जपा ‘अ‍ॅप’ला खिसा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 07:14 PM2019-02-20T19:14:51+5:302019-02-20T19:15:21+5:30

‘व्हॅल्यू’ आणि ‘व्हॉल्यूम’ या दोन्ही बाबतीत मोबाइलवरुन होत असलेले आर्थिक व्यवहार प्रचंड मोठे आहेत. त्यात अर्थातच तरुणांचा वाटा सर्वाधिक. म्हणूनच तरुण आणि मोबाइल या दोन गोष्टी सायबर भामट्याच्या सध्या रडारवर आहेत..

Mobile app can steal money from your bank | जपा ‘अ‍ॅप’ला खिसा!

जपा ‘अ‍ॅप’ला खिसा!

Next
ठळक मुद्देतिजोरीच्या चाव्या आपण स्वत:हून चोरांच्या हाती दिल्यावर ही तिजोरी भरलेली कशी राहणार?

- सोहम गायकवाड
आजची तरुणाई खूपच स्मार्ट झाली आहे, पण ती ‘स्मार्ट’ होण्याच्या आधी त्यांच्या हातात स्मार्टफोन्स आले. आता तर अशी स्थिती आहे, या स्मार्टफोन्सशिवाय तरुणांचं पानही हलत नाही.
टाइमपासपासून तर अभ्यासापर्यंत, संवादापासून ते संपर्कापर्यंत आणि आॅनलाइन व्यवहारांपासून ते पैसे ट्रान्सफर करण्यापर्यंत साऱ्या गोष्टी आज ते मोबाइलवरच करतात.
पण स्मार्टफोनचा वापर जसा वाढला, तसतसं याच फोन्सच्या माध्यमातून होणारे फ्रॉड्सही वाढले. आपल्या खिशावर डल्ला मारण्याचे नवे उपाय सायबर चोरांनी शोधून काढले. मोबाइल हा त्यातला प्रमुख प्रकार आणि त्याला बळी पडलेत तेही मुख्यत्वे तरुणच.
मोबाइलच्या माध्यमातून कंगाल होण्याचं सर्वाधिक प्रमाण तरुणांचं आहे, असंही अमेरिकेत नुकताच झालेला एक अहवालही सांगतो.
त्याच पार्श्वभूमीवर रिझर्व बॅँकेनं नुकताच एक अलर्ट जारी केला आहे की ज्या कोणी आपल्या मोबाइलवर ‘एनीडेस्क’ हे अ‍ॅप इन्स्टॉल केलं असेल, त्यांनी ते ताबडतोब अनइन्स्टॉल करावं. याचं कारण ‘एनीडेस्क’ आणि त्यासारख्या बोगस अ‍ॅप्सच्या माध्यमातून चोºया करण्याचं प्रमाण खूपच मोठ्या प्रमाणात वाढलं आहे.
मोबाइलच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार होण्याचं प्रमाण पूर्वी फारच कमी होतं, पण टेक्नॉलॉजीचा जसजसा विकास होत गेला आणि तरुणांच्या हातात स्मार्टफोन्स येत गेले तसतसं मोबाइलवरूनच आर्थिक व्यवहार होण्याचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलं. यात सोय होती, वेळेची बचत होती, सारं काही झटपट, काही मिनिटांत काम होत होतं आणि मुख्य म्हणजे कुठलंच टेन्शन नव्हतं. त्यामुळे तरुणांनी हा प्रकार खूपच लवकर स्वीकारला.
डिमॉनेटायझेशननंतर तर त्यात खूपच मोठ्या प्रमाणात वाढ झाली.
मोबाइलवर युनिफाईड पेमेंट इंटरफेसचा (यूपीआय) वापर करून अलीकडच्या काळात कोट्यवधींचे व्यवहार झाले. यासंदर्भात नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन आॅफ इंडियाचा अहवाल सांगतो, २०१७मध्ये मोबाइलवरुन झालेले आर्थिक व्यवहार होते ५६,७५० कोटींचे, तर २०१८मध्ये हाच आर्थिक व्यवहार होता जवळपास सहा लाख कोटींचा!
मोबाइलच्या माध्यमातून झालेली ही आर्थिक उलाढाल तब्बल दहा पटींनी जास्त होती, त्याच वेळी एकूण व्यवहारातही तब्बल आठ पटींनी वाढ झाली.
‘व्हॅल्यू’ आणि ‘व्हॉल्यूम’ या दोन्ही बाबतीत मोबाइलवरुन झालेले आर्थिक व्यवहार प्रचंड मोठे होते, आहेत. त्यात अर्थातच तरुणांचा वाटा सर्वाधिक.
तरुणाई टेक्नोसॅव्ही असली, टेक्नॉलॉजीचा उपयोग कसा करायचा, हे त्यांना बºयापैकी माहीत असलं तरी, ही टेक्नॉलॉजी वापरताना काय काळजी घ्यायची हे मात्र बºयाच जणांना माहीत नाही ही वस्तुस्थिती आहे.
टेक्नॉलॉजीचा वापर करायलाच पाहिजे, असे काही प्रकार घडले की अगदी घाबरुन जाऊन त्याचा वापरच टाळायचा, असं न करता सुरक्षित वापराकडे आपण लक्ष दिलं पाहिजे.
केवळ आर्थिक गोष्टींबाबतच नाही, तर मोबाइलच्या माध्यमातून संपर्क आणि व्यक्त होतानाही तितकीच काळजी घेतली पाहिजे.
रिझर्व बॅँकेने दिलेला हा अलर्ट त्यामुळेच महत्त्वाचा आहे. केवळ आर्थिक बाब म्हणून त्याकडे न पाहता, मोबाइल कसा वापरायचा याचे धडेही आपण काळजीपूर्वक गिरवले पाहिजेत.

अ‍ॅपच्या माध्यमातून कसा मारला जातो डल्ला?
सायबर चोरांसाठी सोशल मिडीया हा दरोडेखोरीचा खूप मोठा अड्डा आहे. त्याचद्वारे हे अ‍ॅप सर्वत्र पोहोचवलं जातं, ते किती उपयोगी आहे, याची आकर्षणं पसरवली जातात. काही कारणानं ‘अडलेले’ लोक तिकडे वळतातच. भामट्यांची मोडस आॅपरेंडीही अगदी साधी आहे. ‘गिºहाइक’ जाळ्यात सापडलं की त्याला लगेच एक नऊ आकडी कोड पाठवला जातो. हा कोड रजिस्टर केला आणि मोबाइलवर अ‍ॅपला परमिशन मिळाली की भामट्यांचं काम झालं! भामट्यांना लगेच आपल्या बॅँक खात्याचा रिमोट अ‍ॅक्सेस मिळतो. तिजोरीच्या चाव्या आपण स्वत:हून चोरांच्या हाती दिल्यावर ही तिजोरी भरलेली कशी राहणार?

Web Title: Mobile app can steal money from your bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.