मु. पो. मलकापूर

By admin | Published: September 22, 2016 05:53 PM2016-09-22T17:53:16+5:302016-09-22T17:53:16+5:30

लांबच्या कॉलेजात रोज जायचं तर बसचा प्रवास. त्यात टारगट पोरं छळणार, धक्के मारणार, छेडछाड करणार! आणि त्यांना काही बोलावं तर घरचे दम देतात, ‘वंगाळ काही केलंस तर शिक्षण बंद, लग्नच करून टाकू, मग बस घरातच.!’

Mu Po Malkapur | मु. पो. मलकापूर

मु. पो. मलकापूर

Next
>- सचिन जवळकोटे
 
 ‘ओन्ली गर्ल्स् बस’ने कॉलेजात जाणार्‍या  लेकीबाळींचा स्वच्छंद प्रवास...
 
लांबच्या कॉलेजात रोज जायचं तर बसचा प्रवास.
त्यात टारगट पोरं छळणार, धक्के मारणार, छेडछाड करणार!
आणि त्यांना काही बोलावं तर घरचे दम देतात, 
‘वंगाळ काही केलंस तर शिक्षण बंद, लग्नच करून टाकू, मग बस घरातच.!’
शिक्षणच थांबायची भीती म्हणून तोंड दाबून सारा त्रास सहन करायचा.
यावर उपाय काय?
गावानंच पुढाकार घेऊन ठरवलं की, 
लेकीबाळींच्या सुरक्षित प्रवासाची काळजी आपण घेऊ.
एक मोफत बसच सुरू करून टाकू.
बस सुरू झाली, आणि सगळं चित्रच पालटलं.
ते कसं?
समजून घ्यायचंय?
चला, मलकापूरला!
 
सन २0११
कर्‍हाड-मलकापूर परिसरातील एक सर्वसाधारण फॅमिली. घरातल्या अर्चनाची दहावी झालेली. आता कुठल्या कॉलेजला अँडमिशन घ्यायचं, यावर खलबतं सुरू. अर्चनाची इच्छा मोठय़ा कॉलेजात शिकण्याची, पण या गोष्टीला आईचा कडाडून विरोध. घरापासून दहा ते बारा किलोमीटर दूर विद्यानगर परिसरात असलेल्या कॉलेजात जाण्यासाठी रोज दोन बस बदलाव्या लागणार. धक्काबुक्की करत बसमध्ये शिरावं लागणार. स्टँडवरच्या टारगटांचा ‘धुसमुसळेपणा’ सहन करावा लागणार. छेडछाडीला सामोरं जावं लागणार.. अन् बरंच काहीऽऽबाही.
आईनं व्यक्त केलेली भीती ऐकून अर्चना भेदरली तर बाबा चिडीचूप. लेकीला छोटीशी मोपेड घेऊन देण्याचीही त्यांची खूप धडपड. परंतु आपली आर्थिक ऐपतही त्यांना ठाऊक. त्यामुळं एसटीच्या धांगडधिंग्यात लेकीला पाठविण्याशिवाय पर्याय नाही, हेही त्यांना कळून चुकलेलं. दिसत असूनही, समजत असूनही अखेर त्यांनी दूरच्या कॉलेजात अर्चनाचं नाव नोंदवलं.
अर्चनाचं कॉलेज सुरू झालं. पहिला क्लास अकरा वाजता. मात्र साडेदहाला कॅम्पसमध्ये पोहोचायचं असेल तर दोन तास अगोदरच घरातून निघायला लागायचं. म्हणजे साडेआठला घरातून निघायचं, नऊला बसस्टॉपवर. हात करूनही दोन-चार बस तशाच निघून गेल्यानंतर एखादी दुसरी उपकार केल्यागत नाईलाजानं थांबणार. आत अगोदरच 
पन्नास-साठ प्रवाशी कोंबकोंब कोंबलेले. त्यात बाहेरचा लोंढा पाच-पंचवीस जणांचा.
ढकलाढकली करत कसंबसं बसच्या दारातून आत घुसायचं. म्हणजे आपण काहीच करायचं नाही. गर्दीत स्वत:ला झोकून दिलं की मागच्या रेट्याबरोबर अँटोमॅटिक शरीर पुढं सरकायचं. अशावेळी मागच्या टारगट पोरांनी मुद्दामहून केलेली झोंबाझोंबी स्पष्टपणे जाणवायची. त्या किळसवाण्या स्पर्शानं मेल्याहून मेल्यासारखं व्हायचं, पण नाईलाज होता. कॉलेजच्या पहिल्या तासाला पोहचायची घाई असायचीच.  शिक्षणासाठी सारं काही सहन करावं लागायचं. हा रोजचाच विचित्र अनुभवही अंगवळणी पडत चालला होता.
***
सन २0१२
नाव सुनीता. बी.ए. सेकंड. विषय इतिहास. देशाचा इतिहास किती सुसंस्कृत आहे, याचा रोज अभ्यास करताना ती हरखून जायची. पण? पण कॉलेजला जाताना बसमध्ये ज्या घटना घडायच्या त्या पाहून मात्र मन भलतंच विषण्ण व्हायचं. गलबलून यायचं. हाच का तो देश, ज्याचा इतिहास एवढा उज्ज्वल होता, या प्रश्नानं मनात काहूर माजायचं. अशातच दिल्लीतील ‘निर्भया’ प्रकरणामुळं सार्वजनिक ठिकाणी प्रवास करताना उगाचच भीती वाटू लागलेली.
सुनीता ज्या बसमधून रोज प्रवास करायची, त्यात सिनिअर तरुणांचीही प्रचंड गर्दी असायची. बसमध्ये तिला कशीबशी जागा मिळाल्यानंतर लगेच  एखादं पोरगं तिला खेटून बसायचं. आजूबाजूच्या मित्रांसोबत बोलण्याचा बहाणा करत ईल शेरेबाजी करायची. या पोरांचा हा रोजचाच उद्योग झाला होता. त्यांना क्रॉस करावं तर घरातल्यांनी सांगितलेलं आठवायचं, ‘तुला फक्त शिकण्यासाठी आम्ही घराबाहेर पाठवतोय. जर बाहेर काही कमी-जास्त झालं तर डायरेक्ट घरातच बसायचं. कॉलेज बंद अन् स्थळ दाखवायला सुरू. आलं का लक्षात?’
त्यामुळं मनात इच्छा असूनही या पोरांशी पंगा घेणं शक्य नव्हतं. आपल्यासारख्या शेकडो पोरी रोज असंच रडत-कुढत कॉलेजला जातात, हेही तिच्या लक्षात आलेलं. पोरींच्या या गप्प बसण्याचा सोयीस्कर अर्थ काढत पोरंही अलीकडं भलतीच चेकाळू लागलेली. मोबाइलवर कसलीही घाणेरडी गाणी लावून डोळ्यात डोळे घालून रोखून बघू लागलेली. या सार्‍या प्रकारामुळं अंगाचा तिळपापड व्हायचा. ‘खाडकन उठावं. त्यांना बदडऽऽ बदड बडवावं,’ असं सतत वाटत राहायचं. पण नाईलाज होता. कारण यातून चांगलं काही घडण्याची अपेक्षा कमीच होती. उलट शिक्षण सोडून घरी बसावं लागलं असतं.
एक दिवस मात्र अतिरेक झाला. सुनीताची मैत्रीण समोरच्या सीटवर बसलेली. दोन्ही बाजूला दोन पोरं. तिच्या पाठीमागं हात टाकून दोघंही एकमेकांशी बोलण्यात दंग. रोख मात्र टोटल तिच्याकडेच. ती मात्र मान खाली घालून गपगुमानं पुस्तक वाचण्याचं नाटक करू लागलेली. त्यांचं ‘टॉन्टिंग’ सहन करण्याच्या पलीकडं चाललेलं. एकदा तर एकाचा हात तिच्या पाठीवरून फिरला. मग मात्र संयम संपला. बांध तुटला. सुनीता खाडकन उठली. तिनं कंडक्टरला जोरजोरात हाका मारल्या. गर्दीतून कशीबशी वाट काढत कंडक्टर समोर आला. तिनं त्या दोघांच्या विचित्र चाळ्याचा किस्सा सांगितला. तरीही कंडक्टरची प्रतिक्रिया अत्यंत शांत. ‘नीट बसा की जरा सरकूनऽऽ’ एवढंच सांगून कंडक्टर पुढं सरकला.
पण ती पोरं भलतीच वाह्यात. ‘तुझा काय संबंध रेऽऽ बस काय तुझ्या   ची इस्टेट काय?’ असा सवाल करत दोघांनी कंडक्टरच्या दहा पिढय़ांचा उद्धार करायला सुरुवात केली. मग मात्र, बसमधल्या सार्‍याच पोरी खवळल्या. सहनशीलतेचा स्फोट झाला. कलकलाट वाढला. एकीनं पुढं केबिनमध्ये जाऊन ड्रायव्हरच्या कानात काहीतरी संदेश दिला. मग काय.. कॉलेजचा मार्ग सोडून बस गर्रऽऽकन डावीकडं वळाली. पाहता-पाहता थेट कर्‍हाड पोलीस ठाण्यात पोहोचली. पोरींनाही हुरूप आला. त्या पोरांचं बखोट धरून त्यांनी वरात थेट साहेबांच्या केबिनमध्ये नेली. छेडछाडीची थेट केस ठोकली. ज्या बसमध्ये रामायण घडलं, त्या बसचं महाभारत अखेर पोलीस ठाण्यात समाप्त झ् ालं.
***
सन २0१३
मलकापुरातील प्रत्येक घराला बारा महिने, चोवीस तास शुद्ध पाणीपुरवठा करणार्‍या नगरपंचायतीच्या कारभार्‍यांची बैठक सुरू. ‘केवळ पाणी, रस्ते अन् ड्रेनेज एवढीच आपली जबाबदारी नाही. आपल्या गावातील पोरीबाळींच्या सुरक्षेचीही जबाबदारी आपण उचलायला हवी,’ अशी स्पष्ट भूमिका उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी मांडताच टाळ्यांचा कडकडाट झाला. मात्र, बहुतांश जणांच्या नजरेसमोर भलामोठा प्रश्न आ वासून उभा ठाकला होता. ‘लेकीबाळींच्या सुरक्षित प्रवासाचं नियोजन आपण कसं करणार?’ याचं उत्तर काही केल्या कुणालाच सापडत नव्हतं. काही महिला नगरसेवकांनी मात्र हळूच एक कल्पना मांडली, ‘फक्त मुलींसाठी स्पेशल मोफत बस देता येईल का बघा?’ 
या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण. ते कर्‍हाडचेच. त्यामुळं मलकापूरची अख्खी टीम मोठय़ा हक्कानं पृथ्वीराजबाबांना भेटली. त्यांनाही ‘मोफत बस’ची कल्पना आवडली. त्यांच्या आदेशानंतर यंत्रणा कामाला लागली. निर्णय झाला. मलकापुरात राहणार्‍या परंतु कर्‍हाडात शिकण्यासाठी जाणार्‍या कॉलेजकन्यांना मोफत पास देण्याचा ठराव नगरपंचायतीनं मांडला. या पासचा निम्मा खर्च पंचायतीनं तर निम्मा एसटी महामंडळानं उचलला. अन् ७ जुलै रोजी श्रीमती प्रेमलाताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियानाअंतर्गत ‘ओन्ली गर्ल्स् बस’ प्रवासाला निघाली. 
***
 
सन २0१४
एका स्थानिक स्वराज संस्थेनं सुरू केलेली देशातली पहिली ऐतिहासिक बस. ना तिकिटाच्या पैशाची चिंता, ना पुरुषांच्या घोळक्यात चेंगरण्याचं झंझट. रोज सकाळी दहा वाजता एक बस ठरावीक स्टॉपवर येऊन उभारायची. त्यात प्रवेश फक्त अन् फक्त मुलींनाच. आतमध्ये कंडक्टरही महिलाच. बस भरली की निघाली थेट कॉलेजला. कुठेही गोंधळ नाही की ढकलाढकली नाही, पुरुषी नजरा नाही की त्यांचा घाणेरडा स्पर्शही नाही.
कित्तीऽऽ कित्ती छान.. पहिल्या वर्षी या मोफत बस योजनेत फक्त तीनशे मुलींनी भाग घेतलेला, कारण सुरुवातीला अशा सुंदर कल्पनेवर कुणाचाच विश्‍वास नव्हता. खिशातला एक दमडाही खर्च न करता आपल्या लेकीबाळी सुरक्षितरीत्या प्रवास करून परत घरी येऊ शकतात, हे पालकांनाही कित्येक दिवस खरं वाटत नव्हतं. पण हळूहळू पटू लागलं. विश्‍वास बसू लागला; म्हणूनच की काय यंदाच्या वर्षी मुलींची संख्या चांगलीच वाढली.
या योजनेसाठी मलकापूर नगरपंचायतीनं कर विभागातला एक क्लार्क कायमस्वरूपी नेमला. आजपावेतो कर गोळा करणार्‍या तेजस शिंदेंचे हात आता मुलींना मोफत पास देण्यात व्यस्त झालेत. शिंदे बोलत होते, ‘पहिल्या वर्षी प्रतिसाद तसा ठरावीक होता. मात्र, नंतर या योजनेचं महत्त्व लोकांना समजत गेलं. मुलींची संख्या वाढत गेली. दर महिन्याला मोफत पास घेऊन जाण्यासाठी मुलींसोबत त्यांचे पालकही मोठय़ा कौतुकानं येऊ लागले. एरवी बसस्थानकात मासिक पास घेण्यासाठी पाच-पाच तास रांगेत उभं राहावं लागायचं. त्यासाठी मुलींना कॉलेजही बुडवावं लागायचं. मात्र, आता उलट झालंय. मुली नगरपंचायत कार्यालयात आल्या की झटक्यात त्यांचा पास त्यांना मिळून जातोय. बसच्या तब्बल बारा खेपा आता सुरू झाल्यात.’
***
 
सन २0१५
हक्काच्या बसमध्ये लेकीबाळींची संख्या वाढतच चाललेली. या बसमुळं शेकडो मुलींचे लाखो रुपये वाचलेले. एका तरुणीला तिकीट काढून कॉलेजला जायची वेळ आली असती तर रोज जायचे दहा अन् यायचे दहा असे एकूण दरमहा पंचवीस दिवसांचे पाचशे रुपये लागले असते. याचा अर्थ वर्षाला सहा हजार रुपये. अशा सहाशे मुलींचा खर्च आला असता तब्बल छत्तीस लाख रुपये. अबब.. एवढे पैसे या सार्‍याजणींचे वाचले. या वाचलेल्या पैशांतून कुणी आपल्या मुलीच्या नावे बँकेत खातं उघडलं. छोट्या-मोठय़ा ठेवीही ठेवल्या.
या ‘ओन्ली गर्ल्स्’ बसमुळं केवळ आर्थिकच फायदा झाला, असं कोण म्हटलं? सर्वात महत्त्वाचा बदल मुलींच्या मानसिकतेत घडला. पाच तासांच्या कॉलेजसाठी सकाळी तीन अन् संध्याकाळी तीन असे सहा तास प्रवासात घालवणार्‍या मुलींचा प्रचंड वेळ वाचला. त्यातून अभ्यास, घरकाम अन् इतर छंदाकडे लक्ष देता आल्यानं घराघरांत ‘चिवचिवाट’ वाढला. घरच्या वातावरणातही फरक पडला. अनेक मुलींना परीक्षेत चांगले मार्कस् पडले. मेरीटही वाढलं. पाहता-पाहता ‘मलकापूरच्या पोरी लईऽऽ हुश्शार !’ असा डंकाही पसरू लागला.
‘संपूर्ण सिटी सोलर, एलक्ष्डी लाइट अन् चोवीस बाय सात पाणी अशा अनेक नवनवीन उपक्रमांमुळे मलकापुरात येऊन राहणार्‍यांची संख्या वाढतच चाललीय. या ठिकाणी भाड्यानं राहणार्‍या मुलींनाही निम्म्या सवलतीत औदार्य पास देण्यास आमच्या नगरपंचायतीनं दाखविलंय,’ मुख्याधिकारी राजेंद्र तेली यांच्या बोलण्यातून नवनवी माहिती उलगडत होती. प्रशासकीय अधिकारी अन् राजकीय पदाधिकारी या दोघांनी हातात हात घालून काम केलं तर काय चमत्कार घडू शकतो, हेही दिसून येत होतं.
***
 
सन २0१६
चौथं वर्ष. बसमधल्या मुलींचा चिवचिवाट वाढतच चाललेला. प्रत्येकाची आपापली हक्काची जागाही ठरलेली. ‘आर्थिक बचत, मानसिक स्थैर्य अन् शैक्षणिक प्रगती’ या तीन गोष्टी एखाद्या बसमधून कशा साधता येतात, याचं जिवंत उदाहरण मलकापूरनं दाखविलेलं. उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे सांगत  होते, ‘ही अनोखी बससेवा पाहण्यासाठी आजपावेतो अनेक शहरांमधील पदाधिकारी इथं येऊन गेलेत. अनेकांनी ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. आंध्र प्रदेशातील राजमुंडरी महानगरपालिकेनंही अश्शीच बससेवा सुरू केलीय. केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निर्णयावर विसंबून न राहता राज्य शासनानंच पुढाकार घेऊन सर्वत्र अशी योजना अंमलात आणणं अत्यंत गरजेचं बनलंय.’
या ‘ओन्ली गर्ल्स् बस’मुळं केवळ मुली अन् त्यांचे पालकच सुखावलेत असं नाही. याचा सर्वात जास्त फायदा पोलीस खात्यालाही झालाय. कर्‍हाडच्या पोलीस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर यांची माहिती आनंदार्श्‍चयाचा धक्का देणारी होती, ‘कर्‍हाड-मलकापूर परिसरात काही वर्षांपूर्वी छेडछाडीच्या गुन्ह्यांचं प्रमाण अधिक होतं. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही आकडेवाडी खूपच कमी झालीय. कॉलेजमधील मुली फाटकातून बसमध्ये अन् तेथून थेट घरासमोरच उतरत असल्यानं त्यांच्या सुरक्षेची चिंता करणं आता बहुतांश पालकांनी सोडून दिलंय.’
खरंच या पोरी भाग्यवान म्हणायच्या. कानात हेडफोन अन् हातात पुस्तक या पोझमध्ये निवांत ‘स्पेशल’ बसमधून प्रवास करणार्‍या मलकापूरच्या या लेकीबाळी कधीकधी गाण्यांच्या भेंड्याही खेळतात. आता इतर शहरांनीही मलकापूरच्या पावलावर पाऊल टाकत अशा ‘ओन्ली गर्ल्स् बस’ सुरू केल्या तर सुरू होईल गावागावांतही चिवचिवाट. तणावापासून दूर अशा मुक्त जगात स्वच्छंदीपणे जगणार्‍या चिमण्या लेकीबाळींचा चिवचिवाट.
 
( लेखक ‘लोकमत’च्या सातारा आवृत्तीचे प्रमुख आहेत.) 

Web Title: Mu Po Malkapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.