चहाला 'अमृततुल्य' उपाधी मिळण्यामागची 'अपौराणिक' कहाणी; (कड्डक) चाय पे (लाईट) चर्चा

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: December 15, 2020 05:28 PM2020-12-15T17:28:56+5:302020-12-15T17:29:15+5:30

जागतिक चहा दिनानिमीत्त थोडासा चहाटळपणा. मंडळी, जरा हलकेच घ्या!

The 'mythical' story behind the title 'tea'; (Kaddak) Tea Pay (Light) Discussion | चहाला 'अमृततुल्य' उपाधी मिळण्यामागची 'अपौराणिक' कहाणी; (कड्डक) चाय पे (लाईट) चर्चा

चहाला 'अमृततुल्य' उपाधी मिळण्यामागची 'अपौराणिक' कहाणी; (कड्डक) चाय पे (लाईट) चर्चा

Next

ज्योत्स्ना गाडगीळ

अमृततुल्य कॉफी किंवा अमृततुल्य सरबत असे वर्गीकरण न होता चहाला अमृततुल्य ही उपाधी का मिळाली, यामागील सत्य जागतिक चहा दिनानिमित्त मला सांगू द्या. ही अमृततुल्य चहा वाल्यांची जाहिरात नाही, हेही लक्षात घ्या. समस्त चहा प्रेमींना इतिहास कळावा, एवढाच कपभर हेतू!

तर अमृततुल्य या शब्दात अमृत हा उल्लेख आढळतो आणि तो उल्लेख पाहता आपल्याला आठव होतो, तो समुद्रमंथनातून निघालेल्या अमृतकुंभाचा! हा अमृतकुंभ दुसरा तिसरा काहीही नसून चहाचा कुंभ रटरटत होता, हे नजरेसमोर आणा. चहा पावडर, वेलची, चहा मसाला, किसून ठेचलेलं आलं आणि योग्य प्रमाणात साखर व दुध याचं पुरेपूर मंथन झाल्यामुळे वासुकीसकट, रस्सीखेच खेळून दमलेल्या सूर आणि असुरांना चहाची तलफ आली आणि त्यांच्यात वाद सुरू झाले. 

मुद्दा असा, की त्याआधी याच घिसाडघाईतून १४ रत्न निघाली होती. पण, त्यावर जेवढा वाद झाला नाही, तो अमृततुल्य चहाचा वेळी झाला. मात्र, त्याआधी नुकतेच निघालेले हलाहल, अर्थात ग्रीन टी नामक पुचाट द्रव्य प्यायला कोणीच तयारी दाखवली नाही. असुरांनी तर सपशेल माघार घेतली. शेवटी महादेवांनी मोठा धीर करून तो हिरवा प्याला ओठी लावला आणि गटागट प्राशन केला. त्यावेळी या विषाचे काही कण पृथ्वीवर सांडले, त्याचे काही अंश प्राण्यांमध्ये, वनस्पतींमध्ये आणि माणसांमध्ये सुद्धा उतरले. तेच लोक आजही ग्रीन टी चे हलाहल पचवण्याचे सामर्थ्य बाळगू शकत आहेत. (संदर्भ- विषाने विष मरते) देवांच्या वतीने हे औदार्य महादेवांनी दाखवले,  त्यामुळे ते कायम फिट राहिले आणि देवांची बाजू वरचढ राहिली.

स्वाभाविकपणे पुढे जे रत्न बाहेर आले, ते म्हणजे चहामृत, त्यावर देवांनी आधी क्लेम केला. मात्र, असुरांना चहाच्या दरवळाने जी काही मोहिनी घातली, त्यामुळे ते अधीर होऊन देवांच्या सभेत जाऊन, वेषांतर करून, मांडीला मांडी ठोकून चहाच्या प्रतीक्षेत बसले. 

भगवान विष्णूंनी असुरांचा धुर्तपणा ओळखला आणि वैकुंठीचे अमृत असुरांच्या ओठी लागू नये, म्हणून दैत्यांना बिनसाखरेचा चहा पिऊ घातला. गाढवाला गुळाची चव काय, म्हणतात ते असं! ते वेडे अमृत मिळाल्याच्या आनंदात नाचत सुटले. मात्र देवांनी चहा नीट उकळेपर्यंत संयम बाळगला, म्हणून त्यांच्या वाट्याला अमृततुल्य चहाचा प्याला आला. अशी ही साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण! 

त्यामुळे इथून पुढे जे कोणी गोड चहा पितात, त्यांनी स्वतःला देव आणि बिनसाखरेचा चहा पितात त्यांनी स्वतःला दानव समजायला अजिबात हरकत नाही. तसेच, एवढं वाचून चहाची मोहिनी झालीच, तर गॅस लावून, त्यावर चहाचं भांड ठेवून त्यात स्वतःच दूध, पाणी, साखर, चहा पावडर, मसाला यांचे मंथन करून अमृततुल्य प्याला ओठी लावायलाही हरकत नाही. 

ही अपौराणिक कथा सांगितल्याबद्दल आभार मानू नका, जमल्यास चहाचे बोलावणे पाठवा, ते निश्चितच स्वीकारले जाईल. 

-तुमचीच 'चहा'ती!

Web Title: The 'mythical' story behind the title 'tea'; (Kaddak) Tea Pay (Light) Discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.