मिलेनिअल्स अर्थात विशीतल्या पिढीला ‘वस्तू’ नको, ‘अनुभव’ हवेत, असं का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 07:30 AM2019-09-26T07:30:00+5:302019-09-26T07:30:02+5:30
22 ते 38 वर्षे या वयोगटातली ही तरुण पिढी जुने सगळे संकेत मोडून काढायला निघाली आहे. त्यांना कर्ज काढून घर घेण्यात फार इंटरेस्ट नाही, मालकीची गाडी गरजेची वाटत नाही, त्यांना एकाच गावा-शहरात राहायचंही नाही, त्यामुळे त्यांना ‘सेटल’ होण्यात मुळात काही रसच उरलेला नाही. त्यांना सोयी-सुविधा हव्या आहेत; पण त्या ‘रेन्ट’ करणं, ‘शेअर’ करणं त्यांच्यासाठी जास्त सोपं आहे !
- पवन देशपांडे
‘मिलेनिअल्सच्या सवयी वेगळ्या आहेत, त्यांचे जगण्यातले प्राधान्यक्रम निराळे आहेत. त्यांना आता स्वतर्च्या मालकीचे घर, स्वतर्च्या मालकीची गाडी या ‘वस्तूं’ची मातब्बरी वाटत नाही. ते (ओला, उबरची) कार भाडय़ाने वापरतील, भाडय़ाच्या जागेत राहतील, कारण ‘मालकीच्या वस्तू’ असणे म्हणजे आयुष्याचे सार्थक अशी त्यांची कल्पना नाही. उलट ते जग एक्स्प्लोअर करू इच्छितात. नव्या ‘वस्तूं’पेक्षा नवे ‘अनुभव’ घेऊ इछितात’.
- ही वाक्ये आहेत, कोटक बँकेचे सव्रेसर्वा उदय कोटक यांची. वाहन उद्योगांची संघटना असलेल्या सियामच्या कार्यक्रमात ही वाक्ये त्यांनी उच्चारली आणि चर्चेला तोंड फुटले.
‘माझी स्वतर्ची मुलेदेखील स्वतर्च्या मालकीची गाडी घेण्यासाठी फारशी उत्सुक नाहीत’, असा दाखलाही त्यांनी दिला आणि वरून हेही सांगितले, की मिलेनिअल्सच्या या नव्या प्राथमिकतांची दखल उद्योग जगताने घेतली पाहिजे आणि त्याप्रमाणे आपल्या उत्पादनांमध्ये कालानुरूप बदल केले पाहिजेत !
पण कोटक यांच्या या वक्तव्याची चर्चा सुरू व्हायच्या आधीच मिलेनिअल्स या शब्दाचा उच्चार आणखी एका व्यक्तीने केला. त्या म्हणजे खुद्द केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन. देशात आलेल्या मंदीच्या सावटावर भाष्य करताना, त्यातही थंडावलेल्या वाहन उद्योगातल्या मरगळीचे कारण सांगताना त्या म्हणाल्या,
‘‘मिलेनिअल्स आता ओला, उबर जास्त वापरतात. त्यामुळे वाहन विक्री घटली आहे.’’
- यावरून सर्वत्र गदारोळ झाला.
देशाच्या अर्थमत्र्यांनी आर्थिक मंदीचे खापर मिलेनिअल्सच्या डोक्यावर फोडणे हे फारच वरवरचे आणि बेजबाबदार असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या.
पण उदय कोटक आणि निर्मला सीतारामन यांच्यामुळे एक शब्द - खरे तर संज्ञा चर्चेत आली हे मात्र खरे र् मिलेनिअल्स !
हे ‘मिलेनिअल्स’ नेमके आहेत कोण? त्यांच्या सवयी आणि प्राथमिकता का बदलल्या? कशा बदलल्या? जगाच्या अर्थकारणाला नवे वळण घेणे भाग पाडण्याएवढा हा बदल खरेच महत्त्वाचा आहे का?
- या प्रश्नांचा शोध घेणे फार रंजक आहे !
1981 ते 1996 या काळात जन्मलेली जनरेशन म्हणजे मिलेनिअल्स. ती आता साधारण 22 ते 37 या सळसळत्या वयात आहे. मिळवत्या आणि खर्च करण्याच्या वयातली किंवा त्या टप्प्यावर येऊ घातलेली ही पिढी जागतिक अर्थकारणाचे इंजिन धावते ठेवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडत असते, म्हणून त्यांची एवढी चर्चा !
- पण वयाच्या त्या विशिष्ट टप्प्यात आलेली ‘मिलेनिअल्स’ची पिढी मात्र आधीच्या पिढय़ांपेक्षा आचार आणि विचारांमध्येही वेगळी आहे, कारण ही पिढी ज्या जगात वाढली, ते जगच पूर्ण बदलून गेलेले, अनेक क्षेत्रात मोठय़ा संक्रमणावस्थेतले असे आहे. मिलेनिअल्स वेगळे ठरतात ते म्हणूनच !
‘आयुष्यात सेटल होणे म्हणजे काय?’- या प्रश्नाचे मिलेनिअल्सचे उत्तर आधीच्या पिढय़ांपेक्षा वेगळे होऊ लागले आहे. ही पिढी नव्या दमाची. नव्या उमेदीची. नव्या आशा-आकांक्षांची आणि नव्या विचारांचीही.
सध्या या जनरेशनमधील बरेच जण शिकत आहेत, अनेक जण नोकरीच्या- उमेदीच्या काळात आहेत, काही नवे करण्याची धडपड करीत आहेत. नव्या जगाचा वेध घण्यात व्यग्र आहेत. त्यामुळेच ही मिलेनिअल जनरेशन आता अर्थव्यवस्थेला चालवण्याच्या - वेग देण्याच्या टप्प्यावर येऊ लागली आहे. म्हणूनच त्यांना, त्यांच्या सवयींना, त्यांच्या स्वभावाला महत्त्व न दिल्यास देशातील कोणताच उद्योग-व्यवसाय भविष्याचे आडाखे नीट आखू शकणार नाही. कोणतेच धोरण त्यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही. हे वास्तव आहे.
जागतिक मंदीचा फास थोडा-थोडा घट्ट होत असताना आणि अर्थव्यवस्थेची चाके मंदावत असताना मिलेनिअल्सवर फोकस येणे साहाजिक आहे. कारण हीच जनरेशन आता ‘सर्वात मोठी बाजारपेठ’ही आहे. अनेक विकसित देशांमध्ये गेल्या काही वर्षापासून याच जनरेशनवर फोकस आहे.
अमेरिकेत गेल्याच वर्षी मिलेनिअल्सवर एक शास्रशुद्ध अभ्यास करण्यात आला होता. त्यात मिलेनिअल्सच्या सवयी, त्यांची विचार करण्याची पद्धत, त्यांच्या खरेदीचा पॅटर्न, त्यांच्यावर कोणत्या गोष्टींचा अधिक प्रभाव आहे, आधीच्या जनरेशनपेक्षा ही जनरेशन कोणत्या बाबतीत वेगळी आहे आणि या सार्या गोष्टींचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो, याचा विचार करण्यात आला होता. त्यात आढळलेली तथ्ये ही जगाला मिलेनिअल्सचे महत्त्व ओरडून सांगणारी होती. पण, दुर्दैवाने त्याकडे फारसे कोणी गांभीर्याने पाहिलेच नाही.
जेव्हा ही मिलेनिअल पिढी पहिल्यांदा नोकरी-धंद्याच्या क्षेत्रात उतरण्याच्या तयारीत होती, तेव्हा 2006 ते 2008 या काळात अमेरिकेतून उठलेले मंदीचे वादळ सार्या जगाला मंदीच्या फेर्यात घेऊन गेले होते. त्याच काळात ही मिलेनिअल्सची पहिली फळी मोठय़ा आशेने जगाकडे पाहात होती. पण, मंदीने त्यांच्यावर वार केला. त्यांच्या अपेक्षांना पहिले खिंडार येथे पडले. या पिढीला पहिला फटका जागतिक मंदीचा बसला होता. उमेदीच्या काळात त्यांनी पहिल्यांदाच जागतिक मंदीचा सामना केला आणि हाताला काम असलेले बेरोजगार होतानाही पाहिले. त्यांच्या मनावर गोंदला गेलेला मंदीचा पहिला धडा नंतर त्यांच्या आर्थिक विचार आणि आर्थिक सवयींना आकार देत गेला. जे मिलेनिअल्स यात भरडले गेले ते स्वतर्च्या आणि आधीच्या पिढीच्या खर्चाच्या-कर्जाच्या बाबतीत अधिक कर्मठ झाले. मग यातून पुढे आली ‘डोक्यावर कर्ज नको’ ही वृत्ती. कर्ज काढून घर घ्यायचे किंवा बँकेपुढे हात पसरून डोक्यावर व्याजाचे ओझे घेऊन घरासमोर चारचाकी ऐशोआरामी गाडी उभी करण्याचा ‘स्टेट्स सिम्बॉल’ त्यांनी बासनात गुंडाळून ठेवला.
पण उच्च शिक्षणासाठी कर्ज काढायला मात्र त्यांनी मागेपुढे पाहिले नाही, असे पेव रिसर्चने अमेरिकेत केलेल्या संशोधनात आढळले आहे. पदवी किंवा त्यापेक्षा अधिक शिकलेल्या मिलेनिअल्स तरुणांचे प्रमाण आधीच्या पिढीपेक्षा 10 टक्क्यांनी अधिक आहे. म्हणजेच त्यांची स्वप्ने मोठी आहेत. त्यासाठी कर्ज घेण्याची आणि ती फेडण्याची त्यांची हिम्मत आहे. म्हणूनच मिलेनिअल्सवर आधीच्या पिढीपेक्षा अधिक शैक्षणिक कर्ज आहे. त्यामुळेच त्यांच्याकडील बचतही तोकडी आहे, असेही या संशोधनात म्हटले आहे.
याच काळात तंत्रज्ञानाने प्रगतीचा वेग धरला आणि जगातल्या जवळपास सार्याच गोष्टी एकमेकांना जोडल्या गेल्या. टूजी मोबाइलपासून सुरू झालेला डेटा गेम आता फोर जी आणि येत्या काळात फाइव्ह जीर्पयत येऊन ठेपला आहे. मिलेनिअल्स जसजसे कमावून खर्च करण्याच्या ताकदीवर उभे राहू लागले, तसतशी टेक्नॉलॉजीची कवाडेंही त्यांना खुणावू लागली. त्यातून त्यांना जग हातातल्या स्क्रीनवर उपलब्ध झाले. नव्या अनुभवांच्या जाणिवांसाठी आकाश स्पष्ट होऊ लागले आणि त्यांच्या सीमा विस्तारत गेल्या.
खर्च कोणत्या गोष्टींवर करायचा, याचा विचार प्रामुख्याने अशा पद्धतीने रुजत गेला. वस्तूंवर, भौतिक सुखांवर प्रेम करण्याऐवजी ही पिढी मग अनुभवसंपन्न होण्यावर भर देऊ लागली. त्यामुळेच मिलेनिअल्स पर्यटन, मनोरंजन आणि वेगवेगळ्या पदार्थावर आधीच्या पिढीपेक्षा जास्त पैसे खर्च करत असल्याचे अमेरिकेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या रिसर्च पेपरमध्ये दिसून आले. म्हणून मग मनोरंजन व्यवसाय झपाटय़ाने वाढतो आहे. स्वस्तात मिळू लागलेला डेटा आणि भरमसाठ इंटरनेट स्पीड यामुळे मनोरंजनाची अनेक साधने बोटांच्या टिचकीखाली आली आहेत. मनोरंजनासोबतच अनेक सेवाही ऑनलाइन उपलब्ध झाल्या आहेत. ओला-उबरसारख्या वाहतूक सेवा देणार्या कंपन्यांची सेवा असो की स्विगी-झोमॅटोसारख्या खाद्यपदार्थ पुरवठा करणार्या कंपन्यांची सेवा असो, सारे घरबसल्या ऑर्डर होऊ लागले आहे. ऑनलाइन खरेदीही अॅपवर उपलब्ध झाली आहे आणि पैशांचे व्यवहारही घरबसल्या क्षणात होऊ लागले आहेत.
या सार्यात एवढी स्पर्धा वाढली आहे की, ऑफर्सचा कायम मारा होत आहे. मग, जिथे डिस्काउंट किंवा जिथे स्वस्तात चांगली सेवा तिथेच व्यवहार करण्याकडे मिलेनिअल्सचा कल वाढला आहे. जास्तीत जास्त बचत करून ती इतर अनेक ठिकाणी कशी वापरता येईल, याकडे त्यांचे अधिक लक्ष असल्याचेही रिसर्चमध्ये आढळून आले आहे.
शिवाय एखादी गोष्ट शेअर करायची आणि पैसा वाचवायचा हा जो जगभरात ट्रेण्ड आहे तोच मुळी मिलेनिअल्समुळे घट्ट होऊ लागला आहे. त्यातून मग वाहनांचे शेअरिंग पुढे आले. शेअर टॅक्सी किंवा शेअर रिक्षा हा प्रकार तोच. अगदी वाहतुकीसाठी टांग्यांचा वापर व्हायचा तेव्हापासूनच शेअरिंग आहे. पैसा वाचतो आणि इच्छितस्थळी प्रवासही होतो हाच त्यामागचा हेतू. आता हा ट्रेण्ड आणखी पुढच्या टप्प्यावर येऊन ठेपला आहे. लोक स्वतर्ची वाहने बाहेर काढण्यापेक्षा रोज त्याच मार्गावरून जाणार्यांसोबत कार शेअर करू लागले आहेत. त्यासाठी कार पुलिंगसारख्या सेवा देणारे अॅपही आहेत आणि हे कार पुलिंग सध्या जोमात आहे. नव्या गाडय़ा खरेदी करण्यापेक्षा लोक अशा सेवा उपलब्ध करून देणार्या कंपन्यांची सेवा घेऊ लागले आहेत. त्यातही शेअरिंग करू लागले आहेत.
कर्ज काढून गाडी खरेदी करायची, तिला मेंटेन ठेवण्यासाठी वेळोवेळी खर्च करायचा. स्वतर् ड्रायव्हिंग करायचे नसेल तर ड्रायव्हरला नोकरी द्यायची. त्याच्या पगाराचा खर्च उचलायचा आणि वाढत्या इंधनदराचा बोजा आहे तो वेगळाच. शिवाय मोठय़ा शहरांमध्ये पार्किगचा प्रश्न आहेच. त्याची कटकट वेगळीच. म्हणूनच कार पुलिंग किंवा कार शेअरिंग अशा कार सेवा घेण्याचे प्रकार वाढले आहेत. शेअरिंग इकॉनॉमी ही अशा पद्धतीने बळावत आहे. प्रस्थापित अर्थव्यवस्थेच्या घडीवर शेअरिंग इकॉनॉमीची नवी घडी बसत आहे.
केवळ वाहतूक व्यवस्था शेअर करण्यार्पयत हे मर्यादित नाही, तर आता घर आणि ऑफिसही शेअर करण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. पर्यटनस्थळावर तर घराचे शेअरिंग प्रत्यक्षात भारतातही पाहायला मिळते. म्हणजे कोकणात गेलात तर घरच्या जेवणापासून ते राहण्याच्या व्यवस्थेर्पयत सारे काही शेअरिंगच्या स्वरूपात मिळते. छोटय़ा व्यवसायासाठी अनेकांनी एकच ऑफिस वापरण्याचा ट्रेंडही मोठा आहे.
आधीच्या पिढीत म्हणजेच जनरेशन एक्समध्ये महिलांचा नोकरी-व्यवसायातील सहभाग फार नव्हता. असला तरी तो फार नगण्य स्वरूपाचा होता. तेही फक्त मेट्रो शहरांत किंवा सुशिक्षित घरातील महिला नोकरीसाठी बाहेर पडायच्या. पण, मिलेनिअल जनरेशनमध्ये महिलांचा नोकरी-व्यवसाय आणि उद्योगांतील सहभागही झपाटय़ाने वाढला आहे. पूर्वी महिलांचे शिक्षणातील प्रमाणही कमी होते. पण ही पिढी शिकली. त्यामुळे महिलांचा अर्थव्यवस्थेतील वाटाही वाढला आहे. मोठय़ा प्रमाणात महिला कमावत्या होऊ लागल्या आहेत आणि त्यांच्यातील बचतीचा पॅटर्न हा कायम आहे. मिलेनिअल्स तरुण असो की तरुणी त्यांची बचतीची स्टाइलसारखीच आहे. पैसा अनुभव मिळवण्यासाठी खर्च करायचा आणि वस्तू जमवून त्या पूजत बसायचे नाही, हा मिलेनिअल्समधील ट्रेंड आहे.
मिलेनिअल्स घर खरेदी करायला फार लवकर पुढे येत नाहीत आणि त्यामुळे बांधकाम क्षेत्रात अनेक वर्षापासून कठीण परिस्थिती आहे, अशी ओरडही येत्या काळात ऐकायला मिळेल. अमेरिकेत सध्या हीच स्थिती आहे. भारतातही सध्या घरविक्री मंदावलेली आहे. पण, दुसरीकडे परवडणार्या घरांची मागणी वाढलेली आहे. म्हणजेच सध्या घर घेऊ इच्छिणार्यांना घरांचे दर परवडत नाहीत, अशी मिलेनिअल्सची स्थिती आहे. यात आणखी एक नवा अडथळा असा की शिकलेली ही पिढी चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात सतत स्थलांतर करण्यात आघाडीवर आहे. शिवाय एकाच ठिकाणी आपण किती काळ राहणार याची सध्या या मिलेनिअल्सला खात्री नाही. त्यामुळे त्यांना घरखरेदी करून पैसा गुंतवून ठेवायची किंवा डोक्यावर कर्ज वाढवून ठेवायची इच्छा नाही, असेही आढळून आले आहे.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिलेनिअल्सच्या पहिल्या फळीला जो फटका बसला, तो आता याच पिढीतील दुसर्या फळीलाही बसण्याची शक्यता आहे. कारण सर्वात तरुण मिलेनिअल सध्या 20-21 वर्षाचा आहे. त्यालाही येत्या काळात त्या उमेदीच्या टप्प्यातच पहिल्या मंदीचा सामना करावा लागणार आहे. म्हणजे त्याच्याही आर्थिक आचार-विचारांना मंदीच्या झळांची किनार असेल. याचा सरळ अर्थ असा आहे की, अर्थव्यवस्थेतील चढ-उतार, रोजगाराची उपलब्धता आणि मिळणारे उत्पन्न यावर मिलेनिअल्सच्या स्वभावांना आकार मिळत गेला आहे. त्यात टेक्नॉलॉजीने नव्या विचारांची दारे खुली केली आहेत. अनुभवसंपन्न होण्याच्या जाणिवांना आकाश खुले केले आहे. हेच मिलेनिअल्स येत्या काळात कत्र्याधत्र्याच्या भूमिकेत शिरतील तेव्हा खर्या अर्थाने अर्थव्यवस्थेसमोर, उद्योगांसमोर नवे आव्हान असेल.
त्यामुळे अर्थव्यवस्थेचा विस्तार 5 ट्रिलियन डॉलर्पयत नेण्याची स्वप्ने पाहत असताना या मिलेनिअल्सच्या स्वभावाचा, आर्थिक सवयींचा, मानसिकतेचा आतापासूनच अभ्यास सुरू करावा लागणार आहे.
pavan.deshpande@lokmat.com