No Girls ऑन द ग्राउण्ड

By admin | Published: June 1, 2017 11:38 AM2017-06-01T11:38:32+5:302017-06-01T11:38:32+5:30

मुलं शाळेतून येतात, कॉलेजातून येतात, दप्तर फेकतात आणि मस्त मैदानावर खेळायला जातात. त्यांना त्या खेळात करिअर करायचं नसतं, फक्त खेळायचं असतं! तसं मुली का खेळत नाहीत? मैदानावर बिन्धास्त खेळण्यात प्रॉब्लेम काय आहे?

No Girls on the Ground | No Girls ऑन द ग्राउण्ड

No Girls ऑन द ग्राउण्ड

Next
- गौरी पटवर्धन
 
स्थळ :
गावातलं किंवा गावाबाहेरचं कुठलंही मैदान किंवा विशेष रहदारी नसलेला रस्ता.
वेळ : 
ऊन नसलेली कुठलीही / किंवा ऊन असलेली पण असू शकते. 
दिवस : 
सुटीचा.
 
अशा वेळी अशा ठिकाणी काय दृश्य दिसतं आपल्याला?
मुलांची टोळकी खेळत असतात. 
बहुतेक ठिकाणी क्रिकेटचाच डाव मांडलेला असतो. क्वचित कुठेतरी फुटबॉल असतो. कधीतरी आडवी दोरी बांधून व्हॉलिबॉल चाललेला असतो. मुलं सायकली चालवत असतात. पतंगांचे दिवस असतील तर पतंग उडवत असतात. थोडक्यात सांगायचं तर नुसता कल्ला चाललेला असतो. 
 
***
स्थळ : 
नदी / तलाव / धरण / कालवा / विहीर / पाट / समुद्र / खाडी 
वेळ : 
खरं तर कुठलीही, पण शक्यतो सकाळ किंवा संध्याकाळची. 
दिवस : 
उन्हाळ्यातला.
अशा वेळी अशा ठिकाणी काय दृश्य दिसतं आपल्याला?
तीन-चार वर्षांच्या मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत अनेकजण कपडे काढून त्या पाण्यात डुंबत असतात. कोणी पोहत असतं, कोणी सूर मारत असतं. धमाल चाललेली असते. आणि यातल्याच अनेक ठिकाणी, थोडंसं लांबवर सात-आठ वर्षांपासूनच्या मुली कपडे धुवत असतात. भांडी घासत असतात. पाणी भरत असतात. डोक्यावरून हंडे वाहत असतात. मोठ्या बहिणीच्या किंवा आईच्या हाताशी मदतीला उभ्या असतात.
***
हाच प्रकार व्यायामशाळांमध्ये! 
मुलगे हवा तसा व्यायाम करत असतात, पण मुलींनी मात्र व्यायामशाळा आतून बघितलेली पण नसते. मुलं टोळकं करून किंवा एकेकटी बिनधास्त रस्त्यांवर धावत असतात किंवा सायकली घेऊन फिरत असतात आणि मुली मात्र एकाच ठिकाणी फारतर घराच्या अंगणात किंवा खिडकीत (तेही अंगण किंवा खिडकी असेल तर) बसून बाहेरच्या जगाकडे बघत असतात.
*** 
का?
असं का?
असे प्रश्न कधी पडतात का आपल्याला?
शाळेतून आलं, दप्तर फेकलं आणि मस्त बाहेर खेळायला गेलं असं मुलींच्या बाबतीत का होत नाही? मैदानावर जाऊन मुली का खेळत नाहीत?
आपणही मैदानावर खेळावं असं त्यांना वाटत नसेल का? मग त्यांना हे सगळं का करता येत नाही? आपण समाज म्हणून नेमकं काय वागतो? असं काय करतो की या गोष्टींची इच्छासुद्धा मुलींच्या मनात येऊ नये?
मुख्य म्हणजे असे प्रश्न तरी आपल्याला कधी पडतात का?
आणि पडतच नसतील तर का पडत नाहीत?
सांगा ना, मुली मैदानावर का खेळत नाहीत?
 
मैदानावर मनसोक्त खेळणाऱ्या, हसऱ्या मुली दिसतात का?
आपल्याकडे सगळीकडे अशीच परिस्थिती का असते, असा प्रश्न पडतो का कधी आपल्याला? जिवाची तगमग होणाऱ्या उन्हाळ्यात छान गार पाण्यात डुंबावं असं मुलींना वाटत नसेल का? संध्याकाळी जरा गार हवा सुटल्यावर कानात वारं भरलेल्या वासरासारखं सुसाट पळत सुटावं असं त्यांना वाटत नसेल का? आपणही मैदानावर खेळावं असं त्यांना वाटत नसेल का? मग त्यांना हे सगळं का करता येत नाही? समाज म्हणून आपण असं काय करतो की या गोष्टींची इच्छासुद्धा मुलींच्या मनात येऊ नये?
समजा एखादी १५ वर्षांची मुलगी म्हणाली मी पण जाते पोहायला तर काय होईल? १५ मिनिटात सगळं गाव तमाशा बघायला तिथे येऊन उभं राहील. लोक कसे बघतील हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. काय कॉमेंट्स करतील ते पण सगळ्यांनाच माहिती आहे. तिला कुठे कुठे कसे स्पर्श होतील हे पण सगळ्यांनाच माहितीये. पण या सगळ्यात तिचं काय होईल हे माहितीये का कोणाला? 
बरं पोहायचं जाऊ द्या! ग्राउंडवर लंगडी खेळायला? पतंग उडवायला? क्रि केट खेळायला? तिथेही काही फार वेगळे अनुभव येत नाहीत मुलींना. समजा एखादी मुलगी गेलीच खेळायला तर तिचं काय होतं ते माहितीये का कोणाला?
तिचं नाव खराब होतं. 
तिचं लग्न होण्यात अडचणी येऊ शकतात. 
घरातले लोक तिचं बाहेर पडणंच बंद करून टाकू शकतात. 
सगळं जग तिला हसतं. 
तिच्यावर, तिच्या कपड्यांवर, तिच्या शरीराच्या अवयवांवर अतिशय गलिच्छ भाषेत कॉमेंट्स होतात.
कुठे तिला मारहाण होऊ शकते. 
‘सुधारण्यासाठी अघोरी बाबाकडे’ नेलं जाऊ शकतं. 
किंवा याहूनही इतर बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. पण वाढीच्या वयात आणि त्यानंतरही शरीराला व्यायाम न मिळाल्यामुळे आपल्याकडच्या बहुतेक सगळ्या मुलींचं काय होतं माहितीये का कोणाला?
ते कोणालाच माहिती नसतं. कारण त्याबद्दल कोणीच विचार करत नाही.
आता हे सारं वाचून लगेच काहीजण म्हणतील की, ‘काहीही काय! आज आपल्या मुली आॅलिम्पिकमध्ये मेडल्स कमावतात. वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकतात. अगदी डिस्ट्रिक्ट लेव्हलपासून मुलींच्या खेळाच्या स्पर्धा होतात. आणि तरी तुम्ही असं कसं म्हणता की मुलींना मोकळेपणाने खेळायला मिळत नाही म्हणून?
पण चित्र तसं नाही. एक लक्षात घ्यायला पाहिजे की स्पर्धेसाठी, फोकस ठेवून, ठरवून एक क्र ीडाप्रकार शिकणं हा एक प्रकार झाला. त्यात काही जणी भाग घेतात. त्यांची संख्या मुलांच्या तुलनेत किती, हा वेगळा प्रश्न. पण इथे तो मुद्दाच नाही आहे. इथे मुद्दा असा आहे की शाळेतून किंवा कॉलेजमधून आलं की दप्तर टाकायचं, काहीतरी खायचं आणि मैदानावर जायचं. तिथे मनसोक्त खेळायचं आणि दमून घामेजून घरी यायचं हे मुलांना जितकं सहज मिळतं तितकं ते मुलींना मिळतं का? अनेकदा तर मुलींना मागूनसुद्धा मिळत नाही. उलट मुलींनी खेळणं म्हणजे काहीतरी भयंकर वाईट असतं असं इतकं पक्कं डोक्यात भरवलेलं असतं की आपणसुद्धा खेळावं असं मुलींच्या मनातसुद्धा येत नाही. 
पण मुली खेळतच नाहीत तेव्हा काय होतं?
कधीच व्यायाम न केलेल्या, कधीच मोकळ्या हवेत न खेळलेल्या या मुली पुढचं सगळं आयुष्य त्याची किंमत मोजत राहतात. थोडं काम केलं की अनेकजणींचं अंग दुखतं. काहींची पाठ दुखते, हातपाय दुखतात. पण त्यांना आयुष्यभर काम तर करावंच लागतं. मग सतत होणारा कुठलातरी त्रास सहन करत त्या घरची आणि बाहेरची कामं रेटत राहतात. अनेक जणींना मासिक पाळीचा खूप त्रास होतो. तोही त्या कायम अंगावर काढतात किंवा त्यासाठी वेदनाशामक औषधं घेत राहतात. बाळंतपण हा तर बहुतेक बायका/मुलींसाठी अतिशय त्रासदायक अनुभव होऊन बसतो. त्यातून उद्भवणारी दुखणी त्यांना उरलेलं आयुष्यभर त्रास देत राहतात.
खूप बारीक असणाऱ्या किंवा चमत्कारिक लठ्ठ झालेल्या या मुली अतिशय निस्तेज दिसतात. व्यायाम केल्यामुळे घाम येऊन शरीरावरची रंध्र मोकळी होऊन त्वचा सतेज दिसते. ते या मुलींच्या बाबतीत कधीच घडत नाही. आणि मग कितीही वेळा ब्यूटिपार्लरच्या वाऱ्या केल्या तरी चेहऱ्यावर ‘ग्लो’ येत नाही. महागडा मेकअपसुद्धा त्वचेचा निस्तेजपणा लपवू शकत नाही.
व्यायाम केल्यामुळे शरीराला सहज एक डौल येतो. तो न आल्यामुळे मुली बेढब दिसतात. कुठल्याच फॅशनचे कपडे त्यांना चांगले दिसत नाहीत. त्यात स्वत:च्या शरीराबद्दलची लाज नकळत्या वयापासून मनावर बिंबवलेली असल्यामुळे खांदे पाडून चालणं, पोक काढून उभं राहणं, सतत अंगाभोवती ओढणी, पदर, स्कार्फ गुंडाळून घेणं हा प्रकार असतोच.
या दोन्हीमुळे होतं काय? 
तर मुलींचा आत्मविश्वास जातो. आपल्यावर कुठलं संकट आलं तर आपण दहा पावलं पळूसुद्धा शकत नाही हे मुलींना नीट माहिती असतं. मग त्या त्यांची सुरक्षितता सोडून इतर काही करायच्या फंदात पडतच नाहीत. आणि मुळात संस्कृती आणि परंपरेने करकचून बांधलेलं त्यांचं आयुष्य अजून अजून आवळलं जातं. शरीराबद्दलची लाज मनात अजून पक्की होत जाते आणि ती काय अवस्थेला पोचते हे सांगितलं तरी खरं वाटणार नाही.
वयाच्या तिशी-पस्तिशीतच अनेक शारीरिक व्याधींनी ग्रासलेल्या या मुलींना/ बायकांना डॉक्टर सांगतात की दुखणं कायमचं बरं करायचं असेल तर व्यायाम करायला पाहिजे. आणि डॉक्टर साधे साधे व्यायाम सांगतात. उदा. हात शरीराला समांतर आडवे धरा आणि खांद्यातून फिरवा. मागून पुढे दहा वेळा आणि पुढून मागे दहा वेळा. पण अनुभव असा येतो की अनेक जणींना असे हात फिरवता येत नाहीत. इन फॅक्ट स्वत:चे हात शरीराला समांतर धरणे एवढा शारीरिक मोकळेपणा त्यांनी कधी अनुभवलेलाच नसतो. वाकण्याच्या व्यायामासाठी पायात अंतर घेऊन उभे राहा असं सांगितलं तर त्यांना तसं करायची लाज वाटते. कारण पायात दीड फूट अंतर ठेवून उभं राहायचं ही कृती त्यांनी शाळेतल्या पीटीच्या तासानंतर कधीच केलेली नसते. 
स्वत:चे हात फिरवता येत नाहीत, कमरेतून वाकता येत नाही, जमिनीवर उठता- बसताना आधार लागतो, वजन उचलता येत नाही, जरा भरभर चालता येत नाही अशा केविलवाण्या अवस्थेला आपण आपल्या देशाची ५० टक्के लोकसंख्या वयाच्या चाळिशीतच आणून ठेवतो. 
या शारीरिक कमकुवतपणाबरोबर तितकीच त्रासदायक ठरते ती मानसिक कुचंबणा! मुलींनी मोकळ्या हवेत खेळायचं नाही, पावसात बिनधास्त भिजायचं नाही, मनमोकळं धावायचं नाही, सायकल चालवायची नाही, मोठ्याने गायचं नाही, हसायचं नाही... 
जगण्याच्या कुठल्याच बाजूचा बिनधास्त मनमोकळा आनंद न मिळालेल्या मुलींची मानसिक अवस्था काय असेल? सगळं जग आपल्याविरु द्ध आहे, आपल्या आनंदाच्या आड येतंय असं त्यांना वाटत नसेल का? आणि तसं वाटणं चुकीचं तरी कसं म्हणता येईल? जे छोटे छोटे आनंद बरोबरीच्या मुलांना विनासायास मिळतात आणि मला मात्र ते केवळ मुलगी म्हणून नाकारले जातात हे दिसतं तेव्हा किती संताप होत असेल बंड करावंसं वाटत असेल. पण सगळाच समाज विरोधात आहे हे दिसल्यावर त्याची भीती वाटत असेल आणि शेवटी कदाचित अगतिक पराभूत मन:स्थितीत त्या आपलं स्त्रीजन्माचं प्राक्तन स्वीकारत असतील. या सगळ्यातून कशा प्रकारचा समाज निर्माण होईल? सुदृढ तर नक्की नाही. 
मग का करतो आपण असं? 
मोकळेपणाने वावरण्याचा मुलींचा मूलभूत अधिकार आपण का काढून घेतो? 
मुली मोकळेपणाने खेळल्या तर आपल्याला का त्रास होतो इतका? 
या सगळ्या प्रश्नांची स्वत:शी तरी प्रामाणिकपणे उत्तरं शोधूया का केव्हातरी?
 
(गौरी मुक्त पत्रकार आहे.)
 
 

Web Title: No Girls on the Ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.