मिडल पार्टिशन-अनुष्का-दीपीकाची ही कुठली नवीन हेअर स्टाईल?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 01:58 PM2019-02-07T13:58:10+5:302019-02-07T13:58:29+5:30
मधला भांग, तेल लावूच चापूनचोपून अंबाडा किंवा वेणी हे स्टायलिश आहे? - कोण म्हणतं, नाही?
सारिका पूरकर-गुजराथी
दीपिका पादुकोण, अनुष्का शर्मा यांचे शाही विवाह सोहळे, वेडिंग लोकेशन, वेडिंग कार्ड, लेहंगे हे सारं बरंच चर्चेत होतं, गाजलंही. ट्रेण्डसेटर ठरलं. तसंही या दोघीही जे काही परिधान करतात, जे दागिने वापरतात, तो आता ट्रेण्ड बनतोच. मात्न या दोघींच्या वेडिंग लेहंग्याप्रमाणेच आणखी एक गोष्ट चर्चेत राहिली, ती म्हणजे वेडिंग रिसेप्शनसाठी त्यांनी केलेली हेअर स्टाइल.
दोघींनीही रिसेप्शनसाठी केसांचा मध्यभागी भांग पाडून अगदी चप्पट स्टाइल करून केसांचा अंबाडा घातला होता. त्यावर भरपूर गजरे माळले होते. भांगात लालचुटूक सिंदूर भरला होता. गजबच दिसत होत्या. त्यांनी रिसेप्शनसाठी नेसलेल्या साडीवर ही स्टाइल भारी शोभून दिसली.
एरवी केसांचा मध्यभागी भांग, अगदी तेल चोपडून केल्यासारखी वाटणारी ही स्टाइल म्हणजे आजीबाई स्टाइल म्हणूनच माहीत आहे. पूर्वी केसं गळून स्वयंपाकघरात पडू नयेत म्हणून बायका भरपूर तेल लावून, मधोमध भांग पाडून पाठीमागे घट्ट अंबाडा घालत असत. एकदा घातलेला अंबाडा दुसर्याच दिवशी सोडला जायचा. गळ्यात केस घेऊन फिरलं तर केवढा त्रागा केला जायचा घरोघर.
पण मग ती काकूबाई स्टाइल मागे पडली. तेल लावणंच कालबाह्य झालं. आता मात्र या दोघींमुळे ही स्टाइल पुन्हा हिट झाली. मिडल पार्टिशन या नावाने ती ओळखली जाऊ लागली. केवळ अनुष्का, दीपिकाच नाही तर सोनम कपूर, अदिती राव हैदरी, आलिया भट, सोनाक्षी सिन्हा, करिना कपूर, ऐश्वर्या राय-बच्चन, प्रियंका चोप्रा, श्रद्धा कपूर यांनीही गेल्या काही दिवसांत ही स्टाइल फॉलो केलेली दिसते.
फारसे श्रम न घेता, कमी वेळात ही स्टाइल लांब, मध्यम लांब केसांसाठी करता येऊ शकते. शिवाय ट्रॅडिशनल लूकही सहज मिळतो. केवळ साडी, लेहंगा, घागरा, अनारकली, सलवार-कमीज, पलाझो या पारंपरिक कपडय़ांवरच नाही तर कॉर्पोरेट ब्लेझर्स, जीन्स-टय़ुनिक, वनपीस, शॉर्ट वन पीस, ट्राउझर्स, पॅन्टसुट्स, जम्पसुट्स या वेस्टर्न आउटफिट्सवरही मिडल पार्टिशन करून केसं मोकळे सोडले तर सुंदर दिसतात.
मिडल पार्टीशन करून केसांची छान पोनीटेलही तुम्ही घालू शकता. साडीसाठी ही स्टाइल करणार असाल तर मिडल पार्टिशनबरोबरच दोन्ही बाजूने छोटय़ा बटवेण्याही छान दिसतात. हीदेखील ओल्ड इज बॅक या कॅटेगरीतीलच स्टाइल आहे.
मिडल पार्टिशनमुळे म्हटलं तर तुम्हाला खूप मॅच्युअर्ड लूक मिळतो, म्हटलं तर ट्रॅडिशनल आणि कधी कॅज्युअल आणि फंकी लूकदेखील.
असं काही सोप्प केलंत ना तरी स्टायलिश दिसू शकतं. ट्राय इट.