मातीबानी
By admin | Published: June 16, 2016 12:10 PM2016-06-16T12:10:01+5:302016-06-16T12:32:00+5:30
ती शास्त्रीय संगीत शिकलेली, तर तो पाश्चात्त्य संगीताचा दिवाना. त्यांनी एकत्र येत वेगवेगळे प्रयोग सुरू केले. तंत्रज्ञान आणि सुरांची अशी काही साथ घातली की लोकसंगीतालाही एक वेगळा आयाम देण्याचा प्रयत्न सुरू केला. भाषा-प्रांत आणि प्रकार या साऱ्याच्या पलीकडे जाऊन बोलणारी संगीताची एक नवी भाषा ते घडवू पाहत आहेत..
संगीताच्या एक नव्या ‘आंतरराष्ट्रीय’
उपक्रमाची ही चर्चा, येत्या (२१ जून)
आंतरराष्ट्रीय संगीत दिनानिमित्त...ताल, लय व स्वर यांच्या त्रिवेणी संगमातूनच जन्माला येणारं सुंदर रसायन म्हणजे संगीत...
मानवी भावनांना सृजनात्मक रूप देणारं माध्यम म्हणजे संगीत. या अभिजात कलेला भाषेचं, धर्माचं, प्रांताचं कोणतंही बंधन मुळी मान्यच नाही... स्वर्गीय सुरांनी मनाचा ठाव घेतला की ते संगीत आपलंच झालं म्हणून समजा!
‘मातीबानी’ या आॅनलाइन बँडने संगीताची ही किमया तंतोतंत खरी करून दाखवली आणि संपूर्ण जगाला ‘जागतिक लोकसंगीत’ची ओळख करून दिली.
कार्तिक शहा आणि निराली कार्तिक. भारत, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका इथपासून इराण, भुतान, क्युबा, ब्राझील, दक्षिण आफ्र्रिका अशा सर्व देशांमध्ये या जोडीच्या संगीताची जादू पसरली आहे. लोकसंगीत हा आपल्या संस्कृतीचा गाभा आहे, हे लक्षात घेऊन कार्तिक आणि निरालीने जगभरातील संगीतप्रेमी, सिनेमॅटोग्राफर, फोटोग्राफर, म्युझिक इंजिनिअर, तंत्रज्ञ अशा अनेकांशी आॅनलाइन संपर्क साधला आणि लोकसंगीताला नवा आयाम मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
आतापर्यंत त्यांचे चार अल्बम्स प्रदर्शित झाले असून, ‘मातीबानी’ला यू-ट्यूब, फेसबुक अशा डिजिटल माध्यमातून चार लाखांहून अधिक हिट्स मिळाले आहेत. या बँडमुळे जगभरातील तरुणाईला अक्षरश: ‘याड लागलं’ आहे.
निराली मूळची अहमदाबादची, तर कार्तिक मुंबईचा. कार्तिकला पाश्चात्त्य संगीताची आवड आणि निरालीने लहानपणापासून शास्त्रीय संगीताचे धडे गिरवलेले! दोघंही विवाहाच्या बंधनात अडकले आणि आपल्या संगीताच्या आवडीलाही आयुष्याप्रमाणे एका दिशेनं नेण्याचा चंग त्यांनी बांधला. यातूनच २०१२ मध्ये ‘मातीबानी’चा जन्म झाला. ‘माती’त रुजलेली, मुळांना घट्ट धरून आकाशाकडे झेपावणारी आणि सर्वांना आपलीशी वाटणारी ‘बानी’ अर्थात भाषा म्हणजे ‘मातीबानी’! या शब्दाला त्यांनी सांगितिक प्रयोगामध्ये चपखल बसवलं आणि सर्वांची मनं ‘संगीतमय’ करत जिंकून घेतली.
या सुरेल प्रवासाबाबत बोलताना निराली म्हणते, ‘मला लहानपणापासून शास्त्रीय संगीताची आवड होती. पं. जसराज यांचे शिष्य पं. विकास परीघ यांच्याकडून मी अहमदाबादला शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. कार्तिकला भेटल्यानंतर त्याच्या संगीतप्रेमानेही मी भारावून गेले. दोघांनाही असलेली संगीताची अभिरुची पाहता, आपण संगीतावर वेगळ्या प्रकारचे संस्कार केले तर नवा प्रवाह निर्माण होऊ शकतो, अशी कल्पना सुचली. ‘मातीबानी’च्या माध्यमातून वेगवेगळ्या संस्कृतींचा मिलाफ असलेली गाणी जन्माला येतात आणि नवजात बाळाचं भरपूर कोडकौतुक व्हावं, त्याप्रमाणे सर्व संगीतप्रेमी या गाण्यांना भरभरून प्रतिसाद देतात. अर्थात, हे सर्व सहजशक्य झालं आहे ते केवळ तंत्रज्ञानामुळे.’
कार्तिक आणि निराली शास्त्रीय, लोकसंगीत अथवा पाश्चात्त्य संगीताचा पाया रचून त्यावर आधारित अनोखी संगीतरचना तयार करतात. ही संगीतरचना तयार करताना विविध देशांमधील कलाकारांशी, तंत्रज्ञांशी आॅनलाइन संपर्क साधला जातो. कम्पोझिशन ऐकवणं, शूटिंग, फोटोग्राफी, संगीत शब्दबद्ध करणं अशी संगीत रचनेची सर्व चर्चाही आॅनलाइनच केली जाते. बहुतांश वेळा, एका रचनेवर काम करणारी संपूर्ण टीम एकमेकांना प्रत्यक्ष भेटलेलीच नसते. मात्र, स्काईपच्या माध्यमातून चर्चा करून या टीमची अनोखी संगीतरचना जन्माला येते.
‘मातीबानी’च्या ‘द म्युझिक यंत्र’ या सिरिजमध्ये सुमारे २५ देशांमधील ५० कलाकारांनी एकत्र काम केलं आहे. या सिरिजने डिजिटल मीडियात अक्षरश: धुमाकूळ घातला. प्रत्येक अल्बमची, सिरिजची तालीम ही स्काईपवर केली जाते, हे विशेष! या बँडने आजवर ‘जाओ पिया’, ‘लगन लागी’, ‘मौको कहा ढुंढो रे बंदे’, ‘पायल की झनकार’ अशा एकाहून एक सरस संगीतरचना दिल्या आहेत.
कार्तिक म्हणतो, ‘संगीताचं सर्व संशोधन हे डिजिटल माध्यमातूनच केलं जातं. संगीताला जात, भाषा, धर्म आणि भौगोलिक सीमा असे कोणतेच बंधन नाही. मला आवडणारं एखादं गाणं अमेरिकेतील मुलालाही आपलंसं वाटतं, तेच गाणं ब्राझीलमधील तरुणांनाही भावू शकतं. हीच तर संगीताची खरी जादू आहे.
‘मातीबानी’तर्फे तयार करण्यात येणाऱ्या संगीतरचनांमध्ये वेगवेगळ्या संस्कृतीचे लोक एकत्र येतात. संगीताचा आनंद जास्तीत जास्त लोकांना घेता यावा, हाच आमचा प्रामाणिक हेतू आहे. ही शाश्वत कला हेच सत्य आहे; त्यामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर असलेले लोकसंगीत जतन करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. यातूनच जगभरातील संस्कृतींना बळकटी येऊ शकते.’
परदेशात ‘स्ट्रीट म्युझिक’ ही संकल्पना खूप प्रचलित आहे. भारतात ही संकल्पना फारशी रुजलेली नाही. ‘मातीबानी’च्या माध्यमातून हा ट्रेण्ड रुजू पाहत आहे, हेही नसे थोडके! आणि मदतीला आहे तंत्रज्ञान, जगभरात आपलं संगीत पोहचवण्याची एक संधी!
- प्रज्ञा केळकर-सिंग
स्र१ंल्लि८ं2211@ॅें्र’.ूङ्मे
न्यूयॉर्क सबवे
ते
भोजपुरी
‘मातीबानी’तर्फे ‘लगन लागी’ हे गाणं न्यूयॉर्कमधील सबवे स्टेशनवर शूट करण्यात आलं. यामध्ये जगभरातील १५ संगीतकारांनी काम केलं आहे. ‘मौको कहा ढुंढे रे बंदे’ हे गाणं महिला दिनाचे औचित्य साधून प्रदर्शित करण्यात आले. यामध्ये इराण, ब्राझील, जर्मनी, अमेरिका आणि भारतातील तरुणींचा सहभाग आहे. ‘वर्ल्ड हेरिटेज डे’च्या निमित्ताने जगभरातील महत्त्वाच्या ऐतिहासिक जागांवर गाणे शूट करण्यात आले. ‘मातीबानी’नं स्वातंत्र्यदिनाचं निमित्त साधत ‘रंग रसिया’ हे गाणंही अनेक पाकिस्तानी कलाकारांसोबत रसिकांसमोर आणलं. पुढील दोन गाणी पंजाबी आणि भोजपुरी भाषांमध्ये तयार करण्याचा ‘मातीबानी’चा मानस आहे.