डिटॉक्स ड्रिंकचा नवा ट्रेण्ड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2018 03:27 PM2018-03-22T15:27:41+5:302018-03-22T15:27:41+5:30
डिटॉक्स. हा शब्द सध्या तरुण जगाचाही भाग झाला आहे.
- भक्ती सोमण
डिटॉक्स. हा शब्द सध्या तरुण जगाचाही भाग झाला आहे. आपल्या शरीरातली अनावश्यक घटक जास्तीत जास्त पाणी पिऊन काढून टाकणं हे यातलं साधं सूत्र. पण ट्रेण्ड आला की, सगळेच जण गुगल करायला लागतात, डिटॉक्स ड्रिंक्स नावाचे ट्रेण्ड फेसबुकसह इन्स्टाग्रामवर झळकू लागतात. खरंतर हे तसं नवीन काहीच नाही. आपल्या आजीच्या काळातलंच सारं फिरून नव्यानं आलंय. मात्र आहे उपयोगी. त्यामुळे या उन्हाळ्यात डिटॉक्स ड्रिंक नावाचं हे पेय प्रकरण एन्जॉय करायला काहीच हरकत नाही.
वाळ्या-मोगऱ्याचं पाणी
आठवत असेल तर आपली आजी पूर्वी माठातल्या पाण्यात मस्त वाळा घालायची. मोगºयाची फुलं, तुळशीची पानं घालून ठेवायची. ते काय होतं? छान थंड सुगंधीत पाणीच. आताही तेच करायचं आहे. तेही अगदी सोपं. म्हणजे आवडत असेल तर सरळ पाण्यात संत्र्याचं किंवा मोसबीचं साल घालून ठेवायचं. किंवा लिंबाचं साल घातलं तरी चालतं. या पाण्याला मस्त गंध तर असतोच पण उत्तम डिटॉक्स आणि पाचक म्हणूनही हे पाणी काम करतं.
ताक आणि शहाळ्याची जादू
उन्हाळ्यात भरपूर पाणी पिणं तर महत्त्वाचं आहेच, पण नुस्तं पाणी प्यालं जात नाही म्हणून तर सरबतं आहेत. त्या सरबतांनाही जरा उत्तम रंगरूप दिलं तर तेही डिटॉक्सचं काम करतातच. त्यासाठी म्हणूनच उन्हाळ्यात ठरवून शहाळ्याचं पाणी नेमानं पिणं उत्तम. याशिवाय काळं मीठ-सैंधव घातलेलं ताक, साखर न घालता लिंबू मीठ पाणी हे पारंपरिक प्रकारही शरीरात उत्तम आणि डिटॉक्स म्हणून, शरीराला तकवा राहण्यासाठीही उत्तम. वाचताना हे सारं पारंपरिक वाटेलही; पण कोल्ड्रिंकचा हात सोडला तर हे सारे प्रकारच शरीरासाठी हितकारक ठरावेत.
त्वचेवर ‘ग्लो’ हवाय?
आजकाल पाणी पिताना तसेच्या तसे न पिता त्यातून शरीराला पोषक घटक मिळावेत, बॉडी हायड्रेट राखली जावी यासाठी विविध घटक पाण्यात मिसळले जातात. उन्हाळ्याच्या दिवसात असे पाणी आवर्जून पिण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. यात साखर मात्र घालायची नाही.
त्यातलंच हे एक डिटॉक्स ड्रिंक. काकडीच्या चकत्या, लिंबाच्या चक्त्या, आल्याचे छोटे तुकडे (आवडीप्रमाणे), पुदिन्याची पानं हे सारं रात्री पाण्यात घालून ठेवायचं. दुसºया दिवशी ते दिवसभर प्यायचं. वजन कमी करणं, स्किनवर ग्लो येणं यासाठीही हे पाणी उत्तम.
bhaktisoman@gmail.com