व्हाया मुंबई आयआयटी खरगपूर
By admin | Published: June 22, 2017 10:00 AM2017-06-22T10:00:31+5:302017-06-22T10:00:31+5:30
दहावीत असताना आयुष्यात पुढे काहीतरी मोठं करायचं एवढाच विचार मनात होता. वाशीम जिल्ह्यातील शिक्षणात अग्रेसर असणाऱ्या कारंजा (लाड) तालुक्यात लहानपणापासून शिकलो होतो
- धीरज केशवराव चौधरी
दहावीत असताना आयुष्यात पुढे काहीतरी मोठं करायचं एवढाच विचार मनात होता. वाशीम जिल्ह्यातील शिक्षणात अग्रेसर असणाऱ्या कारंजा (लाड) तालुक्यात लहानपणापासून शिकलो होतो म्हणून आपला बेस पक्का आहे, अशी खात्री होती. आपल्या भागातल्या फारच कमी लोकांनी यश मिळवले म्हणून ‘आयआयटी’ची तयारी करण्याचा आव्हानात्मक निर्णय घेतला. घरून असलेल्या पूर्ण स्वातंत्र्यामुळे पुढचा प्रवास स्वत:च ठरवायचा होता. आणि ठरलं, मुंबई गाठायची!
दहावीची परीक्षा संपताच मुंबईच्या एका नवीन क्लासने सहा दिवसांचा कॅम्प घेतला होता आणि आठवीत एनटीएसईमध्ये मिळवलेल्या यशामुळे अकरावी, बारावीची फी पण माफ केली होती. पहिल्यांदाच मी मुंबईला एकटा गेलो. स्वत:च्या सुरक्षेसाठी आणि आपला उद्देश लक्षात घेऊन काही नियम मनाशी पक्के बांधून घर सोडलं. स्वप्नांच्या मायानगरीत असं काय विशेष वारं वाहतं हे अनुभवायला माझा प्रवास सुरू झाला.
अॅडमिशन पक्की होईपर्यंत क्लासवाल्यांनी अनेक झुठे वादे केले. पण कोचिंग सोडून राहण्या-खाण्याची व्यवस्था, जाणं-येणं, हॉस्टेल, केअर-टेकर अशा गोष्टींची सोय दूरदूरपर्यंत नव्हती. सुरु वातीच्या काळात १-२ तास प्रवासातच जायचे. सगळं ठरवून, कधीतरी, संपूर्ण कुटुंबासोबत प्रवास करणाऱ्या मला आता रोज धावत, ठरलेल्या वेळेची लोकल पकडावी लागायची. सोबत राहायला माझ्याचसारखी अजून ५-७ मुलं होती. यश मिळवण्याची जिद्द मनात होतीच. किराणा, स्वयंपाक, घरभाडे, कधी अचानक रूम शिफ्ट करणं असं सगळं आम्हालाच बघावं लागत होतं. घरी या सगळ्या गोष्टी सांगून फायदा नव्हता. आपला निर्णय आपल्यालाच सार्थ ठरवायचा होता.
दिवसागणिक हवेतली जादू तर नाही पण लोकांची मेहनत मात्र दिसायला लागली. इथं कॉम्पिटिशन अफाट होती.
बेस पक्का असल्यामुळे मराठी आणि इंग्रजीविषयी न्यूनगंड नव्हता. हिंदीची काळजी नव्हती. ते खरंच आहे की, प्रवास जेवढा खडतर असतो तेवढी यशाची मजा पण जास्त येते. नवनवीन लोकं भेटत होती. कॉलेज, मित्र-मैत्रिणी, मज्जा, खेळ या सगळ्यांचा समतोल साधूनही अभ्यास करता येतो, तोही अधिक चांगल्या पद्धतीने हे कळलं. एक सर्वसामान्य शेड्युलच आपण फॉलो केलं पाहिजे हा समज दूर होऊन सेल्फ असेसमेंट करून आपल्यानुसार आपली कार्यपद्धती ठरवायची हे लक्षात आलं. वाईट स्वप्नातही नाही दिसणार एवढी गरिबी बघितली मुंबईच्या रस्त्यांवर, तर दुसरीकडे नजरेतही नाही मावणार एवढी श्रीमंतीपण पाहिली!
आपल्या स्वप्नांचे पारडे आपल्या समस्यांपेक्षा जड करून ठेवले की मार्ग आपोआपच निघतात हे मुंबईच्या धावत्या आयुष्याने शिकवलं. पहिल्यांदाच भारताच्या विविध भागांतून आलेल्या लोकांशी माझा संपर्क, संवाद झाला. आपला कम्फर्ट झोन सोडून नवीन प्रांतात, नवीन लोकांत, भाषा येत नसताना, धड इंग्रजीही नाही आणि धड हिंदीही नाही, एकटे-दुकटे येऊन छोटी छोटी (समाजासाठी) कामं करणारी अनेक मंडळी मी दुरूनच पाहत होतो. अभ्यासासाठी एक चांगला मित्रांचा ग्रुप बनला. त्या कन्स्ट्रक्टिव्ह पद्धतीच्या अभ्यासाने, मौजेने, स्पर्धेने घरापासून एवढे दूर राहूनही जास्तीत जास्त काळासाठी मन रमलेलं असायचं. तरीही संध्याकाळी घरची आठवण यायचीच.
एफबी, व्हॉट्सअॅप डिस्ट्रॅक्शन नको होतं म्हणून सोबत कुणाची नव्हतीच, इतरही कुठली मनोरंजनाची साधनं नव्हती.
मुंबईत अपॉर्च्युनिटी तो है बॉस म्हणत स्ट्रगललाच आपला ‘आॅक्सिजन’ बनवलेल्या लोकांची फौजच दिसली मला ! ते चित्र नेहमीचंच माझ्या मनात कोरलेलं राहील. तरीही त्या धकाधकीच्या मुंबईत अजून न राहण्याचा निर्णय मी माझ्या दोन वर्षाच्या वास्तव्यानंतर घेतला. म्हणून आज भारतातल्या सगळ्यात जुन्या व मोठ्या आयआयटी खरगपूर येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंग करायला गेलो. आज तिथं इंजिनिअरिंगच्या चौथ्या वर्षात पदार्पण करतोय.
इथून निघाल्यावर पुन्हा मुंबईने बोलावले तर नक्की जाईन. नवीन स्वप्नांची नवीन कहाणी पूर्ण करायला !