अनाहूत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2018 05:00 PM2018-01-31T17:00:28+5:302018-02-01T16:06:40+5:30
लैंगिक शिक्षणाची गरज काय हे सांगणारा एक अस्वस्थ अनुभव
- माधुरी पेठकर
उमेश बगाडे. त्याला लहानपणापासून गोष्टी सांगायला आवडतात. त्याच्या हातात आता शॉर्ट फिल्मसारखं प्रभावी माध्यम आहे. आता तो नुसती गोष्ट सांगत नाही तर त्यातून काहीतरी महत्त्वाचं मांडण्याचाही प्रयत्न करतो. त्याच प्रयत्नात त्यानं दोन शॉर्ट फिल्म केल्या. पहिली चौकट आणि दुसरी अनाहूत. उमेशच्या या अनाहूत शॉर्ट फिल्मला नुकताच फिल्मफेअर (पॉप्युलर अवॉर्ड फॉर नॉन फिक्शन कॅटिगिरी) पुरस्कार मिळाला आहे.
२० मिटिांची फिल्म. अनाहूत. मधू नावाच्या किशोरवयीन मुलीची ही गोष्ट. लैंगिक शिक्षणाची गरज काय? याविषयी बोलते. मधूच्या शाळेत लैंगिक शिक्षण विषयावर बोलायला सामाजिक संस्थेतल्या डॉ. मैत्री येतात. मुख्याध्यापिका आणि शिक्षकांना त्या हे सांगतात की विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षण देणं किती महत्त्वाचं आहे, पण काही शिक्षकांना वाटतं की या वयात मुलांना असल्या शिक्षणाची गरज नाही. अडनिड्या वयातल्या त्यांच्या समस्यांचं निरसन करण्यास शाळा समर्थच आहे. डॉ. मैत्रींनी काही सांगण्याची गरज नाही. शेवटी डॉ. मैत्री आणि त्यांच्या सहकाºयांना केवळ विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीची परवानगी दिली जाते.
आरोग्य तपासणी करताना डॉ. मैत्रींना आठवीत शिकणारी मधू भेटते. पोट दुखत असल्यानं शाळेतून घरी जाण्याची परवानगी मिळालेली मधू भावाची वाट पाहात असते. मधूच्या चेहºयावरचे भाव ओळखून डॉ. मैत्री तिच्याशी बोलतात. बोलता बोलता डॉ. मैत्रींच्या लक्षात येतं की मधूवर घरातच लैंगिक अत्याचार होतोय. शंकेपोटी त्या मधूची तपासणी करतात त्यात आठवीतली मधू गर्भवती असल्याचं आढळतं.
लैंगिक शिक्षणाची गरजच नाकारणाºया मुख्याध्यापक आणि शिक्षकांना मधूच्या आयुष्यातल्या या अनाहूत अपघातानं हादरा बसतो. त्यांना बसतो तोच धक्का फिल्म पाहताना आपल्यालाही बसतो.
उमेश सांगतो, ‘मित्रानं शाळेतल्या एका हेल्थ चेकअपदरम्यानचा प्रसंग सांगितला. तो ऐकून मी हादरलो. मग अनेक शाळांमध्ये गेलो. तिथल्या शिक्षकांशी, शाळेतल्या मुला-मुलींशी, त्यांच्या पालकांशी बोललो. डॉक्टरांना, समुपदेशकांनाही भेटलो. लैंगिक शिक्षणाची आजची स्थिती आणि त्याची गरज यावर भाष्य करणारी फिल्म बनवण्याचं मग मी ठरवलं.
आपल्या फिल्ममधून समाजासमोर काही एक महत्त्वाचा विचार ठेवण्याचा प्रयत्नही तो करतो. तोच विचार त्यानं त्याच्या पहिल्या ‘चौकट’ या फिल्ममधूनही मांडला आहे.
चौकट ही फक्त घरा दारालाच नसते. आपल्या मनालाही असते. रूढी-परंपरांच्या, धारणांच्या, पूर्वग्रहांच्या अनेक चौकटी असतात. या चौकटीत राहून वागणारी माणसं साचेबद्ध, कट्टर किंवा अगदी खलनायकही वाटू शकतात; पण खरंच ती तशी असतात की निव्वळ चौकट त्यांना तसं वागायला भाग पाडते. ती चौकट मोडता येते का आणि मोडलीच तर जगाकडं छान, प्रसन्न नजरेनं पाहता येतं का, हेच तो या फिल्ममधून मांडतो आहे.
चौकट हीच या शॉर्ट फिल्मची हिरो आहे आणि व्हिलनही. ही चौकट घरातून अंगण आणि अंगणातून घर दाखवते. घरात बघितलं तर दिसतं की घरातली एक बाई देवाच्या नैवेद्यासाठी पुरण करतेय. अंगणात एक वृद्ध याचक चतकोर भाकरीसाठी ताटकळलेला आहे. चौकटीच्या आतली बाई त्याला सांगते, ‘देवपूजेआधी काहीही मिळणार नाही’. चौकटीबाहेरचा याचक देवपूजा आटोपणाच्या प्रतीक्षेत बाहेर बसून राहतो. ते पाहून घरातील बाई त्याच्या हातात शिळ्या भाकरी ठेवते. पुन्हा पूजेच्या आणि नैवेद्याच्या कामात गढून जाते. यथासांग पूजा आणि नैवेद्य होतो. सहज म्हणून ती बाहेर डोकावते तर तिनं दिलेली शिळी भाकरी खाऊन तृप्त झालेल्या त्या म्हाताºयानं भाकरीचं ॠण फेडायचं म्हणून अख्खं अंगण झाडून ठेवलेलं असतं. तो जात असतो.
हे बघून चौकटीआतली स्त्री अस्वस्थ होते. रितीरिवाजांच्या चौकटीत अडकून दारात आलेल्या याचकावर अन्याय केल्याची भावना तिला छळायला लागते. एका क्षणी तर देवासमोरचं नैवेद्याचं ताट घेऊन धावते. पण दाराची चौकट पुन्हा तिला अडवते. ते दारंही ती जोरजारात धक्के देऊन उघडते...
फिल्मच्या सुरुवातीला काहीतरी अडवून धरणारी चौकट शेवटच्या दृश्यात मोकळी होऊन प्रसन्न हसताना दिसते. १२ मिनिटांचा हा लघुपट. यात मोजून ७ संवाद. केवळ दृश्यांच्या माध्यमातून हा लघुपट संवाद साधतो. एक अनुभव देतो.. वेगळाच!
उमेश बगाडेची ‘अनाहूत’ ही २० मिनिटांची शॉर्ट फिल्म पाहण्यासाठी ही लिंक https://www.filmfare.com/awards/short-films-2018/finalists/anahut-uncalled/2389
ही फिल्म पाहण्यासाठीची लिंक https://youtu.be/AKjsT8-8GYM
madhuripethkar29@gmail.com