मु. पो. परभणी

By Admin | Published: March 1, 2017 01:43 PM2017-03-01T13:43:53+5:302017-03-01T13:43:53+5:30

गंगाखेडहून परभणीला आले. शाळेतल्या मुली माझ्या राहणीमानाला, बॅगला दप्तर, रिफीलला कांडी आणि इरेझरला खोडरबर म्हणण्याच्या सवयीला हसायच्या. तिथून सुरुवात झाली आणि स्थलांतरानं शहरी नजर शिकवली...

Mu Po Parbhani | मु. पो. परभणी

मु. पो. परभणी

googlenewsNext
>- वैष्णवी श्रीकांत तर्कसे


मी मुळची गंगाखेडची. आमचं गंगाखेड हा परभणी जिल्ह्यातला एक तालुका. मी लहानाची मोठी तिथेच झाले. भरपूर माणसांच्या मोठ्या कुटुंबात अतिशय लाडात, कौतुकात वाढले. सुरुवातीपासून अभ्यासात जेमतेमच होते. इयत्ता चौथीपर्यंत तर शाळासुद्धा कधी नियमित केली नाही. माझी मोठी बहीण माझ्या अगदीच विरु द्ध, अभ्यासात खूप हुशार. ती दहावीला चांगल्या मार्कांनी पास झाली. मग आईबाबांनी तिच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी गंगाखेड व्यतिरिक्त दुसरा पर्याय निवडण्याचा निर्णय घेतला आणि पुढील शिक्षणाकरिता परभणीला स्थायिक व्हायचं असं निश्चित झालं. बाबा वकिली व्यवसायात असल्यामुळे त्यांना गंगाखेड सोडून परभणीला येणं शक्य नव्हतं. मी गंगाखेडच्या श्री सरस्वती विद्यालयात शिकत होते. आणि त्यावेळी सहाव्या वर्गाची परीक्षा दिली होती. मलासुद्धा शिकायला परभणीला घेऊन यायचं हा ताईचाच अट्टाहास. तिने तो शेवटपर्यंत सोडला नाही. मग आई आम्हा दोघींना घेऊन परभणीला राहणार असं ठरलं. 
आम्ही गंगाखेडहून परभणीला स्थलांतर केलं आणि एका नव्या आयुष्याची खऱ्या अर्थाने सुरु वात झाली. परभणीला आल्यावर मला बाल विद्यामंदिर या नामांकित विद्यालयात सातव्या वर्गात प्रवेश मिळाला. सुरुवातीला शाळेत थोडा त्रास झाला. शाळेतल्या काही मुलींनी मला खूप लवकर त्यांच्यात सामावून घेतलं. पण इतर अनेक मुली माझ्या राहणीमानाला, माझ्या बॅगला दप्तर, रिफीलला कांडी आणि इरेझरला खोडरबर म्हणण्याच्या सवयीला हसायच्या. मला वाईट वाटायचं. पण आज मागे वळून पाहिल्यावर कळतं की तोसुद्धा एक अनुभवच होता. 
पुढे आठवी - नववीच्या वर्षांत शाळेमध्ये खूप रमत गेले. इतर अनेक गोष्टींमध्ये भाग घेऊ लागले, पण अभ्यासात डोळे दीपवून टाकणारं यश वगैरे फारसं कधी मिळालं नाही.
बाबांना सोडून परभणीला राहत असल्यामुळे त्यांची आठवण वारंवार यायची. ते आठवड्याच्या सुटीला परभणीला यायचे. ते दोन दिवस आमच्यासाठी जणू पर्वणीच असायची. दहावीच्या वर्षी खूप प्रचंड अभ्यास केला आणि माझ्याकडून मला स्वत:लाच जेमतेम पास होण्याची अपेक्षा असताना मी ७६ टक्के मिळविले. माझ्या स्वत:च्याच नजरेत माझी किंमत वाढली होती. यशाचा आलेख आता उंचावत न्यायचा असं मनाशी निश्चित केलं होतं. अकरावी-बारावीच्या वर्षांतसुद्धा खूप अभ्यास केला; पण अपेक्षित असं यश मिळू शकलं नाही. त्यामुळे थोडं नैराश्य आलं. आणि निराश झालेले सगळेच विद्यार्थी जसं बीएससी करण्याचा निर्णय घेतात तसाच मीपण घेतला. मायक्रोबायोलॉजी, बॉटनी, केमिस्ट्री असे तीन विषय निवडले. सुरुवातीपासूनच मायक्र ोबायोलॉजी विषयाबद्दल मनात आवड निर्माण होऊ लागली.
त्याच महाविद्यालयात मायक्रोबायोलॉजीचे प्राध्यापक डॉ. शिवा आयथल सर भेटले. माझ्या आयुष्यावर त्यांचा प्रचंड प्रभाव आहे. त्यांनीच मला खऱ्या अर्थाने जगायला शिकवलं. आयुष्यात फक्त चांगले मार्क्स मिळवणं म्हणजेच सगळं काही नव्हे हे त्यांनी मला पटवून दिलं. माझ्यात सुप्तावस्थेत असलेल्या लेखनाच्या गुणाला त्यांनी जागृत केलं आणि मला माझा लेखनाचा छंद जोपासायला भाग पाडलं. त्यांच्याचकडून मला लेखनाची प्रेरणा मिळत गेली. मला स्वत:चीच नव्याने ओळख झाली. सुरुवातीला माझं लिखाण मी माझ्यापुरतं आणि शिवा सरांपुरतंच मर्यादित ठेवलं होतं; पण मागच्या काही वर्षांपासून मी माझे लेख फेसबुकवर पोस्ट करते आणि तिथे माझ्या लिखाणाला मिळणारा प्रतिसाद पाहून माझं मन गहिवरून येतं. लेखनाबरोबरच मला शिवा सरांमुळे वाचनाची आवड निर्माण झाली आणि मी मराठीसोबतच इंग्लिश पुस्तकंसुद्धा वाचू लागले. वाचनामुळे आपले विचार प्रगल्भ होतात, याचा अनुभव मला स्वत:ला आला. 
आता मी मायक्र ोबायोलॉजी विषयात एमएससी करत आहे. येत्या दोन- चार महिन्यानंतर स्थलांतरणाची अजून एक संधी मिळणार आहे. गंगाखेड ते परभणी या स्थलांतराने मला आयुष्य जगायला शिकवलं. स्थलांतर करण्याचं धाडस केलंच नसतं तर इतकं सगळं शिकायचं राहून गेलं असतं.
या सगळ्यात परभणी शहराविषयी मनात प्रेम निर्माण झालं. या शहराने मायेने जवळ घेतलं म्हणूनच इथे राहणं शक्य झालं. म्हणूनच स्थलांतरणाचा हा निर्णय खरोखरच आयुष्य बदलणारा ठरला. 
- परभणी

अनाऊन्समेण्ट
छोटीशी गावं.
त्यापेक्षा मोठी पण छोटीच शहरं.
या शहरात राहणारी जिद्दी मुलं.
आपल्या स्वप्नांचा हात धरून,
संधीच्या शोधात
मोठ्या शहरांकडे धावतात.
काय देतात ही मोठी शहरं त्यांना,
कसं घडवतात-बिघडवतात?
आणि जगवतातही..??
-ते अनुभव शेअर करण्याचा
हा नवा कट्टा
तुम्ही केलाय असा प्रवास?
आपलं छोटंसं गाव, घर सोडून 
मोठ्या शहरात गेला आहात शिकायला?
मोठ्या शहरात? दुसऱ्या राज्यात? परदेशातही?
काय शिकवलं या स्थित्यंतरानं तुम्हाला?
काय अनुभव आले?
कडू-वाईट?
हरवणारे-जिंकवणारे?
त्या अनुभवांनी तुमची जगण्याची रीत 
बदलली का?
दृष्टिकोन बदलला का?
त्या शहरानं आपलं मानलं का तुम्हाला?
तुम्ही त्या शहराला?
की संपलंच नाही उपरेपण?
या साऱ्या अनुभवाविषयी लिहायचंय?
तर मग ही एक संधी!
लिहा तुमच्या स्थलांतराची गोष्ट.

१. लिहून पाठवणार असाल, तर
पाकिटावर ‘वन वे तिकीट’ असा उल्लेख करा.
सोबत तुमचा फोटो आणि पत्ता-फोननंबरही
जरूर लिहा...
पत्ता-  संयोजक, ' ऑक्सिजन', लोकमत भवन, बी-३, एम.आय.डी.सी, अंब, नाशिक - 422010
 
2. ई-मेल-  oxygen@lokmat.com

Web Title: Mu Po Parbhani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.