50 वर्षांपूर्वी हरवलेल्या विमानाचं बर्फाळ पोटातलं रहस्य उलगडेल?
By अोंकार करंबेळकर | Published: August 2, 2018 03:28 PM2018-08-02T15:28:52+5:302018-08-02T15:29:33+5:30
हिमालय स्वच्छता मोहिमेला निघालेली एक तुकडी. त्यांना स्पिती व्हॅलीत विमानाचे अवशेष सापडले आणि एक मृतदेहही. पन्नास वर्षापूर्वी अपघात झालेल्या विमानाचे हे तुकडे असे अचानक समोर आले. आणि....
-ओंकार करंबेळकर
50 वर्षे झाली त्या घटनेला. 7 फेब्रुवारी 1968 रोजी भारतीय हवाई दलाचं रशियन बनावटीचं एन्टोनोव्ह 12 विमान झेपावलं. 102 लोकं घेऊन विमान नेहमीच्या वेगानं लेहच्या दिशेनं जात होतं. रोहतांग पासजवळ जाताच उड्डाणासाठी हवामान अतिशय खराब होत चालल्याचं वैमानिकाच्या लक्षात आलं. त्यानं तत्काळ चंदिगढशी संपर्क करून आम्ही माघारी येत आहोत असा निरोपही दिला; पण थोडय़ाच वेळात या विमानाचा संपर्क तुटला आणि पुढे त्यांचं काय झालं याची बराच काळ माहिती कोणालाच समजली नाही.
2003 साली मनालीच्या काही गिर्यारोहकांना या भागात बळीराम नावाच्या एका जवानाचा मृतदेह सापडला. त्यानंतर या हरवलेल्या विमानाचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला. 98 लोक आणि चार कर्मचार्यांना घेऊन जाणार्या लोकांच्या विमानाचं पुढं काय झालं हे शोधायला पुनरुत्थान 3 नावाने एक शोधमोहीमसुद्धा सुरू करण्यात आली. पण हिमालयाच्या बर्फाळ पर्वतरांगांमध्ये या विमानाचे अवशेष आणि मृतदेह शोधणे अगदीच कठीण काम होतं. त्यामुळेच 2009 साली पुनरुत्थान मोहीम थांबविण्यात आली. तरीही 2017 र्पयत 5 मृतदेहांचा शोध लागला. हा अपघात म्हणजे एखाद्या सिनेमातली कथा किंवा रहस्य वाटावे अशी एक कथाच बनून गेला. या भागात कोठेतरी विमान पडलं असावं एवढंच कळलं आणि हा विषय मागे पडला.
पण नुकतंच, जुलै महिन्यामध्ये या कथेला आणखी एक अनपेक्षित वळण मिळालं आहे. इंडियन माउंटेनिअरिंग फेडरेशनच्या गिर्यारोहकांनी यंदाच्या वर्षी हिमालयामध्ये स्वच्छतेचं काम घेतलं होतं. स्पितीमध्ये स्वच्छ भारत मोहीम सुरू असताना अचानक एका मृतदेहाचा हात काही गिर्यारोहकांना दिसला. हा मृतदेह आणि स्वच्छता मोहिमेत सापडलेल्या काही वस्तू 50 वर्षापूर्वी कोसळलेल्या विमानाच्या आहेत हे लक्षात यायला फार वेळ गेला नाही. डेहराडूनमध्ये राहणारे राजीव रावत या मोहिमेचं संचलन करत होते. नेहरू इन्स्टिटय़ूट माउंटेनिअरिंगमध्ये ते गेली अनेक वर्षे प्रशिक्षक म्हणून काम करत आहेत. लेह, स्पिती, शिमला आणि मंडी अशा चार ठिकाणी हिमालयातील स्वच्छतेचं काम त्यांनी स्वीकारलं आहे. स्पितीमधला त्यांचा अनुभव मात्र एकदम रोमांचकारक आहे.
आपल्या या मोहिमेबद्दल ते म्हणाले, आम्ही खरं तर जेथे कचरा उचलतो त्या भागाचा थोडा अभ्यास करतो. त्याबद्दल वाचलेलं असतं किंवा गूगलवर तरी थोडीफार माहिती मिळवलेली असते. या परिसरात कुठंतरी विमान कोसळलं होतं हे आम्हाला माहिती होतं. पण असं काही समोर येईल वाटलं नव्हतं. गेल्या अनेक वर्षामध्ये हिमालयाची अवस्था प्रदूषण आणि कचर्यामुळे फारच वाईट झाली आहे. इतक्या उंचीवर स्वच्छता मोहीम करतो तेव्हा आम्हाला प्लॅस्टिकच्या पिशव्या, बाटल्यांचा खच सापडतो. हे सगळं काळजीत टाकणारं असतं. यावर्षी बर्फ अगदीच कमी पडला. नाहीच पडला असं म्हणावं लागले इतका कमी पडला. त्यामुळे बर्फाच्या आच्छादनाखाली दबलेल्या वस्तू, कचरा बाहेर आला असावा, असा माझा अंदाज आहे. त्यामुळेच कचर्याबरोबर या अपघातग्रस्त विमानाचे सुटे भागही आमच्यासमोर आले.
राजीव रावत यांनी सुरू केलेल्या स्वच्छता मोहिमेतून अनपेक्षित वस्तू सापडल्या असल्या तरी त्याला एक भावनिक कंगोराही आहे. या मृतदेहाबद्दल अजून व्यवस्थित तपास झालेला नाही. हा मृतदेह कोणाचा आहे, पन्नास वर्षानंतर त्याची ओळख कशी पटवायची, हे प्रश्न समोर आहेत. एअरफोर्सच्या विमानात काही तरुण, विवाह न झालेले जवानही होते. त्या सर्वाच्या नातेवाइकांनी गेली पन्नास वर्षे केवळ आपल्याला कधीतरी त्यांच्याबद्दल माहिती मिळेल म्हणून अश्रू रोखून धरले आहेत. गेली 50 वर्षे त्यांच्यासाठी शोध सुरू आहे. इतरांसाठी ती एक मोहीम असली तरी त्या 104 कुटुंबांसाठी तो अत्यंत भावनिक मुद्दा आहे. रावत यांना त्याचा तत्काळ प्रत्यय आला. हा मृतदेह कोणाचा आहे समजण्याआधीच एका वर्तमानपत्राने पायलटचा मृतदेह सापडला अशी बातमी प्रसिद्ध केली. त्या अपघातग्रस्त विमानाच्या पायलटच्या मुलाला हे समजताच त्याने तत्काळ अमेरिकेतून संपर्क करून रावत यांनी आपल्या वृद्ध आईला दिल्लीमध्ये भेटावे, अशी विनंती केली. डीएनए चाचणीसाठीही तो तत्काळ तयार झाला. तुम्ही रोज माझ्या संपर्कात राहा अशीही विनंती त्यानं केली. पण रावत म्हणतात, याबाबतीत आपण सैन्याला मदत करण्यापलीकडे काहीच करू शकत नाही. पुढील सर्व तपास आणि नियमबद्ध प्रवास सरकार व सैन्यच करेल. आपल्या जवळच्या माणसांना असं एकाएकी गमावणं धक्कादायक असतं, ही कुटुंबे इतक्या वर्षानंतरही त्या धक्क्यातून सावरलेली नाहीत.
इतिहासात काही प्रकरणं अनुत्तरित म्हणून बंद केली जातात किंवा त्यावर तपास करणं शक्य नसल्यामुळे ती बंदही केली जातात. पण कालांतरानं कधीतरी अचानक त्यावरचं रहस्य तयार करणारं आवरणं गळून पडतात व असे शोध लागतात. राजीव रावत यांना मोहिमेत लागलेला हा शोध थक्क करायला लावणारा आहे आणि तितकाच पुढे काय, असा प्रश्न निर्माण करणाराही आहे. हिमालयानं आपल्या बर्फाळ पोटात किती रहस्य दडवून ठेवली आहेत, कुणास ठाऊक!