नालासोपार्याच्या वस्तीतल्या पोरांचा डान्स कसा ठरला जगात भारी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 05:56 AM2019-05-16T05:56:00+5:302019-05-16T06:00:05+5:30
पायात साध्या रबराच्या चपला, अंगात बनियन आणि डोळ्यांत स्वप्न आणि डान्सचं पॅशन. अशी नालासोपारातली मुलं. फुटपाथवर प्रॅक्टिस करत अनेक डान्स शो जिंकत. या तरुण मुलांचा ग्रुप आता वर्ल्ड ऑफ डान्स ही जागतिक स्पर्धा ¨ंजंकला आहे. गल्ली बॉय ते ग्लोबल किंग्ज झालेल्या या तरुण मुलांच्या किंग्स ऑफ युनायटेडचा कोरिओग्राफर सुरेश मुकुंद. त्याच्याशी या विशेष गप्पा.
- स्नेहा मोरे
साधारण 2008 साली सुरेश मुकुंद आणि व्हर्नान मॉन्टेरिनो यांनी एकत्न येऊन फिक्शियस क्रू या डान्स ग्रुपची स्थापना केली. नालासोपारा आणि वसईत राहणारी, तारुण्याच्या उंबर्यावर असणार्या मुलांचा हा ग्रुप. या तरुण मुलांकडे बाकी काहीही नव्हतं; पण या पोरांच्या रक्तात डान्स होता. तेव्हा टीव्हीवर नुकतंच रिअॅलिटी शोचं पर्व सुरू झालं होतं. अगदी सुरुवातीचा बुगी-वुगी हा डान्स शो. त्यात हा ग्रुप सहभागी झाला. त्यांच्या अंगात भिनलेल्या नृत्याला सापडलेली ही पहिली वाट.
सुरेश सांगतो, ‘त्या शोमध्ये सिलेक्शन झालं आणि तिथून आमच्या स्वप्नांना आकार येऊ लागला. नालासोपारा आणि वसईतली मध्यमवर्गीय घरांत वाढलेली आम्ही पोरं, आम्हाला संघर्ष नवा नव्हता. डान्स करायचा म्हटलं तिथपासून या प्रवासात प्रचंड ठोकरा खाल्ल्या, काही जमलं, काही नाहीच जमलं. पण कधीही हार पत्करली नाही. हीच आमच्या ग्रुपची खासियत आहे. अपयश तर बरेचदा आलं; पण ते आम्ही स्वीकारलं. त्यातून पुढं निघालो, मनात होतं, आज नसेल पण उद्या आपली वेळ येईल! आपण झगडत रहायचं, मागे हटायचं नाही.’
हे सांगताना सुरेशच्या आवाजातली जिद्द आणि ठाम निर्धार कळतो.
खरं तर अजूनही डान्सला आपल्याकडे करिअर मानत नाही. त्यातही मुलगे. त्यांना म्हणजे तर डान्स कर, पण पोटापाण्याचंही कायतरी बघ असं या मुलांनाही आपल्या घरात ऐकावंच लागलं. पण या मुलांना ही चौकट मोडायची होती. त्यासाठी बुगी-वुगीने मदत केलीय. 2009 साली बुगी-वुगी ही स्पर्धा जिंकल्यावर हा ग्रुप चर्चेत आला. मग 2010 साली ‘एन्टरटेन्मेन्ट के लिए कुछ भी करेगा’ या शोचं विजेतेपद आणि इंडियाज गॉट टॅलेंटमध्ये तिसरं स्थान, 2011 साली इंडियाज गॉट टॅलेंटमध्ये विजेतेपद असा त्यांचा प्रवास सुरू होता.
त्यानंतर मग त्यांनी ठरवलं, दोन-चार स्पर्धा जिंकून मिरवायचं नाही. आपण आपल्या क्षेत्नातील सर्वोच्च मानाचा किताब पटकावयचा. 2012 साली वर्ल्ड हिप हॉप डान्स चॅम्पियनशिपमध्ये आठवं स्थान आणि 2015 साली वल्र्ड हिप हॉप डान्सचं कांस्यपदक पटकावलं. मात्र तरी ते थांबले नाही, त्यांना जगात नंबर वनचा किताब हवा होता. म्हणून तर जगभरातील डान्सरचं स्वप्न असणार्या वर्ल्ड ऑफ डान्सचा विजेतेपदाचा किताबही जिंकला.
सुरेश सांगतो, आम्ही आमचं स्वप्न पूर्ण केलं, याचा आनंद मोठा आहे.
अर्थात हा त्यांचा प्रवास सोपा नव्हता. आधी स्थापन केलेल्या मूळ ग्रुपमध्ये फूट पडली.
सुरेश सांगतो, ‘आम्ही दोघांनी ग्रुपची सुरु वात केली होती, मात्न काही काळाने ग्रुपमध्ये फूट पडली. 2011 नंतर फिक्टिशियसमधून वेगळं झाल्यावर किंग्स युनायटेडची निर्मिती झाली. मग पुन्हा मागे वळून पाहिलं नाही. व्हर्नाननेही डान्स ग्रुप सुरू केलाय, मात्न आता आमचा प्रवास वेगवेगळ्या दिशांनी सुरू आहे.’
वर्ल्ड ऑफ डान्सचं आमंत्नण
वर्ल्ड ऑफ डान्ससाठी ऑडिशन द्यावी लागत नाही, त्या स्पर्धेसाठी या ग्रुपला आमंत्नण आलं होतं. सुरेश सांगतो, साधारण आठ महिन्यांचा प्रवास होता. त्यापूर्वीपासून आम्ही या शोचा अभ्यास करत होतोच. पण तिथे जाऊन जगाशी स्पर्धा करायचं स्वप्न इतक्यात पाहिलं नव्हतं; पण मेहनतीवर विश्वास असला की जग जिंकता येत आणि तेच आम्ही केलं. पाच राउण्डची ही स्पर्धा होती. मात्न या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पाश्चिमात्य नृत्याचा अधिक प्रभाव असल्यानं बॉलिवूड डान्स, हटके स्टेप्स आणि हिप हॉपला बॉलिवूडचा तडका या सर्व शैलींनी परीक्षकांचे मन जिंकलं.
..अन् ती धडधड!
स्पर्धेच्या सेमी फायनलच्या राउण्डला स्टेजवर सादरीकरणाला जाण्याच्या 10 मिनिटं आधी ग्रुपमधल्या एकाच्या पायाला दुखापत झाली. काही क्षणासाठी आमचं अवसान गळून पडलं. कुणाला काही सुचेना. अस्वस्थता होतीच; पण मग प्राथमिक उपचार केल्यावर त्या सदस्यानंच निर्णय घेतला की मी डान्स करणारच, आता माघार नाही. आणि त्याच अवस्थेत पायाला बँडेज करून त्यानं ते सादरीकरण केलं आणि सर्वानी टाळ्यांचा कडकडाट केला.
सुरेश सांगतो, त्यांनी कमावलेल्या यशामागचं समर्पण. खरं तर 2015 साली या ग्रुपवर एनिबडी कॅन डान्स- पार्ट -2 हा चित्नपटच बनवण्यात आला होता. त्यात वरुण धवननं साकारलेलं पात्न सुरेशवर आधारित होतं.
त्यातलं डान्सचं पॅशन सुरेशच नाही तर इथले नृत्यवेडे मुलं जगलेत. सुरेश सांगतो की, गरिबीवर मात करण्यासाठी इथले मुल-मुली कलाप्रकारांमध्ये झोकून देतात. बरेचदा वर्षानुर्वष यश मिळत नाही, मात्न मेहनत करणं, रात्नंदिवस त्या कलेला वेळ देणं ही पोरं सोडत नाहीत. चिकाटीने तेच तेच करतात. आमचं यश आज जगाला दिसतं आहे, पण आमचं सातत्य खरं तर जिंकलंय!
त्या जिंकण्याला आज जग सलाम करतंय. ही मुलं सेलिब्रिटी होत तमाम चॅनल्सवर झळकत आहेत. कुठं नालासोपारा कुठं हॉलिवूड पण स्वप्न खरी होतात, याचं हे एक उदाहरण आहे.
**
हॉलिवूमध्ये नाव कमवायचंय!
डान्समधला सर्वोच्च शोमधलं विजेतेपद मिळालंय. जगात आम्ही बेस्ट आहोत हे सगळ्यांनी पाहिलंय आम्ही ते कमावलंय. यानंतर आता बर्याच संधी चालून आल्या आहेत. त्यात मग फिल्म, शो, अॅड्स, कॉन्सर्ट अशा वेगवेगळ्या संधी आहेत. मात्न आमच्या ग्रुपला हॉलिवूडमध्ये काम करायचंय, आंतरराष्ट्रीय चित्नपटांच्या कॅन्व्हासवर आमच्या नृत्याची झलक दिसावी, देशाचंही नाव आणखी मोठं व्हावं यासाठी मेहनत घेणार आहोत, असं सुरेश सांगतो.
आता जगभरात शो
वर्ल्ड ऑफ डान्सच्या यशानंतर आता जगाच्या कानाकोपर्यात आम्ही शो, कॉन्सर्ट करत आहोत. प्रत्येक आठवडय़ाला वेगळं शहर, वेगळी माणसं, वेगळी संस्कृती जाणून घेण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे. शिवाय त्या-त्या मातीतल्या डान्सच्या संस्कृतीकडूनही आम्ही काहीतरी वेगळंपण आत्मसात करायचा प्रयत्न करणार आहोत. हे सुरेश मोठय़ा अभिमानानं सांगतो.
( स्नेहा लोकमतच्या मुंबई आवृत्तीत वार्ताहर आहे.)