एम.जी.रोड : पैशाचं मोल सांगणारी एक आगळी शॉर्टफिल्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 01:51 PM2018-06-28T13:51:36+5:302018-06-28T13:53:01+5:30
पैसा. त्याची ताकद, त्याचं स्वप्न विकणं आणि ती प्रत्यक्षात आणणं हे सारंच रोजच्या जगण्याचा भाग आहे. पण, त्या पैशानं जगणंच हरवलं तर.
माधुरी पेठकर
जगण्यासाठी पैसा लागतो. जगताना प्रत्येक गोष्टीसाठी पैसा लागतो, हे सत्य आहे. पण पैसा मोठी अजब चीज आहे. हातात तो असला तरी माणसं पैसा पैसा करत धावत असतात. पैशापाठी धावताना परस्परांशी रेस लावतात. हा पैसा कोणाला स्वस्थ बसू द्यायलाच तयार नाही.
जवळ पैसा नसलेली माणसं पैसे मिळवण्यासाठी अस्वस्थ. थोडा पैसा असलेली माणसं आणखी जास्त कमावण्यासाठी अस्वस्थ. भरमसाठ पैसा असलेली माणसंही अस्वस्थ. पैसे मिळवण्याची अस्वस्थता, पैसे खर्च करण्याची अस्वस्थता, पैसे लपवण्याची अस्वस्थता आणि पैसे दाखवण्याची अस्वस्थता. आता या अस्वस्थतेविषयी फारसं कोणाला काही वाटत नाही. उलट ही अस्वस्थताच आता जगण्याचं ध्येय झाली आहे. पैसे कमावण्यासाठीच मुलं जणू लहानाची मोठी होतात. मोठी माणसं पैसे कमावता कमावता म्हातारी होतात. म्हातारी माणसं शेवटी उरलेल्या पै अन् पैचा हिशेब ठेवत काथ्याकूट करत राहतात.
हावरट, उधळमाणकी, कंजूष, उदार, काटकसरी, हिशेबी, व्यवहारी, समाधानी, असमाधानी अशी कितीतरी स्वभावाची माणसं पैशानं जन्माला घातली. जग उभं करण्याची आणि ती पाडण्याची ताकद माणसाच्या हातातल्या, बाजारातल्या, बॅँकामधल्या पैशात आहे. पैसा आपल्या तालावर जग नाचवत आहे. अशा जगात पैशाला दुय्यम मानून आपल्या तालावर जगणारी माणसं अपवादच ठरावित.
राकेश साळुंके लिखित-दिग्दर्शित ‘एम. जी. रोड’ या लघुपटात पैशाच्या जगात अपवादानं भेटणार्या गोष्टी बघायला मिळतात.
शहर मुंबई. धावत्या मुंबईमधला एक एम. जी. रोड नावाचा एक रस्ता. या रस्त्यावर आपल्याला दोन टोकाची माणसं भेटतात. रस्त्यावर का होईना पण रात्रभर शांत झोपून सकाळी उठलेला मजूर कम एक भिकारी माणूस. वय झालं असलं तरी त्याचं त्यालाच कमवून पोट भरावं लागतंय. तर एक आपल्या टोलेजंग बंगल्यात राहणारा, मोठय़ा गाडीनं ऑफिसला जाणारा श्रीमंत माणूस. या दोघांना जोडतो तो हा एम. जी. रोड.
रोज सकाळी आठ, सव्वाआठ वाजता श्रीमंत माणूस ठरल्याप्रमाणे ऑफिसला जायला निघतो. त्याला हा म्हातारा रोज आडवा येतो. म्हातारा त्या श्रीमंत माणसाच्या स्वच्छ गाडीची काच पुसून देतो. आणि चिल्लर पैशासाठी हात पुढे करतो. गाडीतला माणूस दोन-पाच रुपयाचं नाणं त्या म्हातार्या मजुराच्या हातात देतो. तेवढय़ावर हा गडी खुश होतो. दिवसभर थोडी मजुरी आणि थोडी भीक मागून जेवढे मिळतील तेवढय़ा पैशात वडापाव खाऊन शांत झोपी जातो. फाटक्या, मळक्या कपडय़ांचा, परिस्थितीनं आणि म्हातारपणानं कृश झालेला हा माणूस. रस्त्यावर राहणारा. पण त्याच्या चेहर्यावर परिस्थितीच्या भोगाचं दुर्ख नाही. असमाधान नाही. कोणतीही अस्वस्थता नाही. तुटपुंज्या पैशांवर आला दिवस ढकलणं हेच त्याचं रोजचं काम.
पण त्याच्या स्वस्थ आणि शांत जगात एकदा अस्वस्थता येते. बैचेनी आणि तळमळ येते. उघडय़ावर राहणार्या या माणसाला पहिल्यांदा चिंता भेडसावते. रोज वडापाव खाऊन शांत झोपणार्या या म्हातार्याची पहिल्यांदा झोपे उडते.
एक दिवस गाडीतला श्रीमंत माणूस एकदम उदार होतो. या म्हातार्या माणसाच्या हातावर दोन -पाच रुपयाच्या नाण्याऐवजी थेट हजाराची नोट ठेवतो. म्हातार्या माणसाचा स्वतर्च्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही.
ती नोट घेऊन तो थेट त्याच्या स्वप्नांच्या जगात जातो. छान कपडे घालून, मेट्रोनं प्रवास करत तो एका हॉटेलात जातो. पोटभर जेवण करून गरमा गरम चहा पितो. हॉटेलचं बिल फेडून वर वेटरला पाच रुपयांची टिपही देतो.
अचानक आयुष्यात आलेली ही हजार रुपयाची नोट. या म्हातार्याला सुखाचं फक्त स्वप्नंच दाखवते. जवळ नोट ठेऊन झोपलेला हा म्हातारा शांत झोपूच शकत नाही. ती हजाराची नोट हरवली तर नाही ना, कोणी चोरली तर नाही ना, ही शंका त्याला रात्रभर जागंच ठेवते.
या नोटेचं काय करावं, असा प्रश्न रात्रभर त्या म्हातार्याला छळत राहातो. त्याच्या फाटक्या खिशाला जड झालेल्या या हजाराच्या नोटेचं काय होतं याचं उत्तर पावणेदहा मिनिटांच्या ‘एम. जी. रोड’ या लघुपटात आहे.
राकेश साळुंके हा व्हीएफएक्स आर्टिस्ट. भेटली तू पुन्हा, रॉक ऑन 2, टाइमपास 2 यासारख्या चित्रपटांसाठी त्याने व्हीएफएक्स आर्टिस्ट म्हणून काम केलं. राकेश हा स्टेज आर्टिस्टही होता. एकांकिका, नाटक यात विशेष रूची असलेल्या राकेशला स्वतर्ची फिल्म डिरेक्ट करायची होती. ही संधी त्यानं शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून घेतली.
त्याच्या मनात एक कल्पना घोळत होती. आजूबाजूच्या वातावरणातून, रोजच्या अनुभवांतून या कल्पनेला टोक आलं होतं. ही कल्पना त्याला लघुपटातून मांडावीशी वाटली. पूर्वी पैसा सहजासहजी मिळत नव्हता. कजर्सुद्धा लवकर भेटायचं नाही. पण आता कर्जासाठी माणसाला फार चिंता करावी लागत नाही. फार खस्ता खाव्या लागत नाही. पूर्वीपेक्षा खूप सहज आज कर्ज उपलब्ध होण्याची सुविधा आहे. पण, खरी तगमग आणि तडफड सुरू होते ती कर्ज मिळाल्यानंतरच. कर्ज फेडण्याचे हफ्ते माणसाची झोप उडवतात. त्याच्याकडून त्याचं समाधान आणि आनंद हिरावून घेतात. रोजच्या आयुष्यात येणारे पैशाचे अनुभव वेगळ्या पद्धतीनं मांडण्यासाठी राकेशनं ‘एम. जी. रोड’ या लघुपटाची निर्मिती केली. क्षणाक्षणाला अस्वस्थता, चिंता, भीती, हाव आणि असमाधान देणार्या या पैशाचा मुकाबला करता येणं शक्य आहे. तो मार्ग दाखवण्याचा प्रयत्न राकेश साळुंकेनं ‘एम. जी. रोड’ या लघुपटात केला आहे.
राकेशची ही फिल्म इथं पाहता येईल.
https://www.youtube.com/watch?v=vwbfZ0S_So0