'प्लॅन बी' तयार ठेवून नोकरीचा राजीनामा दिला, MPSC परीक्षेत पहिला आला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 06:36 PM2020-06-25T18:36:04+5:302020-06-28T13:23:10+5:30

परिस्थिती वाटेत अडसर म्हणून उभीच होती; पण सगळ्या अडचणी ओलांडून अधिकारी झालेल्या तिघांची गोष्ट

MPSC pass out- 3 topers- and their struggle | 'प्लॅन बी' तयार ठेवून नोकरीचा राजीनामा दिला, MPSC परीक्षेत पहिला आला!

'प्लॅन बी' तयार ठेवून नोकरीचा राजीनामा दिला, MPSC परीक्षेत पहिला आला!

googlenewsNext
ठळक मुद्देबेस्ट इज येट टू कम!

प्रसाद चौगुले
महावितरण कंपनीच्या कऱ्हाड  कार्यालयात ऑपरेटर म्हणून काम करणारे बसवेश्वर चौगुले यांचा मुलगा प्रसाद राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात अव्वल येतो.
अर्थात प्रसाद अजूनही म्हणतोच की, ‘बेस्ट इज येट टू कम!’ 
प्रसाद साताऱ्यातील जवाहर नवोदय विद्यालयात शिकत असताना अनेक प्रशासकीय अधिकारी शाळेत येऊन मार्गदर्शन करायचे. आपणही प्रशासकीय सेवेत जावं ही त्याची तेव्हापासूनच इच्छा होती.   
कुटुंबाची परिस्थिती बेताची आहे, हे ओळखून शिक्षण पूर्ण झाल्यावर लगेचच नोकरी करून प्रसादने अर्थाजर्नात वडिलांना हातभार लावला. सुमारे वर्षभर नोकरी केल्यानंतर त्याला स्पर्धा परीक्षा खुणावू लागली. या परीक्षांची माहिती, त्यात घ्यावे लागणारे कष्ट, त्यासाठी आवश्यक आर्थिक तयारी, अपयश आलेच तर ‘प्लॅन बी’ सज्ज ठेवून प्रसादने आपल्या नोकरीचा राजीनामा देण्याचं ठरवलं. 
नियमित आठ तास सलगपणो अभ्यास करत वारंवार प्रश्नपत्रिकेचा सराव, चालू घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून त्याचाही अभ्यास त्यानं केला. सोशल मीडियापासूनही दूर राहिला. प्रसाद सांगतो, काही महत्त्वपूर्ण वेबसाइट, आवश्यक व्हिडिओ असं सगळं बघण्यासाठी मोबाइल हातात असायचा पण कागदावर काढलेल्या नोट्स वाचून मिळणारं समाधान मोबाइलवर मिळालं नाही. चांगले मार्क मिळतील याची मला खात्री होती; पण मी या परीक्षेत नंबर काढणार म्हटलं की आई अस्वस्थ व्हायची. आम्ही शिकावं ही जिद्द तिचीच, ती अंधश्रद्धाळू नाहीच; पण मुलाच्या इच्छांना कोणाचीही अगदी तिचीही दृष्ट लागू नये म्हणून ती म्हणायची, ‘असं सारखं म्हणू नय, दृष्ट लागती.’ 
निकालाची बातमी सांगितल्यानंतर, ‘खरंच व्हय?’ हा तिचा एवढाच प्रश्न होता.’ 
स्पर्धा परीक्षा द्यावी असं का वाटलं असं मुलाखतीतही विचारलं गेलं तर प्रसादने तेव्हाही प्रामाणिकपणो तेच सांगितलं होतं, नोकरीची शाश्वती आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळविण्यासाठी!
मात्र तरीही त्याचा प्लॅन बी पक्का होता, खासगी नोकरी करून प्रसादने पैसे साठवले. वर्षभरात आपल्याला यश मिळालं नाही तर प्लॅन बी म्हणून मित्रबरोबर स्वतंत्र व्यवसाय करण्याचं त्यानं पक्क केलं होतं. 
*****

राहुल गुरव


बेताची परिस्थिती असल्याचं भान, योग्य मार्ग दाखवणारे  मित्र आणि कष्टाला मागे न हटणारी हिंमत अंगी ठेवून राहुल पोपट गुरव या शेतकऱ्याच्या लेकानं कोणत्याही खासगी क्लासशिवाय तहसीलदार पदार्पयत मजल मारली. 
सातारा तालुक्यातील देगावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतून राहुलच्या शिक्षणाचा श्रीगणोशा झाला. मराठी माध्यमातून बारावीर्पयत शिक्षण घेतल्यानंतर तो अभियांत्रिकी शिक्षणासाठी कणकवलीला गेला. पदवी मिळाल्यानंतर काही महिने नोकरीशिवाय राहावं लागलं. त्याचवेळी स्पर्धा परीक्षांतून नोकरी मिळविण्याविषयी त्याच्या मित्रंनी त्याला सांगितलं. घरच्या दीड एकर शेतात खाणारी पाच तोंडं होती, त्यामुळे कसंबसं शिक्षणासाठी पैसे उभे केलेल्या कुटुंबीयांना त्याला स्पर्धा परीक्षा तयारीचं काही सांगणंही कठीण होऊन बसलं. अशावेळी त्याच्या मित्रंसह परिचितांनी त्याला मोठा आधार दिला. मित्रंचं मार्गदर्शन आणि इंटरनेटवर मिळालेल्या माहितीच्या आधारे राहुल अभ्यास करू लागला. पुण्यात मित्रकडे राहून मित्रंच्या पुस्तकातून अभ्यास करून त्याने हे यश मिळवलं. 
राहुल सांगतो, ‘कष्टकरी आई-वडील आणि  मार्गदर्शक मित्र यांच्यामुळेच हे यश मिळविता आलं. मी तीन वर्षे स्पर्धा परीक्षेची तयारी केली. सहायक उपनिबंधक पद मिळविल्यानंतर आता सेवेत रुजू व्हावं, अशी इच्छा व्यक्त केली; पण दोस्तांनी याला तीव्र विरोध केला. तू आम्हाला जड नाहीस म्हणत त्यांनी आवश्यक ती सगळी मदत प्रत्यक्षात केली आणि खूपच ऊर्जा मिळाली. हा निकाल लागल्यानंतर कुटुंबीयांनंतर सर्वाधिक आठवण आली ती मित्रंची.’  

...
अमर मोहिते

अंगावर वर्दी असावी, या लहानपणी उराशी बाळगलेल्या स्वप्नानं चक्क दोन वेळेला हुलकावणी दिली. दोन वेळेला सैन्यात जाण्यासाठीचे प्रयत्न फसले, त्यानंतर वायू दलाच्या परीक्षेनेही चकवा दिला. दगड फोडणाऱ्या  आई-वडिलांचे कष्ट पाहून त्याच्यातही लढण्याचं बळ होतंच. सैन्याची वर्दी नाही मिळाली तर पोलिसांची खाकी परिधान करण्यासाठी अमर मानसिंग मोहिते सरसावला आणि थेट पोलीस उपअधीक्षक पद मिळविलं. 
सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज या छोटय़ाशा गावात अमरचा जन्म झाला. तो आणि त्याचा भाऊ दोघांनाही देशसेवेची  क्रेझ, त्यामुळे आई-वडील दगड फोडण्याचं काम करत असताना ही दोघं तिथं शेजारीच युद्धभूमी करून लढाई खेळायचे. नंतर पैसे भरायला लागणार नाही, अशी शाळा निवडून कुटुंबीयांनी त्यांना सरकारी शाळेतही टाकलं. 2क्16 मध्ये अमरने अभियांत्रिकी पदवी मिळवून पुण्यात नोकरीस सुरुवात केली. मोठय़ा शहरात मोठय़ा आकडय़ांचा पगार दिसत असला तरी खर्चाचा ताळमेळ घालता हाती निराशाच !  हे घुसमटलेपण काढून टाकण्यासाठी त्याने नोकरीचा राजीनामा देऊन थेट आजोळ गाठलं. शिराळ्याजवळील मांगरूळ येथे त्याने अभ्यास करायला सुरुवात केली. 2018 मध्ये उपशिक्षणाधिकारी म्हणून तो शासकीय सेवेत रुजू झाला; पण त्याचं वर्दीचं खूळ काही डोक्यातून जायला तयारच होईना. उपशिक्षणाधिकारी म्हणून साताऱ्या त  कार्यरत असताना त्याने परीक्षा दिली आणि पोलीस उपअधीक्षक पदार्पयत मजल मारली.
मोलमजुरी करून शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारे पालक, आजी-आजोबा यांच्या विश्वासाच्या जिवावरच हे पद मिळवू शकलो, असं अमर सांगतो.  

- प्रगती जाधव-पाटील
(प्रगती लोकमतच्या सातारा आवृत्तीत वार्ताहर आहे.)

Web Title: MPSC pass out- 3 topers- and their struggle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.