नागास्टाइल- स्वप्न आणि रूटीनच्या झगड्याची गोष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2020 07:50 AM2020-11-05T07:50:18+5:302020-11-05T07:55:08+5:30
नागास्टाइल ही नागनाथचीच गोष्ट.खरं तर शहरात रुटीन आयुष्य जगणाऱ्या अनेकांची. स्वप्नांची आणि रोजच्या संघर्षाची. त्या सिनेमानं आंतरराष्ट्रीय सिनेमात धडक मारली, त्यानिमित्त नागनाथचं हे मनाेगत..
-नागनाथ खरात
दिसाड दिस या माझ्या पहिल्याच मोबाइलवर बनवलेल्या शॉर्ट फिल्मची राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली. सर्बियात एका ऑस्कर विजेत्या निर्मात्यानं खूप कौतुक केलं. वर्तमानपत्रातही बरंचसं छापून आलं. चांगलं कौतुक झालं. खरं तर माझ्यासाठी या गोष्टी फार नवीन होत्या. याला कशाप्रकारे रिॲक्ट व्हावं हेदेखील तेव्हा मला कळलं नव्हतं. पुणे विद्यापीठातून बाहेर पडल्यानंतर महावितरणमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवर नोकरी करायला लागलो. जेव्हा तुम्ही बाहेरून शहरामध्ये येत असता, त्यावेळी हे करावंच लागतं. आयुष्यात खूप प्रकारची कामं केली होती; पण दिवसभर नोकरी कधी केली नव्हती. सकाळी ऑफिसमध्ये सर्वात अगोदर मी पोहोचायचो. रोज सकाळी तीन तास मिळायचे. असे सात महिन्यांनंतर एक हिंदी फिल्म लिहून झाली (हिंदी भाषिक प्रदेशात घडणारी).
या फिल्मसाठी सुट्टीच्या दिवशी लोकांना, मित्रांना भेटत होतो. फिल्मच्या निर्मितीसाठी प्रयत्न करत होतो; पण मनासारख्या कोणत्याच गोष्टी होत नव्हत्या. काही लोक भेटले तर तिथं काम करण्याचं काहीच स्वातंत्र्य नव्हतं. म्हणून ते नाकारलं. दुसरीकडे रोज नोकरीची वेळ ठरलेली असायची. बघता बघता या गोष्टींचा मला जाम कंटाळा आला होता. त्रासही होत होता. दुसरी एक कथा लिहायला घेतली होती तर तिच्यावर मन लागत नव्हतं. एक स्क्रिप्ट लिहून पडलं होतं. साडेतीन वर्षे कॅमेरा हातात घेतला नव्हता. त्यामुळे थोडं अस्वस्थही वाटायचं. एकंदरीत महिन्याला मिळणाऱ्या पैशांतून दिवस ठरल्याप्रमाणे निघत होते. दोन वर्षे अशीच निघून गेली.
मागे मुंबईवरून भेटायला आलेल्या मित्रानं सहज प्रश्न विचारला की, अलीकडे कविता, फिल्म, काहीच का करत नाही? मी क्षणभर पाठीमागे वळून पाहिलं. लक्षात आलं की, मी रुटीनमध्येच पूर्णपणे अडकून पडलो होतो. वाचन जवळपास संपलं होतं, गेल्या दीड दोन वर्षात मी पाच फिल्मही पाहिल्या नव्हत्या. वाटलं आपण आता काहीतरी केलं पाहिजे होतं. तिथेच मला ‘नागास्टाइल’ सुचली. मनात म्हटलं आपलीच गेल्या तीन वर्षाची गोष्ट सांगूया. माझ्याच रोजच्या डायरीवर आधारित नागास्टाइल या चित्रपटाचा जन्म झाला.
रोज ऑफिसला जाताना बसमध्ये विचार करायचो. दिवसभर मोकळ्या वेळात त्याचा आकार ठरवायचो. कारण रोजच्या जगण्यावर फिल्म जरी करत असलो, तरी ती पडद्यावर फिल्म म्हणून ताकद टिकवून ठेवणंही तितकंच अवघड असतं.
फिल्म लिहून झाली. गोष्ट खूप पर्सनल होती. रोजच्या डायरीतील/ आयुष्यातील सर्व पात्रं हेही त्याचीच भूमिका निभावणार होते. जे खऱ्या आयुष्यात जसे आहेत. म्हणजे आईची भूमिका माझी आई करणार होती, मित्राचा रोल तोच मित्र करणार होता. किंवा कित्येक गोष्टी या रोजच्या रूटीनवर प्रत्यक्षात शूट होणार होत्या.
जसा वेळ मिळेल तसा, ऑफिसला सुट्टी मिळेल तशी चार महिने शूटिंग केलं. बऱ्याचदा शूटच्या वेळी कोणी जवळ नसल्यावरच मला जास्त, कम्फर्टेबल वाटायचं. जिथे परवानगी नव्हती तिथे योगेश, दीपक आणि आमची टीम सकाळी लवकर शूट करून मोकळी व्हायची. ऑफिसचं शूट काही वेळा तर मी एकट्यानंच पार पाडलं.
पुढे लॉकडाऊनमध्ये फिल्म अडकून पडली. जमेल तसे पैसे उभे केले.
एडिटिंग आणि शेवटच्या तांत्रिक गोष्टींना आठ महिने लागले. आणि एकदाची ‘नागास्टाइल’ फिल्म तयार झाली.
नागास्टाइल फिक्शन फिल्म आहे की डॉक्युमेंटरी आहे, हे ज्याचं त्यानं ठरवावं. माझ्यासाठी फक्त ती दोन तासाची फिल्म आहे. आता मध्य पूर्व युरोपमधल्या सर्वात मोठ्या असलेल्या 24 व्या जिहलवा इंटरनॅशनल डॉक्युमेण्टरी फिल्म फेस्टिव्हलमध्ये फर्स्ट लाइट्स, विभागात स्पर्धेत आहे. तिथून पुढे फिनलंड आणि इतर युरोपियन देशात तिचं स्क्रीनिंग होणार आहे. डॉक अलायन्स या वेबसाइटच्या माध्यमातून आठवडाभर ऑनलाइन 1 नोव्हेंबर 8 नोव्हेंबर या काळात रीलीजही होतेय. एकंदरीत नागास्टाइल स्वत:ची वाट घेऊन चालत आहे. याच्यासारखा आनंद तरी काय आहे.
प्रत्येक नवीन फिल्म तुम्हाला काहीतरी देत असते. नागास्टाइलने माझ्या बऱ्याच पुढच्या गोष्टी सोप्या केल्या आहेत. नवीन प्रोजेक्टवरही काम सुरू आहे. आता पुढे पाहतोय...
( लेखक तरुण कथालेखक, दिग्दर्शक आहे.)
nagkharat@gmail.com