर उद्रेक आपल्या छातीवर मिरवला. 1970 च्या दशकात या मोहिमेने बराच जोर धरलेला दिसतो.
1990च्या दशकात जागतिकीकरण सर्वदूर पोहचायला लागलं तसे शर्टही सैलावला. त्यांच्यावर गमतीशीर काहीसे चावट मेसेजही दिसतात. माय डॅड इज माय एटीएम हे शर्टविधानं याच काळात गाजले. खा-प्या-मजा करा, जगण्याकडे दुर्लक्ष करा, फार काही गांभीर्यानं घेऊ नका, जगून घ्या असे टी मेसेजिंग याच काळात पसरले, ते बाजारपेठीय चंगळवादी जगण्याचा धागा पकडूनच. 2000च्या दशकातही तेच ‘स्टे कुल’चं वारं दिसतं. अपवाद अलीकडच्या इमिग्रेशनच्या नव्या चर्चेचा.
टी-शर्टवरचे मेसेज म्हटलं तर निव्वळ फॅशन, म्हटलं तर त्यातली स्फोटक विधानं अत्यंत गंभीर गोष्टींना वाचा फोडतात. जे उघड बोलता येत नाही, ते उघड सांगण्याची धमक या टी-शर्ट मेसेजमध्ये दिसते.
आता नव्यानं हा ट्रेण्ड चर्चेत आहेत.
आपल्याला हवी ती वाक्यं थेट शर्टवर छापून अनेकजण मिरवत आहेत.
त्यामुळे ही नवीन मोहीम काळाचा कोणता चेहरा सांगते, हे लवकरच कळेलही!
***
मेसेज टी-शर्ट घालताय; पण ‘हे’ सांभाळा!
ग्राफिक टी-शर्ट्सची फॅशन आहे; पण म्हणून ते कुणीही आणि कधीही घालावेत का? याचं खरं उत्तर आहे की, ग्राफिक टी-शर्ट कुणीही घालावेत, त्याला बंधन नाही. पण कधी आणि कसे घालावेत याला मात्र काही नियम आहेत. तर साधे आहेत, आपण जे शर्ट घालतोय ते आपलं स्टेटमेण्ट आहे, हे लक्षात ठेवलं तरी आपलं आपल्यालाच कळतं की आपल्याला काय म्हणायचं आहे, काय नाही.
1) मुलींनी हे शर्ट शक्यतो जिन्सवर घालू नये, त्याऐवजी पलाझो, कॉटन पॅण्ट्स घालाव्यात.
3) लेगिन्स अजिबात घालू नयेत.
4) टी-शर्टसोबत एखादा छानसा स्ट्रोल नक्की वापरावा.
6) मुलांनी जिन्सची पॅण्ट वापरली तर चालते; पण शॉर्ट घालून कॉलेजात जाऊ नये.
7) या टी-शर्टच्या बाह्या फोल्ड करू नयेत.
8) आवडत असल्यास लेअरिंग करावं, ते चांगलं दिसतं.
9) परीक्षा, मुलाखती, काही चर्चासत्रं, एखादं महत्त्वाचं लेक्चर अशावेळी हे शर्ट घालू नयेत.
10) ग्राफिक लाउड नसावं, सुंदर असावं.
11) धार्मिक भावना दुखावणारे, किंवा समाजाला घातक, अश्लिल असे संदेश असलेले शर्ट घालू नयेत.
12) हे शर्ट घालता म्हणजे लोक तुमच्याकडे पाहणारा, अशा लोकांचा त्रास करून घेत मनस्ताप होणार असेल तर ते घालू नयेत.
**
करिश्मा कपूरचे मेसेज टी
अलीकडच्या काळात सर्वाधिक मेसेज टी कुणी वापरत असेल तर ती म्हणजे करिश्मा कपूर. ती सर्रास मेसेज टी-शर्ट वापरते, मात्र त्यावरचे मेसेजही तिचे व्यक्तिमत्त्व सांगतात.
नो लिमिट, नो बॅड डेज, स्टक इन नाइण्टीज, वी आर इक्वल, लव्ह, हॅपी, लव्ह ममा या संदेशाचे टी-शर्ट तिनं अलीकडच्या काळात परिधान केलेले दिसतात.
प्लेन काळा, निळा, लाल, पांढरा शर्ट आणि त्यावर बोल्ड अक्षरात हा संदेश असे तिचे फोटो तिच्या सोशल मीडियात सर्रास दिसतात.
ते शर्ट तिला शोभतातही कारण अत्यंत साधी राहणी. जिन्स, पलाझो, कॉटन पॅण्ट्स यावर हे अत्यंत साधे शर्ट ती घालताना दिसते.
स्टाइल कॉपी म्हणूनही जर तिला कॉपी करायचं असेल तर करायला हरकत नाही, इतकी सुंदर ती या पोशाखात दिसते.