नाशिक ते अमृतसर, 1500 किलोमीटर, 5 दिवस आणि दोन चाकांवरचा थरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 05:10 PM2020-02-06T17:10:12+5:302020-02-06T17:14:39+5:30
दिवस-रात्र सायकल चालवताना गडद धुक्याच्या अंधार्या रात्री 25 सायकलपटूंची निसर्गानं पाहिलेली कसोटी, या सार्याची एक थरारक गोष्ट.
समीर मराठे
जवळपास प्रत्येकाचा गुडघा कामातून गेला होता. कुणाच्याच हाताच्या बोटांना पुरेसं सेन्सेशन नव्हतं. आपल्या हातांना बोटं आहेत की नाहीत, हेच समजत नव्हतं. कित्येकांच्या मानेला, पाठीला आणि घोटय़ाला असह्य रग लागली होती, सगळेच धडधाकट, पण कोणालाच धड उभं राहता येत नव्हतं, नीट, सरळ पावलं टाकता येत नव्हती, जिना चढता-उतरताना तर प्रत्येक जण तिरका, केवळ एकाच (त्यातल्या त्यात सुस्थितीत असलेल्या) पायावर भार टाकून आणि त्या एकाच पायानं पायर्या चढत किंवा उतरत होता. बसण्याचा भाग तर इतका हुळहुळा झालेला होता, की आता ‘बसायचं’ या भावनेनंही, बसण्यापूर्वीच आधी मनात आणि नंतर बसण्याच्या जागी ‘कळ’ उठत होती!.
प्रत्येकाचं शरीर थकलेलं होतं, थंडीमुळे आक्रसलेल्या त्वचेला सुरकुत्या पडल्या होत्या, गेले पाच दिवस कोणालाच पुरेशी झोप मिळाली नव्हती. मिट्ट, भयाण अंधारातही डोळे ताणून पाहावं लागल्याची स्वसक्ती असल्यामुळे, प्रत्येकाच्याच डोळ्यांत अनावर झोप होती, पण अमृतसरच्या सुवर्णमंदिराचा कळस पाहताक्षणी प्रत्येकाची झोप उडाली होती, इतक्या दिवसांच्या श्रमानं थकलेलं शरीर अचानक पुन्हा ताजंतवानं झालं होतं, चेहरा उजळला होता आणि डोळ्यांत एक विलक्षण चमक आली होती. प्रत्येकजण गळामिठी घेत एकमेकांचं अभिनंदन करत होता. आपण हे साहस केलं यावर कुणाचाही विश्वास बसत नव्हता.
नाशिक ते अमृतसर. 26 डिसेंबरला पहाटे सहा वाजता नाशिकहून 25 सायकलपटू अमृतसरच्या दिशेनं निघाले. नाशिक, मुंबई, पुणे, कोलकाता, बंगळुरू. अशा अनेक ठिकाणच्या सायकलपटूंचा त्यात समावेश होता. त्यात दोन लढवय्या महिलाही होत्या. अंतर होतं किमान 1500 किलोमीटर आणि हे अंतरही कापायचं होतं फक्त पाच दिवसांत! महाराष्ट्र, मध्य प्रदेश, हरयाणा, राजस्थान आणि पंजाब. तब्बल पाच राज्यांतून आणि सायकलच्या चाकांवर दिवस-रात्र हा प्रवास करायचा होता. जेवण-खाण, झोप, अत्यावश्यक कामं. अगदी सायकल पंक्चर झाली, रस्ता चुकलो, ‘हरवलो’, तरीही हे सगळं आपलं आपणच मॅनेज करायचं होतं.
सगळ्यांचं ध्येय एकच. स्वतर्ला तपासून पाहायचं, तावून, सुलाखून घ्यायचं, आपल्या क्षमतांचा अंदाज घेत आणि त्यांना पणाला लावत नववर्षाच्या पूर्वसंध्येला सुवर्णमंदिर गाठून ध्येय पूर्ण करायचं.
**
प्रत्येकाला प्रोत्साहन देत, प्रसंगी एकमेकांना मदत करत, नाशिकहून आम्ही सर्व जण निघालो, तेव्हा वाटेत येणार्या आव्हानांची सर्वानाच कल्पना होती, पण ती इतकी खडतर असतील, याची अपेक्षा कोणालाच नव्हती.
अमृतसर्पयतच्या या प्रवासाचे एकूण चार टप्पे करण्यात आले होते. पहिलाच टप्पा सहाशे किलोमीटरचा. त्यानंतर दोनशे, चारशे आणि सर्वात शेवटी तीनशे किलोमीटर!
या संपूर्ण मार्गावरचे टप्पे निश्चित करण्यात आलेले होते, रस्ता आखूून दिलेला होता, साधारण दर शंभर किलोमीटर अंतरावर ‘कंट्रोल पॉइंट’ ठरवून दिलेले होते. याच निर्धारित रस्त्यानं प्रत्येकाला जायचं होतं आणि प्रत्येक कंट्रोल पॉइंटला निर्धारित वेळेतच पोहोचायचं होतं. त्या त्या पॉइंटवर अगदी मिनिटभर जरी उशिरा पोहोचलं तरी ‘बाद’ होण्याची भीती होती! शिवाय बरोबर कोणालाही बॅकअप व्हेइकल घेण्याची परवानगी नव्हती. कोणीच रस्ता दाखवणार नव्हतं किंवा रात्रीही सायकल चालवायची म्हणून तुमच्या मागे एखादी गाडी ठेवून त्या गाडीच्या प्रकाशात सायकल चालवण्याची, ‘थकलो’ म्हणून कुठेही, कोणत्याही ठिकाणी सायकल गाडीत टाकून सिटवर बसण्याची सोय नव्हती! वेळेचं आणि अंतराचं भान बाळगून आपल्या खाण्या-पिण्याचं, नैसर्गिक विधींचं, झोपेचं आणि आता किती अंतर, किती स्पीडनं सायकल आपल्याला पळवावी लागेल, याचा अंदाज बांधून त्याचं नियोजनही मनातल्या मनात आपलं आपल्यालाच करायचं होतं.
आंतरराष्ट्रीय मान्यता असलेल्या या ‘ब्रेव्हे’ (बीआरएम) उपक्रमाचे नियमही तितकेच काटेकोर होते, असतात, प्रत्येकाला सक्तीनं ते पाळावेही लागतात. सायकल बिघडली, आपल्या क्षमता कमी पडल्या, तर ‘मी आता क्विट करतोय’ असं संयोजकांना फोन, एसएमएस, व्हॉट्सअपनं कळवून, स्वतर्हून या आव्हानातून माघार घ्यायची सोय असते, पण कुठलाही गैरप्रकार करण्याचा प्रय} केला, तर या उपक्रमांतून आयुष्यभरासाठी हद्दपार होण्याचीही टांगती तलवार डोक्यावर असते.
या प्रवासात पहिलं मुख्य आव्हान होतं, ते पहिले सहाशे किलोमीटर अंतर वेळेत पूर्ण करण्याचं. वाटेत नागमोडी रस्ते होते, थंडीतही घामटं काढणारे तीन घाट होते, त्यातले दोन अतिशय अवघड घाट तर थेट मध्यरात्री येणार होते. तरीही अनेकांनी हे आव्हान जिद्दीनं पूर्ण केलं.
पण पहिला धक्का बसला, तो या पहिल्या टप्प्यातच. जवळपास पाचशे किलोमीटर अंतर वेळेत पूर्ण केल्यानंतर एका महिला रायडरच्या सायकलचं चाक मध्यरात्री अचानक बस्र्ट झालं, ती सायकलवरून पडली, बराच मार लागला आणि राइड अध्र्यातच सोडून तिला घरी परतावं लागलं. मात्र तिलाही दुर्ख होतं ते मार लागल्याचं नाही, तर राइड अध्र्यातच सोडावी लागली याचं. यानंतरही प्रत्येक टप्प्यावर रायडर्सना अनेक अनपेक्षित आव्हानांना तोंड द्यावं लागलं.
पुढच्या टप्प्यात थंडी अचानक वाढली. पुढे ती आणखी वाढतच गेली. रस्त्यांनी चकवा दिला. या दोनशे किलोमीटरच्या टप्प्यात काही जण रस्ता चुकले.
यानंतरचा चारशे किलोमीटरचा टप्पा सर्वात अवघड आणि अनपेक्षित होता. अनेक आंतरराष्ट्रीय रायडर्सच्या क्षमतेचीही इथे कसोटी लागली. राजस्थानातून जाणारा हा रस्ता अत्यंत खराब होता. रस्ता एकपदरी, पण मोठा होता. दर पावलावर रस्त्याला भेगा होत्या आणि या भेगांमध्ये डांबर टाकलेलं होतं. सगळा रस्ता अतिशय खडबडीत असल्यामुळे क्षणाक्षणाला धक्के बसत होते. सायकल बॅलन्स करावी लागत होती. शरीराचे सगळे अवयव दुखायला लागले होते. कितीही जीव तोडून सायकल चालवली तरीही सायकल पळत नव्हती. सायकल चालवताना अक्षरशर् दमछाक होत होती. थंडीनं कहर केला होता. या संपूर्ण टप्प्यात तापमान शुन्याच्या जवळपास आणि काही ठिकाणी तर उणे दोन अंश सेल्सिअस होतं. अंगावर कितीही कपडे घातले तरीही थंडी थांबत नव्हती. बर्याच जणांनी तर अंगावर एकावर एक असे कपडय़ांचे सहा थर चढवले होते. त्यामुळे वजन वाढलं होतं. रात्रीच्या अंधारात रस्ते लक्षात येत नव्हते. अनेक जण या टप्प्यात रस्ता चुकले. काही जणांना तर वीस-पंचवीस किलोमीटरचा फेरा पडला. प्रत्येक कंट्रोल पॉइंटवर वेळेच्या आत पोहोचण्याची प्रत्येक रायडरची छडपड चालली असताना रस्त्यांचा हा चकवा! त्याचमुळे काही जणांची ही राइड वेळेत पूर्ण होऊ शकली नाही, तर बर्याच सायकलपटूंनी जीव तोडून सायकल चालवूनही प्रत्येक कंट्रोल पॉइंटवर निर्धारित वेळेच्या केवळ एक-दोन मिनिटे आधी ते पोहोचू शकले.
एवढं होऊनही एकापेक्षा एक खडतर आव्हानांना सायकलपटूंची आणखी परीक्षा पाहायचीच होती. सगळ्यात मोठं आव्हान होतं ते धुक्याचं. रात्री धुकं असू शकेल, याची कल्पना सगळ्यांनाच होती, पण इतकं?. दोन फुटांवरचंही काही दिसत नव्हतं. अनेकांच्या सायकलच्या लाइटचा प्रकाश तर रस्त्यावरही पोहोचत नव्हता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला आणि पुढे काय आहे, कोणालाही काही दिसत नव्हतं, कळत नव्हतं. रस्त्यावर वाहतूक अत्यंत तुरळक, पण मध्यरात्रीच्या या अंधारात समोरून येणारी वाहनं अक्षरशर् अंगावर येत होती. काही सायकलपटूंनी तर आपल्या सायकली सोडून अक्षरशर् रस्त्याच्या कडेला उडी घेतली. त्यातच काही जणांच्या सायकली पंक्चर झाल्या. डोळ्यांत बोट घातलं तरी दिसणार नाही, इतका अंधार बुडुख आणि कोणाला काही झालं तर लक्षातही येणार नाही अशी स्थिती. आता मात्र सारेच हबकले आणि सगळ्यांनी एकत्रित निर्णय घेतला, सर्वानी आता बरोबरच जायचं. दिवसरात्र सलगपणे जवळपास हजार किलोमीटचं अंतर एव्हाना सगळ्यांनीच कापलं होतं. शरीर-मन पूर्णपणे थकलं होतं. वेळ मिळेल तसं रात्रीच्या अंधारात कुठल्यातरी ढाब्यावर, कुडकुडत्या थंडीत, उघडय़ावरच अनेकांनी तास-दोन तास झोप (?) काढली होती. त्यामुळे या अंधार्या रात्री अनेक जण सायकल चालवतानाही मधूनच डुलक्या घेत होते. एकमेकांशी बोलत, गप्पा मारत, दुसर्याला जागं ठेवत सगळ्यांनी हा टप्पा कसाबसा पार केला.
शेवटच्या तीनशे किलोमीटरलाही हीच स्थिती होती. एकमेकांना आधार देत आणि आपल्या क्षमता पणाला लावत सार्यांनी हा टप्पाही पार केला. दिवसरात्र सायकल चालवत, दररोज सरासरी तीनशे किलोमीटर अंतर सार्यांनी पार केलं! पाच दिवसांत जवळपास 75 टक्के वेळ सारे जण सायकलवरच होते. अमृतसरला पोहोचल्यावर सुवर्णमंदिराचा कळस दिसला आणि प्रत्येकाच्याच परिश्रमाचं जणू सार्थक झालं!. एकूण 25 जणांपैकी 15 जणांनी हे आव्हान यशस्वीपणे पूर्ण केलं. खडतर परिस्थितीमुळे, रस्ता चुकल्यामुळे, एखादा कंट्रोल पॉइंट केवळ काही मिनिटांनी हुकल्यामुळे दहा जणांना त्या त्या टप्प्यावर ‘डिसक्वॉलिफाय’ व्हावं लागलं, पण तरीही त्यातल्या बर्याच जणांनी राइड सोडली नाही. सार्यांच्या दृष्टीनं तेही ‘विजेते’च होते!..
पण तरीही एक प्रश्न उरतोच.
या आव्हानासाठी देशभरातून कुठून कुठून सायकलपटू आले होते. त्यांनी का केला हा वेडा अट्टहास? कारण ही ट्रिप नव्हती, मजा नव्हती, पिकनिक नव्हती. संपूर्ण मार्गात वेळेचं, अंतराचं आणि निसर्गाचंही आव्हान होतं. प्रत्येक टप्पा त्या त्या वेळेतच पूर्ण करण्याची (स्व)सक्ती होती. प्रत्येक आव्हान पेलत स्वतर्च्या क्षमतांना ओळखत, प्रसंगी त्यांना जोजवत, तुटेर्पयत ताणत, आपण स्वतर्च ठरवलेल्या ध्येयार्पयत जाण्याचा हा संघर्ष होता. प्रसंगी जिवाचाही होता. मग तरीही त्यांनी का केलं हे वेडं साहस?.
त्यातलं एक मुख्य कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय मान्यता असलेल्या या ‘ब्रव्हे’ राइड्सचं ध्येयच मुळात स्वतर्चा एण्डुरन्स टेस्ट करणं, स्वतर्ला तपासणं आणि तावून-सुलाखून घेणं हा आहे. त्यामुळे या सायकलपटूंची तशी मानसिक तयारी असतेच.
यासंदर्भात अनेक रायडर्सशी बोलणं झालं. जवळपास सगळ्यांचं म्हणणं एकच होतं, याला वेडेपणा म्हणा, मॅडनेस म्हणा किंवा आणखी काही. पण मॅडनेसशिवाय अशा गोष्टी होतच नाहीत. पण ते साहस पूर्ण झाल्यावर मिळणारं समाधानही अत्यच्च कोटीचं असतं.
या राइडमध्ये सहभागी झालेले आंतरराष्ट्रीय सायकलपटू आणि मुंबई-शहर जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांचं प्रातिनिधिक म्हणणं होतं, ‘प्रत्येकानं कधी ना कधी, कुठल्या ना कुठल्या मार्गानं स्वतर्ला ‘टेस्ट’ केलं पाहिजे. नाशिक ते अमृतसर सायकल राइड ही त्यासाठी एक सुवर्णसंधी होती. प्रत्येक राइड वेगळी असते. अगदी त्याच मार्गावर तुम्ही पुन्हा राइड केली, तरीही प्रत्येक वेळेचं चॅलेंज वेगळं असतं. ऊन, वारा, पाऊस, थंडी, हवामान, रस्ता. अगदी रस्त्यावरची ट्रॅफिकही तुम्हाला दरवेळी वेगळं आव्हान देत असते. नाशिक-अमृतसर राइडमध्ये तर आव्हानंच आव्हानं होती. अशा आव्हानांच्या प्रलोभनापोटीच अनेक सायकलपटू ‘पॅरीस-ब्रेस्ट-पॅरीस’ (पीबीपी) ही 1217 किलोमीटरची अत्यंत चॅलेंजिंग सायकल राइड करतात, यंदा मीही केली, पण नाशिक-अमृतसर राइडमधली आव्हानं कुठल्याही दृष्टीनं ‘पीबीपी’पेक्षा कमी नव्हती. ‘पुढे काय?’ याची कोणालाच कल्पना नव्हती, तरीही त्यांची जिद्द वाखाणण्याजोगी होती. एकेक अवघड टप्पा पार केल्यानंतर वाढणार्या मनोबलाची तुलना कशाशीही करता येणार नाही. यामुळे केवळ पुढच्या राइडसाठीच नव्हे, तर तुमच्या दैनंदिन जगण्यात आणि आयुष्यातही अशा अनपेक्षित आव्हानांना तोंड देण्याची शक्ती तुम्हाला मिळते. शारीरिक, मानसिक. सार्याच बाबतीत तुम्ही इम्प्रुव्ह होत जाता. नवे मित्र जोडता. एकमेकांशी मानसिक, भावनिक दृष्टीनं कनेक्ट होता. अडचणीच्या प्रसंगी मदतीला, सहकार्याला तयार होता. या राइडमध्ये सगळ्यांनीच हा अनुभव घेतला. प्रसंगी स्वतर्ची राइड पणाला लावताना अनेक सायकलपटू दुसर्याच्या मदतीला धावून गेले. भले त्यामुळे काही जणांची राइड वेळेत पूर्ण झाली नाही, पण या कृतीतून जे सेल्फ रिवॉर्ड त्यांना मिळालं, त्याची किंमत कशात करणार?.
हेच कारण आहे या मॅडनेसमागे. कुठलंही एखादं साहस केल्यानंतर बरेच सायकलपटू म्हणतात, पुन्हा असा वेडेपणा करायचा नाही. जीव धोक्यात टाकायचा नाही. पण ते तेवढय़ापुरेसंच. काही दिवसांनी त्यांची ही खुमखुमी पुन्हा जागी होते, आव्हानं खुणावायला लागतात आणि मग पुन्हा एकदा शोध सुरू होतो, नव्या वेडेपणाचा.
एव्हाना या वेडेपणाच्या वेगावर ते स्वारही झाले असतील.
*****************
सहभागी रायडर्स
बाळासाहेब वाकचौरे, अॅड. दत्तात्रय चकोर, किशोर काळे, विजय काळे, प्रमोद तुपे, डॉ. हिमांशू ठुसे, रतन अंकोलेकर, डॉ. राहुल सोनवणी, गोरक्षनाथ शिंदे, रामदास सोनवणे, दीपक वाघ, समीर मराठे (नाशिक), मयूर शानभाग, प्रीती म्हस्के, नागामलेश्वर राव, योगेश भट (पुणे), सतीश शर्मा, अहशाम आशान, नरेंद्र मार्सकोल्हे, शशीकांत पाटोळे, प्रशांत पाटील, श्रीकांत दळवी, अनीता गुप्ता (मुंबई), विभव शिंदे (बेंगळुरू), देबंजन डे (कोलकाता)
मार्शल्स - डॉ. महेंद्र महाजन (आयोजक), यशवंत मुधोळकर, चंद्रकांत नाईक, संदीप परब, दिनेश मोरे
***********
‘बीएमडब्ल्यू’ आणि सहकार्यांचे मदतीचे हात.
नाशिक-अमृतसर सायकल राइडमध्ये सायकलपटूंना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं. भयानक थंडी, बोचरे वारे, दाट धुकं आणि समोरून थेट अंगावर येणारी वाहनं. शिवाय, खराब रस्त्यामुळे वारंवार पंक्चर होणारी सायकल. सारे जण अशा टप्प्यावर आणि मध्यरात्रीच्या अंधारात अशा ठिकाणी होते, जिथून धड पुढेही जाता येत नव्हतं आणि धड माघारीही परत फिरता येत नव्हतं. मनोबल खचवणाराच हा प्रसंग होता, पण काहीही झालं तरी पुढे जाणंच श्रेयस्कर होतं. अशा आणीबाणीच्या प्रसंगी काही अनुभवी सायकलपटू पुढे झाले. नाशिकचे रहिवासी, पण मुंबई शहर-जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी आणि आंतरराष्ट्रीय सायकलपटू बाळासाहेब मुरलीधर वाकचौरे (त्यांच्या आद्याक्षरांमुळे सायकल जगतात त्यांना ‘बीएमडब्ल्यू’ या नावानंच ओळखलं जातं), अॅड. दत्ता चकोर, सतीश शर्मा, किशोर काळे, प्रमोद तुपे. या अनुभवी रायडर्सनी सगळ्या सायकलपटूंची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली, काहींनी सर्वाच्या पुढे तर काहींनी सर्वाच्या शेवटी राहून इतर सायकलपटूंना ते सोबत घेऊन गेले, कोणीही मागे एकटा राहणार नाही, चुकणार नाही, याची काळजी घेतली. त्यांना धीर दिला, ज्यांच्या सायकली रात्रीच्या अंधारात पंक्चर झाल्या, त्यावेळी थांबून त्यांच्या सायकलचे पंक्चर काढायलाही मदत केली. निर्धारित वेळेत प्रत्येक कंट्रोल पॉइंटवर पोहोचण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देत, त्यांचं मनोबल उंचावत, त्यांचा स्पीड वाढवत आपल्याबरोबर त्यांची सायकल राइडही वेळेत पूर्ण करून दिली. सच्च्या ‘ब्रेव्हे रायडर्स’चा अनुभव त्यांनी सहकर्यांना दिला.