नितीन आणि नर्मदेची ओढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 08:51 AM2018-05-24T08:51:07+5:302018-05-24T08:51:07+5:30
रूढार्थाने घेतलेलं चांगलं शिक्षण, परदेशात ‘स्कॉलर’ म्हणून जायची संधी, परत आल्यावर चांगल्या पॅकेजेसच्या नोकऱ्या.. असं सगळं नीटच आखून रेखून घडावं तसं नितीनच्या आयुष्यात घडलं होतं. पण त्यात तो रमत नव्हता.. त्यानं नर्मदेच्या काठानं एक नवीन प्रवास सुरू केला..
- प्राची पाठक (shashwateepathak@gmail.com)
‘पापा कहते हैं बडा नाम करेगा’..
या भावनेचा ताण शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक मुला-मुलीला असतो. मुलींनासुद्धा असतो. आणि फक्त पापाच नाही, तर आई, आजूबाजूचे लोक, नातेवाईक आणि समाज असे सगळेच आपापल्या परीने दबाव टाकत असतात. जरा वेगळ्या मार्गानं कोणी जायचं ठरवलं तर त्याला/तिला ती वाट पक्की तरी माहीत असावी लागते, जे त्यावेळी सहज शक्य नसतं. नाहीतर दबाव टाकणाºया लोकांपासून स्वत:ला तोडून घ्यावं लागतं. एकटेपणाचा सामना करावा लागतो. स्ट्रेस, डिप्रेशन असे सगळे दुरून दुरून जाणलेले शब्द प्रत्यक्ष स्वत:त घडतांना दिसू लागतात. त्यातूनदेखील झगडून सुसज्ज तयार बाहेर पडावं लागतं किंवा काही जण असहाय्य होऊन शरणागती पत्करतात.
रूढार्थाने घेतलेलं चांगलं शिक्षण, परदेशात ‘स्कॉलर’ म्हणून जायची संधी, परत आल्यावर चांगल्या पॅकेजेसच्या नोकºया असं सगळं नीटच आखून रेखून घडावं तसं नितीनच्या आयुष्यात घडलं होतं. पण त्यात तो रमत नव्हता. त्याच्या आजूबाजूच्या मित्रांनादेखील असंच सगळं मिळालेलं असूनही ते फारसे खूश नाहीत. त्यांच्या आयुष्याविषयी याचं काय कारण असावं हे त्याला अस्वस्थ करत होतं. मटेरिअलिस्टिक आयुष्यात जे जे टप्पे असतात, ते ते चढायचे का, कशासाठी, या टप्प्यावर तो इतरांना आणि स्वत:ला जोखत थांबला होता. केवळ पैसा पैसा करणं किंवा जगण्यासाठी फक्त धावत सुटणं त्याला मान्य नव्हतं. युरोपात गेल्यावर वेगवेगळे देश आणि लोकांचं जगणं पाहूनदेखील त्याला काही प्रश्न पडले होते. तिथल्या ओपन हाउस इव्हेंटमध्ये भारताबद्दल बोलायची संधी मिळाल्यावर आपल्याला आपल्या देशाबद्दल फार काही माहिती नाही, हे त्याच्या लक्षात आलं. एकीकडे मनात आपलंच शहर, राज्य, देश जाणून घ्यावं हे येत होते आणि दुसरीकडे नोकरी, त्यातील आव्हानं आणि नोकरीत असलेल्या इतरांचं ते जगत असलेल्या आयुष्याबद्दल नाखूश असणं हे सगळे नितीन नीटच न्याहाळत होता. एका क्षणी त्यानं ठरवलं हे चक्र तोडायचं आणि सरळ बॅग उचलून घरी निघून आला.
गुजरातमधल्या भरु चला राहणारा नितीन टेलर. त्याची ही गोष्ट. चांगल्या पगाराची नोकरी सोडून आल्यावर कोणालाही ते न आवडणं, नेमकं तुला करायचं तरी काय आहे, पैसे कमावलेच पाहिजेत, करणार काय दिवसभर.. अशा सगळ्या प्रश्नांच्या भडिमारातून तो गेला. बराचसा एकटादेखील पडला. पोराच्या डोक्यावर तर परिणाम झालेला नाही ना, म्हणून समुपदेशक आणि चक्क मनोविकारतज्ज्ञ अशाही फेºया करवल्या गेल्या. तो शांतपणे नर्मदेच्या किनारी जाऊन बसत असे. विचार करत असे, कसं जगायचं आहे आपल्याला? नदी वाहत जाते, असंच आयुष्यदेखील वेगवेगळ्या वळणांना स्वत:हून आपल्याला तारून नेईल, असंही आणि तसंही. तर काहीतरी छान घडवत आपण एक वेगळा प्रवाह बनवता येतो का ते बघावं, हे मनाशी पक्कं होत गेलं त्याचं. बी टेक, मग एमटेक, मग कॉलेजात पाचएक वर्षे शिकवणं, मग इंटरनॅशनल स्कॉलर म्हणून स्वीडनच्या विद्यापीठातील एका कोर्ससाठी निवड, बंगळुरूस्थित एका अमेरिकन स्टार्टअपमध्ये नोकरी असं सगळं सोडून नितीन नर्मदेची साद ऐकत बसला होता.
त्यातच भरूच, अंकलेश्वर परिसरात शिक्षण आणि आरोग्य या विषयांत काम करायची संधी त्याला मिळाली. दोन- अडीच वर्षे हे काम केल्यावर नितीनने भारतभ्रमण केलं. भारतातील वेगळ्या वाटेनं जाणारे, कोणत्या तरी क्षेत्रात भरीव काम करणारे लोक पाहिले. विविध जागृती यात्रांमध्ये भाग घेतला. असंच काहीतरी आपण नर्मदेच्या किनारी आपल्याच शहरात आणि परिसरात करावं हे निश्चित करून त्यानं ‘सर्व्हे हॅपिनेस फाउंडेशन’ची स्थापना २०१४ साली केली. भरूच आणि गुजरातमध्ये विविध ठिकाणी फिरून नवनवीन संस्था शोधून काढल्या. वेगळ्या वाटेनं जाणारे रोल मॉडेल्स शोधले. त्यांच्याकडून प्रेरणा घेता येईल अशा प्रेरणा यात्रा नदीच्या किनाºयानं सुरू केल्या. त्यात ग्रामीण युवकांचा कौशल्य विकास कसा होईल यावर जास्त भर होता. प्रत्यक्ष त्याच परिसरात सुरू असलेले विविध ग्रामोद्योग आणि चांगल्या संस्था यांची ओळख या तरु णांना करून दिली.
अतिशय दुर्गम भागातले तरु ण यासाठी निवडले. हळूहळू विविध नद्यांच्या परिसरात असलेले असेच रोल मॉडेल्स इतरही लोकांना प्रेरणादायी ठरतील म्हणून तापी यात्रा, नर्मदा प्रेरणा यात्रा सुरू केल्या. आजवर नऊ प्रेरणा यात्रा नितीनने आयोजित केलेल्या आहेत. या यात्रांमध्ये सहभागी होणारे लोकदेखील त्यांच्या त्यांच्या स्तरावर चौकटीबद्ध आयुष्यातून काहीतरी वेगळं घडवतात आणि स्वत:च नवे रोल मॉडेल्सदेखील होत जातात, असाही त्याला अनुभव आलाय. सोशल आंत्रप्रीनर, कॅपॅसिटी बिल्डिंग, इन्क्युबेशन सेंटर, स्किल डेव्हलपमेंट असे वेगवेगळे मोठाले शब्द नितीन स्वयंप्रेरणेने करत असलेल्या कामाला जोडले जाऊ लागले. त्यालाही त्यातून खूप काही शिकायला मिळतेय. हळूहळू तो विविध ठिकाणी वर्कशॉप्स घेऊ लागला. मार्गदर्शन करण्यासाठी जाऊ लागला. त्यातून थोडेफार पैसे मिळू लागले. त्याला त्याच्या आयुष्याचं ध्येय मिळत गेलं. त्याचं मॉडेल स्वयंपूर्ण होत आहे. विविध लोक जोडले जात आहेत. घरातच त्याचं छोटंसं आॅफिस आहे. टीव्हीवर मुलाखती, टॉक शो सुरू झाल्यावर शेजारपाजारच्या लोकांचं ‘तरु ण मुलगा घरात बसून करतो काय?’ हे कुतूहल मिटलं एकदाचं. ऐन उमेदीच्या काळात जगभरातील संधी बाजूला सोडून, महिन्याच्या महिन्याला मिळणारा ठरावीक पगार नाकारून स्वत:च्या परिसरात काहीतरी निर्माण करायची नितीनची धडपड वाखाणण्याजोगीच आहे!
त्याच्या या उपक्रमाच्या अधिक माहितीसाठी http://www.servehappiness.org ही वेबसाईट बघता येईल.
नितीनच्या या उपक्रमानं मलाही साद घातली आणि मीही त्या नर्मदा यात्रेला जाऊन आले.. नर्मदा या नदीच्या नावातच ‘नर्म ददाति’ आहे. आनंददायिनी, सुख देणारी ती नर्मदा. भारतात इतर कोणत्याही नदीची परिक्र मा होत नाही. झाली, तरी इतकी प्रसिद्ध नाही जितकी नर्मदेची परिक्र मा आहे. रुढ अर्थाने परिक्र मा अशी नाही; पण नर्मदेच्या साक्षीने, नर्मदेच्या काठाने, आपल्या स्वत:च्या शहरातून वाहणाऱ्या नर्मदेसोबत काहीतरी काम केलं पाहिजे या हेतूनं नितीन टेलर यानं ‘नर्मदा प्रेरणा यात्रा’ सुरू केली. ‘सर्व्ह हॅपिनेस फाउण्डेशन’ या त्याच्या फाउण्डेशनमार्फत २०१४ सालापासून ते आजवर नऊ वेगवेगळ्या प्रेरणा यात्रा झालेल्या आहेत. नर्मदेच्या काठाने असणाºया विविध संस्थांची ओळख, वेगळ्या पद्धतीने आयुष्य जगणारे रोल मॉडेल्स यांची भेट, प्रत्यक्ष नर्मदेच्या पात्रात एक छोटी परिक्र मा, जेणेकरून प्रत्यक्ष नदीचा अनुभव घेता येईल, असं सगळे या परिक्रमेत असतं.
यावर्षी २३ मार्च ते २५ मार्चदरम्यान ही नर्मदा प्रेरणा यात्रा पार पडली. मीही या यात्रेत सहभागी झाले. नर्मदा तीन राज्यांमधून वाहते. त्यातील गुजरातमधील टप्प्यात चैत्र महिन्यात उत्तरवाहिनी परिक्र मा केली जाते. हाही एक धागा या यात्रेला जोडण्यात आला. अमरकंटकला उगम पावणारी नर्मदा भरूच जवळ समुद्राला जाऊन मिळते. नर्मदा प्रेरणा यात्रेची सुरु वात झाडेश्वर मंदिर परिसर, भरूच इथून झाली. मंदिराच्या मागेच नर्मदेचं पात्र आहे. भरूचचे शेंगदाणे प्रसिद्ध आहेत. त्यामुळे, पहिली भेट या शेंगदाण्याच्या कारखान्याला सहभागी सदस्यांच्या विनंतीवरून झाली. त्यातून भरूचची काहीतरी गमतीदार, चटपटीत ओळख तर झालीच; पण इतर सदस्यांनादेखील एकमेकांशी बोलायला, ओळख करून घ्यायला जरा स्पेस मिळाली. त्यानंतर भरूच शहराजवळ असलेल्या सरदारनगर प्राथमिक शाळेला भेट देण्यात आली. इथे तर शाळेच्या गेटपासूनच विविध प्रयोग आवारात केलेले दिसतात. विद्यार्थ्यांसाठी निरनिराळ्या प्रकारचे उपक्र म राबविले गेले आहेत. हे सगळं काय आहे, ते जाणून घ्यायची छान संधी ही शाळेची भेट देते. त्यानंतर झगडिया येथील सेवा रुरल या संस्थेची ओळख आपल्याला होते. भारतातल्या सर्वोत्तम सामाजिक संस्थांपैकी ही एक संस्था आहे. सामाजिक स्वास्थ्य आणि स्त्रियांच्या सबलीकरणासाठी विविध उपक्र म येथे राबविले जातात. इथल्या हॉस्पिटलमार्फत दिल्या जाणाºया सेवांची आपल्याला ओळख होते. याच संस्थेचे विवेकानंद ग्रामीण तकनिकी केंद्र आहे. गुमानदेव या ठिकाणी असलेल्या केंद्राची आणि त्या केंद्रात सुरू असणाºया विविध ट्रेड्सची सफर केली जाते. आदिवासी मुलांना कौशल्य विकास प्रशिक्षण आणि रोजगाराची खात्री हे केंद्र देते.
दुसºया दिवशी गुमानदेवचे प्रसिद्ध हनुमान मंदिर पाहून दिवस सुरू होतो. राजपिपला येथे हरसिद्धी मातेचंही प्राचीन मंदिर आहे, जे गरुडेश्वरच्या ईशान सेंद्रिय शेताच्या मार्गावर आहे. त्यामुळे, आसपासच्या परिसराची सांस्कृतिक झलक मिळते. ईशान सेंद्रिय शेत एका छोट्या टेकडीवर आहे. परदेशातील नोकरी सोडून कोणती प्रेरणा घेऊन ही शेती सुरू झाली, तिची बलस्थानं काय आहेत, कोणती उत्पादने विक्र ीसाठी ठेवता येऊ शकतात, या सगळ्याची छान ओळख प्रत्यक्ष शेतावर जाऊन आपल्याला होते. इथे दारातच मोठा शमी वृक्ष आहे. तिथपासूनच आपण तिथल्या निसर्गात आणि शेतीतल्या प्रयोगांमध्ये गुंतून जातो. पर्यावरणस्नेही आणि शाश्वत जीवनशैली बद्दल भरपूर काही बोललं जातं. प्रत्यक्ष अशी जीवनशैली अंगिकारणारे लोक मात्र क्वचितच दिसतात. साकवा या गावातील धीरेन सोनेजी यांच्या कुटुंबाला दिलेली भेट फारच अनोखी ठरते. घरात केलेले छोटे छोटे प्रयोग, ग्रामोद्योग, स्वत:पुरतं अन्न पिकवणं, साधी राहणी हे सगळे अंगिकारलेले चालते-बोलते रोल मॉडेल्स आपल्याला भेटतात. इथे विचारांना भरपूर खाद्य मिळाल्यावर आपण थेट राजपिपला येथील राजवंत राजवाड्यातच जातो. तेथील प्रिन्सला भेटतो. त्यांच्या नजरेने त्यांचे प्रश्न, आयुष्य समजून घेतो. राजपिपलाचा इतिहास समजून घेतो.
तिसºया दिवशी नर्मदेची उत्तरवाहिनी परिक्र मा एकवीस किलोमीटरच्या पट्ट्यात केली गेली. रामपुरा ते गोपालेश्वर या भागात नर्मदा नदी उत्तर दिशेने वाहते, हा भौगोलिक संदर्भ लक्षात घेऊन नर्मदा नदी खळाळती ठेवण्यासाठी आपल्या परीने आपण काय काय करू शकतो, एकूणच नद्यांच्या आरोग्याबद्दल जाणीव-जागृती, असे सगळे या निमित्ताने साधलं जातं.
अर्थात, हे सगळं करायचं तर रोज पहाटे उठून एकवीस-बावीस किलोमीटर चालायची तयारी मात्र हवी.
वेगळ्या वाटेनं जायची इच्छा असणारे विविध क्षेत्रातले देशभरातून आलेले लोक आणि प्रत्यक्ष वेगळ्या वाटेनं चालणाºया रोल मॉडेल्स सोबत चर्चा, विविध भेटी, सकारात्मक काही अशी रिफे्रशिंग बौद्धिक सफर या नर्मदा प्रेरणा यात्रेत होते.
खºया अर्थानं ही यात्रा डोक्याला भरपूर खाऊ पुरवते..