इव्हेण्ट नको, उत्सव हवा!

By admin | Published: July 28, 2016 05:20 PM2016-07-28T17:20:58+5:302016-07-28T17:47:10+5:30

गणरायाच्या आगमनाचं नियोजन करताना आपल्याला नक्की कसा उत्सव हवाय, याचाही विचार करायला हवा!

No event, no festivities! | इव्हेण्ट नको, उत्सव हवा!

इव्हेण्ट नको, उत्सव हवा!

Next

 - रोहित नाईक

आता पुढचे काही दिवस चर्चा फक्त गणेशोत्सवाची! आत्ताच अनेक मेसेज विविध व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्सवर फिरू लागलेत. गणेशोत्सव कसा साजरा करायचा याचं प्लॅनिंग, वर्गणी, स्पॉन्सर्स याची चर्चा जोरात सुरू होते. हा खरं तर कुणा एकाचा नाही साऱ्या महाराष्ट्राचा प्रमुख सण. घरोघरी बसणाऱ्या गणपती बाप्पामुळे महाराष्ट्रात दहा दिवस चैतन्याचे वातावरण असते. संपूर्ण समाजाला एकत्रित, एकाच मंडपात आणताना एकात्मतेची शिकवणच या उत्सवानं दिली.
परंतु गेल्या काही वर्षांपासून हा सार्वजनिक गणेशोत्सव पाहताना एक विचार नेहमी मनात येतो की, खरंच आज हा ‘उत्सव’ एक उत्सव राहिला आहे का? की दरवर्षी आम्ही एक नवीन ‘इव्हेंट’ आयोजित करतो? ज्या विचाराने सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली होती, त्या विचारांचं पालन आज होतं का? गणेशोत्सवाचं रूप झपाट्यानं बदलत भजन, टाळ-मृदंग, ढोलकी अशा पारंपरिक वाद्यांची जागा ‘डीजे’नं कधी घेतली कळलंच नाही. पूर्वी गणेशोत्सवासाठी वर्गणी गोळा करायचे. आज काहीजण त्याकडे ‘वसुली’ या नजरेने पाहतात. याचा आपल्याला विचार करण्याची गरज आहे.
हा सण खरंतर आपल्या संस्कृतीचा भाग आहे. मांगल्याचं प्रतीक आहे. मात्र तरीही मंडपात पत्ते खेळणं, कलागुणांना वाव म्हणून वेस्टर्न म्युझिक डान्स कॉम्पिटिशन ठेवणं, विसर्जन मिरवणुकीत ‘मुन्नी - शीला’ व ‘शांताबाई’सह आयटम सॉँगवर नाचणं तेही विशेष ‘एनर्जी’ घेऊन! आणि या साऱ्यात आपण तरुणच अनेकदा आघाडीवर असतो. त्यात सध्या नवसाचा राजा या ‘कन्सेप्ट’ने तर धुमाकूळच घातलाय. इतका की हल्ली गल्लोगल्लीत ‘नवसाचा राजा’ पाहायला मिळतो. तिथं रांगा लागतात आणि नवा इव्हेण्ट सुरू होतो.
मुंबईत तर गणेशमूर्तींवरून वेगळीच स्पर्धा दिसून येते. जितकी मोठी मूर्ती तेवढे आपले मंडळ फेमस असा विचार करून उंचच्या उंच मूर्ती हमखास मुंबईत दिसतात. आणि या साऱ्यात सागरी पर्यावरणाचा विचारही केला जात नाही.
एकूण काय, गणेशोत्सव असो, दहीहंडी असो, नवरात्र असो की अन्य कोणताही सण असो, त्या सणाचं पावित्र्य राखूनच त्याचा आनंद जल्लोषात साजरा करायला हवा. आपल्याला सण-उत्सव-आनंद हवा की नुस्ते झगमगीत इव्हेण्ट हवेत याचा विचार आपण साऱ्यांनीच करायला हवा! आपण तरुणच या उत्सवातलं चैतन्य, त्यातला आनंद आणि ऊर्जा मनापासून टिकवू शकतो. 

इव्हेंटची हंडी

एखाद्या सणाचं महत्त्व न जाणून प्रसिद्धीसाठी चढाओढ केली तर तो सण इव्हेंट बनतो आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘दहीहंडी’. सुरुवातीला चाळी-चाळींमध्ये, गल्लीगल्लीमध्ये साजऱ्या होणाऱ्या या उत्सवाचं काही वर्षांतच इव्हेंटमध्ये रूपांतर झाले. लाखो-लाखोंच्या हंड्या फुटू लागल्या. बक्षिसांचा वर्षाव सुरू झाला आणि खरा उत्सव त्यात हरवून गेला.




आॅक्सिजन आता वाचा
रोज, आॅनलाइन!



आता ‘आॅक्सिजन’ तुम्हाला रोज वाचता येईल!
रोज भेटता येईल. रोज नवनवीन लेख वाचता येतील.
आपला हवाहवासा मित्र रोज भेटण्याचा आनंद 
कमवताना ही भेट कुठेही, कधीही 
चोवीस तास होऊ शकते याची खात्रीही बाळगता येईल!
आणि आमच्या संपर्कात राहत 
आपल्या मनातलं व्यक्तही करता येईल!

www.lokmat.com इथं रोज.. नियमित..
ही रोजची भेट अजिबात चुकवू नका!

- आॅक्सिजन टीम

 

Web Title: No event, no festivities!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.