ब्रिटिश तरुणांनी मुंबईत येऊन केलेले हे कुठले ‘पार्कोर’ प्रताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 01:44 PM2018-12-06T13:44:37+5:302018-12-06T13:46:57+5:30

सेफ्टी बेल्ट न लावता गगनचुंबी इमारतींवर चढणं, कठडय़ांवरून हात मोकळे सोडून चालणं, पुशअप मारणं, झोपणं, लोंबकळणं आणि एका इमारतीवरून थेट शेजारच्या इमारतीवर उडी मारणं..

mumbai-british-parkour-group-caught-performing-deadly-stunt | ब्रिटिश तरुणांनी मुंबईत येऊन केलेले हे कुठले ‘पार्कोर’ प्रताप

ब्रिटिश तरुणांनी मुंबईत येऊन केलेले हे कुठले ‘पार्कोर’ प्रताप

Next
ठळक मुद्देअचाट साहसाचे दिवाने तरुण-तरुणीही जगभर आहेत.

मनीषा  म्हात्रे 

मुंबईत 14 मजली इमारतीच्या गच्चीवरून दुसर्‍या शेजारच्या इमारतीच्या गच्चीवर उडी मारणार्‍या तरुणांचा तो व्हिडीओ तुमच्यार्पयत पोहचला असणारच! - या व्हायरल व्हिडीओमागचं सत्य पोलिसांनी उजेडात आणलं, ते भयंकर आहे. 
ज्या तरुणांनी हा उद्योग केला ते तरुण भारतीय नसून ब्रिटिश होते. ब्रिटनमध्ये प्रसिद्ध असलेल्या स्टॉरोर या ‘पार्कोर ग्रुप’चे हे सदस्य. स्टॉरोर हा असाच एक ब्रिटनमधला ग्रुप. त्यांनी मुंबईत येऊन हा स्टंटबाजीचा प्रताप केला. त्यांना अचाट धाडस करून पहायचं होतं. सेफ्टी बेल्ट न लावता गगनचुंबी इमारतींवर चढणं, इमारतीच्या कठडय़ांवरून हात मोकळे सोडून चालत जाणं, तिथंच पुशअप मारणं, झोपणं, लोंबकळणं आणि एका इमारतीवरून थेट शेजारच्या इमारतीवर उडी मारणं. त्याला म्हणतात ‘रूफ टॉप जंप’.  करणार्‍यांचं सोडा, पाहणार्‍यांच्याही जिवाचा थरकाप उडवणारे हे स्टण्ट ही मुलं का करत होती तर त्यांना यासार्‍या अचाट साहसाचा व्हिडीओ शूट करून तो तमाम सोशल साइट्सवर अपलोड करायचा होता. तसा त्यांनी तो केलाही. त्यांच्या त्या व्हिडीओला हजारो व्ह्यजू मिळाले, तो व्हायरल झाला. गाजला. सुपरहीट झाला. त्याला लाखो लाइक्स मिळाले. एखाद्या सुपरमॅन, स्पाइडरमॅनसारखी कमाल आपल्याला जमली, असा आनंद आणि थ्रिल या मुलांनी कमावला. 
मुंबईत दादरच्या रहिवाशी इमारतींवर उडय़ा मारणारे हे तरुण काही एकदुकटे नव्हेत किंवा त्यांनीच हा वेडाचार केला असंही काही नाही. ब्रिटनसह जगभरात स्टोअर ग्रुप नावानं स्टंटबाजी करणारे अनेकजण आहेत. ते या ग्रुपचे सदस्यही आहेत. उंच इमारतींच्या गच्चींवरून उडय़ा मारत पुढं जाणं हा त्यांच्या लेखी साहसी खेळ आहे. या ग्रुपने ब्रिटनसह अन्य देशांमध्ये या जीवघेण्या प्रकाराची प्रात्यक्षिकं केली आहेत. समाजमाध्यमांवर या प्रात्य़क्षिकांचे व्हिडीओ सोशल मीडियात सर्रास उपलब्ध आहेत. आणि त्या अचाट साहसाचे दिवाने तरुण-तरुणीही जगभर आहेत. सोशल मीडियात या ग्रुपचे जगभरात सुमारे 30 लाख फॉलोअर्स आहेत. त्यातलेच काही स्टण्ट करणारे हे ब्रिटिश तरुण भारतात आले होते.
- टूरिस्ट व्हीसावर भारतात आलेला हा ग्रुप, तो मुंबईत का आला होता? तर वरळीच्या नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया इथं 2 डिसेंबर रोजी एक साहसी खेळांचं शिबिर होणार होतं. या साहसी खेळालाही प्रोत्साहन मिळावं म्हणून तिथं बोलायचं, माहिती द्यायची म्हणून ते आले होते. मात्र आपण काय करतोय हे अधिकाधिक लोकांर्पयत, मुंबईकर तरुणांर्पयत पोहचावं म्हणून त्यांनी हा स्टण्ट केला. ही मुलं उतरली होती, वरळीच्या एका हॉटेलमध्ये. गूगल मॅपच्या साहाय्यानं या तरुणांनी दादर, वांद्रेसह दक्षिण मुंबईतल्या काही उंच इमारतींची निवड आपल्या प्रात्यक्षिकांसाठी केली. 
दादरच्या भवानी शंकर मार्गावरील राधेशाम या आठ मजली इमारतीवर त्यांनी आधी प्रात्यक्षिक केलं. मात्न या इमारती कमी उंचीच्या होत्या. दोन इमारतींमधील अंतरही कमी तुलनेनं कमी होतं. मग त्यात त्यांना काही आव्हान वाटलं नाही.  त्यामुळे हा ग्रुप आंबेडकरनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या इमारतींच्या गच्चीवर पोहोचला. येथील इमारती 14 मजली आहेत. एका इमारतीच्या गच्चीवरून दुसर्‍या इमारतीच्या गच्चीवर उडी मारण्याचं प्रात्यक्षिक कॅमेर्‍यात कैद करून त्यांनी ते व्हिडीओ सोशल मीडियात टाकले. मात्र काही स्थानिक तरुणांनी हे असे प्रकार सुरू असल्याची माहिती दादर पोलिसांना दिली. त्यानंतर वरळीतील हॉटेलमधून या ग्रुपला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं. व्हीसाबाबत चौकशी करून दादर पोलिसांनी विशेष शाखेला ही बाब कळवली. व्हीसाच्या अटी भंग केल्यानं त्यांना तातडीनं मायदेशी पाठवण्यात आलं. 

पार्कोर 

मानवी शरीराच्या मर्यादा ताणून त्यातून थ्रिल शोधण्याचा प्रयत्न आणि त्यातले धोके

पार्कोर म्हणजे मिलिटरी ट्रेनिंगमध्ये शिकवल्या जाणार्‍या साहसी शारीरिक हालचालींचा सराव करून उंच इमारतींवरून उडय़ा मारणे, कठडय़ावरून चालणे, कोणतीही साधने न वापरता केवळ शारीरिक कसरतींनी सरळ उभ्या भिंती चढून जाणे आणि हे सारे मानवी हालचालींमध्ये शक्य असलेले; पण सरावाअभावी एरवी न अनुभवता अलेले मुक्त स्वातंत्र्य अनुभवणे.
पार्कोर हा फ्रेंच शब्द आहे. फ्रान्समधला रेमण्ड बेले हा साहसी खेळाडू या प्रकाराचा उदगाता मानला जातो. रेमण्ड आणि पुढे त्याचा मुलगा डेव्हीड यांनी या ‘पार्कोर’ प्रकाराची सुरुवात केली. एखाद्या वास्तूच्या संपूर्ण अनुभवासाठी तिच्या खालून, वरून, मधून, भोवतीने जाऊन पाहाण्याच्या रोमांचक अनुभवासाठी हा (जीवघेणा) खेळ  खेळतात. त्यात वेगाने धावणे, उंच उडी घेणे, उंचावरून खाली झोकून देणे, भिंती अगर कठडे चढणे, एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी थेट उडी घेऊन जाणे, जमिनीवरून सरपटणे अशा अनेक प्रकारांचा यात समावेश असतो.
युरोपात आणि आता अमेरिकेतही या पार्कोरचा रीतसर प्रशिक्षणाने सराव करणारे अनेक तरुण ग्रुप्स तयार झाले आहेत.
या प्रकाराचा बोलबाला सुरू झाला तो गेल्या दहा-बारा वर्षात. अनेक सिनेमे आणि डॉक्युमेटरीजमधून हे पार्कोर प्रकरण रोमांचक धाडसाच्या अनुभवासाठी दाखवलं गेलं.
पण केवळ त्या थ्रिलच्या अनुभवासाठी अप्रशिक्षित मुलंही या पार्कोरच्या वाटेला जातील, या शंकेने अनेक देशातल्या सुरक्षा व्यवस्थांनी, अग्निरोधक यंत्रणांनी सार्वजनिक ठिकाणी हे असले स्टण्ट करायला मनाई केलेली आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये यावर बंदी घालण्याचीही चर्चा सुरू झाली आहे.
इंटरनॅशनल जिम्नॅस्टिक फेडरेशनने 2017 साली पार्कोरला मान्यता दिली, तेव्हाही क्रीडा जगतातून मोठा विरोध झालाच होता. आता 2020 मध्ये या पार्कोरच्या ‘विश्वविजेतेपदा’साठीच्या स्पर्धा होऊ घातल्या आहेत. त्या दरम्यान पुन्हा एकदा हा विषय चर्चेला येईल, हे नक्की!
.......

Web Title: mumbai-british-parkour-group-caught-performing-deadly-stunt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.