अजून न झालेला शिक्षक
By admin | Published: February 19, 2016 03:05 PM2016-02-19T15:05:47+5:302016-02-19T15:29:02+5:30
डीएड करून शिकलो खूप, पण शिक्षक नाही झालो. आता आयुष्य नवेच धडे शिकवतं आहे.
Next
>
डीएड ऐन भरात होतं, खेडय़ा-पाडय़ात या कोर्सला मानाचं स्थान होतं त्याकाळी. मीही पदवीचा अभ्यासक्र म अर्धवट सोडून डीएडला गेलो. त्याआधी लाजराबुजरा असणारा मी डीएडच्या दोन-अडीच वर्षात मात्र एक संपूर्ण नवीन आयुष्य जगल्यासारखा जगलो. त्या वर्षात दुनियादारीचे नियम शिकायला मिळाले. मित्रपरिवार, चांगल्या-वाईटाची ओळख, जीवनमूल्य, समजली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माङयासारख्या भित्र्या मुलात चार लोकांपुढे उभं राहून बोलण्याची हिम्मत आली. अगोदर कुठेही मंचावर न गेलेलो मी नंतर मात्र नाटकात भाग घेऊ लागलो. मंचावर कविता सादर करू लागलो.
पण आमचं डीएड झालं आणि नेमकी तेव्हापासूनच या कोर्सला उतरती कळा लागली. आमच्यापासूनच नवीन अभ्यासक्रम, आंतर्वासिता, सीईटी असे प्रयोग सुरू झाले. आंतर्वासितेच्या काळात सहामासासाठी दीडहजारी शिक्षक होण्याची संधी आम्हाला मिळाली. त्याकाळात शाळांमध्ये चालणारा कारभार जवळून पाहता आला. शिकणारी मुलं, न शिकविणारे काही शिक्षक, चांगल्या शिक्षकांसाठी मुलांचं प्रेम, शिक्षकाभोवती पडणारा मुलांचा गराडा हे सारं प्रत्यक्ष अनुभवता आलं. आणि एक समाधान मिळालं की, उद्या शिक्षकाची नोकरी जरी नाही मिळाली, आपण कुठं फुटाणो जरी विकत असलो तर भेटल्यावर ही मुले ‘सर, पाच रु पयांचे फुटाणो द्या,’असं आदरानंच म्हणतील.
दुर्दैव असं की डीएड करून चार वर्षे लोटली पण नोकरी नाही.
गावाकडील लोकांमध्ये मात्र अजूनही डीएड म्हणजे हमखास नोकरी, असा गोडसमज आहे. गावाकडे गेलं की ते त्याची विचारणाही करतात. वाट पाहत न थांबता आता इतर स्पर्धा परीक्षांकडे मी वळलोय. नोकरीसाठी प्रयत्न सुरूच आहेत. खरं सांगतो, डीएड करून आज बेरोजगार असलो तरी तो अभ्यास करताना आयुष्याचा एक सुवर्ण काळ, एक संपूर्ण जीवन जगल्याचं समाधानही मनाला आहे.