सुंदर केसांचं नैसर्गिक गुपित

By admin | Published: March 14, 2017 04:23 PM2017-03-14T16:23:34+5:302017-03-14T16:23:34+5:30

केस सुंदर करायचे म्हणजे केसांना डाय लावायचा नाहीतर आपल्या आवडीच्या रंगानं केस कलर करायचे हे गणित एकदम पक्कं आहे.

The natural secret of beautiful hair | सुंदर केसांचं नैसर्गिक गुपित

सुंदर केसांचं नैसर्गिक गुपित

Next

 

- डॉ. निर्मला शेटटी

- मेहेंदी, बीट आणि बदाम

केस सुंदर करायचे म्हणजे केसांना डाय लावायचा नाहीतर आपल्या आवडीच्या रंगानं केस कलर करायचे हे गणित एकदम पक्कं आहे. यामुळे केसं सुंदर दिसतात पण तात्पुरते. केमिकलयुक्त डाय सतत वापरल्यामुळे केसांना कायमचा रूक्षपणा येतो हे कुठे माहित असतं तेव्हा. आणि जेव्हा माहित होतं तोपर्यत केस रूक्ष, राठ झालेले असतात. तसंच केस कलर करण्याचंही होतं. एकदा का केसांना रंग लावायला सुरूवात केली की व्यसन लागल्यासारखं विशिष्ट कालावधीनंतर केस रंगवावेच लागतात. केस कलर केल्यामुळे आपला लूक एकदम बदलतो, केस छान दिसतात हे जरी खरं असलं तरी यासाठी आपण केसांचं आरोग्य धोक्यात घालतो याकडे दुर्लक्ष का करतो? केस सुंदर करायचे सोबत केसांचं आरोग्यही जपायचं असेल तर मेहेंदी आणि सोबत इतर नैसर्गिक घटकांचा वापर करायला हवा. यामुळे केस सुंदर दिसताना मनात आता केसांचं पुढे काय होणार ही चिंता नसते.

* मेहेंदी ही केमिकलयुक्त रंगांना उत्तम पर्याय आहे. पण मेहेंदी वापरतानाही आपले केस, बाहेरचं वातावरण याचा विचार करणं आवश्यक आहे. * मेहंदी सरसकट सगळ्यांनाच सूट होते असं नाही. ज्यांच्या केसांना मुळातच करड्या तपकिरी रंगाची झाक असेल त्यांनी मेहंदी लावली तर ती शोभून दिसत नाही. ज्यांच्या केसांचा रंग तपकिरी आणि लालसर यांच्या मधला असतो त्यांनी केसांना मेहंदी लावल्यास ते अधिक शोभून दिसतं.

* कलर आणि डायच्या तुलनेत मेहंदी हा एकदम सुरक्षित पर्याय आहे. मेहंदीमुळे केसांचं कंडीशनिंग होऊन केसांना सुरक्षा कवचही मिळतं. केसांचं पोषणही होतं. पण बाहेरचं वातावरण कोरडं असेल त्याकाळात केसांना मेहंदी लावली तर मात्र केस आणखी कोरडे होण्याची शक्यता असते. म्हणून सरसकट मेहंदी केसांना न चोपडता आपल्या केसांवर त्याचा हवा तो इफेक्ट मिळण्यासाठी मेहंदीचा वापर नीट समजून करायला हवा.

* मेहंदीत फळं किंवा सुकामेवा मिसळून मग ती मेहंदी केसांवर लावल्यास केसांचं कंडीशनिंग चांगलं होतं. केस कोरडे आणि राठ होत नाहीत.

* दोन मोठे कप मेहंदीची पानं घ्यावीत. (पानंच. बाजारात मिळणारी पावडर नव्हे.) ही पानं व्यवस्थित धुवून घ्यावीत, मग थोडी सुकवून घ्यावीत.

* सहा बदाम, पाव कप ओलं खोबरं, पाव कप बीटाचे तुकडे, २ चमचे कॉफी हे सर्व साहित्य एकत्र करून मऊ पेस्ट होईल असं दळून घ्यावं.

* एक लोखंडी वाडगं घेवून त्यात मेहंदींची पेस्ट आणि बाकीचं पेस्ट केलेलं साहित्य एकत्र करावं. ते दोन दिवस तसंच ठेवावं. आणि मग केसांच्या छोट्या छोट्या बटा करुन ही पेस्ट केसांना लावावी. सुकल्यावर थंड पाण्यानं केस धुवावेत.

* केस कलर करताना ते ‘बॅलन्स’ करणंही महत्त्वाचं आहे. कारण कलर हे एक रसायन, दुसरा शाम्पू आणि तिसरा कंडीशनर. एकाच वेळी केसांवर तीन प्रकारच्या रसायनांचा वापर होत असतो. आणि म्हणूनच केस कलर केल्यानंतर केस धुण्यासाठी हर्बल शाम्पू आणि कंडीशनरच वापरायला हवं. त्यामुळे रंगातील घातक रसायनं केसांच्या मुळाशी जाण्यास प्रतिबंध होतो.

* घरच्या घरी एक उत्तम बॅलन्स पॅक बनवता येतो. यासाठी एका केळाचे बारीक केलेले काप, पिकलेल्या पपईची एक मोठी काप, पाव कप तीळाचं/ बदामाचं/ आॅलिव्हचं तेल, पाव कप नारळाचं दाटसर दूध, दोन अंड्यांचा बलक आणि लवेन्डर तेलाचे चार थेंब घ्यावेत. हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये वाटून त्याची एकजीव बारीक पेस्ट करावी. केसांच्या छोट्या छोट्या बटा करून ही पेस्ट केसांना लावावी. पेस्ट लावल्यानंतर केस पीन लावून नीट बांधून घ्यावेत. केसांवर शॉवर कॅप घालावी. आणि वीस मीनिटानंतर केस हर्बल शाम्पू आणि कंडीशनरने धुवून टाकावेत.

 (लेखिका ख्यातनाम निसर्गोपचारतज्ज्ञ आहेत)

Web Title: The natural secret of beautiful hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.