‘मोबाईल ईश्क’; तरुण मुलींना काय ‘नकोसं’ वाटतं?

By admin | Published: January 8, 2015 08:37 PM2015-01-08T20:37:14+5:302015-01-08T20:37:14+5:30

मुळात कुणीतरी आपल्या प्रेमात पडलंय, आपण कुणाला तरी आवडतोय, या भावनेनंच ती आनंदून गेलेली असते. त्यात सुरुवातीला ती काही स्वत:हून त्याला फोनबिन करत नाही.

'Mobile love'; Do young girls feel 'unwanted'? | ‘मोबाईल ईश्क’; तरुण मुलींना काय ‘नकोसं’ वाटतं?

‘मोबाईल ईश्क’; तरुण मुलींना काय ‘नकोसं’ वाटतं?

Next
>ठोंब्या, ढोंग करतो.
 
मुळात कुणीतरी आपल्या प्रेमात पडलंय, आपण कुणाला तरी आवडतोय, या भावनेनंच ती आनंदून गेलेली असते. त्यात सुरुवातीला ती काही स्वत:हून त्याला फोनबिन करत नाही. तोच तिला सतत फोन करतो. काहीबाही विचारतो, इकडून तिकडून आलेला एखादा मेसेज फॉरवर्ड करतो. तिच्या आवडीचं गाणं लागलं तर त्यातली एखादी ओळ तिला लिहून पाठवतो,  त्यातून बरंच काही ‘सुचवतं’. तिला आवडणारे रंग, तिला आवडणारी फुलं, तिला आवडणारी गाणी, असं जे जे म्हणून तिला इम्प्रेस करायला आवश्यक ते सारं करतो.
हा माणूस आपल्याला किती जपतो, किती काळजी घेतो, आपल्या मनातली प्रत्येक गोष्ट न सांगताच कशी काय ओळखतो, याचं तिला अप्रूप वाटू लागतं. त्यात ती जे म्हणेल ते तो ऐकतो, तिनं फोन ठेवायचा प्रयत्न केला तर हटून बसतो आधी तू फोन ठेव, मी नाही ठेवणार.
हे सारं सुरुवातीचे काही महिने चालतं, तोपर्यंत ती कमीच बोलत असते. मग हळूहळू ती ‘मोकळी’ होते, ‘बोलकी’ होते. त्याचे फोन एव्हाना तिला सवयीचे झालेले असतात, आणि मग त्याचा फोन आला नाही की, ती सैरभैर होते. वेड लागल्यासारखी अस्वस्थ होते. सतत त्याला फोन करते.
नेमके त्याचकाळात त्याचे फोन आणि मेसेजेस आटतात. इकडे तिच्या मैत्रिणी तिला सांगतात की, बघ तू ‘पटली’ असं वाटल्याबरोबर तो तूला इग्नोर करायला लागलाय. आज किती फोन केले त्यानं दिवसभरात?
आता त्याच्या कॉल्सची संख्या मोजणं सुरू होतं? किती वेळ आणि काय बोलला याचं मोजमाप मनातल्या मनात सुरू होतं.
आणि ते कमी होतोय असं वाटलं की, आपण इनसिक्युअर होतो, तो असं का वागतोय हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तसतसा तो जास्तच लांब जातो. मुद्दाम फोन घेणं टाळतो असं अनेक मुलींची पत्रं सांगतात.
का आपली फोनवर त्याच्याशी भांडणं होतात आणि का त्या ठोंब्याला आपण चुकीचं वागतोय, गृहित धरतोय हिला हे कळत नाही, असं वाटून मुलींची प्रचंड चिडचिड होते.
आपण फसवले जातोय, आपल्याला जेव्हा त्याची गरज आहे तेव्हा तो आपल्याशी बोलत नाही, त्याला वाटेल तेव्हाच करतो, फार गृहित धरतो अशी मुलींची भावना होते.
त्या भावनेतूच त्याचं काय चुकतं, याची मुलींच्या पत्रातून हाती येणारी ही यादी.
१) त्याचा फोन आला की आपण लगेच तो घ्यायला हवा, एकदोनदा कॉल मिस झाला तरी त्याला राग येतो. लगेच टोमणा मारतो की, एवढं काय करत होतीस महत्वाचं?
नाहीतर मग आपण कॉल केल्यावर चिडून फोनच उचलत नाही. त्याचा प्रचंड त्रास होतो. तू कामात असतोस, मी रिकामटेकडी असते का?
२) फोन न उचलणं हा तर आजारच. एरव्ही जेव्हा पहावं तेव्हा मोबाईल हातातच असतो, सतत अँँग्री बर्ड नाहीतर कॅण्डी क्रश. आम्ही भेटलो तरी बोटांनी टुकटूक चालूच. काहीही बोला, ऐकतोय की नाही कळतंच नाही. बोललो तर म्हणतो, कान उघडे आहेत माझे ऐकतोय मी, तू बोल. म्हणजे थोडक्यात काय आमच्या बोलण्याला काही किंमतच नाही. आणि एरव्ही मात्र हा कधीही फोनच उचलणार नाही, विचारलं तर सांगणार, मोबाईल कुठं तरी लांब होता, कळलंच नाही! किती ढोंग करणार?
३) प्रचंड थापा मारणार? मी काय मोबाईल मित्राकडेच विसरलो, बॅलन्सच नव्हता, पॅण्टच्या खिशात होता, पॅण्ट कपाटात ठेवली गेली, बॅटरीच संपली, वेळच नव्हता, लक्षातच आलं नाही, सतराशे साठ कारणं. एक फोन नाही करता येत मग वेळेत मित्राच्या मोबाईलवरुन, एक रुपयाच्या डबड्यावरुन. आम्ही फोनची वाट पाहणार, तासंतास, दिवसेंदिवस फोन नाही, लागला आणि विचारलं की भांडण सुरू.तू सतत प्रश्नच विचारते म्हणून.
४) तो व्हॉट्सअँपवर ऑनलाईन दिसतो, फेसबूकावर लायका ठोकतो, कमेण्टा मारतो, आणि आपल्यालाच फोन करायला त्याला फुरसत नसते, यावर कोण मुर्ख विश्‍वास ठेवेल?
५) बरं, फोन करा.तो म्हणणार बोल.अरे काय बोल, तू पण बोल ना काहीतरी, सांग, तुझं काय चाललंय, काय केलं आज, पण नाही. काहीच बोलणार नाही. नुस्तं हं हं हं करत राहणार,  कंटाळा येतो असं भींतीशी बोलण्याचा, मग डोकं सटकणार नाही तर काय होईल?
६) मित्रांशी ढिगानं बोलता येतं, मित्रांशी सगळं शेअर होतं, पण मला काही सांगायची वेळ आली की, लगेच तू नको पडूस त्याच्यात, माझं मी पाहून घेईन.पाहून घेईन म्हणजे, आणि तुझं तू.मग हे प्रेमबिम सब झुठ का?
७) त्याला सोयीच्या वेळेस आपण रोमॅण्टिक व्हायचं, म्हणजे त्यानं रोमॅण्टिक काही मॅसेज केला, तो गोडगुलाबी बोलायला लागला की, आपण तसंच बोलायचं, आपण काय यंत्र आहे का? म्हणजे त्याला माझ्या फिलिंग्ज कधी कळणार नाही,प ण त्याचा मूड असला की लगेच रोमान्स सुरू, नाही जमणार!
८) सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचं दुटप्पी वागणं, सुरुवातीला  जे त्याला आवडायचं ते आता आवडत नाही. आधी म्हणायचा, तू बोलत रहावंसं, मी ऐकत रहावंसं वाटतं. आता फोन उचलला की, सूर असा की, ठेव एकदाचा फोन.
९) आपण काहीही विचारा, त्याला उलटतपासणीच वाटते. मग भल्या माणसा तूच मोकळेपणानं काय ते सांगून टाकत जा ना, पण नाही घशात बोळा कोंबाळा तसा मख्खं.काही सांगत नाही. बाहेरुन कळलं की, संताप होतोच.
१0) यासार्‍यातून मुलींची मुलांशी सतत अखंड भांडणं होतात. त्या प्रचंड रडतात. आतल्या आत कुढतात. दिवस दिवस जेवत नाही, कुणाशी बोलत नाही, घरच्यांशी भांडतात, त्यांच्यावर राग काढतात.आणि सतत अस्वस्थ, रेस्टलेस असतात. आणि प्रचंड कडवट, एकारल्या बनत जातात.त्याही संपलेल्या आणि हरलेल्याच दिसतात.

Web Title: 'Mobile love'; Do young girls feel 'unwanted'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.