मध्य प्रदेशातून न्यू यॉर्कमध्ये...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2018 12:08 PM2018-01-04T12:08:05+5:302018-01-04T12:08:12+5:30
मध्य प्रदेशातल्या छोट्याशा गावातली मी मराठी मुलगी. अठराव्या वर्षी घरचे लग्न ठरवत होते. ते मान्य नव्हतं म्हणून घरातून बाहेर पडले. पहिल्यापासूनच मला काहीतरी ‘वेगळं’ करून पाहायचं होतं. त्याच्या शोधात सुरू झालेला माझा प्रवास थेट न्यू यॉर्कपर्यंत पोहचला..
-वैशाली शडांगुळे
विदिशा. मध्य प्रदेशातलं एक छोटंसं गाव. आता जरी सर्व सोयीसुविधा आल्या असल्या तरी त्याकाळी म्हणजे १९९६-९७ साली तिथं फारशा सोयी नव्हत्याच. बंधनं मात्र खूप. बाहेरच्या जगाचं दर्शन दुर्मीळ. शिकायचं कशाला तर सगळ्यांनाच डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हायचं म्हणून.
मला त्यात रस नव्हता. वेगळं काहीतरी करू असं डोक्यात यायचं. पण वेगळं म्हणजे काय हे कळत नव्हतं. तसंही विदिशातच राहून मला काय वेगळं करायला मिळणार होतं?
पण कशी काय हिंमत आली, काय डोक्यात आलं माहिती नाही. मी १८ वर्षांची असताना न सांगता घराबाहेर पडले. घरात माझ्या लग्नाचा विषय सुरू झाला होता. लग्न तेव्हा करायचं नव्हतं. म्हणून मग मी विदिशा सोडलं. भोपाळला आले. शहर मोठं. स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी नोकरी करणं गरजेचं होतं. सुरुवातीला हॉस्टेलमध्ये राहिले. आॅफिस असिस्टंट, कॉम्प्युटर आॅपरेटर असे जे मिळतील ते जॉब करायला सुरुवात केली. त्यातही अडचणी खूप होत्या. मुख्य म्हणजे भाषेची अडचण. मला मराठी येत होतं. हिंदी, इंग्रजी फारसं येत नव्हतं. बोलून बोलून तेही जमायला लागलं. आत्मविश्वास वाढला.
जॉब करता करता जे पैसै साठले त्यातून भाड्याच्या घरात राहायला लागले. पण पुढं कसं निभणार याची मात्र अस्वस्थता कायम असायची. त्यानंतर मग मला बडोद्याला जॉब मिळाला. तिथे एका इन्स्टिट्यूटमध्ये मी शिकवत असे.
याच काळात मला फॅशन डिझायनिंगविषयीही काही माहिती मिळाली. मी अजून माहिती मिळवली. ते क्षेत्र आवडायला लागलं. पण तिथे नेमका काय स्कोप आहे हे कळत नव्हतं. बडोद्याच्या कंपनीत काही प्रेझेंटेशन्स करायची होती. त्यानिमित्त मला मुंबईला जाण्याची संधी मिळाली. इथे मुंबईत मी केलेली प्रेझेंटेशन्स सगळ्यांना खूप आवडली. त्यातूनच काही कॉन्टॅक्ट्स मिळाले आणि मला मुंबईमध्ये नोकरीसाठी विचारणा झाली.
मी मग थेट मुंबई गाठली.
मुंबईबद्दल इथे येण्याआधी खूप ऐकून होते. एकटी कशी राहणार याबद्दल धाकधूक, काही प्रमाणात भीतीही होती. पण आपल्याला काय करायचंय याबद्दल मी पूर्णपणे ठाम होते. परत मागे फिरण्यापेक्षा मुंबईकडे पुढे जाणारा रस्ता स्वीकारला. राहायच्या जागेपासून सगळी सोय मलाच करावी लागली. इथे काही लहान-मोठे जॉब्ज केले. पण याच शहरानं मला मोठी संधी दिली. मी सुरुवातीला लहान लहान इन्स्टिट्यूटमधून फॅशन डिझायनिंग शिकण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी फारशा सोयी उपलब्ध नव्हत्या. पैशाचं गणित जमत नव्हतं. मग माझा मीच अभ्यास चालू केला. आणि त्या जोरावर आणि क्रिएटिव्हिटीच्या भरवशावर स्वत:चं छोटंसं बुटिक एका उपनगरात सुरू केलं. कष्ट होतेच. पदोपदी अडचणी होत्या. पण केलं.
लोकांना हॅण्डल करणं या क्षेत्रात खूप महत्त्वाचं असतं. त्यासाठीचा कॉन्फिडन्स माझ्याकडे अजिबातच नव्हता. तेही मी शिकले. लोकांची बरीच बोलणीही खाल्ली. त्यातूनच शिकत गेले. साथ फारशी कुणाची नव्हती, पण हिंमत कायम होती. यातूनच हळूहळू ओळख निर्माण व्हायला लागली. मात्र फॅशन डिझायनिंगचं शिक्षण न घेतल्याची खंत होती. त्यामुळे ते शिकायचंच असं ठरवून दिल्लीच्या इन्स्टिट्यूटमधून फॅशन डिझायनिंगचा डिप्लोमा केला. बुटीक सुरू केल्यानंतर १० वर्षांनी मी कोर्स करत होते. तिथेही सुरुवातीला प्रवेश नाकारला गेला. पण माझी गरज त्यांना मी सांगितली आणि प्रवेश मिळाला.
मी सगळी डिझाइन्स हातानं करायचे आणि तिथे कॉम्प्युटरवर शिकवली जात. त्यामुळे ते आत्मसात करावं लागलं. समृद्ध करणारा तो काळ होता.
तिकडून परत आल्यावर एस ब्रँड नावानं काम सुरू केलं. मी मध्य प्रदेशातून आले. तिथली संपन्न परंपरा सोबत होती. नव्या-जुन्याचा मेळ घालून काही करावं हे डोक्यात होतंच, ते केलं. आणि हळूहळू माझं कलेक्शन फॅशन वीक्समध्ये सादर करायला सुरुवात केली. माझे हातमागावरचे कपडे लोकांना आवडू लागले. मुंबई आणि दिल्लीच्या फॅशन शोपर्यंत पोहचले. हा क्षण फार मोठा होता. त्यानंतर थेट न्यू यॉर्क फॅशन वीकपर्यंत मजल मारली. मला आणि माझ्या कामाला ओळख मिळू लागली. फॅशन वीक्समधून खरं एक्सपोजर मिळायला लागलं.
मधल्या काळात अनेक वर्षांनी विदिशामध्ये परत गेले. आई-बाबांना खूप आनंद झाला. त्यांच्याच नाही, तर सगळ्यांच्याच नजरेत आता अभिमान दिसतो. घरातून पळून गेलेली मुलगी एवढं यश मिळवेल याची अपेक्षाच त्यांना नव्हती. पण ते मला जमलं याचा आनंद आहेच.
आज या सगळ्याकडे अलिप्तपणे पाहताना आपल्याला एकाच जन्मात दुसरं आयुष्य मिळालं आहे असं वाटतं. स्वप्नवत वाटतं सारंच. मी खूप महत्त्वाकांक्षी नव्हतेच. पायावर उभं राहायचं होतं. त्यासाठी सतत पुढे पाहत गेले. पुढचाच विचार केला आणि त्या शोधात मुंबईत आले. जो काळ जगले, संघर्ष केला तो आता आठवतही नाही. जे समोर आलं ते करत गेले आणि त्यामुळेच काहीतरी करू शकले.
आता न्यू यॉर्कपर्यंत पोहचले तेव्हा आपल्या कष्टांचंही सुख वाटतं..
(न्यू यॉर्क फॅशन शोमध्ये आपली डिझाइन्स सादर करणारी वैशाली सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे.)
मुलाखत आणि शब्दांकन
- भक्ती सोमण