मॉडर्न, पण स्वतंत्र नव्हे?
By admin | Published: February 11, 2016 07:52 PM2016-02-11T19:52:40+5:302016-02-11T19:52:40+5:30
‘लिव्ह इन’मधल्या सहजीवनावरही उभी राहताहेत नवी प्रश्नचिन्हे. आणि लागतेय प्रेमाची कसोटीच.
Next
>
- चिन्मय लेले
‘लिव्ह इन’मधल्या सहजीवनावरही उभी राहताहेत नवी प्रश्नचिन्हे. आणि लागतेय प्रेमाची कसोटीच.
ती दोघं लिव्ह इनमध्ये राहणारी. स्वतंत्र. मॉडर्न.
त्याचे आईबाबा घरी येतात. ती पटकन किचनमध्ये जाते. चहा करते. पटकन गळ्यात ओढणीही घेते. त्याच्या आईला जास्त साखरेचा, वडिलांना बिनसाखरेचा चहा देते.
त्याची आई खूश होते. मुलगी ‘संस्कारी’ आहे, घरेलू आहे असं तिला वाटतं.
असं साधारण वर्णन असलेली एक जाहिरात टीव्हीवर अलीकडे झळकत होती. त्यात काय दिसतं? तर ती दोघं लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतात. समान हक्कं, समान जगणं कुठल्याही बंधनाशिवाय मान्य करतात.
पण प्रत्यक्षात मात्र त्याचे आईवडील आले म्हणून तो चहा करायला जात नाही. तीच जाते. (कारण चहा एरवीही घरात बायकाच करतात ना.) मग गळ्यात ओढणी घेऊन, परंपरा जपत त्यांना हवं नको पाहते.
बाकी सगळं ठीक, पण यात पुन्हा मुलीकडच्या अपेक्षा टिपिकल. त्याला लिव्ह इनमध्ये राहूनही चहा आयताच मिळणार !
अशी चर्चा/वाद चिक्कार झाले. लिव्ह इनमध्ये राहणा:या तरुण जोडप्यांनीही त्यावर आपली मतं मांडली. मात्र त्यातही मुलींचं मत ठाम होतं की, प्रकार बदलला तरी मुलींची कामं बदलत नाहीत. त्यांना घर चालवण्याची जबाबदारी घ्यावीच लागते.
आता लिव्ह इनच्या नव्या प्रकारात मुली ही बंधनंही धुडकावून लावत आहेत.
म्हणून लिव्ह इन रिलेशनशिपचा एक वेगळा प्रकार जन्माला आला आहे.
पूर्वी लिव्ह इन म्हणजे लग्न करता एका छताखाली राहणं असा मामला होता, ज्याला अर्थातच सामाजिक मान्यता नव्हती. आणि नाहीही. हा टिपिकल शहरी ट्रेण्ड.
पण आज त्या मॉडर्न ट्रेण्डमध्येही प्रश्न निर्माण होताहेत.
ते कामं वाटण्याचे. जबाबदारी स्वीकारण्याचे. आणि एकत्र जगताना कराव्या लागणा:या तडजोडींचे. म्हणून मग अनेकजण आता असं लिव्ह इनमध्ये राहणंही टाळतात. स्वतंत्र राहतात.
या नात्यातही अनेक नवीन पेच आहेत आणि अनेक नवीन समस्याही. लग्न नको म्हणणारे काहीजण म्हणून मग लग्नाचाही पर्याय स्वीकारू लागले आहेत.
लग्न संस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना या नव्या व्यवस्थाही तितक्याच जटिल आहेत हे खरं !
आणि तिथं पणाला लागताहेत जोडप्यांच्या अपेक्षाही आणि सहजीवनही !