पुढच्या दहा वर्षांत ‘अधल्या-मधल्यां’ची चांदी
By admin | Published: May 14, 2014 02:16 PM2014-05-14T14:16:07+5:302014-05-14T14:16:07+5:30
मार्कशीटवर आकडे नसतील, तरी चालेल ; हातात ‘स्कील’ तेवढं पायजे!
Next
>आज लोकसभा निवडणुकीच्या निकालांचा दिवस. आज उशिरापर्यंत देशभरातून जमा होणारी आकडेवारी पुढच्या पाच वर्षांसाठी या देशाचं नेतृत्व नक्की कोणाच्या हातात असेल, याचा फैसला करील.
बाकीच्या अनेकानेक मुद्यांवर मतभेद असले, तरी ज्या देशाची लोकसंख्या सरत्या दिवसागणिक अधिक तरुण होत जाते आहे, त्या देशातल्या मतदारांच्या अपेक्षांची पूर्तता करणं, हे महाकर्मकठीण काम असेल, याबद्दल अजिबात दुमत नाही.
जागतिक मंदीच्या सावटातून बाहेर पडणार्या अर्थव्यवस्थेला गती येईल, तसं पहिलं आव्हान असेल ते रोजीरोटी शोधणार्या तरुण हातांना काम देण्याचं! नोकर्यांची मागणी आणि पुरवठा यांच्यातली दरी सांधत देशाच्या अर्थव्यवस्थेचा ग्रोथ रेट सातत्यानं वाढीस लावणं हे आव्हान सोपं नसेल. कुठल्या विकसनशील अर्थव्यवस्थेचं खरं ड्रायव्हिंग फोर्स असतात स्कील्स आणि नॉलेज अर्थात कौशल्य आणि ज्ञान हे दोन घटक. आजच्या अर्थव्यवस्थेपुढचाच नाही तर उद्योगापुढचा आणि सरकारपुढचाही एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, काम मागणार्या तरुण हातांना नव्या, बदलत्या अर्थव्यवस्थेला आवश्यक असणारी रोजगार-कौशल्यं शिकवणार कशी?
आधुनिक भारताची सर्वोच्च शक्ती ठरू शकणारं तरुण मनुष्यबळ ‘रोजगार-व्यवसाय कुशल’ बनवणं, हा आपल्या अर्थव्यवस्थेच्या वाढीशी जोडला गेलेला एक कळीचा मुद्दा बनला आहे.
यासाठीच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून केंद्र सरकारनं नॅशनल स्कील डेव्हलपमेण्ट कॉर्पोरेशन या संस्थेची स्थापना केली. पब्लिक-प्रायव्हेट भागीदारीतून चालणारा हा उपक्रम. त्यांनी केलेल्या अभ्यासानुसार या देशात २0२२ पर्यंत भारतात टप्प्याटप्प्यानं ५0 कोटी कौशल्याधारित रोजगार संधी निर्माण होणं अपेक्षित आहे. यासगळ्या रोजगार संधी तंत्रशिक्षण आणि व्यावसायिक-कौशल्यांशी संबंधित असतील.
वस्तू उत्पादन आणि सेवाक्षेत्राशी संबंधित ११ क्षेत्रं झपाट्यानं विस्तारत आहेत. या सर्वच क्षेत्रांमध्ये निकटच्या भविष्यकाळात रोजगाराच्या विपुल संधी निर्माण होतील. (त्यापैकी नऊ क्षेत्रांची माहिती आणि त्यातले रोजगार यांची विस्तृत माहिती या अंकात पुढे वाचायला मिळेल.) मात्र या विस्तारात आवश्यक असलेलं कुशल मनुष्यबळ मिळणं अवघड होतं आहे कारण नव्या क्षेत्रात काम करू शकतील, बदलती स्कील शिकून त्याप्रमाणं नव्या संधी साधतील असं मनुष्यबळ तयार करण्याचे उपक्रम आपल्याकडे कमी आहेत. ती उणीव भरून काढावी म्हणून विविध खासगी कंपन्यांच्या मदतीनं या आयोगानं छोट्या शहरात अनेक तंत्रशिक्षण अभ्यासक्रमही सुरू केले आहेत.
नॅशनल स्कील डेव्हलपमेण्ट कॉर्पोरेशनने प्रसिद्ध केलेल्या एका अभ्यासानुसार दरवर्षी एक कोटी २0 लाख तंत्रकुशल हात देशाच्या एकूण मनुष्यबळात दाखल होतात. मात्र आजच अर्थव्यवस्थेची गरज ही एक कोटी ५0 लाख इतक्या कुशल कामगारांची आहे. आणि २0२२ पर्यंत टप्प्याटप्यानं ही गरज वाढत जाणार आहे.
एकीकडे उद्योगांची कुशल कामगारांची गरज वाढते आहे आणि दुसरीकडे हाताला काम नाही म्हणून पूर्ण अल्पश्ििक्षत, अर्धशिक्षित अनेक तरुण-तरुणी घरी बसून आहेत. हातात कोणतंच कौशल्य नाही आणि पुस्तकी शिक्षणात रस नाही, उच्चशिक्षणात गती नाही म्हणून त्यांना नव्या जगात काही व्यवसायच उपलब्ध होत नाहीत.
अशा या ‘मधल्यां’साठी नव्या अर्थव्यवस्थेत आणि उद्योग व्यवसायात भरपूर रोजगार संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यातून उत्तम पैसे कमावता येऊ शकतात हे अनेकांच्या लक्षातच येत नाही.
तुम्ही आहात का असे ‘मधले’?
-म्हणजे नापासाची नामुष्की नसेल, पण पुस्तकी शिक्षणात फार रस/गती नसलेले.. चाळीस- पन्नास टक्क्यांच्या वर कधी जाऊ न शकणारे ?
आपलं नेमकं काय होईल, याचा कायम घोर लागलेले?
- तर मग पुढच्या दशकात भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये तुम्हाला खरा चान्स आहे. भविष्यात कशाला, वर्तमानाचाच विचार करा ना.. इंजिनिअर झालेले नोकरी शोधत फिरतात आणि प्लंबर, इलेक्ट्रिशियन हवा झाला घरी, तर त्याला शोधत माणसं फिरतात. एम.बी.ए. झालेल्यांवर दहा-बारा हजारात मार्केटिंगची छुटपुट कामं करायची पाळी येते आणि कोपर्यावरचा टेलर तीनशे-चारशेच्या खाली शिलाई बोलत नाही.
- तर तंत्र अवगत असणारं मनुष्यबळ सध्या मोठय़ा डिमाण्डमध्ये आहे.
२0२२ पर्यंत कुठली तंत्रकौशल्यं बाजारात हॉट असतील, याची माहिती देणारा हा अंक कामाच्या प्रतिष्ठेबद्दलच्या जुन्या कल्पना झटकून तुम्हाला नवीन विचार करायला मदत मिळावी, म्हणून मुद्दाम योजला आहे.
याचा अर्थ काय?
आपण मधल्या फळीत आहोत, आपली झेप अमुक एवढीच आहे, एखादं स्कील शिकून घेऊन त्यावर आयुष्य बेतण्याची गरज आहे हे मान्य करण्याची आणि आपल्या हाताला एखाद्या उत्तम कौशल्याची जोड देण्याची तयारी हा भविष्यातला हुकुमाचा एक्का ठरेल. तशी तयारी तुम्हाला करता यावी, नव्या वाटांवरचे नवे मैलाचे दगड दिसावेत म्हणून हा प्रयत्न आहे. तो कसा वाटला, हे कळवा आणि महत्त्वाचं म्हणजे त्यावर विचार करून उद्यासाठीचा निर्णय घ्या.. आजच!!
- ऑक्सिजन टीम