बडबड प्रचंड कृती शून्य! -असं होतंय का तुमचं?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 04:32 PM2019-05-30T16:32:14+5:302019-05-30T16:32:22+5:30
मी हे करणार ते करणार, मला हे येतं, ते तर माहितीच आहे, घरच्यांना काही कळत नाही, मी पळूनच जाणार आहे, तसाही मी काही दिसायला बरा नाही म्हणून लोक कमी लेखतात अशा भलत्याच भ्रमात अडकवून नुस्ते ढिम्म बसून राहणारे अनेकजण. त्यांना सांगावंसं वाटतं, भय्या, पहलो निकलो तो सही, कुछ काम तो करो!
-प्राची पाठक
(लेखिका मानसशाशास्त्राच्या अभ्यासक आहेत)
सेल्फी नावाचं एक सदर ऑक्सिजन पुरवणीत लिहीत होते . प्रत्येक लेखाला येणार्या बहुसंख्य मेलमध्ये अनेकजण लिहीत की, आमच्या मनातलंच लिहिलं. आम्हाला असंच वाटतं की, पळून जाऊ का? घरच्यांशी पटत नाही, तसं मला सगळं माहितीये, सल्ले नकोत. फक्त ऐकून घ्या..
त्यासार्या मेल्समध्ये अनेकांनी झगडून उभ्या केलेल्या आयुष्याची चित्रंही दिसत. काही यशोगाथा भेटत, काही प्रश्नांचे सैल झालेले गुंते दिसत. मात्र बहुसंख्य तरुण मुलांच्या मनात मात्र दिसे खळबळ. आणि त्यापुढचा एक अॅटिटय़ूड आय नो ऑल, मला सगळं येतं !
केवळ माहिती हाताशी आहे असं वाटणं आणि आपल्याला खरोखरच एखादं स्किल येणं हे वेगळं असतं, याची जाणीव अनेकांना नसते. त्यामुळे दोष देणं किंवा आपण कसे बिच्चारे परिस्थिती किंवा नशिबाने पोळलेलो आहोत, असं वाटून पळवाट शोधणारेही अनेक.
त्यासार्या इमेल्समधून हाती लागलेले हे आजच्या तारुण्याचे काही प्रश्न. काही समज. काही गैरसमज.
जाऊ का पळून?
‘दूर कुठेतरी पळून जावंसं वाटतंय’ हा एक किडा अनेकांच्या डोक्यात वळवळत असतो. जे सुरू आहे, त्यातून दिलासा मिळावा अशी अनेकांची तळमळ असल्याचे जाणवते.
‘पकलो यार’,
‘बोअर झालंय एकदम’,
‘ब्रेक पाहिजे, तेच ते रूटीन कंटाळवाणे झालंय, असं सतत का वाटत असतं अनेकांना? यावर खरं तर विचार व्हायला हवाय. इतकं साचलेपण का येतं मनाला? सतत थोडय़ाथोडय़ा काळाने असं का होत जातं? आपली गाडी मुळातच रडत खडत सुरू असेल तर पळून जावंसं वाटण्यानं तिच्यात आणखीनच बिघाड होतील, हे समजून घेतो का आपण? नादुरु स्त गाडीने वेगळा प्रवास विशेष झेपत नसतो. ती समजून उमजून आणि मोजून मापून घेतलेली रिस्क नसते. उगाच भावनेच्या आहारी जाऊन काहीतरी करून बसणं कायमच शरीर मनाला परवडेल असं नाही. एका ठिकाणाहून उठून दुसरीकडे पळून गेलोही समजा, तर त्यातसुद्धा कालांतराने असंच पळून जावंसं वाटायला लागेल. मुद्दा पळून जावंसं वाटण्याचा नसतो, मुद्दा आपल्या मनाच्या खेळांचा असतो अनेकदा. त्यामुळे आहे तिथेच राहून पळून जावंसं का वाटतंय, त्यावर काम करणं जास्त फायदेशीर ठरू शकतं. जम के लढाई तो करनी पडती हैं भाई!
घरच्यांशी पटतच नाही !
घरात आईवडिलांशी, बहीण, भावांशी फारसं न पटणं नेहमीचंच झालंय. आजूबाजूला असंख्य मित्न असणं, हातातल्या मोबाइलमध्ये अनेक सोशल ग्रुप्स असणं आणि तरीही मनातलं बोलायला कोणी नसणं, हेही नेहमीचंच. या विषयांची सातत्याने मांडणीसुद्धा केली जाते आणि तरीही तेच ते मुद्दे सतत समोर येत राहतात. त्यामानाने पर्याय शोधून, आपल्यात डोकावून संवाद कौशल्य सुधारलेल्या तरुण मुलांची उदाहरणं फारच कमी प्रमाणात समोर येताना दिसतात. का होतो हा लोचा, हे चटचट सांगता येतं अनेकांना; पण आपापल्या स्तरावर आपापली उत्तरं शोधून पुढे जाणार्या लोकांच्या गोष्टी त्यांच्यापाशीच राहतात. एखादी सायकल शिकायला जसा सराव करावा लागतो, तशीच मेहनत आणि सातत्य आपल्या घरात आपलं संवाद कौशल्य विकसित करायला लागू शकतं, हे लक्षात घेतलं जातं का? तिथेही पडून-झडूनच शिकता येत असतं. घरात संवाद साधताना काय चुका होतात हा विचार करतो का आपण? आपल्याला आपलंच बरोबर असं कायमच कसं वाटू शकतं? दुसर्यांची काय बाजू आहे? आपली बाजू त्यांच्यार्पयत पोहोचवायचे काय मुद्दे असू शकतात? कोणत्या पद्धती असू शकतात? त्यावर गप्पा मारतो का आपण? त्या त्या लोकांशी थेट आणि आपल्या मित्न-मैत्रिणींशीसुद्धा? मग ही गॅप भरून निघणार कशी? मला समजून घेणारं कोणीच नाही, हा एक आपणच आपल्याभोवती विणलेला गोड गोंडस फुगा असू शकतो कधी कधी. तो फोडून प्रत्यक्ष संवाद साधायला शिकलं तर घरातसुद्धा उत्तम मैत्न गवसायची एक शक्यता असते. करून तर पाहा.
कसली बोअर दिसतेय/दिसतोय?
जास्त गंभीर प्रश्न असतात लूक्सबद्दल. सेल्फी काढण्याच्या सोयीमुळे तर विविध प्रकारे आपले फोटो आपणच काढून किंवा कोणाकडून काढून घेऊन तपासता येतात. शेकडो हावभाव करून आपण कसे दिसतो फोटोंमध्ये, ते निरखता येतं. तरीही सतत आपल्याला आपल्यात काही कमी आहे आणि आपण फारसे बरे दिसत नाही असे वाटत असेल तर त्याही डोक्यातल्या किडय़ांना जरा नीटच समजून घ्यावं लागेल. नेमकं काय टोचत असतं आपल्याला? का? आपण कोणत्याच अँगलने जराही बरे दिसत नसतो की काय? इतकी निगेटिव्हिटी आपल्याच लूक्सबद्दल का जाऊन बसते मनात? इतरांचे चकचकीत फोटो पाहून हा लोचा होतोय का आपल्यात? जरा विस्कटून मांडावे लागतील हे सर्व प्रश्न. आपल्याशीच. आपल्यालाच जरा स्माइल देता येणं शिकायला लागेल. हेही सर्व मनाचेच खेळ सुरू असतात, ते बजावून सांगावं लागेल स्वतर्ला.
मला सगळं माहितीये !
करिअरचा विषय निघाला की, एकतर आपल्याला सगळ्यातलं सगळं माहीतच असतं किंवा कशातलंच नेमकं काय निवडावं ते ठरवता येत नसतं. नेमकं काही ठरवता न येणं हे एकवेळ ठीकच असतं. त्यावर मदत घेता येते, तज्ज्ञांचं ऐकता येतं; पण माहितीचा डोंगर आपल्या डिव्हाइसेसमध्ये कोंबून कोंबून भरून आता आपल्याला सगळ्यातलं सगळं एकदम उच्चप्रतीचं माहिती झालंय, हा आविर्भाव मनात येत असेल तर आपणच आपल्याला रेड सिग्नल दिला पाहिजे. माहितीपलीकडेसुद्धा काही महत्त्वाचं असतं आणि ते आपल्याला अपुरं माहीत असू शकतं किंवा माहिती नसूही शकतं या शक्यतांचा विचार करणं कधी शिकणार आपण? आपल्याला काय करायचं आहे, हे एकदम फिक्स प्लॅन आखल्यासारखं क्वचितच कोणाला माहीत असतं. आपली वाट चुकू शकते. कालांतराने ती सापडूही शकते. कधी तर खूपच उशिराने साक्षात्कार होऊ शकतो. इट इज ऑल ओके. पण म्हणून हेही नको आणि तेही नको, असा रडीचा डाव खेळण्यात काहीच अर्थ नाही. आपल्याला हवं तसं घडेल आणि मगच आपण कामाला लागू, या कोषातून बाहेर पडायलाच लागतं. कामं करत करत, स्वतर्ला अपडेट करत करत जात असताना अचानक आपल्याला हवं ते साधायची सगळी सामग्री आपल्या हाताशी येते आणि त्यात उत्तरोत्तर प्रगती साधता येते. म्हणूनच रडगाणी गात बसण्यात तसा अर्थ नाही. मनाला एक बजावत राहायचं - भैया, जो भी हैं, जैसा हैं, ठीक ही हैं. पहले निकल तो पडो..