NO SMOKING is स्टायलिश

By admin | Published: June 8, 2017 11:38 AM2017-06-08T11:38:15+5:302017-06-08T11:38:15+5:30

वयात येतानाच तंबाखू सेवनाची सवय अनेकांचा घात करते. आणि त्यातून ते व्यसन सारं तारुण्य पोखरून टाकते, हे आजच्या भारतातलं चित्र आहे..

NO SMOKING is stylish | NO SMOKING is स्टायलिश

NO SMOKING is स्टायलिश

Next

तंबाखू हे तसं आपल्याकडचं अत्यंत आम व्यसन. तरुण मुलांमध्येही सर्रास दिसतं. म्हणून तर अलीकडेच झालेल्या जागतिक तंबाखू दिनाची थीमही ‘तंबाखू - प्रगतीतला अडथळा’ अशीच होती. विकासाच्या वाटेवर धोकादायक ठरणारी ही तंबाखू. भारतातही तरुण मुलांचं तंबाखू सेवन ही अत्यंत चिंतेची बाब आहे. 


ग्लोबल युथ टोबॅको सर्व्हे हे आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्यात आलेलं विविध देशांतील तंबाखू सेवनाच्या सवयीचं सर्वेक्षण. १३ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये तंबाखू सेवन किती आहे याचा अभ्यास यात करण्यात आला. भारतात या वयातले १४.६ टक्के विद्यार्थी कोणत्या न कोणत्या स्वरूपात तंबाखू सेवन करतात असं आढळलं. म्हणजे इतक्या लहान वयापासून, खरंतर वयात येतानाच हे व्यसन सोबत करूलागते. 


आपल्या देशात तंबाखू सेवनामुळे होणारे आजार हा सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा आहे. त्यात स्मोकिंगचे प्रश्नही आहेतच. धूम्रपानामुळे आजूबाजूच्या व्यक्तींना त्रास होतो. त्यामुळे इतर व्यक्तींच्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. विडीच्या धुराचा जास्त त्रास होतो. अशा मुलांमध्ये वारंवार श्वसन मार्गाचे आजार होऊ शकतात. धूम्रपानामुळे आजूबाजूच्या व्यक्तींना होणाऱ्या त्रासाला एक्सपोजर टू सेकण्डहॅण्ड स्मोकिंग असं म्हणतात. प्रत्येकाने आपल्या अवतीभवती, घरामध्ये कुणी धूम्रपान करत असेल तर त्यांना सांगायला हवं की, तुमच्या पिण्यानं आम्हालाही त्रास होतो आहे. हा केवळ तुमचा नाही तर आमच्याही आरोग्याचा प्रश्न आहे. 


मुख्य मुद्दा म्हणजे कुणी कितीही आग्रह केला तरी आपण हे व्यसन करायचं नाही. त्यात स्टायलिश आणि मॉडर्न असं काहीही नाही. तंबाखूमुक्त आयुष्य जगणं, आपण नॉन स्मोकर असणं हे जास्त स्टायलिश आहे.


आपण आणि आपले मित्रमैत्रिणी या अर्थानं स्टायलिश आणि मॉडर्न असणं गरजेचं आहे.
पुण्यात पेस या संस्थेच्या वतीने विविध शाळांमध्ये मुलामुलींसाठी व्यसनजागृती उपक्रम राबविले जातात. त्यातही असं आढळतं की योग्य वयात माहिती पोहचली तर मुलं या व्यसनापासून लांब राहतात.


सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तंबाखूचं व्यसन असेल तर त्यातून सुटण्यासाठी वैद्यकीय मदत घेता येते. बऱ्याच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील संलग्न रुग्णालयांत मानसोपचार विभागात या व्यसनमुक्तीसाठी मदत मिळू शकते. मुंबईतील टाटा मेमोरिअल हॉस्पिटलमधील प्रिव्हेण्टिव्ह आॅनकोलॉजी विभागात एक टोबॅको सेसेशन क्लिनिक चालवलं जातं. काही दंत महाविद्यालयांतही या सुविधा उपलब्ध आहेत.
मुद्दा हा की आपल्याला व्यसन सोडायचं असेल तर मदत मिळू शकते. गरज आहे ती आपल्या इच्छाशक्तीची. 

सावधान...
तंबाखू सेवनानं अनेक आजार होतात. तोंडात पांढरे चट्टे येणं, तोंड उघडण्यास त्रास होणं, सतत येणारा त्रासदाय खोकला, श्वसननलिकांचे आजार, रक्तवाहिन्या व हृदयावर परिणाम होऊन उच्च रक्तदाब, हृदयविकार, मेंदूचा रक्तपुरवठा कमी झाल्यास अर्धांगवायू, पचनसंस्थेचे व मूत्रपिंडाचे आजारही होऊ शकतात. तोंडाच्या विविध भागातील उदा. जीभ, गाल, श्वसननलिका, स्वरयंत्र, अन्ननलिका, फुप्फुसे यांचा कर्करोग होऊ शकतो.

- डॉ. नीता घाटे, कान-नाक-घसातज्ज्ञ आणि पेस संस्थेच्या सदस्य 


 

Web Title: NO SMOKING is stylish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.