दिल मेरा मुफ्त का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 08:34 AM2018-03-29T08:34:00+5:302018-03-29T08:34:00+5:30

दिल का कमरा खाली हुआ और दुसरे मिनिटपे किरायदार दरवाजेपे खडा! मुलीचा ब्रेकअप काय झाला, मित्र म्हणवणाऱ्यांनी रंगच पालटला..

Is my heart free? | दिल मेरा मुफ्त का?

दिल मेरा मुफ्त का?

Next


- श्रुती मधुदीप

..आणि मी पाठम्होरी फिरले. तुझ्या डोळ्यात पहायची माझी हिम्मत होत नव्हती. पाह्यलं असतं तर मी पुन्हा पुन्हा अडकले असते तुझ्या डोळ्यात. सोडवलंच नसतं मला. इतका धीर मला कुठून मिळाला होता कोण जाणे; पण तुझ्या हातातले माझे हात सोडवून मी निघाले. आता सगळ्या सवयीतून मी तुला बाहेर कशी काढणार होते, कोण जाणे. इतकं हमसून हमसून आजारी पडेस्तोवर मला कधीच रडू आलं नाही. पण, तो तू होतास म्हणून ! पण तू म्हणजे नेमका कोण, मला माहीत नाही. मी तेच जाणून घ्यायचा प्रयत्न करतेय. इतक्यात ‘शुभम इज कॉलिंग’ असं फोनवर उमटलं. मला नव्हता घ्यायचा फोन पण कुणीतरी आधाराला हवं, काहीही न बोलता असं वाटलं म्हणून मी फोन उचलला.
शुभम : हॅलो..
मी : हं.
शुभम : अगं शलाका! काय ऐकतोय मी हे?
मी : काय?
शुभम : यू ब्रोकअप? आय मीन, तुम्ही सोबत नाही आहात आता?
मी : हं.
शुभम : हं काय? असं कसं होऊ शकतं शलाका? काय कारण, काय आहे नेमकं? व्हॉट इज द प्रॉब्लेम?
मी : काहीच नाही.
शुभम : अरे ! सांग ना! मी काही मदत करू शकतो का? मी बोलू का त्याच्याशी?
मी : शुभम, आपण नंतर बोलू या का?
शुभम : शलाका, अगं पण ऐक तरी..
मी : हं. ठेवते. बोलू. बाय.
मला बोलावंसंच वाटलं नाही शुभमशी. म्हणजे खरं तर बोलावंसं वाटलं; पण हा विषय सोडून दुसरं काहीतरी बोलावं असं वाटलं. मला या विषयातून बाहेर पडण्यासाठी कुणीतरी अनोळखी मित्र किंवा मैत्रिणीने यावं आणि माझ्या भूतकाळाविषयी तिला काहीच माहीत नसावं असं वाटलं. नवा वर्तमान क्रि एट करावा असं वाटलं. या सगळ्या विचारात मला घरी कधी एकदा पोहोचेन असं झालं होतं. अर्थात, घरी पोहोचल्यावरही मला घराबहेर पडून काहीतरी करावं वाटेल. आहे तिथे मन स्थिरावणार नाही, हे कळत होतं मला. पण. पुन्हा शुभमचा कॉल. म्हणाला, तू कुठं आहेस आत्ता? मी तुला भेटायला येतो. पण त्यालाही सांगून टाकलं, एकटं राहू दे मला. गरज वाटली तर सांगेन न तुला.
शुभम आम्हा दोघांमधला म्युच्युअल फ्रेण्ड. आम्हा दोघांचाही जवळचा मित्र! आज त्याने मला फोन करणं, हे स्वाभाविकच होतं. पण माझ्यासाठी तो आत्ता धोकादायक होता. त्याने आमची पुन्हा भेट घालून दिली असती कदाचित आणि मग, मग मी वहावत गेले असते. मला पुन्हा जोडणं नको आहे, हे माझ्या मनात क्लीअर होतं. कारण मी आमच्या नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय उगाच नव्हता घेतला. त्याला काही ठोस कारणं होती.
मी घरी पोहोचले. बेल दाबायच्यावेळी लक्षात आलं, आपण कसे दिसतोय ते आधी पहायला हवं. नाहीतर आईला संशय यायचा. तिने काही विचारलं तर आपण गोंधळून जाऊ म्हणून मी पार्किंगमध्ये जाऊन गाडीच्या आरशात स्वत:ला पाहिलं. डोळे पुसले. बाटलीतलं पाणी चेहऱ्यावर मारलं आणि घराची बेल वाजवून आईशी काहीही न बोलता मी माझ्या रूममध्ये जाऊन बसले. इतक्यात मेसेंजर टोन वाजली. पाहिलं तर शुभम !
Shubham : Shala, don’t worry ! mee aahe na sobat. 
Me : thanks, Shubham.. 
Shubham : kiti sundar aahes aga tu ! kititari mula tujhyavar fidaa aahet. Tulaa kahich tension nahi. 

शुभमने असा का मेसेज केला मला कळलंच नाही. माझ्या सुंदर असण्याचा कुठं प्रश्न होता आत्ता? मला काय रिप्लाय द्यावा यावर ते कळलंच नाही. तेवढ्यात त्याने मेसेज केला..
Shubham : tu na ugaach aswasth hou nakos. Malaa khup tras hoto tu ashi disalis ki. Itakya sundar muline as itak radaav kaa? itak aswasth vhav ka? tu mala bhet ekada, tujh sagal dukhh ghalavoon takato.  
असं म्हणून त्याने ‘पप्पी’ची स्माईली टाकली. मला जरा कसंतरीच होऊ लागलं. म्हणजे आज जे शुभम बोलत होता, त्याला वेगळं टेक्शचर आहे असं मला जाणवू लागलं. एक वेगळीच अस्वस्थता जाणवू लागली.
Shubham : ek chhaan hug aani puppi tula! sagal dukkh chhumantar! 
शुभमचा हा मेसेज वाचला आणि मी शॉकच झाले. खरं तर शुभम त्याचा अगदी चांगला मित्र. मलाही तो संवेदनशील भासायचा. कधेमधे फोन करून, कॉलेजमध्ये आवर्जून बाजूला घेऊन आमची चौकशी करायचा. म्हणून तो मला जवळचा वाटायचा. असं वाटायचं की याला आपली काळजी आहे; पण आज हा असं बोलेल असं मनातदेखील आलं नव्हतं. प्रश्नचिन्हांनी माझा जीव व्याकूळ झाला होता. जणू संपत चालले होते मी. स्वत:चं घर कोलमडत असताना दुसºयाला कसं छत द्यावं ? स्वत:च मोडक्या-तोडक्या मन:स्थितीत असताना दुसºयाला विश्वासाचा हात कसा द्यावा? कसं पाहावं प्रेमभरल्या डोळ्याने विश्वासाची एकही तिरीपही माझ्यााकडे नसताना? भांबावले होते मी. दिल का कमरा खाली हुआ और दुसरे मिनिटपे किरायदार दरवाजेपे खडा ! हे माझं शरीर, मन बुक करून घ्यायला शुभम रांगेत पहिल्या नंबरबर थांबला होता. क्या करे ! कैसे बताये यह दिल मेरा मुफ्त मे नही है, और नाही किराये पे. मित्राच्या नात्यापेक्षा मुलीचं किंवा मुलाचं शरीर-मन बुक करून घेण्यासाठी हार्मोन्स वरचढ ठरत होते. शुभम मला एक पप्पी आणि मिठी मारणार होता माझं दु:ख संपवून टाकण्यासाठी आणि मी आॅनलाइन राहून फक्त त्याच्या मेसेजेसना सीन येऊ देत होते!

dancershrutu@gmail.com 

Web Title: Is my heart free?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.