योग नावाच्या नव्या इंडस्ट्रीत करिअरच्या संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 02:43 PM2018-06-21T14:43:40+5:302018-06-21T14:43:40+5:30
योग ही आता एक करिअर संधी आहे. आपल्याकडे जर पॅशन असेल तर योगाच्या या ग्लोबल लाटेवर स्वार होण्याची संधीही मिळू शकते.
- राहुल रनाळकर
योग ही आता एक इंडस्ट्री बनते आहे आणि तिची व्यापकता सध्या दिवसेंदिवस वाढतेय. आरोग्याशी संबंधित जागरूकता, योगाचा प्रचार- प्रसार हे सारं पाहता नव्या काळात योग करणारे आणि योग शिकवणारे असं मिळून एक नवीन व्यवसाय क्षेत्र तयार होणार आहे. अर्थात काहीच येत नाही, चला योग करू पैसे कमावू असं करणार्या थातूरमातूर लोकांना इथं स्थान नाही. मात्र ज्यांना या विषयाची आवड आहे, त्यातलं पॅशन कळतं त्यांच्यासाठी मात्र अनेक नवीन संधी येत्या काळात असतील असं दिसतं आहे.
योगातील करिअर असा विचार करताना मात्र हे लक्षात घ्यायला हवं की ही काही हमखास पगाराची, नाकासमोरची नोकरी नाही. योग विषयात एखादी पदवी, पदविका किंवा प्रमाणपत्न मिळवल्यानंतर प्रत्येकाला नोकरी मिळेलच हे सांगता येत नाही. संधी आहेत पण अमुक करून तमुक होऊ अशी सोय आजतरी नाही. शाळा, कॉलेजचा विचार केला तरी अजूनही पूर्णवेळ योगशिक्षक नेमणं सुरू झालेलं नाही. काही मोजक्या शाळा, कॉलेजेसमध्ये स्वतंत्न योगशिक्षक आहेत. अन्य सगळ्या ठिकाणी पीटीच्या शिक्षकांकडून योग शिकवला जातो; पण भविष्यात असे स्पेशलाइज्ड शिक्षक असण्याची शक्यता आहे.
असोचेम या संस्थेनं केलेल्या एका सर्वेक्षणानुसार केवळ भारतात तीन लाख योगशिक्षकांची कमतरता असून, प्रत्यक्षात पाच लाख योग विशेषज्ञांची गरज आहे. दक्षिण-पूर्व आशियातील देशांत भारतीय योगशिक्षकांना संधी आहे. अर्थात, इंग्रजी भाषेत योग शिकवण्यात निपुण असणं हे बायडिफॉल्ट आलंच. चीनमध्ये तीन हजार भारतीय योगशिक्षक कार्यरत आहेत. मात्न त्यातील बहुतेक हरिद्वार, ¬षिकेश येथील आहेत. या दोन्ही ठिकाणी जगातील सर्वाधिक योग स्कूल आहेत. सध्या युरोप, अमेरिकेसह सर्वच खंडांमध्ये योग वेगानं लोकप्रिय अन् स्वीकारार्ह बनतोय. त्यामुळे योग एक्स्पर्टची मागणीही वाढतेय. फक्त अमेरिकेचा विचार करता एक वर्षात 9.9 बिलीयन अमेरिकन डॉलर्स म्हणजे सुमारे 55 हजार कोटी रुपये एवढी उलाढाल योगक्षेत्नात होतेय. अन्य देशांतील विस्तार पाहता ही उलाढाल आणखी महाकाय असेल हे उघड आहे.
मुद्दा काय, शारीरिक-मानसिक स्वास्थ्यासाठी योगासनं शिका, ती कराच. पण हे एक नवीन करिअरचं दालन आपल्यासमोर खुलं होतंय. आगामी काळात या क्षेत्रात फक्त देशांतर्गतच नाहीत तर ग्लोबल संधी आहे हे आपल्याला माहिती असलेलं बरं.
आजच्या योग दिनाच्या निमित्तानं त्या संधींवरही एक नजर टाकलेली बरी!
संधी कुठं?
योग संपूर्णपणे शिकायचा झाल्यास त्यासाठी योग्य आणि प्रशिक्षित शिक्षकांची गरज असते. योगशिक्षक स्वतर् ही योगव्यवसाय सुरू करू शकतात. योगच्या प्रशिक्षण देणार्या संस्थांमध्येही योगशिक्षकांची गरज असते. या शिवायही खालील ठिकाणी योगा एक्स्पर्टना संधी मिळते. योग रिसर्च सेंटर, योग अकादमी, हेल्थ रिसॉर्ट्स, हॉस्पिटल्स, जिम, खासगी आरोग्य केंद्र, हौसिंग सोसायटय़ा, कॉर्पोरेट सेक्टर, कॉर्पोरेट घराणी, प्रसिद्ध व्यक्तींचे योगगुरु या सगळ्या ठिकाणी योग ट्रेनर्स म्हणून संधी मिळू शकते.
पात्रता काय हवी?
* योग एक्स्पर्टला कोणत्या व्यक्तीला कोणती योगासनं करायला सांगायची याचं अचूक ज्ञान असणं अत्यंत गरजेचं आहे. यात चूक झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
* प्राणायाम, ध्यानधारणा हे विषय संवेदनशील असल्यानं किती प्रमाणात आणि कोणी करायचे हे योगशिक्षकाला माहीत असणं आवश्यक आहे.
* योग शिकू इच्छिणारे बर्याचदा अलौकिक, पारलौकिक अर्थानं योगाकडे पाहत असतात. त्यामुळे त्यांना मन अन् शरीर यांचा समन्वय या योगाच्या मूळ तत्त्वाकडे आणण्याचे जिकिरीचे काम अत्यंत सावधपणे, सहजपणे करावं लागतं. ही बाब अत्यंत कठीण मानली जाते. त्यासाठी योगशिक्षकाची जडणघडणही या प्रकारची व्हायला हवी. नसेल तर ती शिकून-समजून घेण्याची तयारी हवी.
* योग एक्स्पर्ट बनण्यासाठी एखादा कोर्स केल्यानंतर जसाजसा तुमचा अनुभव वाढत जाईल, त्यातून नवीन संधी उपलब्ध होत जातील.
* स्वतर् योग जीवनशैली काही प्रमाणात तरी आत्मसात करायला हवी. त्यासाठीची मानसिकता तयार करूनच या क्षेत्नात प्रवेश करावा.
इन्स्टण्ट योगचे फॅड
* अन्य कुठेही काही जमत नाही म्हणून चला योगच्या फिल्डमध्ये जॉब करू, असा विचार असल्यास हाती निराशा येण्याचीच शक्यता अधिक आहे.
* सध्या योगचा फुगवटा अधिक दिसत असला तरी बहुतेकांना इन्स्टण्ट योगा हवा असतो, म्हणजे महिनाभरात वजन कमी करणारी योगासने वगैरे. पण योगात लगेच बदल घडून येत नसतो. त्यातील सातत्य महत्त्वाचं आहे. अर्थात, योगामध्ये आसनांची लोकप्रियता अधिक आहे. पण जेव्हा योग सर्वागाने शिकला-शिकवला जातो, तेव्हा त्याचं महत्त्व अधिक वाढतं. युरोपियन देश आणि अमेरिका, चीनमध्येही योगाच्या शारीरिक अंगावर अधिक भर देण्यात येतो, त्यामुळे योग तत्त्वज्ञानाला आसनांशी जोडणारा धागा बनण्यास निश्चितच अधिक वाव आहे. त्यातून योगाची परदेशांतील मागणी वाढत जाणारी आहे.
योग शिक्षण देणार्या प्रमुख संस्था
* मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ योग, नवी दिल्ली
* द योग इन्स्टिटय़ूट, सांताक्रुझ
* परमार्थ निकेतन आश्रम, उत्तराखंड
* रामामानी अय्यंगार मेमोरियल योग संस्थान, पुणे
* भारतीय विद्याभवन, दिल्ली
* बिहार स्कूल ऑफ योग, मुंगेर
* कैवल्यधाम योग इन्स्टिटय़ूट, लोणावळा
* स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्थान, बंगळुरू
* या संस्थांच्या नावानं गुगल केल्यास त्यांचे पत्ते, अधिक माहिती सहज मिळू शकते.
योग कॅपिटल
बूम दिवसेंदिवस वाढतोय. तो कायम राहण्याची आणि अधिकाधिक गतीने विकसित होण्याची शक्यता जगभरातील तज्ज्ञ वर्तवत आहेत. त्यामुळे योगाच्या ग्लोबल कॅपिटल असलेल्या भारताने त्यात आघाडी घेण्याची गरज आहे. अन्यथा याही क्षेत्नात चीन, अमेरिका, युरोप आणि रशिया आगेकूच करतील. कदाचित पुढील काही वर्षात परदेशातील योग एक्स्पर्ट भारतात येऊन भारतीयांना योगाचे महत्त्व समजावून सांगतील, आपल्याला ते पटेल, आवडेल आणि आपण त्यांना त्यासाठी हवे तेवढे पैसेही मोजू..
(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत शहर संपादक असून, योगविषयक अभ्यासक आहेत.)
rahul.ranalkar@hotmail.com