#metoo जगाचा एक भेसूर चेहराच आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2017 02:15 PM2017-10-25T14:15:17+5:302017-10-26T09:42:35+5:30
जगभरात तरुणी, महिलांनी आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराची, छेडछाडीची जाहीर कबुली दिली आणि जगाचा एक भेसूर चेहराच समोर आला.
- प्रियदर्शिनी हिंगे
#metoo हा हॅशटॅग सोशल मीडियात पाहिलाच असेल तुम्ही.
गेले काही दिवस अनेकजणींनी आपल्याला आलेले लैंगिक अत्याचारांचे, छेडछाडीचे अनुभव हा हॅशटॅग लावत मोकळेपणानं व्यक्त केले. सोशल मीडिया हे एक वेगळं व्यासपीठ म्हणून यानिमित्तानं समोर आलं. ज्याविषयी बोलायची, तोंड उघडायचीच चोरी ते विषय जाहीर लिहिण्याची हिंमत जगभरात अनेक बायकांनी, मुलींनी केली.
निमित्त झालं, हॉलिवुड प्रोड्युसर हार्वे विन्स्टेन यांच्या विरोधात काही महिलांनी पुढाकार घेऊन लैंगिक छळवणुकीची तक्रार दाखल केली. विन्स्टेन यांच्या विरोधात तब्बल साठ जणींनी तक्रार केली. त्यामुळे कंपनीने कारवाई करत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवलाच; पण त्यांना आॅस्करच्या पॅनलवरूनही हटवण्यात आलं. दरम्यान प्रसिद्ध अभिनेत्री अलिसा मिलेनने १६ आॅक्टोबर रोजी ट्विटर हॅण्डलवरून ट्विट केलं. ज्या महिला लैंगिक छळवणुकीच्या बळी आहेत त्यांनी आपल्या व्यथा #metoo या हॅशटॅगनं लिहाव्यात असं आवाहनही केलं. अमेरिकेतच नाही आणि ग्लॅमर वर्ल्डमधल्याच नाही तर जगभरातल्या, विविध क्षेत्रात काम करणा-या अनेक महिलांनी आणि पुरुषांनीही लैंगिक छळाबद्दलच्या व्यथा मांडल्या.
लैंगिक छळ, छेडछाड, कार्यालयात किंवा सार्वजनिक ठिकाणी, प्रवासात आणि घरातही होणारे त्रास हे सारं बायका सहजी बोलत नाहीत. जाहीर सांगणं तर दूरच. त्यानं बाईचीच बदनामी होते असा एक जुनाट समज असतोच. मात्र या हॅशटॅगनं जगभरातल्या अनेकजणींनी खुलेपणानं आपली वेदना मांडली. #मीटू म्हणत फेसबुक, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट या प्रकारच्या सर्व सोशल मीडियात ही मोहीम पसरली.
आणि घरात जवळच्या नातेवाइकांनी केलेल्या बळजबरीपासून ते चोरटे स्पर्श, कार्यालयातले अपमान, जीवघेण्या नजरा याविषयी स्पष्ट लिहिलं. जगभर महिलांच्या लैंगिक छळाचं प्रमाण किती मोठं आहे हे यानिमित्तानं समोर आलं. या मोहिमेची व्याप्ती व तीव्रता बघत अनेक पुरु षांनीही लैंगिक छळाच्या विरुद्ध उभं रहायचा निर्णय घेतला. अनेकांनी लिहिलं की बायकांच्या या त्रासाची आपण कल्पनाही केली नव्हती. यापुढे असं वागणा-या अनेकांच्या विरोधात आम्हीही उभं राहू.
जगभर गाजणा-या मीटू या हॅशटॅगचा वापर जरी मिलन या अभिनेत्रीने केला असला तरी या शब्दांचा उगम मात्र २००६ मध्ये सामाजिक कार्यकर्त्या तराना बुरेक यांनी पहिल्यांदा केला होता. एका १३ वर्षीय मुलीनं आपल्यावर बलात्कार झाल्याचं त्यांना सांगितलं. मात्र तेव्हा त्या तिला मदत करू शकल्या नाही. मात्र मी तुझ्या दु:खात सहभागी आहे. मीही या प्रसंगातून गेले आहे. हे सांगण्यासाठी त्यांनी मीटू या शब्दाचा प्रयोग केला. त्यानंतर बलात्कार तसेच लैंगिक छळवणुकीला सामोरे गेलेल्या महिलांसाठी त्यांनी संस्था सुरू केली. सोशल मीडियावर मीटू ही मोहीम सुरू केली. याच मोहिमेला मिलेनने एक नवा आयाम दिला.
(priya.dhole@gmail.com)