नको ही नोकरी; पण मग पुढे काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 08:00 AM2020-11-19T08:00:00+5:302020-11-19T08:00:16+5:30

सध्या जवळपास ५० टक्के कर्मचारी ऑफिसमधील तणावाने बेजार आहेत. त्यात वाढलेले खर्च आणि ईएमआयचा बोजा. नोकरी टिकवण्याची मजबुरी. यातून वाट कशी काढणार?

No job; But what next? | नको ही नोकरी; पण मग पुढे काय ?

नको ही नोकरी; पण मग पुढे काय ?

googlenewsNext

-विनोद बिडवाईक

ऑफिसमधील बरेचसे तणाव हे परिस्थितीचे भान न आल्यामुळे वाढतात. सध्या जवळपास ५० टक्के कर्मचारी ऑफिसमधील तणावाने बेजार आहेत. त्यात आधुनिक जीवनपद्धतीमुळे वैयक्तिक आयुष्यात स्वतःबद्दल असणाऱ्या अवाजवी अपेक्षा अनावश्यक तणावाला आमंत्रण देत आहेत. जीवनमान उंचावल्याचा अभिमान प्रत्येकाला असतो; परंतु महागडी घरे, मोठमोठ्या गाड्या, महागडे गॅझेट्स हेच म्हणजे आपलं उन्नत जीवनमान असं अनेकांना वाटतं. त्याशिवाय दुसऱ्यांसोबत तुलना, ती महागात पडतेय. सोशल मीडियावर महागड्या टूअरचे आणि संपत्तीचं प्रदर्शन करणं अनेकांना आवडतं. मात्र हे करताना त्या साऱ्याचे ईएमआय भरणं, त्यासाठी करावे लागणारे कष्ट, ऑफिसमध्ये जॉब टिकवण्यासाठी करावी लागणारी धडपड आणि बॉसची लाचारी हे सर्व आपोआप कार्यसंस्कृतीचे महत्त्वाचे भाग झाले आहेत.

परिणाम? - वाढलेला तणाव

कोविडमुळे जवळपास ७० लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. काही दिवस नवलाचा वाटलेल्या वर्क फ्रॉम होमचा आता कंटाळा आला आहे. आता नोकरी टिकवून ठेवणे ही प्रायोरिटी झाली आहे. आता प्रत्येकाला भविष्याची चिंता सतावत आहे. त्यात अतिशय वेगाने होणारी तांत्रिक प्रगती अनेकांच्या नोकरीचा घात करणार हे उघड आहे.

सध्या तीन गोष्टी कर्मचाऱ्यांमध्ये उघड दिसतात-

१) कमालीची अनिश्चितता आणि भविष्याबद्दल न करता येणारी भाकिते

२) त्यामुळे होणारा भावनिक कोंडमारा

३) अशी परिस्थिती कशी सांभाळावी याचे अज्ञान

 

माणसाच्या भावनिक प्रतिक्रियेवर या तीन गोष्टी प्रभाव टाकत असतात. या स्थितीत आपले तर्क, समस्येचे निराकरण आणि योग्य विचार करण्याची क्षमता क्षीण होऊ शकते. मग सुरू होतं प्रतिक्रिया देणं. राग, क्रोध, निराशा, दुसऱ्याबद्दलचा मत्सर, भीती आणि टोकाच्या परिस्थितीत पॅनिक अटॅकच्या रूपात अनेक गोष्टी बाहेर पडतात. असं म्हणतात की रागीट माणसे मुळात घाबरलेली असतात आणि क्रोध हा त्यांची संरक्षण यंत्रणा असते.

 

रागाचे, क्रोधाचे, व्यवस्थापन कसे करावे, हा मात्र नेहमीचा विषय असतो. आपली बुद्धिमत्ता कितीही स्ट्रॉंग असली, माणूस कितीही हुशार असला तरीही अनेकांना या भावना हाताळता येत नाहीत. त्यासाठी भावनिक बुद्धिमत्ता कमवावी लागते. या असुरक्षित काळात आपल्या करिअरला गती देण्यापासून नोकरी वाचवण्यापर्यंत या बुद्धिमत्तेची गरज आहे.

कल्पना करा की आपला मेंदू धरणाप्रमाणे आहे, पाण्याचा एक मोठा साठा या धरणात (या रूपकात,

पाणी आपला राग आहे). कधीकधी, धरणावर लहान क्रॅक आणि लहान गळती सुरू आहे आपल्या लक्षात येते.

जे आपण सहजपणे दुरुस्त करू शकता; परंतु आपण पुरेसे लक्ष दिले नाही तर धरण फुटेल.

जर आपला राग तो फुटण्यापूर्वी पकडला तर आपण त्यावर नियंत्रण ठेवण्यास सक्षम असू; परंतु धरण फुटण्याची वाट बघितली तर त्याचा परिणाम भयानक होऊ शकतो. ते भावनिक ट्रीगर लवकर पकडणे, शिकणे सर्वात महत्त्वाचे कौशल्य आहे. नकारात्मक प्रतिक्रिया सकारात्मक प्रतिक्रियेत परावर्तित कशी करता येईल हे शिकणे म्हणजे आयुष्याचे व्यवस्थापन. ते जमले तर अनेक गोष्टी सोप्या होतील.

-------------------------------------------------------------------------------------------

४ गोष्टी विसरू नका

१) राग कधी येतो?

आपण स्वतःला किती ओळखले हा गहन प्रश्न आहे. जगाला, इतरांना समजून घेण्याच्या नादात आपण स्वतःकडे खूप दुर्लक्ष करत असतो. आपला स्वभाव कसा आहे, स्वतःचे गुण-दुर्गुण कोणते आहेत, आपल्या भावनिक प्रतिक्रिया कशा असतात हे सर्व समजून घ्या. स्वतःला केव्हा राग येतो हे समजले तरी खूप.

२) तो असा का वागला?

आपण स्वतःला समजून घेतले, मग पुढे काय? येथे आपल्याला फक्त इतरांच्या जागी स्वतःला समजून विचार करावा लागेल. एखादा काही बोलला असेन, बॉसने रागावले तर त्यामागे काहीतरी परिस्थिती आणि त्या व्यक्तीची मानसिक अवस्था असते. कदाचित बॉसला त्याच्या बॉसने रागावले असेल आणि तोच राग आता आपल्यावर तो काढत असेल. सहअनुभूती हा शब्द येथे योग्य आहे. लोकांना समजून घेणे महत्त्वाचे असते.

३) कुठून येतो राग?

स्वतःच्या भावनांचे नियंत्रण आणि व्यवस्थापन जे सर्वात कठीण काम आहे. एखादी घटना घडली, त्याचा प्रभाव आपल्यावर होणार, परिस्थिती वाईट असेल तर आपल्या भावना ट्रीगर होणार आणि रिस्पॉन्स म्हणून आपण रागावणार, निराश होणार. मग आपण त्यावर कोणत्यातरी स्वरूपात प्रतिक्रिया देणार; पण लक्षात ठेवा राग ही प्रतिक्रिया आहे. भावना कदाचित निराशा असू शकेल. प्रश्न आहे ती भावना आपण कशी ओळखतो.

४) प्रतिसाद द्या..

इतरांची भावनिक स्थिती समजून घेणे, त्यांचा भावनिक प्रतिसाद ओळखणे महत्त्वाचे. आपण आपल्या भावना दाबून ठेवू शकत नाही; पण त्या नियंत्रित करू शकतो, ती मदत आपण इतरांनाही करू शकतो.

 

(लेखक ह्युमन रिसोर्स आणि व्यवस्थापनतज्ज्ञ असून, अल्फा लावल ह्या बहुराष्ट्रीय संस्थेत उपाध्यक्ष या पदावर कार्यरत आहेत.)

vinodbidwaik@gmail.com


 

Web Title: No job; But what next?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.