NH44 - एका रोमांचक रोडट्रिपचा ट्रेलर
By admin | Published: October 14, 2016 01:02 PM2016-10-14T13:02:44+5:302016-10-14T13:02:44+5:30
3745 किलोमीटर्स 35 दिवस 34 रात्री 11 राज्यं 7 कलंदर भटके ... एका रोमांचक रोडट्रिपचा ट्रेलर !!!
चार पत्रकार. दोन फोटोग्राफर. एक ड्रायव्हर. एकूण सात भाग्यवान लोक. एक दिवस त्यांचं आॅफिस त्यांना सांगतं, सगळी कामं ठेवा इथेच आणि पडा बाहेर! कशाला? - एक रोडट्रिप करायला. आणि तीही क्रॉसकण्ट्री. म्हणजे भारताच्या दक्षिण टोकाकडून निघायचं आणि वरवर जात थेट उत्तरेच्या टोकाला भिडायचं. डायरेक्ट श्रीनगर. ठऌ44 म्हणजे नॅशनल हायवे फोर्टी फोर. कन्याकुमारी ते श्रीनगर. देशातला सर्वाधिक लांबीचा महामार्ग. जरुरीपुरते कपडे पिशवीत भरायचे. आणि निघायचं. कुठे राहणार, कुठे खाणार-पिणार, कुणाला भेटणार.. यातलं काहीही ठरलेलं नाही. एरवी पत्रकारांचे दौरे म्हणजे सगळं शिस्तशीर नियोजन असतं. विषय ठरतात. अपॉइंटमेण्ट्स नक्की होतात. पूर्वतयारी होते. इथे पूर्वतयारी एकच : हिंमत गोळा करायची आणि निघायचं. करायचं काय? - तर रस्त्यावर भेटतील त्या माणसांशी बोलायचं. त्यांच्याबरोबर राहायचं, खायचं-प्यायचं, गप्पा काढायच्या, त्यांच्या मनात उतरायचं, त्यांची सुख-दु:खं-स्वप्नं-राग सगळं समजून घ्यायचं... मुख्य म्हणजे ही माणसं जे सांगतील, ते नीट कान देऊन ऐकायचं. प्रश्न विचारून लोकांच्या अंगावर धावून जायचं नाही. पत्रकार म्हणून त्यांना शहाणपण शिकवायचं नाही. जमलं तर त्यांच्याकडून शिकायचं. ...आणि या गोष्टींनी भरलेली पिशवी घेऊन परत यायचं. यावर्षीच्या ‘दीपोत्सव’ या ‘लोकमत’च्या दिवाळी अंकासाठी आम्ही ही स्पेशल रोडट्रिप केली. कन्याकुमारी ते थेट श्रीनगरपर्यंतची रोमांचक रोडट्रिप! या प्रवासाला गेले होते, ‘सात हिंदुस्तानी’ - मेघना, समीर, सुधीर, ओंकार, प्रशांत, अनिरुद्ध आणि मुकेश. आजच्या अंकातले त्यांच्या प्रवासाचे टे्रलर वाचाल, तर तुम्हाला या सात जणांबद्दल फारच ‘जे’(जे फॉर जेलस!!) वाटण्याची शक्यता आहे. कारण कामाचा भाग म्हणून का होईना (आणि तेही चकटफू) इतकं भटकायला कोणाला मिळतं हल्ली? - म्हटलं ना, ये तो सिर्फ टे्रलर है... पिक्चर अभी बाकी है, मेरे दोस्त!!