#metoo- बाय बाय करता येईल नोकरीला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 05:35 PM2018-10-19T17:35:50+5:302018-10-19T17:35:58+5:30
घरी आई आजारी, भाऊ शिकतोय. करिअर समोर उभं आहे, आणि बॉस म्हणतो, घरी ये! काय करेल ती? - तेच जे तिनं आणि तिच्यासारख्या अनेकींनी करायला हवं!
- श्रुती मधुदीप
ती सध्या फारच धावपळीत होती. आईचं आजारपण, ऑफिसमधली कामाची वर्दळ, त्यात ती ज्या चॅनलसोबत काम करत होती त्याचा नवा इव्हेण्ट सुरू होत होता. त्यामुळे क्षणोक्षणी प्रपोजल्स तयार करणं, ते बॉसकडून अप्रुव्ह करून घेणं. घरी आली तरी आईची काळजी, तिला काय हवं नको ते पाहणं, त्यातही ऑफिसमधून या ना त्या कामासाठी फोन-मेसेजेस. तसा तिचा भाऊ होता घरी आईची काळजी घ्यायला; पण नाही म्हटलं तरी तो तिच्यापेक्षा चार-पाच वर्षानी लहान. नुकताच ग्रॅज्युएशनला आलेला. वडील लहानपणीच एका अपघातात गेलेले. तिने अगदी शून्यातून सगळं उभं केलेलं. तसा मामा होता सोबतीला! पण सारं घर मात्न तिच्या जॉबवर विसंबून. सध्याचे दिवस फारच दगदगीचे होते; पण या दगदगीतून आलेल्या घामाला वार्याची झुळुकदेखील मिळते, असा अनुभव होता तिचा. त्या विश्वासानेच ती एकदम हसतमुख जगायची!
आज ती सगळं आवरून- स्वयंपाक बनवून आईला ‘येते गं’ असं म्हणून बाहेर पडली. चप्पल घालताना तिला काय जाणवलं माहीत नाही चप्पल काढून ती पुन्हा घरात आली. बेडवर पडलेल्या आईजवळ जाऊन म्हणाली, ‘‘आई गं! काळजी घे हं. मी येतेच संध्याकाळी. तोवर बरी हो हं. बास झालं आता हे आजारपण’’ आईच्या चेहर्यावर थकलेलं हसू उमटलं. तिने आईच्या केसातून हात फिरवला आणि ती ऑफिसमध्ये गेली. गेल्या गेल्या गीताने तिला सांगितलं की सरांनी तिला त्यांच्या केबिनमध्ये अमुक एक फाइल घेऊन बोलावलंय. तिने आपल्या डेस्कवरची फाइल उचलली. आणि ती बॉसच्या केबिनच्या दाराशी उभी राहिली. ती ते दार उघडणार इतक्यात तिच्या मनावर प्रचंड दडपण आलं. तिला परवाचंच व्हॉट्सअॅप चॅट आठवलं.
Boss : Hey
She : yes Sir
Boss : your dp is so beautiful
She : thank you Sir
Boss : One thing I must tell you…
She : what Sir ?
Boss : you are more than beautiful ! I mean one can not breathe after watching your dp
आणि ती ऑफलाइन गेली. आपला बॉस असं बोलू लागतो तेव्हा काय करायचं, कसं उत्तर द्यायचं तिला कळलं नव्हतं. ‘थॅँक्यू’ म्हणावं तरी प्रॉब्लेम, स्माइली पाठवावी तरी पंचाईत! त्या मेसेजनंतर त्या दोघात काहीच मेसेजिंग झालं नव्हतं.
आणि आता ती बॉसच्या केबिनच्या दारावर उभी होती. समोरच्या अर्धवट पारदर्शक दरवाज्याने तिला सूचना दिली होती
‘पुश द डोअर!’ तिने त्याकडे नीरव नजरेने पाहिलं आणि दरवाजा आत ढकलला.
‘मे आय कम इन सर’- ती
‘‘ ओह’’ बॉस तिच्याकडे निव्वळ पाहत राहिला काही क्षण! तिच्या केसापासून पायाच्या नखार्पयत त्याचं तिला स्कॅन करून झालं.
‘सर’ ती अवघडून दरवाजातूनच बोलली.
‘‘अं हो ये ना. ये ये. बस’’
‘सर ही फाइल. परांजपे येऊन भेटून गेले काल. त्यांनी काही बुलेट पॉइण्ट्स दिले होते आपल्या या नव्या इव्हेण्टविषयी. तेही इंक्लूड केले आहेत फाइलमध्ये. तुम्ही एकदा बघून घेतलेत ते तर बरं होईल.’ ती कामाविषयी बोलू लागली.
‘येस शुअर. तुला त्या मुद्दय़ांविषयी काही हरकत आहे का ?’
‘अं. नाही सर. आय थिंक द पॉइण्ट्स आर वॅलिड’
‘मग काही हरकत नाही. चालू कर पुढे काम’
‘नाही पण सर तुमच्या नजरेखालून एकदा गेलं तर.’
‘अगं’ बॉस तिला तोडत म्हणाले ‘तुझ्यावर विश्वास आहे माझा’’
तिला यावर काय बोलावं ते कळेना. फक्त सहा महिन्यांच्या जॉइनिंगवर हा माणूस इतक्या मोठय़ा इव्हेण्टच्या प्लॅनिंगमध्ये माझ्यावर विश्वास ठेवतो. काहीतरी विचित्नच वाटलं तिला.
‘ठीक आहे सर.’ असं म्हणून ती फाइल हातात घेऊन निघणार इतक्यात बॉसने ठरवून तिच्या हातावर हात ठेवला. तिने त्यांच्याकडे एक कटाक्ष टाकला.
‘ओह सॉरी’ बॉस म्हणाले.
ती निघणार इतक्यात बॉसने तिला थांबवलं.
‘‘अं मनाली!’
तिने मागे वळून पाहिलं.
‘येस सर’
‘यू आर सच अ ब्रिलियण्ट कलिग! तुझ्यासाठी एक गुड न्यूज आहे.’
‘काय सर?’ तिने धपापत्या छातीने विचारलं.
‘विल यू कम फॉर कॉफी टूनाइट ? घरीच ये.’
‘सर पण गुड न्यूज कुठली?’
‘ये ना घरी आज तिथेच सांगीन.’
तिला काय बोलावं ते कळेना. ‘सर माझी आई आजारी आहे.’ - ती म्हणाली.
‘ओह! एक्चुअली आय वॉण्ट टू गिव्ह यू प्रमोशन विल यू कम टू माय प्लेस ?’
काही क्षण ती त्यांच्याकडे निर्स्तब्ध होऊन पाहत राहिली. बॉसही अपेक्षित असलेल्या रिस्पॉन्सची वाट पाहत राहिला. तिच्या डोळ्यात पाणी दाटलं पण तिने ते ढळू दिलं नाही. तिच्या हातातली फाइल तिने क्षणात बॉसच्या टेबलवर ठेवली. आता केबिनच्या दरवाजा काय सूचना देतो याचा विचार तिने केला नाही. ती बाहेर गेली. स्वतर्च्या डेस्कवरच्या तिच्या गोष्टी तिने घेतल्या. इतक्यात गीता अभिमानाने येऊन म्हणाली,
‘मनाली, अगं तुला सांगायचं राहिलं, मला प्रमोशन मिळालं!’
तिने गीताशी एक अर्थपूर्ण नजरानजर केली तरीही गीताच्या चेहर्यावरलं अभिमान किंचितही कमी झाला नाही.
मनाली बाहेर पडली.
स्फुंदून स्फुंदून ती रडू लागली.
इतक्या वर्षाच्या आपल्या लाडक्या गीतासारख्या मैत्निणीलाही असं होताना पाहणं हे तिला वेदना देणारं होतं. गीतू! तू घेऊ नकोस ते प्रमोशन ! प्लीज! ही स्पर्धा आपल्या दोघीतली नाही गं. तू नाहीस जिंकलीस तुला प्रमोशन मिळालं म्हणजे. आपण सगळ्याच जणी हरतोय. तुझ्या लक्षात येतंय का? हा सामना आहे आपला स्वतर्शीचा! हा सामना आहे आपलं असणं फक्त शरीरार्पयत मर्यादित करू पाहणार्या त्या बॉसशी, त्याच्या त्या नजरेशी आणि त्याच्यासारख्या अनेक नजरांशी! तुला कळतंय का?
ती हमसून हमसून रडली; पण आता तिच्या घरातले किती तरी प्रश्न तिच्यासमोर आ वासून उभे होते. तरीही तिला ऑफिसच्या दरवाज्यावर कोरलेलं ‘पुश द डोअर’ आकर्षित करत नव्हतं. कारण तिने त्याला बाय बाय केलं पुन्हा कधीही तिथे पाऊल न ठेवण्यासाठी!