माय एनआरसी नंबर इज ! आसाममधल्या मियां पोएट्रीची गोष्ट

By meghana.dhoke | Published: January 23, 2020 07:21 AM2020-01-23T07:21:00+5:302020-01-23T07:25:03+5:30

आसाममधल्या काही तरुण मुलांनी आपल्याच बोलीभाषेत जन्माला घातलेल्या विद्रोही कवितांची गोष्ट र्‍ मियां पोएट्री!

My NRC number is! Mian Poetry in Assam | माय एनआरसी नंबर इज ! आसाममधल्या मियां पोएट्रीची गोष्ट

माय एनआरसी नंबर इज ! आसाममधल्या मियां पोएट्रीची गोष्ट

Next
ठळक मुद्देजेमतेम पंचविशीच्या आतबाहेरचे हे तरुण, त्यांच्या वेदनांना त्यांनी शब्द दिलेत.

- मेघना ढोके

आसाममध्ये एनआरसी प्रक्रिया सुरू होती, तेव्हाची म्हणजे साधारण 2016 सालची ही गोष्ट..
सव्वातीन कोटी आसामी माणसं तेव्हा आपले कागद घेऊन आपण भारतीय नागरिक आहोत हे सिद्ध करण्यासाठी रांगेत उभी होती. त्यात सर्व जातीधर्माचे लोक होते. त्याच काळात म्हणजे 2016 साली उदयास आलेली ही एक कवितेची गोष्ट आहे. जी 2019 मावळता मावळता अत्यंत स्फोटक बनली, तिचं नाव आहे मियां पोएट्री. विविध संघटनांची, त्यात धार्मिक, राजकीय आणि भाषिक, विद्यार्थी संघटनाही आल्याच, अनेक संघटनांचे तरुण लोकांना फॉर्म भरण्यापासून कागदपत्रं भरून देण्यार्पयत, ते डेटा शोधण्यासाठी मदत करण्यापासून ते नाव एनआरसीच्या ड्राफ्टमध्ये आलं नसेल तर काय करता येईल इथर्पयतची मदत करत होते. साधारण सगळ्यांचंच एकमेकांशी वेदनेचं नातं होतं.
त्या वेदनेतून काही तरुणांच्या कवितांनी जन्म घेतला. तीच ही मियां पोएट्री.  डॉ. हाफीज अहमद हे आसाममधल्या चर चोपडी साहित्य परिषदेचे अध्यक्ष आणि आसामी भाषेचे जाणकार मानले जातात. त्यांनी ‘मियां’ वळणाची ( मियां नावाची बोलीभाषा) एक कविता लिहिली. त्याचा साधारण भावानुवाद असा होतो की, 
‘लिहून घ्या, मी मियां आहे, 
माझा एनआरसी नंबर 
2000543 आहे.’
 या कवितेचा इंग्रजी अनुवाद बराच व्हायरल झाला. दिल्लीसह देशभर या मियां पोएट्रीची दखल घेतली गेली. आसाममध्ये मात्र मोठा उद्रेक झाला. आसामी भाषेतल्या अनेक जाणकारांनी या कवितेवर आक्षेप घेतला. अनेक राजकीय संघटनांनीच नाही तर उदारमतवादी विचारवंतांनीही त्याविषयी आक्षेप घेतला आणि आपल्या वेदनांचे हकनाक भांडवल करत मियां पोएट्रीच्या नावाखाली आसामला बदनाम करण्याचे काम सुरू आहे म्हणून मोठा वादही झाला. 
आसामी माणसं, भाषा आणि आसामी जगण्यातलं सोशीक सहिष्णूपणच मियां पोएट्री मोडीत काढते आहे असा आरोप झाला. काही कवींवर तीन ठिकाणी एफआयआर दाखल करण्यात आला. 


हे सारं एकीकडे सुरू असताना दुसरीकडे मात्र ‘मियां पोएट्री’ करणार्‍या कवींचं प्रमाण वाढत होतं. त्यांच्या कविता वाचणार्‍याला जहाल वाटत होत्या. एकीकडे देशभरात ‘विद्रोही’ कविता म्हणून त्यांचं कौतुक झालं दुसरीकडे आसाममध्ये मात्र आसामी हिंदू-मुस्लीम, डावे-उजवे, जाणकार यासार्‍यांनी त्या कवितांवर आक्षेप घेत त्यांच्यावर आसामी जगण्यावर शिंतोडे उडवण्याचे आरोप केले.
यासार्‍या वादात हा प्रश्न मात्र महत्त्वाचा आहे की, मियां पोएट्री करणारे हे कवी नेमके आहेत कोण?
त्याचं उत्तर आहे की, जेमतेम शिकलेले, नोकरी करणारे, कुठं स्वयंसेवी संस्थात काम करणारे, जेमतेमच इंग्रजी बोलणारे असे अनेक ‘सामान्य’ तरुण या नव्या अभिव्यक्तीच्या फॉर्ममुळे कवी झाले.
बंगाली मुस्लीम असलेले हे तरुण. मात्र ते घरात ना बंगाली बोलतात ना आसामी. बंगाली-आसामीच्या मिश्रणातून जन्माला आलेली त्यांची बोलीभाषा आहे. ते घरात ज्या भाषेत बोलतात त्याच भाषेत त्यांनी कविता लिहायला सुरुवात केली. त्या कवितेच्या मुळाशी होती वेदना. आपल्याला ‘मियां’ म्हणून हिणवलं जातं याची वेदना. ‘मियां’ या शब्दामागे आसाममध्ये एक ठसठस आहे, ती म्हणजे ज्याला मियां म्हटलं जातं तो बांग्लादेशी घुसखोर. अप्रत्यक्षपणे तुम्ही इथले नाहीत ‘बाहेरचे’ आहात म्हणून सतत संशय घेतला जातो, आपल्याला दुजाभावाची वागणूक मिळते असं या तरुणांना वाटतं.
या कवितेच्या माध्यमातून मग बंडखोरीच करत त्यांनी ठरवलं की, समाज मियां म्हणून आमची हेटाळणी करत असेल तर आम्हाला मान्य आहे की आम्ही ‘मियां’ आहोत. आहोत तर आहोत; पण आम्ही इथलेच आहोत. ज्याला आसामीत चर म्हणतात म्हणजे ब्रrापुत्रेच्या पुरात वाहून जाणारी जागा त्या भागातले हे बहुसंख्य तरुण. गाव पुरात वाहून गेलं की अनेकांना स्थलांतरच करावं लागतं. मात्र ते त्यांच्या गावात होते तोवर न जाणवणारी वेदना मोठय़ा शहरांत त्यांना गाठते आणि तिथं होणार्‍या दुजाभावाविषयी ते आपल्या कवितांत लिहीत जातात.
कार्यकर्ते आणि एनआरसी अ‍ॅक्टिव्हिस्ट अब्दुल कलाम आझाद सांगतात, ‘कुणी मियां म्हणून टोमणा मारला की आधी आम्ही चिडायचो. आता मान्य करतोय की, आहोत आम्ही मियां. पण आम्ही परके नाही, एकेकाळी दलित म्हणून लोकांना हिणवलं, कृष्णवर्णीय म्हणून हिणवलं त्यातून जसा दलित आणि कृष्णवर्णीय साहित्याचा जन्म झाला त्याच्याशीच आमची कविता नातं सांगते. आमचं याच मातीशी असलेलं नातं सांगते; पण आमच्या भाषेत. आम्ही माणसंच नाहीत असं म्हणून आम्हाला व्यवस्था आणि समाज हिणवत असेल तर आम्ही तरी आमची ‘ओळख’ अभिमानानं सांगितली पाहिजे!’
तोच अभिमान आता या कवितेत दिसतो आहे. आणि ती कविता करणारे तरुण कधीच कवी नव्हते, ना त्यांना लेखनाचं काही अंग होतं. मात्र आपल्या आत खदखदत असलेला राग त्यांनी कवितेतून मांडला. 
काझी नील हा 26 वर्षाचा तरुण तेजपूर विद्यापीठात शिकतो. त्याच्या कविता या काळात फार गाजल्या. तेच शहाजहाँनचं. तो एनआरसीसाठी मदत करणार्‍या स्वयंसेवी संस्थेत काम करत होता. त्यानं कविता कधी लिहिणं तर सोडा वाचलीही नव्हती. आता त्याच्या कविता गाजत आहेत.
जेमतेम पंचविशीच्या आतबाहेरचे हे तरुण, त्यांच्या वेदनांना त्यांनी शब्द दिलेत.
त्या शब्दांविषयी आक्षेप आहेत; पण त्यामागची वेदना मात्र खोटी नाही..

(लेखिका  लोकमत  वृत्तपत्र  समूहात  मुख्य  उपसंपादक  असून  त्यांनी  अरुण  साधू  स्मृती  फेलोशिप  अंतर्गत  आसाम  आणि  एन आरसी  प्रक्रियेचा  अभ्यास  केला  आहे .)

meghana.dhoke@lokmat.com

Web Title: My NRC number is! Mian Poetry in Assam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.